सामाजिक कार्यातील संधी 

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

सामाजिक कार्य क्षेत्रात करिअर केलेल्यांनाही अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. शासकीय, शासनअंतर्गत संस्था, अशासकीय संस्था, नागरी हितासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते.

'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' ही आपल्या देशातील समाजकार्य विषयक विविध ज्ञानशाखांमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था समजली जाते. या संस्थेत नव्या जाणिवेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. दारिद्र्य, महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, बेरोजगारी अशा समस्या आणि विषयांकडे नव्या जाणिवेने बघण्याची दृष्टी संस्थेच्या अभ्यासक्रमांमुळे मिळते. हे अभ्यासक्रम सध्याच्या विविध सामाजिक समस्यांचा सम्यकरीत्या विचार करणारे आणि समाजातील नव्या प्रवाहांना भिडणारे आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि समाजातील बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमांच्या रूपरेषेमध्ये बदल करण्याचा संस्थेमार्फत प्रयत्न केला जातो. 

पदवी अभ्यासक्रम 
संस्थेमार्फत पदवीस्तरीय अभ्यासक्रम तुळजापूर येथील कॅम्पसमध्ये सुरू 
करण्यात आले आहेत. यामध्ये 'बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशल सायन्स' आणि 'बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) विथ स्पेशलायझेशन इन रुरल डेव्हलपमेंट' यांचा समावेश आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी बॅचलर ॲडमिशन टेस्ट,ही एंट्रन्स परीक्षा घेतली जाते. त्याद्वारे प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

ग्रामीण भागाच्या बदलासाठी आवश्यक असणारे कौशल्य या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते. विविध कार्यक्रमांचे नियोजन, कार्यान्वयन, देखरेख आणि मूल्यमापन करण्याची क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या हेतूने या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. सहा सत्रांचा हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जातो.

वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम ः
'बॅचलर ऑफ आर्ट्स इन सोशल सायन्स' हा अभ्यासक्रम वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळण्याच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमात विविध विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या दोन वर्षांत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयघटकांची पायाभूत माहिती दिली जाते. तिसऱ्या वर्षामध्ये आंतरज्ञानशाखीय विषयांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये पर्यावरण, विकास आणि लिंग (जेंडर) अभ्यास यांचा समावेश आहे. सहाव्या सत्रामध्ये क्षेत्रीय संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसाठी निवडलेल्या विषय घटकाचा अभ्यास करता येतो. अभ्यासक्रमात सामाजिकशास्त्र आणि विज्ञानाचा संयोग साधण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशीलता, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार करण्याच्या क्षमतेचा विकास होतो. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भाषा, साहित्य, उपयोजित सांख्यिकी आणि संशोधन कार्यपद्धती या घटकातील मूलभूत बाबी विद्यार्थ्यांना शिकता येतात.

संस्थेची ख्याती 
सामाजिक व्यवस्थेशी संबंधित तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती व्हावी यासाठी संस्थेमार्फत विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या सर्वांचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमांमध्ये एम.ए. इन (१) अर्बन पॉलिसी अॅंड गव्हर्नन्स, (२) पब्लिक हेल्थ, (३) ग्लोबलायझेशन अॅंड लेबर, (४) क्रिमिनॉलॉजी अॅंड जस्टीस, (५) हेल्थ पॉलिसी इकॉनॉमिक्स अॅंड फायनान्स, (६) डेव्हलपमेंटल स्टडीज, (८) वूमेन स्टडीज, (९) वूमेन सेंटर्ड प्रॅक्टिसेस, (१०) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अॅंड लेबर रिलेशन्स, (११) क्लायमेट चेंज अॅंड सस्टेनिबिलिटी, (१२) अप्लाइड सायकॉलॉजी-काउन्सिलिंग अॅंड प्रॅक्टिसेस, (१३) मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, (१४) रेग्युलेटरी गव्हर्नन्स, (१५) वॉटर पॉलिसी अॅंड गव्हर्नन्स, (१६) मास्टर ऑफ लॉ ॲक्सेस टू जस्टीस, (१६) डिझास्टर मॅनेजमेंट, (१७) मीडिया अॅंड कल्चरल स्टडीज, (१८) मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ, (१९) ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट चेंज अॅंड लीडरशिप, (२०) लाइव्हलीहूड अॅंड सोशल आंत्रप्रिनरशिप, (२१) सोशल आंत्रप्रिनरशिप, (२२) मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, (२३) कम्युनिटी ऑर्गनायझेशन अॅंड डेव्हलपमेंट, (२४) चिल्ड्रन अॅंड फॅमिली, (२५) दलित अॅंड ट्रायबल स्टडीज अॅंड ॲक्शन, (२६) मेंटल हेल्थ, (२७) डिसॲबिलिटी स्टडीज अॅंड ॲक्शन, (२८) डेव्हलपमेंट पॉलिसी अॅंड ॲक्शन, (२९) सोशल इनोव्हेशन अॅंड आंत्रप्रिनरशिप, (३०) सोशल वर्क इन रुरल डेव्हलपमेंट, (३१) सस्टेनेबल लाइव्हलीहूड अॅंड नॅचरल रिसोर्स गव्हर्नन्स, (३२) डेव्हलपमेंट स्टडीज, (३३) नॅचरल रिसोर्स अॅंड गव्हर्नन्स, (३४) वूमेन स्टडीज, (३५) रुरल डेव्हलपमेंट अॅंड गव्हर्नन्स, (३६) पब्लिक पॉलिसी अॅंड गव्हर्नन्स, (३७) काउन्सिलिंग, (३८) सोशिऑलॉजी अॅंड सोशल आंथ्रॉपॉलॉजी, (३९) पीस अॅंड काँफ्लिक्ट स्टडीज, (४०) कम्युनिटी ऑर्गनायझेशन अॅंड डेव्हलपमेंट प्रॅक्टिस, (४१) लेबर स्टडीज अॅंड सोशल प्रोटेक्शन, (४२) इकॉलॉजी, एन्व्हायन्में अॅंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, (४३) मेंटल हेल्थ, (४४) अॅप्लाइड सॉयकॉलॉजी इन क्लिनिकल अॅंड काउन्सिलिंग प्रॅक्टिस.

एंट्रन्स परीक्षा ः
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'एनईटी - नॅशनल एलिजिब्लिटी टेस्ट' घेण्यात येते. ही संगणकाधारित परीक्षा आहे. यामध्ये १०० गुणांचे वस्तुनिष्ठ पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. देशातील अनेक शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. एकापेक्षा अधिक एम.ए अभ्यासक्रमांना अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ही एकच एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत मिळालेले गुण आणि दिलेले पर्याय यांचा विचार करून अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुण नाहीत. 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल घडतो. सामाजिक विषयांमध्ये करिअर करण्यासाठी हा बदल अत्यंत उपयुक्त ठरतो. 

क्षेत्रीय कृती प्रकल्प ः
संस्थेमार्फत राबवण्यात येणारे क्षेत्रीय कृती प्रकल्प (फिल्ड ॲक्शन प्रोजेक्ट) सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरले आहेत. महिला आणि मुलांवर होणाऱ्या घरगुती हिंसेमुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांच्या निर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेले विभागही त्याचीच निष्पत्ती होय. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये ९५० हून अधिक तास हे क्षेत्रीय पातळीवर काम करावे लागते. या क्षेत्रीय स्तरावरील प्रात्यक्षिकांमधून प्रत्यक्ष ज्ञानार्जन साध्य केले जाते. सैद्धांतिक ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष स्थितीचे ज्ञान देण्यावर भर देण्यात येत असल्याने सामाजिक कार्यातील करिअर करण्यासाठीचा पाया मजबूत होण्यास मदत होते. 
संपर्क ः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार, 
मुंबई - ४०००८८, दूरध्वनी ः ०२२-२५५२५२५२ 
संकेतस्थळ ः https://admissions.tiss.edu
ईमेल ः admissionsinfo@tiss.edu

एम.ए इन पब्लिक अँड गव्हर्नन्स
अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने दोन वर्षे कालावधीचा एम.ए इन पब्लिक अॅंड गव्हर्नन्स, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील पदवीधर व्यक्तीस प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमामध्ये विकसनशील घटनात्मक लोकशाहीमध्ये सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या सैद्धांतिक बाबी शिकवल्या जातात. या समस्या सोडवण्यासाठीचे आराखडे तयार करताना मानवीय मूल्ये आणि सर्वसमावेशकता यांचा काटेकोर वापर कसा करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान केले जाते.

या अभ्यासक्रमामध्ये विधी, अर्थशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण आणि मानववंशशास्त्र या आंतरज्ञानशाखांतील विषय घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय मानसिकतेविषयी सखोल ज्ञान मिळून, सामाजिक समस्या सोडवताना वा त्यासाठी कृती आराखडा तयार करताना याचा उपयोग होतो.
या अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे - राज्ये आणि भारतातील सुशासन,  भारतातील राज्यांचा घटनात्मक पाया, राज्य -मंडई/बाजार - अर्थशास्त्र, भारतातील सार्वजनिक धोरणे, धोरण विश्लेषण, कार्यक्रमांचे मूल्यमापन, माहितीचा साठा - संशोधनाचा आराखडा - वर्णनात्मक पद्धती, भारतातील राजकारण आणि लोकशाही, सार्वजनिक क्षेत्रातील मूल्ये आणि नैतिकता, कार्यकारणभाव असलेल्या आणि अनपेक्षित कार्यपद्धती.

करिअर संधी ः हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय संस्था, शासनाच्या अंतर्गत कार्यरत संस्था, शासनाबरोबर सहकार्याने कार्यरत संस्था, नागरी हितासाठी कार्यरत संस्था, अशासकीय संस्था, मूल्यमापन, संनियंत्रण आणि कार्यक्रम कार्यान्वयनाच्या विविध पैलूंवर कार्यरत असणारे सामाजिक उद्योजकीय घटक, संशोधन आणि सल्ला देणाऱ्या संस्था, यांचा समावेश आहे. या संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत ३०० च्या आसपास वर नमूद संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांनी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध भूमिका आणि पदांसाठी करिअर संधी दिली आहे.
संपर्क ः अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, ॲडमिशन ऑफिस, पीईएस कॅम्पस, पिक्सेल पार्क, बी ब्लॉक, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, हौसर रोड, बंगळूर - ५६०१००,
संकेतस्थळ ः apu.edu.in, 
ईमेल ः reachus@apu.edu.in

संबंधित बातम्या