अवकाशातील युद्धसज्जता 

योगीराज प्रभुणे
सोमवार, 8 एप्रिल 2019

कव्हर स्टोरी
हवामान, जलद संदेशवहन, व्यापार अशा फक्त मोजक्‍याच वापरासाठी कोणताही देश आपला उपग्रह अवकाशात निश्‍चितच सोडत नाही. तर, त्याबरोबर हा उपग्रह पृथ्वीवरचे निरीक्षण करतो, नियंत्रण करतो, देखरेख करतो आणि पुढे तो आज्ञाही देतो. भारताचे सार्वभौमत्व सुरक्षित करण्यासाठी अवकाशातील युद्धसज्जता, ही आजच्या काळाची गरज आहे. अवकाशात फिरणारा भारताचाच निकामी झालेला उपग्रह भेदून या युद्धसज्जतेवर देशातील शास्त्रज्ञांनी निर्विवाद मोहर उमटवली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेल्या युद्धावर बॉलिवूडने ‘बॉर्डर’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. या चित्रपटाने राजस्थानमधील लोंगेवालाची लढाई आपल्या डोळ्यासमोर जशीच्या तशी (सिनेमॅटिक लिबर्टी वजा करता) उभी केली. पाकिस्तान त्यांच्या टॅंक रेजिमेंटसह दोन हजार सैनिक घेऊन भारताच्या लोंगेवाला पोस्टवर चालून येतो. त्या वेळी भारतीय लष्कराचे फक्त १२० जवान त्या पोस्टवर असतात. मेजर कुलदीप चांदपुरी (सनी देओल) हे त्यांचे नेतृत्व करत असतात. त्या वेळी युद्धाची जशी धुमश्‍चक्री आपल्याला पडद्यावर दिसते. तशीच ती प्रत्यक्षात झालेली. किंबहुना अवघ्या १२० जवानांनी दोन हजार सैन्याच्या रेजिमेंटला पराभूत करण्याची ती युद्धाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. या युद्धाच्या शेवटी आपण पाकिस्तानचे सैन्य मागे फिरताना बघतो. यात आपल्याला आग ओकणारे रणगाडे दिसतात, बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी झाडल्या जात असल्याचे दिसते... त्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धावर साकारलेल्या ‘एलओसी’ चित्रपटातदेखील कर्नल विक्रम बत्रा बर्फाच्छादित शिखरांवर लढताना दिसतात. या दोन्हीही युद्धात भारत आणि पाकिस्तानचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखविले, पराक्रमाची शर्थ केली आणि आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण केले. 
भारत-पाकिस्तान दरम्यान १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्धे लढली गेली. ही सर्व युद्ध जमीन आणि काही अंशी समुद्रावर लढली गेली. ही सर्व युद्धे एका अर्थाने पारंपरिक युद्धपद्धतीत मोडली जातात. त्यानंतर युद्धाचे स्वरूप बदलले. छुपे युद्ध (प्रॉक्‍सी वॉर) सुरू झाले. यात दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात झाली. संसदेवरील हल्ला, मुंबई, पुणे, बंगळुरूसह देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या बाँम्बस्फोटांपासून मुंबईवरील हल्ल्यापर्यंत आणि पुढे अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला असो, उरीच्या लष्करी तळावरील हल्ला असो की नुकताच झालेला पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर झालेला आत्मघातकी हल्ला असो, ही सर्व छुप्या युद्धाचीच उदाहरणे आहेत. यातून आपल्याला पारंपरिक युद्धापासून ते छुप्या युद्धापर्यंत पाकिस्तानने आपल्यावर थोपलेल्या वेगवेगळ्या युद्धांचा प्रवास समजतो. 
हॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटात ‘स्पेस वॉर’ पाहिले आहे? त्यात एक मोठी गोलाकार ‘कंट्रोल रूम’ दाखवलेली असते. समोर वेगवेगळ्या ‘स्क्रीन’ लावलेल्या असतात. त्या खोलीतील प्रत्येकजण लगबगीने आपल्या समोरच्या काँप्युटरवरची बटणे दाबत असतो. त्यानुसार समोरच्या ‘स्क्रीन’वर काहीतरी बदल होत असतो. ‘एअरफोन’ लावून त्याच वेळी तो वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो. क्षणाक्षणाला त्या खोलीतील प्रत्येक माणसाचे हावभाव बदलत असतात. कारण, आता ती ‘कंट्रोल रूम’ नसून तिचे रूपांतर एका युद्धभूमीत झालेले दिसते. ‘बॉर्डर’, ‘एलओसी’ चित्रपटांमध्ये नायक जसे लढत असतात, तसेच येथे लढत असतात शास्त्रज्ञ! 
आधुनिक काळात प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्‍यता कमी असल्याचे मत संरक्षणविषयक तज्ज्ञ नोंदवितात. त्याऐवजी भविष्यातील युद्ध हे माहितीचे युद्ध (इन्फर्मेशन वॉरफेअर) असेल. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्था उपग्रहांच्या माध्यमातून जोडल्या आहेत. त्यात बदल करणे, त्या ताब्यात घेणे हादेखील नव्या युद्धाचा प्रकार असेल. देशावर उपग्रहाच्या माध्यमातून पाळत ठेवणे, हेरगिरी करणे हे प्रकारही वाढतील. त्याला तोंड देण्यासाठी शास्त्रज्ञ हेच भविष्यातील सैनिक ठरतील! 

युद्धाची वाढती व्याप्ती 
पहिले महायुद्ध जमीन आणि समुद्रावर लढले गेले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात प्रथम हवाई दलाचा वापर करण्यात आला. त्यात युद्धाची व्याप्ती जमीन आणि पाण्याबरोबरच आकाशापर्यंत वाढली. शत्रूराष्ट्राला नामोहरम करण्यासाठी भयंकर अशा रासायनिक अस्त्र, जैविक अस्त्रांबरोबरच अण्वस्त्रेही विकसित करण्यात आली. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यात जगाचे ध्रुवीकरण झाले. या दोन्ही महासत्तांपासून दूर राहण्याची अलिप्तता चळवळ (नॉन अलायनमेंट मूव्हमेंट) भारताने सुरू केली. मात्र, या शीतयुद्धाच्या काळात वेगवेगळ्या युद्धपद्धती विकसित झाल्या. ‘स्पेस वॉर’ हेदेखील त्याच शीतयुद्धाने जगाला दिले आहे. आतापर्यंतची युद्धे ही जमीन, पाणी, आकाशात लढली गेली. पण, भविष्यातील युद्ध हे अवकाशात लढले जाईल, हा थेट संदेश शीतयुद्धाने जगाला दिला. पण, १९९१ मध्ये सोव्हिएत रशियाचे तुकडे झाले. त्यामुळे शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला. त्याचवेळी वेगाने बदलणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने आपल्या देशाची जमीन, पाणी, आकाश सुरक्षित करत येत असले तरीही आपले अवकाश सुरक्षित नाही, हे यातून लक्षात आले. शीतयुद्धाच्या काळातच अमेरिका आणि रशिया यांनी अवकाशातील संरक्षणाच्या दृष्टीने टाकलेल्या पावलावर पाऊल टाकत भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या चीननेही २००७ मध्ये अवकाशातील उपग्रह भेदणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे अमेरिका, रशियापाठोपाठ चीननेही अवकाशातील युद्धसज्जता साध्य केली. 

‘मिशन शक्ती’चा पाया 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्याची घोषणा केली. पण, आधी सांगितल्याप्रमाणे अशा मोहिमा काही दिवस किंवा महिन्यांमध्ये पूर्ण होत नाहीत. त्यासाठी सातत्य लागते. त्यामुळे या मोहिमेचा पाया २००८ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळात घातला गेला होता. तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी ‘समग्र अवकाश’ असा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला होता. देशाचे अवकाश सुरक्षित राहण्यासाठी, तेथील उपग्रहांच्या सुरक्षेसाठी हा कार्यक्रम आखला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही. के. सारस्वत यांनी ‘भविष्यातील युद्ध अवकाशात लढले जाईल. त्यासाठी अवकाशातील युद्धसज्जता महत्त्वाची आहे,’ असे पुण्यातील एका संरक्षणविषयक कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे या मोहिमेच्या चाचणीची तयारी त्या वेळेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होती. ‘अँटी सॅटेलाइट मिसाइल’ चाचणी करण्यासाठी या सरकारने परवानगी दिली. 

‘मिशन शक्ती’चे यश काय? 
अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतही ‘अंतराळ विश्‍वा’त एका महासत्तेच्या रूपाने पुढे आला आहे. भारताने पृथ्वीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेला भारताचाच निकामी झालेला उपग्रह ‘ए-सॅट’ने (उपग्रहभेदी क्षेपणास्त्र) अवघ्या तीन मिनिटांमध्ये पाडला. ‘इस्रो’ आणि ‘डीआरडीओ’च्या (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) शास्त्रज्ञांनी ही मोहीम फत्ते केली. पण, त्याचे नेमके यश काय आहे? तर, भारतावर अवकाशातून नजर ठेवणाऱ्या उपग्रहांना आपण अचूकपणे टिपू शकतो. ते उपग्रह उद्‌ध्वस्त करणारे क्षेपणास्त्र आपण तयार केले, हे यातील खरे यश आहे. पृथ्वीच्या जवळच्या कक्षेच्या (लो अर्थ ऑर्बिट) जवळ हजारो किलोमीटर वेगाने हे उपग्रह अवकाशात फिरत असतात. एवढ्या प्रचंड वेगाने फिरणाऱ्या उपग्रहाला अवकाशात अचूक गाठून ते उद्‌ध्वस्त करण्यासाठी जी अचूकता आवश्‍यक असते, ती भारताने गाठली. हे यातील यश आहे. त्यामुळे हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाला भारत अवघ्या काही मिनिटांमध्ये उद्‌ध्वस्त करू शकतो, हा संदेश जगाला यातून मिळाला. हादेखील या यशाचा एक भाग आहे. 

भारताची पावले 
अवकाश युद्धसज्ज ही काही दिवसांमध्ये साध्य होणारी गोष्ट निश्‍चितच नाही. ती एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे राजकारणापासून ती दूरच असलेली बरी. भारताने गेल्या दशकभरात अवकाशात कशा प्रकारे एका पाठोपाठ एक यश मिळविले आहे, यावर एक नजर टाकल्यास आपल्याला सहज दिसून येते, की उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी आपण आत्ता यशस्वी केली असली तरीही त्या दृष्टीने नियोजनबद्ध पावले शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे टाकत आहेत. ‘भारतीय अवकाश संशोधन संघटने’ने (इस्रो) २००८ मध्ये ‘चांद्रयान’ मोहीम यशस्वी केली. त्या पाठोपाठ २०१३ मध्ये ‘मंगळयान’ ही भारताची मंगळावरील पहिली मोहीम सुरू केली. २४ सप्टेंबर २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून २०१७ मध्ये ‘इस्रो’ने नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया या अवकाश संशोधनातल्या दिग्गजांनाही जे जमले नव्हते, ती कामगिरी भारताने करून दाखविली. एकाच अग्निबाणाच्या उड्डाणातून सर्वाधिक म्हणजे ३७ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम रशियाच्या नावावर होता. त्या खालोखाल ‘नासा’तर्फे २९ उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले होते. पण ‘इस्रो’ने या पुढे जाऊन शंभरावर उपग्रह एकाच वेळी सोडले.

भारताने काय साध्य केले? 
पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक करून भारताने हवाई दलाची शक्ती पाकिस्तानसह जगाला दाखवून दिली होती. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीने त्यापुढे जाऊन देशाची सुरक्षा आणखी भक्कम केली आहे. भारताच्या हवाई हद्दीत घुसलेले पाकिस्तानचे ‘एफ १६’ लढाऊ विमान हवाई दल पाडू शकते. तसेच, अंतराळातून झालेल्या हल्ल्याचाही तितक्‍याच ताकदीने प्रतिकार करू शकते, ही क्षमता या चाचणीतून भारताने साध्य केली. 

उपग्रह कुठे उद्‌ध्वस्त केला? 
पृथ्वीच्या सर्क्‍युलर कक्षेचे लोअर, मीडियम आणि जियोसिंक्रोनस असे तीन प्रकार पडतात. त्यापैकी लोअर अर्थच्या कक्षेत फिरणारा उपग्रह भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने पाडला. पृथ्वीच्या या कक्षेचा परीघ १६० ते दोन हजार किलोमीटरपर्यंत असतो. यात सर्वसाधारणपणे हवामानाबद्दलची माहिती देणारे उपग्रह असतात. या शिवाय टेहळणी करणाऱ्या उपग्रहांचाही यात समावेश असतो. मीडियम अर्थच्या कक्षेचा परीघ दोन हजार ते ३६ हजार किलोमीटर असतो. तर जियोसिंक्रोनस कक्षेचा परीघ ३६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त असतो. दळणवळणासाठी वापरण्यात येणारे उपग्रह या कक्षेत असतात. 

पाकिस्तानात पडसाद 
भारताचा समावेश ‘अँटी सॅटेलाइट मिसाइल क्‍लब’मध्ये झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्चला दुपारी घोषित केले. त्याचे पडसाद थेट पाकिस्तानमध्येही उमटले आहेत. अर्थात, पाकिस्तानचा अवकाश कार्यक्रम फारच मर्यादित आहे. पण, त्यानंतरही पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की अवकाशातील शस्त्रास्त्रस्पर्धेच्या विरोधात पाकिस्तान आहे.

संबंधित बातम्या