वाणिज्य शाखेतील राजमार्ग

सुरेश वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी

आपल्या देशातील दिल्लीस्थित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, हे वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी गेल्या काही वर्षांत दर्जा, गुणवत्ता, प्लेसमेंट आणि पॅकेजबाबत सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे. या संस्थेला १०० वर्षे झाली आहेत. केवळ १२ विद्यार्थ्यांसह स्थापन झालेल्या या संस्थेत सध्या दोन हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  
दिल्लीच्या दरयागंज भागात स्थित या संस्थेकडे देशातील विविध भागातील विद्यार्थी वाणिज्य आणि अर्थशास्त्रातील शिक्षण घेण्यासाठी आकर्षित होत असतात. अतिउत्कृष्ट शिक्षण आणि सर्वोच्च श्रेणीची गुणवत्ता ही या संस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. वर्षानुवर्षे ही वैशिष्ट्ये घट्ट होत गेली आहेत. बारावीमध्ये उत्तम कामगिरी करणारे अनेक राज्यांतील विद्यार्थी या ठिकाणी येतात, त्यामुळे या संस्थेची स्पर्धात्मकता वाढलेली आहे. अध्यापनात रस असणाऱ्या या संस्थेतील विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ बिझनेस अशासारख्या उच्च दर्जांच्या संस्थांमध्ये संधी मिळाली आहे.

इनक्युबेशन सेंटर 
उद्योजकता वाढीसाठी आवश्यक असणारे कौशल्य व मनोवृत्ती वाढीस लागावी यासाठी या संस्थेत इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सर्जनशील कल्पनांवर मुक्तपणे चर्चा करण्याची संधी मिळते. या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी हे केंद्र सर्व प्रकारचे साहाय्य करते. पदवी स्तरावरील मुलांसाठी अशा प्रकारचे केंद्र स्थापन करणारी ही आपल्या देशातील कदाचित एकमेव संस्था असावी. समाजासाठी उपयुक्त ठरणारे अनेक प्रकल्प कॉर्पोरेट संस्थांच्या साहाय्याने राबवले जातात. 

अभ्यासक्रम ः बारावीमध्ये ९७ ते ९८ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला इथे प्रवेश मिळू शकतो. संस्थेत बी.ए (ऑनर्स) इन इकॉनॉमिक्स आणि बी.कॉम (आनर्स) हे दोन अभ्यासक्रम करता येतात. संस्थेत १२० च्या आसपास अनुभवी अध्यापक आहेत. 

इंटर्नशिपची संधी ः अभियांत्रिकी अथवा एमबीए अभ्यासक्रम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये ज्याप्रमाणे इंटर्नशिपची संधी मिळत असते. तशीच संधी या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही मिळत असते. गुगल, डेलॉईट, नोमुरा, डेल, केपीएमजी, एसबीआय, सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, बर्कले या संस्था इंटर्नशिपची संधी देतात. 

प्लेसमेंट ः या महाविद्यालयातील पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना वार्षिक कमाल म्हणजे जास्तीत जास्त ३१ लाख रुपये ते किमान साडेसहा लाख रुपये असे पॅकेज गेल्या दोन-तीन वर्षांत मिळाले आहे. या संस्थेतील अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि दर्जा लक्षात घेऊन संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत गुगल, सिटी बँक, मॅकन्जी, डैयूस्चे बँक, उबर आदी सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदांसाठी निवड करतात.
संपर्क ः मॉरिस नगर, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली - ११०००७, दूरध्वनी ः ०११-२७६६६५१९, फॅक्स क्रमांक ः २७६६६५१०, 
संकेतस्थळ ः srccgbo.edu.in, 
ईमेल ः info@srccgbo.edu.in

इतर महत्त्वाच्या संस्था
गेल्या काही वर्षांत वाणिज्य शाखेत देशात सातत्याने सर्वोच्च श्रेणीत राहणारी महाविद्यालये-डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स-ख्रिस्त युनिव्हर्सिटी-बंगळूर, लॉयोला कॉलेज - चेन्नई, हंसराज कॉलेज - दिल्ली, सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स - बंगळूर, हिंदू कॉलेज - दिल्ली, रामजास कॉलेज - दिल्ली, क्रिस्तू जयंती कॉलेज - बंगळूर, मद्रास ख्रिस्तियन कॉलेज-चेन्नई, सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स - बंगळूर, श्री वेंकेटश्वरा कॉलेज - दिल्ली, आत्माराम सनातनधर्म कॉलेज - दिल्ली. 

महाराष्ट्रातील संस्था
१) मुंबई - के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अॅंड कॉमर्स, मिठीबाई कॉलेज, चौव्हान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅंड अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकॉनॉमिक्स, केबीपी हिंदूजा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकॉनॉमिक्स, नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकॉनॉमिक्स, एल. एस रहेजा कॉलेज ऑफ आर्ट्स अॅंड कॉमर्स, आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स, एच. आर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकॉनॉमिक्स, सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकॉनॉमिक्स, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, व्ही. जी. वझे कॉलेज, मोहनलाल रायचंद मेहता कॉलेज ऑफ कॉमर्स - नवी मुंबई.

२) पुणे - नेस वाडिया कॉलेज, सेंट मिराज् कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅंड कॉमर्स, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्टस अॅंड कॉमर्स, इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स, सर परशुरामभाऊ कॉलेज, एमआयटी - आर्टस, कॉमर्स अॅंड सायन्स कॉलेज, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स.

सरासरी पॅकेज
 महाविद्यालयांचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन कंपन्या आणि कॉर्पोरेट हाऊस, वाणिज्य शाखेतील पदवीधरांना आपल्या प्रारंभिक स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी निवडू लागले आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे वार्षिक सरासरी पॅकेज दिले जाते - हिंदू कॉलेज दिल्ली - पाच ते साडे पाच लाख रुपये, हंसराज कॉलेज, दिल्ली - पाच ते सव्वा पाच लाख रुपये, क्रिस्तू जयंती कॉलेज, बंगळूर - चार ते पावणे पाच लाख रुपये, किरोरीमल कॉलेज दिल्ली - चार ते साडेचार लाख रुपये. (हे आकडे मागील एक-दोन वर्षांतील आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, दर्जा यांनुसार सरासरी पॅकेजमध्ये फरक पडत जातो.)

संबंधित बातम्या