एका डॉक्टरची कोविड डायरी

डॉ. वसुधा सरदेसाई
सोमवार, 19 एप्रिल 2021

कव्हर स्टोरी

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कोविड हा शब्द आपल्या कोणाच्याच ओळखीचा नव्हता. पण, अचानक या वादळाला तोंड द्यायची एक ‘डॉक्टर’ म्हणून माझ्यावर वेळ आली. या आजाराने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली. भल्याभल्यांची झोप उडाली. माणूस म्हणून हबकलेल्या मला, डॉक्टर म्हणून मात्र खंबीरपणे उभं राहावं लागलं. कोविडचे रुग्ण नुसते तपासायचे नाहीत, तर त्यांच्यावर उपचारही करायचे आहेत, हे लक्षात आल्यावर, त्या दृष्टीनं मी तयारी केली. आजाराचं ज्ञान मिळवणं, या बरोबरच त्यासाठी शारीरिक मानसिक तयारी करणं, त्याचं रीतसर शिक्षण घेणं, त्यानंतर प्रत्यक्ष रुग्णसेवेत कार्यरत राहणं, हा मोठाच प्रवास होता. दर महिन्याला एक आठवडा अशी मे-जून महिन्यापासून कोविड पेशंटची देखभाल जी सुरू झाली, ती आजपर्यंत चालूच आहे. या दर महिन्यातल्या एक आठवड्यानं मला खूप अनुभव दिले. माझ्या संवेदनशील मनाला जाणवणाऱ्या गोष्टी लिहिल्याशिवाय चैन पडेना.. त्यातूनच निर्माण झाली ही ‘कोविड डायरी’..

मे २०२०
“तू त्याला कोविड ड्युटी का म्हणतेस? कोविड राउंड म्हणावं.. त्रास कमी होईल..” कोविड रुग्णांची देखभाल करण्यासाठी एक आठवडाभराची ड्युटी निश्चित झाल्यावर माझ्या अस्वस्थतेवर उपाय म्हणून माझा नवरा मला म्हणाला.
“खरंच असं होईल? शब्द बदलला म्हणून अर्थ बदलेल? हे तोंडाला कोरड पडणं, हे छातीत धडधडणं, हा जोरजोरात चालणारा श्वास, हा कपाळावर जमा होणारा घाम... हे सतत पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं... हे कमी होईल?
***
लवकरच लक्षात आलं, ह्या कोविड ड्युटीसाठी खूप तयारी करावी लागतेय! मानसिक, शारीरिक...
माझी मुलगी एकदा म्हणाली होती, “अगं आई, प्रश्न सोडवायचा असेल तर त्या प्रश्नाच्या वरचढ उंची गाठावी लागते.. म्हणजे तो प्रश्नच खुजा वाटतो..”
कोविड प्रश्नावर मात करण्यासाठी किती उंचीचा स्तर गाठावा लागणार आहे?
व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवायला हवं, आहारात प्रथिनं वाढवायला हवीत. जीवनसत्त्व ‘क’, ‘ड’.. अशा काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या.. जलनेती – न कंटाळता, औषधं – न विसरता..! आणखीही बरंच काही..
ही हृदयातली धडधड कमी करण्यासाठी ज्ञानेश्वरी ऐकतेय, ध्यान करतेय..
सगळीच गंमत वाटायला लागली. आपण कळत नकळत त्या ‘मोड’मध्ये शिरतोय तर.. मग मन म्हणायला लागलं, “yes! I can do it.. चल पुढे!”
***
नंतरचा प्रश्न होता ट्रेनिंगचा! कोणकोणत्या गोष्टीचं किती शिक्षण घ्यायला लागणार आहे हे हळूहळू समजत गेलं. रोगच नवा, त्यातून भयंकर, त्यात निश्चित उपचार नाहीत, वेगवेगळ्या औषधांवर संशोधन चालू असलेला हा काळ.. तेव्हा या ड्युटीमध्ये ते पीपीई किट कसं घालायचं आणि काढायचं? ते घालून कसं वावरायचं? रुग्णांच्या कोणत्या तपासण्या करायच्या? कोणती लक्षणं महत्त्वाची? कोणती औषधं वापरायची?... असं सगळंच शिकावं लागलं.
एक दिवस वेळ काढून राउंडचं रीतसर ट्रेनिंग घेतलं. बरोबर असणाऱ्या असिस्टन्टकडूनच खूप शिकायला मिळतं... पीपीई किट घालण्यातले बारकावे, पेन कुठं ठेवायचं आणि मोबाईल कसा वापरायचा?
माझ्यापेक्षा वयानं लहान पण या कोविडच्या कामात अधिक अनुभवी असणारा आमच्या हॉस्पिटलचा डॉक्टर मला म्हणाला, “अहो, तुम्हाला काय शिकवायचं? तुम्हाला सगळं माहीतच असणार आहे..”
“ हो, पण तरीसुद्धा ..!”
अरेच्चा? हे तर नेहमीसारखेच पेशंट आहेत.. काही नुसते बसलेत, काही नाश्ता करताहेत, काही लोकांना ताप आहे.. काही मात्र ऑक्सिजनला जखडलेत.. हे पल्सऑक्सिमीटर काहीही आकडे दाखवतंय.. बापरे!
मग लक्षात आलं, एवढ्याच आणि ह्याच गोळ्या द्यायच्या आहेत... ठीक आहे. जमेल मला!
***
माझ्या स्वतःच्या राउंडचा पहिला दिवस उगवला. पीपीई किट घातलेली माझी छबी आरशात पाहून मलाच दचकायला झालं. बरोबर असलेल्या असिस्टन्टनं खूपच मदत केली.
मोबाईलचं काय करूया? आणि पेन कुठंय? असा विचार करेपर्यंत पेशंटची यादी हातात पडली. ‘बापरे! एवढे पेशंट्स पाहायचे आहेत?’
परत छातीत धडधडायला लागलं. ‘चष्मा घालावा की तो घट्ट गॉगल? आणि आता डोळ्यांना काहीच का दिसेना?’... ते शिल्ड, चष्मा सगळ्यात बाष्प जमा झालं.
‘आता कसं होणार? इतकं का उकडतंय? आणि तहान लागलीय..’
अर्थात हळूहळू याची सवय होणार होती. फोन प्लास्टिकमध्ये ठेवायचा, फोनचा स्पीकर लावूनच बोलायचं.. मास्कला चिकटपट्टी लावून बाष्प टाळायचं.
माझ्या असिस्टन्टनं मला प्रेमानं शिकवलं.. पुन्हा माझ्या नोट्सही नीट लिहीत होती.
चला, सुरुवात तर ठीक झाली!
***
या कोविड राउंडमध्ये सगळ्यात कशाचा कंटाळा येत असेल तर तो पीपीई किट (स्वसंरक्षणार्थ घालायचे कपडे व इतर आयुधं) घालणं आणि काढणं, म्हणजेच donning आणि doffingचा! हॉस्पिटलमध्ये सर्वच ठिकाणी कपडे आणि इतर साधनं परिधान करण्याचा, तसंच काढण्याचा ठरावीक क्रम भिंतींवरील फलकांवर लावलेला आहे. पण तरीही कामाच्या नादात, गडबडीत काहीतरी उलटसुलट होण्याची शक्यताच जास्ती! त्यातही राउंड संपल्यावर ते भारंभार अंगावर चढवलेले कपडे आणि ती संरक्षणाची आयुधं कधी एकदा उतरवतो असं झालेलं असतं. त्यावेळी कोण वाचतो त्या फलकावर काय क्रम दिलाय ते!
पहिल्या ड्युटीच्या दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी, राउंड संपल्यावर मी ‘हुश्श!’ म्हणत सगळे नियम धाब्यावर बसवून भरभर ग्लोव्ह्ज, टोपी, गॉगल, मास्क अंगावरून उतरवले आणि घाईघाईनं त्या डोफिंग कक्षातून बाहेर पडले. कुणीतरी आत उभं राहून माझं निरीक्षण करतंय, याकडे माझं लक्षही नव्हतं. त्या आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या बाई होत्या. ‘डॉक्टर्स काय करतात?’ हे बघायला मुद्दाम उभ्या होत्या. माझी पुसटशी नजरानजर झाली, पण ‘असेल काही काम’.. म्हणत मी निघाले.
दुसऱ्याच दिवशी एका भल्यामोठ्या यादीत माझं नाव आणि सोबत एक सूचनावजा पत्र! अमुक एका तारखेला, अमुक एका वेळी ‘पीपीई कीट घालणे आणि काढणे’ याचं परत एकदा ट्रेनिंग आहे!
मग मुकाट्यानं दिलेल्या दिवशी मी ट्रेनिंगला हजर! त्या ट्रेनिंग देणाऱ्या बाई माझ्याकडं बघून गालातल्या गालात हसत होत्या. परत एकदा ‘डॉनिंग आणि डोफिंग’ची उजळणी करूनच माझी सुटका झाली.
***
पहिला दिवस, पहिला पेशंट.. मी प्रचंड गोंधळलेली, पीपीई किटनं त्रासलेली..
पंच्याहत्तर वर्षांच्या आजी, जवळजवळ १२-१३ दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत. ऑक्सिजन लागतोय.. मास्क काढला की ऑक्सिजनचं प्रमाण एकदम घसरतंय.. तरीही त्या वारंवार मास्क काढताहेत.
मी त्यांना रागावतेय, समजावतेय.. त्यांची हिंदी भाषा.. मला माझ्या हिंदी बोलण्याची लाज वाटतेय..
माझा हात पकडून त्या एकदम म्हणाल्या, “डॉक्टर, मुझे घर जाना है। घर छोडो..”
“नहीं..नहीं! तुम्हारी तबियत अभी ठीक नही है।”
“ और कितने दिन?”
माझ्याकडे उत्तर नाही. मी गोंधळून त्यांची औषधं पुन्हा पुन्हा तपासतेय..
माझी असिस्टन्ट मला म्हणाली, “त्यांची एक नातलग डॉक्टर आहे.. तिच्याशी बोला..”
मी मास्क आणि फेस शिल्डमधून फोनवर बोलायचा प्रयत्न करतेय.. ती डॉक्टरीण मुंबईची, पेशंटची भाची.. मी पुण्यात.. एकदाचा संवाद जमला.
“तब्येत खूप वाईट आहे..” मी सांगतेय.
“काही करता येईल का?” ती.
“Tocilizumab चा पर्याय आहे, पण ते औषध सहज मिळत नाही.”
“मी मुंबईहून पाठवते.”
फोन बंद झाला तरी मला धडधडतंय. मला Tocilizumab बद्दल फार माहिती नाहीये. पहिलाच प्रसंग आहे. डोस किती? कसं द्यायचं? मला माझी शक्ती वाढवायला हवीय.. ‘घाबरू नकोस..’ मी मलाच समजावतेय..
मग मी जंतू संसर्ग शास्त्रातल्या स्पेशालिस्टशी बोलले. त्याच्या सल्ल्यानं डोस ठरवला. औषध मागवायला सांगितलं.. जवळ जवळ अर्धा तास इथेच गेला..
पुढे अजून किती पेशंट्स राहिले आहेत.. या विचारात धावत राहिले.
हे औषध मिळायला पुढे दोन दिवस गेले. तोवर त्या आजी तेवढ्याच ऑक्सिजनवर.. रोज मी भेटले की माझा हात धरून रडणार.. हे नेहमीचंच झालेलं.
“घर छोडो ना! घर जाना है।”
नंतर फोनवर ती डॉक्टर भाची मला म्हणाली, “आजोबाही admit आहेत, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये!” मला धक्काच बसला. बापरे! परत धडधडायला लागलं ..
मग यथावकाश Tocilizumab मिळालं, दिलं. आजींना बरं वाटलं. ऑक्सिजनची गरज संपली. माझी ड्युटी संपायच्या आदल्या दिवशी त्यांना खरोखरच घरी सोडायची वेळ आली. पहिलाच पेशंट बरा झाला, म्हणून मलाच बरं वाटतंय. मी आजींचा हात धरून पाठीवर हलकंच थोपटलं.
“बाय आंटी, आप ठीक हो गये, आज घर जाना है!” मी खुशीत म्हणाले.
तेवढ्यात त्या भाचीचा फोन आला. “आजींना सांगू नका, पण आजोबा आज सकाळीच गेले..”
मला प्रचंड धडधडायला लागलं.. डोळ्यासमोर धुकं!
चला पुढे ! The show must go on.....
***
रोज कमीत कमी ३०-३५ पेशंट्स.. त्यातले ऐंशी टक्के ऑक्सिजनवरचे! सारखीच चर्चा.. दोन लिटर, चार लिटर की एकदम पंधरा लिटर? साधी नाकाला नळी लावायची की मास्क? अगदी ऑक्सिजनचे व्यापारी असल्यासारखं वाटतंय..
“ऑक्सिजनची गरज आता संपली,” असं सांगूनही काही घाबरलेल्या लोकांचा विश्वासच बसत नाही.
“ उद्या घरी जाऊया..” असं सांगितलं तरी, “अजून एक दिवस थांबू दे ना..” अशी विनवणी!
एक महाभाग तर आपणच आपला ऑक्सिजन लावायला आणि काढायला शिकला. त्याची राउंड घेताना विचारलं, तर म्हणाला, “तसं बरंय.. पण जरा चाललो वगैरे तर ऑक्सिजन घेतो. सकाळी अंघोळ केल्यावरही लावला होता..”
मी चाटच पडले... ‘‘अहो, खाऊ आहे का तो? आपला आपण काय लावताय? औषध आहे ते! डोस तरी माहीत आहे का? तुम्हाला गरज नाहीये आता! आज डिस्चार्ज आहे तुमचा!”
तरीही परत म्हणाला, ‘‘अजून एक दिवस राहू का?”
***
ऑगस्ट-सप्टेंबर २०२०
कोविडचे पेशंट्स खूप वाढलेत. हॉस्पिटल्स गच्च भरलेली आणि त्यातून आयसीयूमध्ये कुठंच जागा नाही. हे हॉस्पिटल की ते हॉस्पिटल अशी रुग्णांची होणारी फरफट पाहवत नाही. नुसत्या साध्या भरतीसाठीसुद्धा चार सहा तास बाहेर थांबावं लागतं. कधी कधी तर खुर्चीही नाही, पायरीवरच बसावं लागतं. क्वचित कधी नशिबानं सहज अॅडमिशन मिळते.
अशा काळात रात्री पावणेदोनची वेळ.. मी अतीव थकव्यानं गाढ झोपलेली.. माझा फोन वाजतोय.. कुठून तरी अंतराळातून आवाज आल्यासारखा.
“हॅलो..” मी प्रचंड झोपेत आहे.
“मॅडम, हॉस्पिटलमधून बोलतोय...” पुढं निदान दोन तीन मिनिटं प्रचंड मोठी केस हिस्ट्री, प्रयोगशाळेतल्या चाचण्यांचे निष्कर्ष इ. काही बाही सांगून झालं.
माझ्या डोक्यात तसूभरही शिरलं नाहीये.. मी जागं राहण्याचा अटोकाट प्रयत्न करतेय..
“मॅडम, मग पेशंटला आयसीयूत जागा मिळाली, म्हणून शिफ्ट केलं.”
“काय? आयसीयूमध्ये जागा मिळाली??” माझी झोप खाडकन उतरली आहे.
“होय, मॅडम..” फोन बंद! आता मी पूर्णपणे जागी.. 
आयसीयूमध्ये रुग्ण पाठवला म्हणजे खरंतर मला ‘हुश्श!’ वाटायला पाहिजे.. मग का बरं रात्रभर पेशंट, आयसीयू, हॉस्पिटलचा रस्ता, नातलग इ.इ. चित्रविचित्र स्वप्ने डोळ्यासमोर नाचत राहिली..?
***
रुग्णसंख्या फारच वाढल्यावर हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली. यावर उपाय म्हणून फारसे आजारी नसलेले रुग्ण घरीच राहू देऊन त्यांना घरच्याघरी उपचार करण्याची नवीनच जबाबदारी अंगावर आली. अशा रुग्णांना प्रथम पूर्णपणे तपासून ते घरी राहिले तरी चालतील का, याचा निर्णय घ्यायचा! नंतर संपूर्ण काळ त्यांच्या तब्येतीविषयी सतर्क राहायचं.. हे बरेचदा अवघड काम वाटू लागलं.
अशा रुग्णांच्या फोन आणि मेसेजेसमुळे काही काळ जीव हैराण झाला. मला तर व्हॉट्सअॅप उघडायची भीतीच वाटू लागली. केव्हाही पाहा, पाचपन्नास रिपोर्ट्स माझी वाटच पाहत असणार..नंतर यातही थोडी सुधारणा झाली. घरी राहणाऱ्या रुग्णांसाठी सोप्या भाषेत ठरावीक सल्ला लिहिलेले कागद आणि यूट्यूबवर पाहता येतील असे व्हिडिओ हॉस्पिटलनं तयार केले. त्यामुळे रुग्णांना सल्ला देणं सोपं झालं. तरीही अचानक रुग्णाची तब्येत खालावली तर काय, हा प्रश्न होताच! सजग आणि रोगाची जाण असलेल्या रुग्णांनाच घरी ठेवणं योग्य वाटत होतं. पल्सऑक्सिमीटर, थर्मामिटर नीट वापरता येतो ना, याची खात्री करावी लागत होती.
***
रुग्णालयातून रुग्णाच्या घरी फोन 
करून त्याच्या प्रकृतीची माहिती देणं हे एक दिव्यच! अगोदर ते पीपीई किट घालून राउंड घ्यायची, रुग्णाच्या सर्व गोष्टींचा ऊहापोह करायचा, वर त्यांच्या घरी फोन करून सगळं कळवायचं! कसला विचित्र आजार आहे! या रुग्णांसोबत कोणीही थांबू शकत नाही. सगळे एकेकटे! रुग्ण कोणत्या परिस्थितीत अडकलाय, हे कसं कळणार घरच्यांना?
प्रत्येक रुग्णाजवळ स्वतःचा फोन असू द्या, असं आम्ही अॅडमीट करतानाच सांगतो. रुग्णाबरोबर घरच्यांना हवं तेव्हा संवाद साधता यावा आणि डॉक्टरांनाही घरच्यांशी बोलता यावं म्हणून!
बऱ्याच वयस्कर माणसांना मोबाईल फोन हाताळता येत नाही. मग डॉक्टरांनाच नवनव्या फोनशी ओळख करून घ्यावी लागते. कानाशी फोन धरणे अवघड म्हणून speaker वर बोलावं लागतं. हे सगळं जमवण्यात काही काळ जातो.
रुग्णाजवळ फोन नसला तर फाईलवर लिहिलेला ‘घरचा नंबर’ फिरवून घरच्यांशी बोलावं लागतं. त्यासाठी हॉस्पिटलचा फोन वापरायचा तर तो रिकामा असावा लागतो! नुसता गोंधळ असतो अशावेळी!
***
कधी कधी या फोनचा खूप वैताग येतो. रुग्णाचे नातेवाईक आपल्याला गृहीत धरायला लागतात. आपल्या वेळेची, श्रमांची त्यांना कदरच नसते जणू! कितीही शंकानिरसन केलं तरी परत परत तेच प्रश्न!
***
एकदा एका आजींची तब्येत त्यांच्या मुलाला मी फोनवरून सांगत होते. मामला थोडा गंभीर होता, कारण आजींना घरी गेल्यावरही ऑक्सिजन द्यावा लागणार होता. त्यामुळे, त्याला समजावण्यात खूपच वेळ गेला. शेवटी एकदाचा तो मुलगा म्हणाला, “ओके, डॉक्टर, ठीक आहे..”
मी फोन ठेवणार इतक्यात, “ऐका ना, डॉक्टर..”
वैतागून माझ्या कपाळावर आठ्या जमा झाल्या.
“आता काय??” मी कोरडेपणानं विचारलं.
“तुम्हाला राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा! आजही किती काम करताय तुम्ही!”
मला अचानक गारवा जाणवायला लागला... ‘ओह, आज राखीपौर्णिमा आहे? माझा हा नवा भाऊ मला फोनवरून शुभेच्छा देतो आहे..’ मी विचार केला.
अचानक माझ्या कोरडेपणाला मायेचा ओलावा मिळाला..!
***
“काका, घरी फोन लावा, तुमची तब्येत मला घरच्यांना सांगायचीय..”
“ घरी कुणी नाहीये..”
“का? काय झालं?”
“मी इथं अॅडमीट आहे.. वरच्या मजल्यावर माझी बायको.. आणि शेजारच्या वॉर्डमध्ये माझा मुलगा! आम्ही सगळे इथंच आहोत..”
बरेचदा असे एकाच कुटुंबातील 
अनेकजण किंवा निदान नवराबायको तरी एकाचवेळी अॅडमीट असतात. कधी एकाच रुममध्ये, कधी वेगवेगळ्या वॉर्डमध्ये! क्वचित एक घरी, एक हॉस्पिटलमध्ये! अशावेळी फोनवरून काही सांगण्याची पंचाईत होते.
***
एका आजोबांची तब्येत अजिबात चांगली नाही. खूपच ऑक्सिजन लागतोय त्यांना.. त्यांच्याजवळ मोबईल फोनही नाही..
मी हॉस्पिटलच्या फोनवरून त्यांच्या घराचा नंबर फाईलवरून शोधून लावला.
“हॅलो, कोण बोलतंय?” मी विचारलं.
“ मी बोलतेय..” फोन आजोबांच्या आजींनी उचलला होता.
आता त्यांच्याजवळ कसं सांगणार मी?
“दुसरं कोणी नाही का घरात?”
“नाही! मीच आहे घरात.. बोला! काय आहे?”
“आजोबांच्या तब्येतीविषयी सांगायचं होतं.. तुमचा मुलगा वगैरे ..?” मी चाचरत विचारलं.
“नाही हो.. गेला ना तो..” आजींचा आवाज कापरा झाला..
आजींचा मुलगा नुकताच कोरोनानं गेलाय.. घरात त्या एकट्याच? माझ्या पोटात तुटलं. मला भडभडून आलं.. काय सांगणार मी?
“कशी आहे त्यांची तब्येत?”
“ठीक आहे.. ठीक आहे..” फोन कट केला. 
मी निःशब्द..!
(लेखिका कन्टलटन्ट फिजिशियन असून पुण्यातील नामवंत रुग्णालयांशी संलग्न आहेत.)
 

संबंधित बातम्या