विधी शिक्षण क्षेत्र

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

विधी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना आज वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी हे शिक्षण दर्जेदार शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांमधून घेणे गरजेचे आहे. अशाच काही नामवंत विधीविषयक शिक्षण संस्थांविषयी...  

नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी या संस्थेने गेल्या काही वर्षांत विधी शिक्षणात देशात पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. संस्थेने विधी शिक्षणप्रकियेत उच्च दर्जा आणि गुणवत्ता स्थापित केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरील मान्य झालेले आधुनिक प्रवाह तातडीने समाविष्ट केले जातात. ही संस्था २३ एकरच्या विस्तृत परिसरात वसली आहे. शासनाच्या आर्थिक पाठबळावर ही संस्था तीस वर्षांपूर्वी सुरू झाली. या कालावधीत संस्थेच्या गुणवत्तेत सातत्याने भर पडत गेली आहे.

वेगळी ओळख ः
आपल्या देशात या संस्थेने विधी शिक्षणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेमार्फत अभ्यासक्रमात सातत्याने नावीन्यता आणली जाते. समाजाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या पैलू आणि बाजूंचा ठळकपणे अभ्यास केला जातो. विधी शिक्षणाची दिशा ही न्यायाशी सुसंगती साधणारी ठेवली जाते. सातत्याने सामाजिक हिताच्या समस्या, प्रश्नांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांच्या जागृतीसाठी ही चर्चासत्रे उपयुक्त ठरली आहेत. या संस्थेने गेल्या वर्षी याच हेतूने मार्जिनलाइज्ड कम्युनिटी स्टडी सेंटर आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिसर्च अॅंड ॲडव्होकसी आणि इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अॅंड एथिक्स इन मेडिसिन या गटांची स्थापना केली. यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे सामाजिक विषयांवर आपली मते मांडता येतात, भाष्य करता येते. सामाजिक समस्यांच्या निर्धारणासाठी कोणत्या नव्या कायद्यांची गरज आहे, याविषयी विचारमंथन केले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या विचार करण्याची संधी दिली जाते. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर अध्यापकांच्या विरोधात मते व्यक्त करतात, त्यांना आव्हान देतात. त्यांच्या प्रश्नांना बगल न देता, उत्तरे दिली जातात.

विधी विषयाशी संबंधित मुख्य अभ्यासक्रमांबरोबर इतर वेगळे विषय उदाहरणार्थ - निवडणूक सुधारणा, सायबर सुरक्षा, अंतराळ कायदे, स्पर्धात्मक कायदे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य काळजी असे विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. दररोज दुपारचा वेळ सामाजिक विषयांच्या वादविवादासाठी ठेवला जातो. यासाठी संबंधित विषयातील शासकीय, सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि विधी क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले जाते. यातील काही तज्ज्ञ अध्यापनासाठी येत असतात. या संस्थेकडे अत्यंत समृद्ध असे ग्रंथालय आहे. परीक्षेच्या काळात मध्यरात्रीपर्यंत हे ग्रंथालय सुरू राहते.

प्रवेश प्रक्रिया ः या संस्थेत बी.ए-एलएलबी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा संपूर्ण निवासी स्वरूपाचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी नाव नोंदवणे आवश्यक आहे. बंगळूर येथील विद्यार्थी असला, तरी त्यास वसतिगृहातच राहावे लागते.

प्रवेशासाठी कॉमन लॉ ॲडमिशन परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत पहिल्या ७५ ते १०० क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे सुलभ होऊ शकते. पहिल्या ५०० विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही संस्था असते. संस्थेतील शिक्षण हे बहुआयामी आणि प्रात्यक्षिकांवर भर देणारे असते. शिकवण्याच्या प्रकियेत प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन, चर्चासत्रे, प्रकरण निहाय अभ्यास, अभिरूप न्यायालयाचे कामकाज आणि प्रकल्पकार्य अशा बाबींचा समावेश असतो. 

अभिनव पद्धती ः या संस्थेने अध्यापनाची एक नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. यानुसार एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक अध्यापक शिकवतात व विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे समाधान करतात. सामाजिक आणि न्यायिक समस्यांच्या बहुज्ञानशाखीय विश्लेषणात्मक निराकरणाच्या दृष्टीने ही अध्यापन प्रक्रिया उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थी कोलंबिया, येल, हारवर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिज, वारविक, मिशीगन यांसारख्या जागतिक श्रेष्ठत्वात वरच्या श्रेणीत असणाऱ्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी निवडले गेले आहेत. ऱ्होडस आणि इनलेक्ससारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळत असतात. या संस्थेतील विद्यार्थी सध्या उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी त्यांची यशस्वी प्रॅक्टिस सुरू केली आहे. देश विदेशातील नामवंत कॉर्पोरेट लॉ कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. समन्यायी आणि सर्वसमावेशकतेचे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावे यासाठी प्रयत्न केले जातात. 

दूरशिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम ः या संस्थेने दूरशिक्षण पद्धतीलाही महत्त्व दिले आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील काही समस्या न्यायालयात जात आहेत. नीतिमत्तेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या बाबी लक्षात घेऊन संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॉ अॅंड एथिक्स हा अभ्यासक्रम मीनाक्षी मिशन हॉस्पिटल अॅंड रिसर्च या संस्थेच्या सहकार्याने सुरू केला आहे. डिप्लोमा इन एन्व्हायर्न्मेंटल लॉ, डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन चाईल्ड राईट्स, कंझ्युमर लॉ अॅंड प्रॅक्टिस आणि सायबर लॉ अॅंड सायबर फॉरेंसिक हे इतर अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीने करता येतात. या संस्थेचे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेश संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना सातत्याने उत्तमोत्तम प्लेसमेंट मिळाले आहे.

इतर नामवंत संस्था
गेल्या काही वर्षांत सातत्याने सर्वोच्च स्थान पटकावणारी काही विधी महाविद्यालये- नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी -बंगळूर, द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्सेस - कोलकता, सिम्बायोसिस लॉ स्कूल - पुणे, आयएलएसएस लॉ कॉलेज - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी, फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगड, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिशा, फॅकल्टी ऑफ लॉ युनिव्हर्सिटी - लखनौ.

पॅकेजेस ः गेल्या काही वर्षांत पुढील शासकीय विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज मिळाले आहेत. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी - बंगळूर - सरासरी वार्षिक पॅकेज १५ ते १८ लाख रुपये, द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्सेस - कोलकता - सरासरी वार्षिक पॅकेज ११ ते १३ लाख रुपये, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी - सरासरी वार्षिक पॅकेज साडेपाच ते सहा लाख रुपये, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगड - सरासरी वार्षिक पॅकेज साडे पाचलाख ते साडेसहा लाख रुपये, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी - ओडिशा - सरासरी वार्षिक पॅकेज साडेपाच लाख ते साडेसहा लाख रुपये.

पुढील खासगी विधी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळाले आहे. आयएलएस लॉ कॉलेज - पुणे - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडेआठ लाख रुपये, लॉयड लॉ कॉलेज - ग्रेटर नोईडा - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडेआठ लाख रुपये, सिम्बायोसिस लॉ कॉलेज - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडेआठ लाख रुपये, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ - पुणे - सरासरी वार्षिक पॅकेज सात ते आठ लाख रुपये, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ लॉ - मोहाली - सरासरी वार्षिक पॅकेज पाच ते सहा लाख रुपये.

संबंधित बातम्या