विज्ञान संशोधनाचे महत्त्व

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान विषयातील संशोधन कार्याला मोठे महत्त्व मिळेल असा कयास शिक्षण तज्ज्ञांनी बांधला आहे. संशोधनात्मक कार्याकडे ठरवून वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याकडे समाधानकारक नाही. कारण या क्षेत्रात लगेच उत्तम करिअर घडत नाही, अशी सर्वसाधारण धारणा आहे. ही धारणा कोरोनाच्या निमिताने तरी दूर करायला काहीच हरकत नाही. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
विज्ञानशाखेतील संशोधनात्मक अभ्यासक्रम हे दर्जेदार व नामवंत संस्थांमधून केल्यास करिअरच्या संधी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्या केल्यासुद्धा मिळू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही अशीच एक संस्था. या संस्थेत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावावर मात करण्याच्या अनुषंगाने बंगळूरस्थित काही स्टार्टअपच्या सहकार्याने लस/औषध/परीक्षण/सॅनिटायझेशन/पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स या संदर्भातील नव्या बाबींच्या संशोधनास गती देण्यात आली. या संस्थेतील, सोसायटी फॉर इनोव्हेशन अॅंड डेव्हपलमेंटमार्फत संशोधनात्मक स्टार्टअपला प्रोत्साहित केले जाते. यामध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी दिली जाते.

जागतिक स्तरावरील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत पहिल्या २०० क्रमांकांत येणारी आणि शतकभराचा इतिहास असणाऱ्या या संस्थेत बारावीनंतरचा चार वर्षे कालावधीचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम हा संशोधन क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी झेप घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळेच या अभ्यासक्रमाचे नाव या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स (रिसर्च) असे ठेवले आहे.

गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक केवळ चांगल्या शासकीय/खासगी शिक्षण संस्थेतील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचा विचार करतात, पण फार अल्प प्रमाणात महाराष्ट्रीय पालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आपल्या मुलाला किंवा मुलीला पाठवण्याचा विचार करतात. आपल्या करिअरच्या रोडमॅपमध्ये ही संस्था तशी दुर्लक्षितच राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अतिशय अल्प प्रमाणात महाराष्ट्रीय मुले या संस्थेत आनंदाने गेलेली दिसतात. 

प्रवेश प्रक्रिया ः बारावी विज्ञानशाखेत किमान ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या संस्थेकडे जाण्याचा विचार करू शकतात. (गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये उत्तीर्ण झालेले आणि यंदा बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.) अर्थातच ही पहिल्या टप्प्याची पात्रता झाली. कारण विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी आयआयटीमार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई-मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. ज्या विद्यार्थ्यांना या वाटेने जायचे नसेल ते किशोर विज्ञान प्रोत्साहन योजनेचा मार्ग अवलंबू शकतात. या योजनेत फेलोशिपसाठी निवड झालेले विद्यार्थी निवडीसाठी पात्र ठरू शकतात.  

वेगवेगळ्या एंट्रन्स‍ परीक्षा दिलेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, त्यांची गुणवत्ता यादी संबंधित परीक्षेतील गुणांवर केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याने सर्व परीक्षा दिल्या असतील, तर त्याचा समावेश सर्व परीक्षांच्या यादीत केला जातो. त्याचा गुणानुक्रम आणि उपलब्ध जागा यानुसार प्रवेश निश्चित केला जातो. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्ररीत्या अशाच पद्धतीने केले जाते.

जेईई-मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेत खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी किमान ६० टक्के, ओबीसी-एनसीएल (नॉन क्रिमीलेअर) संवर्गातील विद्यार्थ्याने किमान ५४ टक्के आणि अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने किमान ३० टक्के गुण मिळायला हवेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट (नॅशनल एलिजिब्लिटी कम एंट्रन्स‍ टेस्ट) परीक्षेत जेईई मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीप्रमाणे गुण मिळवायला संबंधित विद्यार्थी या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतो. जेईई- मेन/ॲडव्हान्स्ड आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या नजरेसमोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील प्रवेश ठेवायला हवा.

अत्यल्प शुल्क ः या संस्थेतील अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क वार्षिक १० हजार रुपये आहे. आणखी वार्षिक पाच हजार रुपये खर्च, असे १५ हजार गुणिले चार वर्षे म्हणजे ६० हजार रुपयांमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट विज्ञान संस्थेमधून पदवी मिळू शकते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स परीक्षेमधील त्यांच्या गुणानुक्रमांकानुसार शिष्यवृत्तीही दिली जाते. येथील उत्तम ग्रंथ संग्रहालय आणि प्रयोगशाळा हेवा वाटाव्या अशा आहेत. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आरोग्य सुविधा, मनोरंजनाची साधने, अत्याधुनिक संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्लेसमेंट प्रक्रिया ः या संस्थेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना देशातील अनेक नामवंत व मोठ्या कंपन्या चांगल्या संधी देतात. संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत या संस्था सामील होतात. याशिवाय प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये सामील न होणाऱ्या ज्या कंपन्यांच्या विविध पदांसाठी जाहिराती येतात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मदत केली जाते. त्यासाठी शिफारस पत्र दिले जाते.

वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम ः पदवीस्तरीय अभ्यासक्रमाची संरचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. पहिली दीड वर्षे सर्व विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, मटेरिअल्स अॅंड अर्थ अॅंड एन्व्हायर्न्मेंटल सायन्स या विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आंतरशाखीय विषयांचा पाया मजबूत होतो. या दीड वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची संधी दिली जाते. दीड वर्षानंतर विद्यार्थी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, मटेरिअल्स अॅंड अर्थ अॅंड एन्व्हायर्न्मेंटल सायन्स या विषयांमधून आपल्या आवडीचा आणि गती असलेला विषय स्पेशलायझेशनसाठी निवडू शकतो. हे विषय निवडल्यानंतरही संबंधित विद्यार्थी त्याच्या आवडीच्या इतरही विषयातील ३० टक्के अभ्यासक्रम करू शकतो. त्यामुळे त्याचे आंतरशाखीय ज्ञान आणखी बळकट होण्यास साहाय्य होते. या अभ्यासक्रमातील संपूर्ण एक वर्ष हे संशोधनात्मक प्रकल्पासाठी राखीव ठेवले जाते. अशा प्रकारचा हा एकमेव अभ्यासक्रम आहे.

चार वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याची इच्छा असल्यास आणखी एक वर्ष अभ्यासक्रम करण्याची त्यास संधी मिळू शकते. त्यानंतर त्याला 'मास्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमाला दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
संपर्क ः द असिस्टंट रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर - ५६००१२, दूरध्वनी ः ०८०-२२९३३४४०, फॅक्स  ः २३६००८५३, संकेतस्थळ ः iisc.ac.in, ईमेल ः ar@academic.admin.iisc.ernet.in 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅँड रिसर्च  
विज्ञान विषयातील संशोधनाकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन शाखेकडे वळावे यासाठी भारत सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च (IISER) या स्पेशलाइज्ड संस्थेची स्थापना करण्यात आली. 

जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी-सुविधा-तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेचा विकास सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून केला जात आहे. या संस्थेचे कॅम्पस पुणे, भोपाळ, तिरुअनंतपूरम, मोहाली, तिरुपती, कोलकता, बेरहमपूर या ठिकाणी आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये १,६६२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यातील २५ टक्के जागा जेईई- ॲडव्हान्स्ड या परीक्षेतील गुण आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमधील गुण यावर भरल्या जातात. उर्वरित ७५ टक्के जागा IISER ॲडमिशन टेस्टमधील गुणांवर भरल्या जातात. जेईई- ॲडव्हान्स्ड या परीक्षेतील गुण आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमधील गुण या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या प्रक्रियेतील जागा रिक्त राहिल्यास त्या जागा IISER ॲडमिशन टेस्टमध्ये गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. या संस्थेचा अभ्यासक्रम बी.एस.-एम.एस. (बॅचलर ऑफ सायन्स - मास्टर ऑफ सायन्स) या नावाने ओळखला जातो. त्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमास बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. 

प्रवेश प्रक्रिया ः प्रवेशासाठी तीन पद्धतींचा अवलंब केला जातो  १) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी थेट अर्ज करू शकतात. २) आयआयटी जेईई- ॲडव्हान्स्ड परीक्षा - खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यास बारावीमध्ये ७५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ६५ टक्के गुण मिळायला हवे. तो जेईई- ॲडव्हान्स्ड परीक्षेतही विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थांना पहिल्या दहा हजारांत स्थान मिळायला हवे. ३) संस्थेमार्फत घेण्यात येणारी एंट्रन्स परीक्षा - आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट. यंदा ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी घेतली जाईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता तारखेत बदलसुद्धा होऊ शकतो. 

या तीनही पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागेल. प्रत्येकासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. अर्ज ऑनलाइन भरावा लागतो.

पात्रता ः १) महाराष्ट्र बोर्डातील बारावीची परीक्षा दिलेल्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०२० साठी गुणांचा किमान कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. हे गुण ५०० पैकी आहेत. खुला संवर्ग - ३४५, ओबीसी - एनसीएल संवर्ग - ३४६, अनुसूचित जाती संवर्ग - ३२८, अनुसूचित संवर्ग - ३१९, दिव्यांग संवर्ग - ३१९. हे किमान मिळालेले विद्यार्थीच संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात. सर्व कॅम्पससाठी एकच अर्ज भरावा लागतो. विद्यार्थांना एंट्रन्स परीक्षेत मिळालेले गुण आणि त्याने दर्शविलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन वेगवेगळ्या कॅम्पससाठी प्रवेश निश्चित केला जातो.
अर्थसाहाय्य ः या अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोईंनी युक्त वसतिगृह उपलब्ध करून दिले जाते. या अभ्यासक्रमात पहिल्या दोन वर्षांत मूलभूत विज्ञानशाखेतील सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय निवड येतो.
संपर्क ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे - ४११००८, दूरध्वनी ः ०२०-२५९०८०००, फॅक्स  ः २५९०२०२५, संकेतस्थळ ः http://www.iiseradmission.in/

नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्टद्वारे भुवनेश्वनरस्थित नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या 'मास्टर ऑफ सायन्स' या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम संशोधनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही संस्थांमधील प्रवेशासाठी देशभरातील ९१ केंद्रांवर नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते. या केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई या केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सोईचे ठरू शकतील अशा भोपाळ, हैदराबाद, अहमदाबाद, इंदोर, रायपूर, अशासारख्या केंद्रांचाही समावेश आहे. यंदा ही परीक्षा १० ऑगस्ट २०२० रोजी घेतली जाणार आहे. (कोरोना परिस्थिती बघून यात बदल होऊ शकतो.) या दोन्ही संस्था शासनाच्या अखत्यारितील असल्याने अत्यल्प फीमध्ये हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.

पात्रता ः या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी विज्ञानशाखेच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या परीक्षेद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च, भुवनेश्वनर येथे २०० विद्यार्थ्यांना आणि मुंबईस्थित डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेत ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गांसाठी राखीव जागा ठेवल्या जातात.

डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस 
या संस्थेची स्थापना मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या सहकार्याने करण्यात आली. या संस्थेत स्टेट ऑफ आर्ट्स म्हणजेच अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज अशी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आहे. ही पदवी मुंबई विद्यापीठामार्फत दिली जाते. ही पदव्युत्तर पदवी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यांपैकी कोणत्याही एका विषयातील राहील. पाचही वर्षी विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये उन्हाळी किंवा हिवाळी संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रम संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे.        

संपर्क ः डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा, नॅनो सायन्स बिल्डिंगच्या विरुद्ध दिशेला, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कालिना कॅम्पस, मुंबई - ४०००९८, दूरध्वनी ः ०२२-२६५३२१३२, फॅक्स  ः २६५३२१३४, संकेतस्थळ ः www.cbs.ac.in, ईमेल ः info@cbs.ac.in

नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅँड रिसर्च, भुवनेश्वनर  
या संस्थेची स्थापना डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने २००७ मध्ये केली. संस्थेत सुरू करण्यात आलेला मास्टर ऑफ सायन्स (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रम हा वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणारा आणि उच्च दर्जाचे विज्ञान प्राध्यापकांची निर्मिती व्हावी या अनुषंगाने तयार करण्यात आलेला देशातील पहिला अभ्यासक्रम होय.
संपर्क ः नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च भुवनेश्वनर, पोस्ट ऑफिस जतनी, खुर्दा (ओरिसा) - ७५२०५०, दूरध्वनी ः ०६७४-२४९४००२, फॅक्स  ः २४९४००४, संकेतस्थळः niser.ac.in, ईमेल ः director@niser.ac.in, एनईएसटी परीक्षेविषयी संकेतस्थळ ः www.nestexam.in

ॲकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च 
या संस्थेला भारत सरकारने इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत संशोधनाकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधन सुविधा, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी व नामवंत संशोधकांकडून अध्ययनाची संधी मिळावी, या हेतूने या संस्थेची स्थापना काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेने केली आहे. 

 या संस्थेत बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स, इंजिनिअरिंग सायन्स, मॅथेमॅटिकल अॅंड इन्फर्मेशन सायन्सेस या विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. या संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अति उत्कृष्ट प्रयोगशाळांमध्ये प्रयोगांचे प्रात्यक्षिके करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. 
संपर्क ः सीएसआयआर - एचआरडीसी कॅम्पस, सेक्टर - १९, गाझियाबाद - २०१००२, संकेतस्थळ ः www.acsir.res.in

संबंधित बातम्या