औषध निर्मितीला गती

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध निर्मिती क्षेत्राची वाढ होत राहील. यामुळे औषध निर्माणशास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर हाहाःकार माजला आहे. या विषाणूवर सध्या तरी कोणतेही खात्रीचे औषध नाही. मात्र अमेरिका सरकाराने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आपल्या देशाकडे हायड्रोक्सिक्लोरोक्विन या औषधाची मागणी केली. तेव्हा हे औषध भारताकडे मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. भारताने अमेरिकेबरोबरच इतर अनेक देशांनाही या औषधाचा पुरवठा केला. या बाबीकडे औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि व्यावसायिकांनी अतिशय सकारात्मकतेने बघितले आहे. औषध निर्मितीच्या क्षेत्रात भारत पुढील काळात जगाचा सर्वात मोठा पुरवठादार होऊ शकतो, अशी शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे. कोरोना संकटाने भारतासाठी औषध निर्मितीच्या क्षेत्रात मोठी संधी निर्माण केली आहे.

झपाट्याने वाढ
गेल्या काही वर्षांत देशातील आणि जगातील औषध निर्माण क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मानवी कर्तृत्वाचा आलेख हा उंचच उंच जात असला, तरी या आलेखाला काळवंडण्याचे काम विविध प्रकाराच्या रोग-आजार-विषाणूंचा प्रादुर्भाव यांनी सुरू ठेवले आहे. त्यामुळे दर तीन-चार वर्षांनी कोणत्या ना कोणत्या नव्या विषाणूचा सामना मानवास करावा लागत आहे. त्यासाठी औषधाचा शोध आणि त्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. 

जगातील अनेक राष्ट्रांपेक्षा भारतातील काही राज्यांची लोकसंख्या अधिक आहे. या लोकसंख्येच्या आरोग्यविषयक समस्यासुद्धा वर्षागणिक वाढत आहेत. एकीकडे भारतीयांच्या वयोमर्यादेत वाढ झाली असतानाच वायू-जल व इतर प्रदूषणे आणि इतर कारणांनी भारतीय विविध प्रकाराच्या आजार आणि रोगांच्या विळख्यात सापडत आहेत. देशातील औषध निर्माण क्षेत्राची वाढ या दुर्दैवी वास्तवाला कवटाळून होत आहे. त्याचबरोबर इतरही विकसनशील देशात थोड्याफार फरकाने अशीच स्थिती दिसून येते. एका अंदाजानुसार पुढील तीन-चार वर्षांत या क्षेत्राची वाढ दरवर्षी तीन ते सहा टक्के राहील. ही स्थिती लक्षात घेऊन मोठमोठ्या औषधी निर्माण कंपन्या या आणखी विस्तारीकरणाच्या तयारीला लागल्या आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या औषधांची अधिकाधिक निर्मिती आणि या त्यासाठी लागणाऱ्या खर्चात घट करण्याची व्यूहनीती या कंपन्यांची आखली आहे. यामुळे औषध निर्माणशास्त्र विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. 

गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि जागतिक दर्ज्याशी स्पर्धा करू शकतील अशा औषधांच्या निर्मिती प्रक्रियेचे खरे सूत्रधार हे या विषयातील तज्ज्ञ ठरतात. या तज्ज्ञांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करावे लागते. उपकरणे हाताळावी लागतात. गुणवत्ता आणि दर्ज्याचे थेट संनियंत्रण करावे लागते. त्याची शुद्धता तपासावी लागते, तसेच औषधाच्या निर्मितीमध्ये निर्धारित घटक योग्यरीत्या अंतर्भूत झाले किंवा नाही यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते.

औषध निर्माण या क्षेत्रात करिअर करण्यासाठी रसायनशास्त्रात बी.एस्सी. वा एम.एस्सी. आणि बॅचलर ऑफ फार्मसी हा अभ्यासक्रम केलेला असावा. औषध निर्मितीच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात बी.एस्सी. वा एम.एस्सी. केलेल्या विद्यार्थ्यांची गरज भासते. प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेमध्ये औषध निर्मितीचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. हे ज्ञान डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी तसेच मास्टर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमामुळे मिळू शकते.

फार्म डी
हा सहा वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. डॉक्टर ऑफ फार्मसी असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. या अभ्यासक्रमाची नियंत्रक संस्था फार्मसी काउंसिल ऑफ इंडिया आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला डॉक्टर अशी उपाधी लावता येते. 

या अभ्यासक्रमात बॅचलर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमासाठी असलेल्या विषयांबरोबरच हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी, क्लिनिकल फार्मसी, ड्रग मॉनिटरिंग, क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी, फार्माकोइपिडेमॉलॉजी, ड्रग मॉनिटरिंग, फार्माकोइकॉनॉमिक्स, फार्माकोथेरेपॅटिक्स यांसारख्या विषयांचा समावेश केला जातो. फार्म डी अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी थेट पीएचडीसाठी नाव नोंदवू शकतात.

महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम पुढील संस्थांमध्ये करता येतो ः १) शासकीय औषध निर्माण महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या पाठीमागे उस्मानपुरा, औरंगाबाद, २) शासकीय औषध निर्माण महाविद्यालय, अमरावती, ३) भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी. या संस्थांमध्ये प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

पात्रता ः सहा वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.

बी.फार्म.
महाराष्ट्रातील शासकीय आणि तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेल्या खासगी संस्थांमधील बॅचलर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचसीईटी ही परीक्षा द्यावी लागते. परीक्षेतील गुणानुक्रमानुसार व पसंतीक्रमानुसार प्रवेश दिला जातो.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 
ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने दर्जेदार शैक्षणिक संस्था म्हणून देश विदेशात नाव कमावले आहे. या संस्थेतील बी.फार्म. अभ्यासक्रम करिअर घडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आला आहे. हा अभ्यासक्रम १९५९ मध्ये सुरू करण्यात आला. अशा प्रकारचा हा पहिला अभ्यासक्रम होता.

या अभ्यासक्रमामध्ये औषध निर्मिती क्षेत्रासाठी आवश्यक असणारे मेडिकल केमिस्ट्री, फार्माकॅलॉजी, फार्मास्युटिकल ॲनॅलिसिस या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. औषध निर्मितीसाठी आवश्यक असणारे सैद्धांतिक ज्ञान संपूर्णपणे विद्यार्थ्यांना मिळावे, औषध निमिर्तीच्या सूत्रांचा विकास करता यावा, औषधांचा प्रभाव, उपयुक्तता आणि परिणामांचे विश्‍लेषण करता यावे आणि प्रत्यक्ष निर्मितीचे तंत्रही अवगत करता येणे शक्य व्हावे या अनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सैद्धांतिक पाया मजबूत व्हावा यासाठी ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबॉयलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक फार्मसी, मॅनेजमेंट या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. 

हा अभ्यासक्रम संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमार्फत चालवला जातो. विद्यापीठ अनुदान आयोगाने या विभागाला सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज इन फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशी मान्यता प्रदान केली आहे. या विभागात अत्याधुनिक अशी उपकरणे आणि यंत्रसामग्री संशोधन कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. देश आणि विदेशातील औषधी उद्योगासाठी अनेक प्रकल्प विभागामार्फत राबवण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लशीच्या शोधासाठी हा विभाग पुढाकार घेत आहे. या अभ्यासक्रमाला एमएचसीईटी मधील गुणांवर प्रवेश दिला जातो. 
संपर्क ः इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई - ४०००१९, दूरध्वनी ः ०२२-३३६१११११    

संबंधित बातम्या