कारोनोत्तर काळातील डिझायनर्स 

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने घर, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये, हॉटेल्स, बस स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणांचे डिझाइन बदलण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात इंटिरियर डिझायनर्सना वेगळ्या संधी मिळू शकतात.

इंटिरियर डिझायनिंगमधील बदल हळूहळू घडू लागले आहेत. त्या अनुषंगाने अनेकांनी विचार सुरू केलेलाच आहे. त्यामुळे इंटिरियर डिझायनर्सना अनेक संधी आहेत. आपण इंटिरियर डिझायनिंग अभ्यासक्रमाचा विचार करू. कोणत्याही ज्ञानशाखेतील फक्त ५० टक्क्यांच्या आसपास गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येणे शक्य आहे. तुमच्यामध्ये जरा हटके करण्याचा किडा सारखा वळवळत असल्यास हे क्षेत्र अमर्याद संधी मिळवून देऊ शकते. 

काय शिकाल ?
घर असावे छान असे सध्याचे ब्रीदवाक्य नसूव घर दिसावे स्मार्ट, असे आहे. घराला स्मार्टपणा आणण्याची जादू इंटिरियर डिझायनरला प्राप्त झालेली असते. इंटिरियर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, या जादूमध्ये तज्ज्ञता प्राप्त व्हावी म्हणून, स्केचिंग, ड्रॉइंग, डिझायनिंगची मूलभूत तत्त्वे, डिझायनिंगच्या दृष्टीने आवश्यक असणारी भूमितीय कौशल्ये आणि तंत्र, अभियांत्रिकी चित्रकला/ग्राफिक्स, डिझायनिंगची विविध साधने, दृश्‍यात्मक आरेखन, छायाचित्रण कला, संगणकाची मूलभूत तत्त्वे, संकल्पनेचे डिझाइन आणि चित्रांकन, अंतर्गत सजावटीचा इतिहास, सौंदर्यकला, आकृती आणि आकार, रंगसंगती, त्यासाठी वापरली जाणारी साधने व साहित्य, डिझायनिंगची कार्यपद्धती, अंतर्गत सजावटीची प्रक्रिया, डिझायनिंगची प्रतिकृती, कलाकुसरीवर आधारित डिझायनिंग, सार्वजनिक ठिकाणचे डिझायनिंग, वाणिज्यक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांचे इंटिरियर डिझायनिंग, मोठ्या इमारती अथवा मॉलची दृश्यात्मकता वाढवण्याचा अभ्यास, डिझायनिंग व्यवस्थापन, डिजिटल मॉडेलची निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष प्रतिकृती, सांस्कृतिक अभ्यास, अंतर्गत सजावटीसाठी आवश्यक असणाऱ्या छायात्रिणाचे तंत्र, निवासी संकुलांचे डिझायनिंग, नवकल्पनेचे सर्जन, अंतर्गत विद्युत्प्रकाश, वास्तुकलेची मूलभूत तत्त्वे, वस्तुसंग्रहालये आणि चित्रगॅलरींच्या डिझाइन संकल्पना, प्रदर्शनाचे डिझाइन, ग्राहकाच्या संकल्पनेनुसार डिझायनिंगचे तंत्र, वैश्‍विक डिझायनिंग आणि शाश्‍वतता इत्यादी बाबींचा समावेश असतो. अशी या अभ्यासक्रमाची ढोबळमानाने रूपरेषा आहे. 

इंटिरियर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांचा समावेश असतो. शिवाय इंटिरियर डिझायनिंगच्या वेगवेगळ्या कंपन्या, फर्म्स, बिल्डर यांच्याकडे इंटर्नशिप करण्याचीही संधी मिळते. या कालावधीत आपण शिकलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर प्रभावीपणे करता आला, तर आपल्या करिअरचा पुढचा मार्ग सुलभ होऊ शकतो. 

परिश्रम आणि संयम
इंटिरियर डिझायनिंगचा अभ्यासक्रम केल्याबरोबर लगेच दुसऱ्या क्षणाला चांगली नोकरी मिळेल वा मोठी कामे मिळतील, असे शक्य होत नाही. कारण या क्षेत्रात बाप दाखव - श्राद्ध कर - दक्षिणा घे, हा सिद्धांत महत्त्वाचा ठरतो. इंटिरियर डिझायनिंग ही कलाकारी आहे. कोणत्याही कलाकारास पहिल्याच झटक्यात अपवादानेच संधी मिळते. त्याला आपली कला सिद्ध करण्यासाठी संयमाने प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. तुमची फुललेली प्रतिभा एखाद्याच्या लक्षात आली, तर तोच तुमचा वाटाड्या ठरतो आणि नव्या नव्या ग्राहकांना तुमच्याकडे आणि तुम्हाला या ग्राहकांकडे पोचवतो. पदवीस्तरीय कालावधीतील सैद्धांतिक पाया आणि त्यानंतरचा अनुभवाचा पाया खणखणीत असेल, तर मग तुमची गाडी सुसाट पळू शकते.

अनुभवाचा फायदा
चांगल्या अनुभव प्राप्त इंटिरियर डिझायनर्सना मोठी मागणी असते. असे डिझायनर्स अनेकदा घराच्या एकूण किमतीच्या काही टक्केवारीमध्ये शुल्क आकारतात. असे डिझायनर्स हे अत्यंत उच्च दर्जाची सेवा देतात. सर्व आधुनिक तंत्रांचा आणि प्रवाहांचा कौशल्यपूर्ण वापर करतात. ग्राहकांचे पूर्ण समाधान होईपर्यंत काम करतात. ग्राहकांच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्याकडील निधीनुसार जे डिझायनर्स उत्तम काम करतात, त्यांना पुढील संधी गतीने मिळू लागते. मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-नागपूर या अ श्रेणींच्या शहरांसह ब आणि क श्रेणीच्या शहरांमध्येही मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. वाणिज्यक कार्यासाठी लागणाऱ्या इमारती उभ्या राहत आहेत. रुग्णालये - रिसॉर्ट्स - हॉटेल्स - पंचतारांकित निवासस्थाने - सेवा उद्योग देणारी कार्यालये उभी राहत आहे. अशा सर्वांचाच कल हा इंटिरियर डिझायनिंगकडे असतो. आपल्या एकूण खर्चाचा काही भाग यासाठी बाजूला काढलेला असतो. त्यामुळेच इंटिरियर डिझायनर्सचे मार्केट वाढत चालले आहे. 

व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी इंटिरियर डिझायनर होण्यासाठी या विषयाचा अभ्यासक्रम चांगल्या संस्थांमधून करायला हवा. या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने चांगल्या संस्था या चाळणी परीक्षा घेऊन प्रवेश देतात. या परीक्षा सर्वसाधारण स्वरूपाच्या असतात. विद्यार्थ्यांचा इंटिरियर डिझायनिंगचा कल बघण्यासाठी प्रश्‍न विचारले जातात. चित्रकला-रेखांकन या विषयीच्या मूलभूत माहितीची संबंधित विद्यार्थ्याची झेप कुठपर्यंत जाते हे तपासले जाते. शिवाय समकालीन घडामोडीवर काही प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. परीक्षेचा दर्जा हा बारावीचा असतो. बहुतेक सर्व परीक्षा या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच्या म्हणजेच वस्तुनिष्ठ पद्धतीच्या असतात.

इंटिरियर डिझायनिंगचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही संस्था  
१) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ः या संस्थेने बॅचलर ऑफ डिझाइन इन फर्निचर अँड इंटिरियर डिझायनिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. इंटिरियर डिझायनिंगमध्ये फर्निचरचा लक्षणीय सहभाग असतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्निचर डिझायनिंगचे अतिरिक्त ज्ञान मिळते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. हा अभ्यासक्रम आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम समजला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. ही परीक्षा डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट (डीएटी) या नावाने ओळखली जाते. त्याचे प्राथमिक आणि मुख्य असे दोन भाग असतात.  प्राथमिक परीक्षेतील गुणांवर आधारित विशिष्ट संख्येत मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले जातात. या परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी admissions.nid.edu या संकेतस्थळावर जाहीर केली जाते. 
संपर्क ः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पाल्डी, अहमदाबाद - ३८०००७, दूरध्वनी : ०७९-२६६२९५००, संकेतस्थळ : www. nid.edu, ईमेल : academic@nid.edu आणि admission@nid.edu  

२) सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स ः या संस्थेने बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन इंटिरियर डेकोरेटर हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालवधी तीन वर्षांचा आहे. इंटिरियर डिझायनरचे करिअर घडविण्यासाठी हा एक प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. प्रवेशासाठी शासनाच्या सीईटीमार्फत प्रवेश दिला जातो. 
संपर्क ः  सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, ७८, डॉ. डी. एन. रोड फोर्ट, मुंबई - ४००००१, दूरध्वनी : ०२२-२२६२१६५२, संकेतस्थळ  https://www.sirjjschoolofart.in/, ईमेल : jjschoolofart@gmail.com 

३) युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम एज्युकेशन अँड स्टडीज ः या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ डिझाइन इन इंटिरियर अँड रिटेल स्पेस डिझायनिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी : चार वर्षे. पात्रता : कोणत्याही विषयातील बारावी. यूपीईएस डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो. ही ऑनलाइन परीक्षा आहे.
संपर्क ः  एनर्जी एकर्स, पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया प्रेमनगर, डेहराडून - २४८००७, दूरध्वनी : ०१३५-२७७०१३७, फॅक्स : २७७६०९५, ईमेल : enrollment@upes.ac.in

४) आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड मीडिया ः या संस्थेने चार वर्षे कालावधीचा बॅचलर ऑफ डिझाइन इन इंटिरियर डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेल्या विषय घटकांमुळे पुढील करिअर संधी मिळू शकतात - (१) इंटिरियर डिझायनर, (२) डिझाइन फोटोग्राफर, (३) सेट डिझायनर, (४) मॉडेल मेकर, (५) थ्रीडी व्हिज्युअलायझर, (६) कॉम्प्युटर एडेड ड्राफ्ट्समन, (७) इंटिरियर स्टायलिस्ट, (८) व्हिज्युअल मर्चंडायझर
संपर्क ः सुविधा चौक, स्वामी विवेकानंद रोड, केवनी पाडा- अंधेरी (पश्‍चिम) मुंबई, संकेतस्थळ : itm.edu.in 

५) जे. डी. इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ः या संस्थेने तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी. इन इंटिरियर डिझाइन अँड डेकोरेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. 
संपर्क ः  ७९, सेकंड क्रॉस, लॅव्हले रोड, बंगळूर - ५६०००१, दूरध्वनी : ०८०- २२२७ ९९२७, संकेतस्थळ : https://www.jdinstitute.com/, ईमेल : jdfashion@jdindia.com

६) रचना संसद ः रचना संसद ही इंटिरियर डिझाइनचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी महत्त्वाची खासगी संस्था आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये बॅचलर ऑफ व्होकेशन इन इंटिरियर डिझाइन हा पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे आहे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. पात्रता : कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी कल चाचणी घेतली जाते. 

संस्थेचे इतर अभ्यासक्रम  
गव्हर्न्मेंट डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन - हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. कालावधी तीन वर्षे. तो अंशकालीन म्हणजेच पार्ट टाइम करता येतो. पात्रता : दहावी उत्तीर्ण. सर्टिफिकेट अँड ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन इंटिरियर डिझाइन - दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हे अभ्यासक्रम करता येतात. हे अभ्यासक्रम रचना संसदेने सुरू केले आहेत. ते अंशकालीन पद्धतीने करता येणे शक्य आहेत. संपर्क ः २७८, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी मुंबई - ४००२५, दूरध्वनी : २४३०१०२४, ईमेल : contact@rachanasansad.edu, संकेतस्थळ : in rachanasansad.edu.in

७) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ः या संस्थेत इंडस्ट्रियल डिझाइन शाखेत इंटिरियर स्पेस डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. 
पात्रता : कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. दहावीनंतर तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीसुद्धा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत सिम्बायोसिस एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन, ही चाळणी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कल चाचणी/स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते. 
संपर्क ः सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, रस्ता क्रमांक- २३१/४ ए, विमान नगर, पुणे - ४११०१४, दूरध्वनी - ०२०-२६६३४५४६/४७/४८, फॅक्स : २६६३४५४९, संकेतस्थळ : www.sid.edu.in, ईमेल : admissions@sid.edu.in

८) एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ः या संस्थेत इंटिरियर अँड स्पेस डिझाइन कोर्स हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे. 
पात्रता : हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतो. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्ट ही चाळणी परीक्षा द्यावी लागते.
संपर्क ः एमआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोणी-काळभोर, पुणे - ४१२२०१, दूरध्वनी : ०२०- ३०६९३६००, संकेतस्थळ : /www.mitid.edu.in, ईमेल : admissions@mitid.edu.in

९) श्रिष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी ः या संस्थेत इंटिरियर डिझाइन अँड बिल्ड, हा तांत्रिक बाबींवर भर देणारा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कनुसार या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. कालावधी तीन वर्षे आहे. 
पात्रता : या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील बारावी विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. ही निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाते.
संपर्क : सीए साइट नंबर- २१, फिफ्थ फेज, केएचबी कॉलनी, येलाहंका न्यू टाऊन, बंगळूर - ५६००६४, दूरध्वनी : ०८०- ४९०००८००, संकेतस्थळ : http://srishti.ac.in, ईमेल : admissions@srishti.ac.in  

संबंधित बातम्या