व्यवस्थापकीय कौशल्याचा प्रारंभ

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी
 

लहान वयात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देणारा अभ्यासक्रम म्हणजे बीबीए. गेल्या काही वर्षांत या अभ्यासक्रमाने उंच उडी घेतली असली, तरी अभ्याक्रमाला प्रवेश घेण्याआधी त्याविषयी माहिती करून घेणे आवश्‍यक आहे.

बंगळूरस्थित ख्रिस्त युनिव्हर्सिटीचे नाव काही जणांच्या कानांवरून गेले असेल, तर काही जणांना कदाचित या संस्थेविषयी काहीही माहिती नसेल. ही युनिव्हर्सिटी 'डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी' या दर्जाची आहे. या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज विभागाचा, गेल्या तीन वर्षांत पदवीस्तरीय व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या रँकिंगमध्ये  देशस्तरावर पहिल्या तीन क्रमांकांमध्ये समावेश होत आला आहे. या संस्थेतील 'बीबीए' म्हणजेच 'बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज' हा अभ्यासक्रम देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांपैकी एक समजला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी सरासरीने पाच ते साडेपाच लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. काही विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता आणि दर्जा यानुसार अधिक पॅकेज मिळाले आहे.

 गेल्या काही वर्षांत बीबीए अभ्यासक्रमाने घेतलेली उंच उडी या क्षेत्रात जाणाऱ्यांसाठी फायदेशीर अशीच ठरणारी आहे. बीबीएला मिळणारे महत्त्व बघून अनेक शहरातील अनेक संस्थांनी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पण या अशा कोणत्याही संस्थेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना काळजी घेणे गरजेचे आहे.

बीबीएचा मार्ग
वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी या व्यावसायिक आणि कला-वाणिज्य-विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे करण्याची इच्छा, मानसिक तयारी आणि धाडस असल्यास बीबीएच्या मार्गाने जाऊन उत्तम करिअर घडवता येणे शक्य आहे. या अभ्यासक्रमाला बारावीनंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला प्रवेश घेता येतो. बीबीए अभ्यासक्रमामध्ये वित्त - फायनान्स, कार्यान्वयन व्यवस्थापन - ऑपरेशनल मॅनेजमेंट, व्यवसाय आणि औद्योगिक कायदे - बिझनेस अॅंड इंडस्ट्रियल लॉ, व्यवसाय पर्यावरण - बिझनेस एन्व्हायरर्मेंट, अर्थशास्त्र - इकॉनॉमिक्स, गणित हे विषय शिकवले जातात. उद्योग व व्यवसायाला लागणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आला आहे. बीबीए अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. मात्र, दिल्ली विद्यापीठात या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. दिल्ली विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा 'बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज' या नावाने ओळखला जातो.

संधी 
हा अभ्यासक्रम केल्यावर लहान वयात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. (अशी संधी नामवंत आणि दर्जेदार संस्थांमधूनच मिळू शकते. कारण या संस्थांमध्ये कॉर्पोरेट कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात.) बीबीए पदवी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रारंभीच्या विविध करिअर संधी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ही पदवी घेतलेल्या उमेदवारांचे, ज्ञान - जाण - आकलन - कल - कौशल्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या पॅकेजची रक्कम ठरत असते. काही विद्यार्थ्यांना १५ लाख रुपयांपर्यंतही पॅकेज मिळाले आहे. बीबीए आणि त्यानंतर एकदोन वर्षाचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांना, एमबीएचे शिक्षण देणाऱ्या देशातील नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे सुलभ होऊ शकते. त्याचबरोबर एमबीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या इतर शाखांमधील विद्यार्थ्यांपेक्षा हे विद्यार्थी चार पावले पुढे राहू शकतात. कारण एमबीए अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या बऱ्याच सैद्धांतिक बाबी, बीबीएचे विद्यार्थी आधीच शिकलेले असतात. 

कॉर्पोरेट कंपन्यांना प्रारंभिक व्यवस्थापकीय गरजा भागविण्यासाठी कौशल्यप्राप्त उमेदवार हे बीबीए पदवीधरांच्या स्वरूपात उपलब्ध होत असल्याने त्यांना पटकन नोकरी दिली जाते. या पदवीधारकांना, कॉस्ट एस्टिमेटर, लॉस प्रिव्हेंशन मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सप्लाय चेन मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर, ब्रँड मॅनेजर, कम्युनिकेशन मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर, वेअर हाऊस मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, स्ट्रॅटेजिक कंन्सल्टिंग असोशिएट, बिझनेस ॲनालिस्ट, इक्विटी रिसर्चर अशी पदे दिली जातात.

 बीबीए पदवीअंतर्गत बीबीए - जनरल, बीबीए - मार्केटिंग अॅंड सेल्स, बीबीए - फायनान्स अॅंड अकाउंटन्सी, बीबीए - फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, बीबीए प्लस एमबीए असे स्पेशलायझेशन करता येणे शक्य आहे. 

आर्थिक मंदीमुळे वरच्या श्रेणीच्या नोकऱ्या एमबीए पदवीधरांना मिळणे दरवर्षी कठीण होत चालले आहे. मात्र, प्रारंभिक पातळीवरील बीबीए पदवीधरांच्या प्रवेशावर फारसा फरक पडलेला दिसत नाही. अशा पदांवर एमबीए पदवीधरांपेक्षा बीबीए पदवीधरांना नोकरी देणे कंपन्यांसाठी किफायतशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या - पीडब्ल्यूसी, देउत्स्चे बँक ग्लोबल ऑपरेशन्स, यूबीएस व्हेरिटी नॉलेज सोल्युशन्स, प्रोटिव्हीटी, प्राइस वॉटर हाऊस कूपर, अर्न्स्ट अॅंड यंग, ट्रेव्हिस्टा, एचडीएफसी, कॉनवोनिक्स, इॲटॉन इंडस्ट्रीज, मैरस्क, एचएसबीसी, कॉटेऑन, बालाजी टेलिफिल्म, आय रिसर्च, केपीएमजी, झोमॅटो इत्यादी.

बीबीएची उपयुक्तता
बारावीनंतर बीबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर आता पुढे काय? असा जो करिअर निवडण्याबाबतचा गोंधळ असतो, तो वयाच्या अठराव्या वर्षीच संपून जाऊ शकतो. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय या सर्वप्रिय व्यावसायिक अभ्यासक्रमांइतकेच यश बीबीए पदवीधरांना मिळू शकते. 

अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्राच्या सैद्धांतिक बाजू आणि पैलूंचा सखोलपणे अभ्यास करता येतो. व्यवस्थापन शाखेकडे सर्वसमावेशकरीत्या बघण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. एमबीए पदवी घेण्यासाठी लागणाऱ्या कितीतरी कमी खर्चात बीबीएच्या रूपाने व्यवस्थापनशास्त्र शिकता येणे शक्य होते. त्यामुळे लहान वयातच आर्थिकदृष्ट्या सक्षम होता होते. बारावीनंतर एमबीए होण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागतात. बीबीए मात्र तीन ते चार वर्षांतच होता येते. लहान वयातच व्यवस्थापकीय क्षेत्रात प्रवेश होत असल्याने व्यवस्थापनाच्या सैद्धांतिक बाबींचा अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे वापर करण्याचे कौशल्य विकसित होत जाते.

पदवी घेतल्यानंतर कॉर्पोरेट विश्वात शिरण्याचा विचार बरेच विद्यार्थी करतात. त्यांना ही बाब एमबीए केल्यानंतरच शक्य होते. तेसुद्धा चांगल्या नामवंत शिक्षण देणाऱ्या संस्थेतून एमबीए अभ्यासक्रम केला तरच. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय कठीण आणि स्पर्धात्मक अशा कॅट/एन-मॅट/एमएच-सीईटी-एमबीए, एमएमएस/झॅट या परीक्षेत उत्तम गुण मिळाले, तरच चांगल्या एमबीए संस्थेत प्रवेश मिळू शकतो. ही बाब लक्षात घेतली, तर बीबीए अभ्यासक्रम करणे हे उपयुक्त ठरू शकते. 

बीबीए इन आयटी
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अॅंड रिसर्च या संस्थेने 'बीबीए इन आयटी' असा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट टेक्नॉलॉजी, डेटाबेस्ड मॅनेजमेंट सिस्टीम, सिस्टीम अॅंड सॉफ्टवेअर प्रॅक्टिसेस, वेब कंटेट मॅनेजमेंट, सायबर लॉ अॅंड रेग्युलेटरी कप्लायन्स, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट, आयटी रिस्क मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टू ग्रीन आयटी यांचा समावेश आहे. 

बीबीए अभ्यासक्रम चालवणाऱ्या महत्त्वाच्या संस्था 
(१) नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेअंतर्गत कार्यरत अनिल सुरेंद्र मोदी स्कूल ऑफ कॉमर्स - मुंबई, (२) शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज - दिल्ली, (३) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - ख्रिस्त युनिव्हर्सिटी - चेन्नई, (४) लॉयोला कॉलेज - चेन्नई, (५) मद्रास ख्रिश्चियन कॉलेज - चेन्नई, (६) प्रेसिडन्सी कॉलेज - बंगळूर, (७) ॲमिटी स्कूल ऑफ बिझनेस-नोईडा, (८) माउंट कार्मेल कॉलेज - बंगळूर, (९) सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट - पुणे, (१०) जे. डी बिर्ला इन्स्टिट्यूट - डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट - कोलकता, (११) आयएफआयए कॉलेज - बंगळूर, (१२) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अॅंड रिसर्च - पुणे, (१३) महाराजा सुरजमल इन्स्टिट्यूट - नवी दिल्ली, (१४) एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅंड टेक्नॉलॉजी - चेन्नई, (१५) नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स - पुणे, (१६) जगन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - नवी दिल्ली, (१७) कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी - भूवनेश्वर, (१८) क्रिस्तू जयंती कॉलेज - बंगळूर, (१९) गोस्वामी दत्त कॉलेज - गांधीनगर, (२०) एथिराज कॉलेज फॉर वूमेन - चेन्नई, (२१) जगन्नाथ इंटरनॅशनल मॅनेजमेंट स्कूल - नवी दिल्ली, (२२) सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज - जैन युनिव्हर्सिटी - बंगळूर, (२३) स्कूल ऑफ मॅनेजमेंट - नोईडा, (२४) प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड रिसर्च - इंदोर, (२५) रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्‌स सायन्स अॅंड कॉमर्स - बंगळूर, (२६) इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अॅंड मीडिया - पुणे, (२७) सेंट मिराज् कॉलेज फॉर गर्ल्स - पुणे, (२८) एमआयटी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅंड सायन्स - पुणे, (२९) इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड सायन्स - पुणे.

संबंधित बातम्या