सनदी सेवा : संधी व आव्हाने
तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांचे आकर्षण कायमच राहिले आहे. मात्र, या परीक्षांकडे वळण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील जोखीम, आव्हाने आणि संधी जाणून घेतल्या आणि त्यानुसार अभ्यास पद्धती, अभ्यास व वेळेचे नियोजन आणि मुलाखतीची तयारी केल्यास नक्कीच यश मिळू शकते...
एकोणीसशे एक्यान्नवनंतर एकंदर देश आणि महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर एका बाजूला उद्योग-व्यवसाय, व्यवस्थापन, बँकिंग-वित्त सेवा, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स ते कृत्रिम बुद्धिमत्ता इ. करिअर संधीची नवी क्षेत्रे जशी पुढे आली, तशीच वैद्यक, अभियांत्रिकी, अध्यापन या प्रचलित करिअर संधींबरोबर सनदी (प्रशासकीय) सेवा क्षेत्रदेखील विद्यार्थ्यांसाठी एक प्रमुख संधी क्षेत्र म्हणून पुढे आले. देशभरात झालेला लोकशाही व शिक्षणाचा प्रसार; विकासाचे विविध उपक्रम; आरक्षण आणि विविध कल्याणकारी कार्यक्रमांचा स्वीकार या प्रक्रियांमुळे वंचित, दुर्बल आणि मागास सामाजिक स्तरामध्ये जाणीव-जागृती निर्माण झाली. प्रभुत्वशाली व मध्यम सामाजिक स्तराशिवाय, विशेषत्वाने दुर्बल, मागास सामाजिक स्तरातील एक मोठा विद्यार्थीवर्ग सनदी सेवांकडे आकर्षित झालेला दिसतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा गेल्या दोन दशकभराचा विचार केल्यास सनदी सेवा (नागरी/प्रशासकीय) क्षेत्र हे करिअरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून पुढे आले आहे, हे लक्षात येते.
सनदी सेवा : विविधांगी संधी
भारतीय घटनेत ज्याची तरतूद केलेली आहे, त्या केंद्र लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) अखिल भारतीय पातळीवर सनदी सेवा परीक्षांचे आयोजन केले जाते. अर्थात या परीक्षेद्वारे सनदी सेवकांची निवड व भरती केली जाते, त्यामुळे या परीक्षेस सनदी सेवा परीक्षा म्हणून ओळखले जाते. यूपीएसीची घटनात्मक तरतूद, त्यास दिलेली स्वायत्तता; आयोगाद्वारे कोणत्याही हस्तक्षेपाविना परीक्षेद्वारे केली जाणारी पात्र उमेदवारांची निवड; या सनदी सेवा परीक्षेचे स्वरूप व रचना आणि त्याद्वारे भरली जाणारी विविध सनदी सेवा पदे या मुख्य बाबींचा विचार केल्यास या क्षेत्रातील विविधांगी संधी लक्षात येतात. याची नोंद पुढीलप्रमाणे करता येईल.
कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थ्यांस या परीक्षेस बसता येते. म्हणजे कोणताही पदवीधारक या परीक्षेसाठी पात्र ठरतो/ते. यासंदर्भात पदवीची शाखा (विज्ञान, वाणिज्य, कला इ.), स्वरूप (नियमित की बाह्य), पदवी शिक्षणाचे माध्यम, कालावधी, पदवीत प्राप्त झालेले गुण अशा कोणत्याही आधारे भेदभाव केला जात नाही.
दुसरे सर्वच सामाजिक - आर्थिक प्रवर्गातील विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत. यासंदर्भात केवळ २१ वर्षे किमान वयोमर्यादा हा पात्रता निकष स्वीकारला आहे. म्हणजे इतर कोणत्याही स्वरूपाचा अवाजवी, अविवेकी भेद केलेला नाही. उपरोक्त दोन्ही कारणांमुळे सनदी सेवा परीक्षा ही सर्वांसाठी खऱ्या अर्थाने खुली ठरते.
पहिल्या मुद्यात स्पष्ट केल्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट शाखेतील पदवी अथवा विद्यार्थ्याला त्यात मिळालेले विशिष्ट गुण असा पात्रता निकष स्वीकारलेला नसल्यामुळे विविध शाखा, संस्था, प्रदेश, माध्यमातून पदवी संपादन केलेले आणि त्यात उत्तीर्ण ते मेरीटमध्ये आलेले असे सर्व विद्यार्थी एकाच पातळीवर आणले जातात. अशारीतीने आत्तापर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता, सर्वांना एका समान पातळीवर गणले जाते आणि सनदी सेवा परीक्षा या सामाईक परीक्षेद्वारे त्यांचे स्वतंत्र, नव्याने मूल्यांकन करून सनदी सेवा पदांवर भरती केली जाते.
- अत्यंत कमी वयात, म्हणजे २१ व्या वर्षी, शासनाच्या महत्त्वपूर्ण यंत्रणेत सहभागाची संधी उपलब्ध आहे.
- शासनाच्या शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती, पर्यटन, महिला-बालविकास इ. अशा विविध विभागांत कार्य करण्याची संधी प्राप्त होते.
- सनदी सेवा पदांच्या जबाबदारींचे वहन करण्यासाठी निर्णयाचे व्यापक अधिकार अर्थात अधिसत्ता बहाल केलेली आहे - ज्याद्वारे एकंदर समाजजीवन आणि विशेषत: गरजू, दुर्बल वंचित घटकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची संधी उपलब्ध होते.
- सनदी सेवेत प्राथमिक अधिकारपदावर रूजू झाल्यानंतर बढतीद्वारे उच्च पदांवर जाण्यास म्हणजे करिअर विकासास वाव मिळतो.
- शेवटी, सनदी सेवा परीक्षांच्या तयारीमुळे इतर अनेक स्पर्धात्मक परीक्षांचे दालन खुले होते.
नागरी सेवा परीक्षेचे आव्हानात्मक स्वरूप
यूपीएससीद्वारे आयोजित केली जाणारी 'नागरी सेवा परीक्षा' ही एक स्पर्धात्मक परीक्षा असून पुढील वैशिष्ट्यांमुळे आव्हानात्मक ठरते. एक, सनदी सेवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या स्पर्धेत यशस्वी होणे हे मोठे आव्हान ठरते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी इतर परीक्षांप्रमाणे पात्रतेची कोणतीही पूर्व निर्धारित अट (३५ टक्के अथवा ४० टक्के) ठरविलेली नसते. त्या त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांच्या विशिष्ट प्रमाणातच परीक्षेच्या त्या-त्या टप्प्यात विद्यार्थी पात्र ठरविले जातात. स्वाभाविकच परीक्षेत पात्र होण्यासाठी इतर विद्यार्थ्यांना मागे सारून पुढे जाण्याची विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि शेवटी जाहीरातीत नमूद केलेल्या संख्येएवढेच विद्यार्थी अंतिम यादीत निवडले जातात. दुसरे, ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व परीक्षा; लेखी स्वरूपाची मुख्य परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची तपासणी करणारी मुलाखत अशा तीन निरनिराळ्या टप्प्यांनी तयार झाली आहे, ज्यासाठी भिन्न प्रकारची अभ्यासपद्धती स्वीकारावी लागते. सर्वसाधारणतः रूढ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलाखतीसारख्या चाचणीला सामोरे जावे लागत नाही. याउलट, मुलाखत हा स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाचा घटक आहे. तिसरे, या परीक्षेचा व्यापक अभ्यासक्रम. यात एक वैकल्पिक विषय, सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स आणि निबंधाच्या स्वतंत्र पेपरचा समावेश होतो. पाचवे, या परीक्षेसाठी समकालीन चालू घडामोडींचा व्यापक व नियमितपणे अभ्यास करणे आवश्यक असते. म्हणजे सामान्य अध्ययन तसेच वैकल्पिक विषयांतील महत्त्वपूर्ण प्रकरणांशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. वर्तमान पत्रे, मासिके, नवीन संदर्भग्रंथ यांद्वारे विद्यार्थ्याला आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. शेवटी, अत्यंत गतिशील स्वरूप हे या परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. एकंदरच शब्द व वेळेची मर्यादा, इतरांशी असणारी स्पर्धा यामुळे या परीक्षेचा प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा ठरतो. यूपीएससी परीक्षेच्या तयारीचा आरंभ करताना हे आव्हानात्मक वेगळेपण लक्षात घेऊनच विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी आवश्यक साधनांची जमवाजमव करावी लागते.
नागरी सेवा परीक्षेची रचना
उपरोक्त परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे नागरी सेवा परीक्षेतील तीन टप्पे आहेत. पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन (२०० गुण) आणि नागरी सेवा कलचाचणी (२०० गुण) या दोन विषयांचा समावेश होतो.
यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी १७५० गुण निर्धारित करण्यात आले आहेत. मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन (१००० गुण), वैकल्पिक विषय (५०० गुण), निबंध (२५० गुण) पेपर्सखेरीज भारतीय भाषेचा (३०० गुण) आणि अनिर्वाय इंग्रजी (३०० गुण) हे भाषेचे दोन पात्रता विषयही समाविष्ट आहेत.
अभ्यास पद्धती
पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी अशा तीन टप्प्यांनी तयार केलेल्या व व्यापक अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे लक्षात घेतल्यानंतरच या परीक्षेच्या तयारीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या तयारीच्या प्रारंभीच काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. मुख्य परीक्षेत घ्यावयाच्या वैकल्पिक विषयाची निवड महत्त्वपूर्ण ठरते. संबंधित वैकल्पिक विषयातील आपला रस, स्वतःची पदवी शिक्षणाची पार्श्वभूमी, त्या विषयाच्या मार्गदर्शनाची उपलब्धता, त्यावर उपलब्ध दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य या बाबींचा विचार वैकल्पिक विषयांची निवड करताना अगत्याचा ठरतो. यूपीएससीत साधारणत: राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, मानववंशशास्त्र, भूगोल, इतिहास हे विषय अग्रक्रमाने निवडले जातात असे दिसते.
वैकल्पिक विषयाची निवड ठरल्यानंतर सर्व विषयांचा अभ्यासक्रम बारकाईने पाहावा. अभ्यासक्रम बारकाईने पाहिल्यानंतर विविध विषयांवरील दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य मिळवावे. काही मूलभूत, संकल्पनात्मक व महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ इंग्रजीतूनच वाचावेत. त्याचे मराठीत योग्य भाषांतर झालेले असल्यास ते उपयोगात आणावे. यानंतर यूपीएससी परीक्षांच्या मागील किमान ७-८ प्रश्नप्रत्रिकांचे सूक्ष्मपणे विश्लेषण करावे. या परीक्षांच्या अभ्यासात प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, त्यामाध्यमातूनच अभ्यासाची दिशा निर्धारित करून त्यात नेमकेपणा आणता येतो. प्रश्नांच्या विश्लेषणाद्वारे प्रश्नांचे स्वरूप, त्यात होणारे बदल, त्या-त्या विषयातील महत्त्वाची प्रकरणे, संदर्भ साहित्याची पर्याप्तता या बाबी लक्षात घ्याव्यात.
माध्यमाची निवड हादेखील अनेकांसाठी त्रासदायक व गुंतागुंतीचा विषय ठरतो. प्रथमतः हे लक्षात घेतले पाहिजे, की मराठी माध्यमातूनही (इतर भारतीय भाषांप्रमाणेच) ही परीक्षा देता येते. इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिल्यानंतर चांगले गुण मिळतात, असा एक व्यापक स्तरावर गैरसमज आढळतो. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा देऊन यश मिळवले हे वेगळे सांगणे नको. वास्तविक पाहता प्रश्नाला अनुसरून योग्य परिभाषेचा अवलंब करून, उत्तरात सर्व मुद्दे समाविष्ट केल्यास कोणत्याही भाषा माध्यमातून चांगले गुण प्राप्त करता येतात, हे उघड आहे. मराठी माध्यमातून अनेक विषयांवर दर्जेदार व अद्ययावत संदर्भ साहित्य उपलब्ध नाही, हे वास्तव आता मागे पडत आहे. त्यामुळे आपल्याला ज्या भाषेतून उत्तम पद्धतीने अभिव्यक्त करता येते, ती भाषा माध्यम म्हणून निवडावी.
यूपीएससीसाठी लागणारी ही प्राथमिक जमवाजमव केल्यानंतर अभ्यास व वेळेचे नियोजन मध्यवर्ती ठरते. पूर्व व मुख्य परीक्षेत अनेक विषयांचा अभ्यासक्रम विविध गुणांसाठी दिलेला असल्याने त्यांचे परीक्षेतील महत्त्व व त्यासाठी वाचावी लागणारी पुस्तके, अभ्यास विषयातील स्वतःची गती व रस या बाबी लक्षात घेऊन घटकवार अभ्यास व वेळेचे नियोजन करावे. नियोजनाबाबात प्रत्येक विद्यार्थ्याने हे लक्षात घ्यावे, की या परीक्षेच्या योग्य तयारीसाठी किमान एक वर्षाचा (दररोज किमान १०-१२ तास) नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक ठरतो. या वर्षभराच्या काळाचे ६, ३, १ महिना; ३०, १५, ७ व १ दिवसाचे सूक्ष्म नियोजन ठरवणे महत्त्वाचे आहे. या नियोजनाची विभागणी करताना मुख्य परीक्षेसाठी साधारणतः आठ महिने, पूर्व परीक्षेसाठी चार महिने द्यावेत. वेळेच्या नियोजनात त्या-त्या विषयांच्या किमान दोन/तीन उजळण्या झाल्या पाहिजेत हे लक्षात घ्यावे. नियोजनाच्या संदर्भात नियोजन केवळ कागदावरच राहणार नाही, तर त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगली पाहिजे.
कोरोनोत्तर स्थिती
कोविड-१९ आजारामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे एकंदर जग आणि आपल्या देशात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणारे आणि या वर्षापासून तयारीस सुरुवात करू पाहणारे अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला यात शंका नाही. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ठिकाण सोडून आपल्या मूळ गावी जावे लागले. परंतु, किती काळ लॉकडाउन सुरू राहील याची कल्पना नसल्यामुळे हे विद्यार्थी अल्पसे अभ्यास साहित्य आपल्याबरोबर घेऊन गेले. याचाच अर्थ उर्वरित बरेच संदर्भ साहित्य बरोबर नसल्याने एक तर त्यांचा बराच वेळ वाया गेला आणि अभ्यास प्रक्रियेत खंडही पडला. संस्थांनी ‘ऑनलाइन’ शिकवणी माध्यमाचा अवलंब केला, तरी इंटरनेटची उपलब्धता, त्यासाठी आवश्यक क्षमतेच्या साधनांचा अभाव आणि हा बराचसा अनोळखी प्रकार यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दुसऱ्या बाजूला ‘ऑनलाइन’ व्यासपीठांचे पेवही फुटले आहेत. त्यातील कोणत्या स्रोतांचा आधार घ्यायचा याविषयी गोंधळच निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात रहात असल्याने इंग्रजी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला. शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील लॉकडाउनमुळे काही प्रमाणात या समस्येस सामोरे जावे लागले. अशारीतीने, उपरोक्त समस्यांमुळे वाया गेलेला वेळ, त्यामुळे मानसिकतेवर झालेला परिणाम, परीक्षेचे पुढे गेलेले वेळापत्रक, नव्या साधनांद्वारे व नव्या पद्धतीने परीक्षेच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
सनदी सेवा परीक्षेची नव्याने सुरुवात करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एखाद्या शहरात मार्गदर्शन घ्यायचे झाल्यास तेथे जाता येण्यासारखी स्थिती केव्हा निर्माण होईल, तोपर्यंत कोणत्या प्रकारची प्राथमिक तयारी करायची, ऑनलाइन प्रकाराचा आधार घेतल्यास त्याला कसे जुळवून घ्यायचे, त्यातील कोणत्या स्रोताचा स्वीकार करायचा, त्यासाठी आवश्यक संसाधनाची जुळवाजुळव कशी करायची, बदललेल्या वेळापत्रकात स्वत:ची तयारी अपेक्षित व प्रभावीपणे होण्यासाठी काय करता येईल, असे काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत.
तथापि, बदल हा मानवी जीवनाचा गतीनियम मानून विद्यार्थीवर्गाला या नव्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागणार आहे. त्यादृष्टीने उपलब्ध वेळ आणि संदर्भ साहित्य याचा पुरेपूर वापर केला जाईल याची दक्षता घ्यावी लागेल. नवी साधने, स्रोत, पद्धती याची निवड करतांना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील यात शंका नाही. थोडक्यात, नव्या स्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीस एका बाजूला जुळवून घेत आणि दुसऱ्या बाजूला नव्या साधनांचा अवलंब करून त्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पूर्व परीक्षा
क्र. विषय/पेपर प्रश्नांची संख्या गुण वेळ
१ सामान्य अध्ययन १०० २०० २ तास
२ नागरी सेवा कल चाचणी * ८० २०० २ तास
* CSAT पेपर हा केवळ पात्रता पेपर आहे.
मुख्य परीक्षा
क्र. विषय/पेपर गुण वेळ
१ अनिवार्य इंग्रजी * ३०० ३ तास
२ भारतीय भाषा * ३०० ३ तास
३ निबंध २५० ३ तास
४ सामान्य अध्ययन - १ २५० ३ तास
५ सामान्य अध्ययन - २ २५० ३ तास
६ सामान्य अध्ययन - ३ २५० ३ तास
७ सामान्य अध्ययन - ४ २५० ३ तास
८ वैकल्पिक विषय - पेपर १ २५० ३ तास
९ वैकल्पिक विषय - पेपर २ २५० ३ तास
* पेपर १ आणि २ म्हणजेच भाषेचे पेपर केवळ पात्रता पेपर आहेत.