करंट अफेअर्स

सायली काळे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

करंट अफेअर्स

राष्ट्रीय
हज यात्रेचे अनुदान बंद

 • मुस्लीम धर्मातील ‘हज‘ या धार्मिक यात्रेवरील सरकारी अनुदान बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१२ पासून ‘हज‘ यात्रेवरील अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले होते तर आता ते संपूर्णतः बंद करण्यात आले आहे.
 • अफजल अमानुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एका चौसदस्यीय समितीने एक मसुदा तयार करून त्यात हे अनुदान या टप्प्यात पूर्णतः बंद करण्याची शिफारस केली होती.
 • हज यात्रेवर सरकार दरवर्षी तब्बल ७०० कोटींचे अनुदान देत असे. यापुढे ही रक्कम मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षण व विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. 
 • अनुदानाच्या निर्णयासोबतच या यात्रेच्या कंत्राटदारांची प्रक्रिया पारदर्शक करण्याचे ठरविले आहे.
 • ब्रिटिश सरकारने १९३२ मध्ये या कायद्याअंतर्गत हज यात्रेवर सरकारी अनुदान देण्याची प्रथा सुरू केली होती.

अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धा

 • संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या क्रिकेट विश्वातील अंध विश्वचषक स्पर्धेत भारत संघ विजयी ठरला आहे.
 • शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने २ गडी राखून २०८ धावांचे लक्ष्य पार करत पाकिस्तान संघाला पराभूत केले.
 • अंध विश्वचषक जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे.

आर्थिक
जागतिक उत्पादन निर्देशांक

 • जागतिक अर्थमंचाने (World Economic Forum) सादर केलेल्या १०० देशांच्या जागतिक उत्पादन निर्देशांकात भारतास ३०वे स्थान मिळाले आहे.
 • जागतिक अर्थमंचाने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल सादर केला असून त्यात जपान अव्वल स्थानी आहे.
 • हा अहवाल तयार करताना त्यात देशाचे औद्योगिक धोरण, सामूहिक कृती असे निकष लावण्यात आले आहेत.
 • सदर १०० देशांचे अग्रमानांकित, उच्च क्षमताधारी, वारसा आणि नव क्षमताधारी अशा चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
 • भारतासह हंगेरी, मेक्‍सिको, फिलिपिन्स, रशिया, थायलंड, तुर्की यांचा समावेश वारसा गटात करण्यात आला आहे.
 • बाजारपेठ आकारात भारताचे स्थान तिसरे आहे महिला सहभाग, व्यापारी कर, नियामक क्षमता यांत भारताचे स्थान  ९०वे आहे.
 • चौथ्या औद्योगिक क्रांतीस अनुकुलतेच्या दृष्टीने भारताचे स्थान ४४ वे असून यात अमेरिका, सिंगापूर, स्वित्झर्लंड अग्रेसर आहेत.

जीएसटीमध्ये पुन्हा फेरफार

 • वस्तू व सेवा कर परिषदेच्या १८ जानेवारी रोजी झालेल्या २५ व्या बैठकीत ५३ सेवांच्या करामध्ये कपात करण्यात आली असून हस्तकलेसह २९ वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत.
 • सदर परिषद हे दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली.
 • नव्याने करमुक्त झालेल्या सेवा : उडान अंतर्गत विमानसेवा (३ वर्षांसाठी), माहिती अधिकार सेवा, कायदे सेवा, निर्यात सेवा, सैनिकांसाठी नौदल विमा, कर्णबधिरांसाठीच उपकरणे, ४० हस्तशिल्पे, २० लिटर पाण्याचा जार, मंच कलाकारांचे रु. ५०० पर्यंतचे मानधन.

कपात झालेले दर 
वस्तू                                            पूर्वीचा दर     आताचा दर
सार्वजनिक बससाठी जैविक इंधन,  
मोठ्या व मध्यम आकाराच्या 
सेकंडहॅंड कार्स                                      २८              १८
मेट्रो, मोनो रेल्वे, 
सांडपाणी प्रक्रिया सेवा                           १८             १२
शिवणकाम, थीमपार्क, वॉटरपार्क             १८               ५
चामड्याची पादत्राणे                              १२               ५

विज्ञान-तंत्रज्ञान
नाविका सागर परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण

 • मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय नौदलातील सहा महिलांनी ’आयएनएसव्ही तारिणी’ या देशी बनावटीच्या बोटीने ’नाविका’ सागरा परीक्रमेस आरंभ केला.
 • लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली या १६५ दिवसांच्या परिक्रमेचा दुसरा टप्पा लिटलटन (न्यूझीलंड) येथे डिसेंबर २०१७ ला पूर्ण झाला.
 • या प्रवासादरम्यान ‘ड्रेक पसेज‘ हा समुद्रातील कठीण समाजाला जाणारा मार्ग त्यांनी यशस्वीपणे पार केला.
 • सध्या आयएनएसव्ही तारिणी ही केप हॉर्न (चिली, द. अमेरिका) येथे पोहोचली असून स्टेनले बंदरावर थांबून ती केप टाऊनच्या (आफ्रिका) दिशेने रवाना होईल.

क्षेपणास्त्र- अग्नी-५ 

 • अग्नी-५ या क्षेपणास्त्राची १८ जानेवारी रोजी ओदिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या या  ५० टन वजनाच्या क्षेपणास्त्राची तब्बल ५ हजार किलोमीटर्सपेक्षा अधिक पल्ला गाठण्याची क्षमता आहे.
 • दीड टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असणाऱ्या या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या २४ पटीने अधिक आहे.
 • पाच ते साडेपाच हजार किलोमीटर्सचा पल्ला गाठण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांना इंटरकॉन्टीनेन्टल बलेस्टीक मिसाईल म्हणतात तर भारतापूर्वी अशी क्षेपणास्त्रे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन याच देशांकडे होती.

भारताच्या ताब्यातील क्षेपणास्त्रे 
क्षेपणास्त्र                                                        पल्ला
पृथ्वी, धनुष                                                     लघु पल्ला
अग्नी-१, अग्नी-२, अग्नी-३                                मध्यम पल्ला
अग्नी-४, अग्नी-५                                             दीर्घ पल्ला

समस्या आणि ऊहापोह
समलैंगिकता निष्कलंक

 • समलैंगिकतेवरील गुन्हेगारीचा कलंक दूर करण्याच्या दिशेने कायदेशीर पाऊल प्रथमच उचलले गेले असल्याने भारतीय समलैंगिक समाजात आनंदाचे वातावरण आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने ब्रिटिशकालीन कायद्यावर आधारित कलम ३७७ राबविण्याच्या आपल्या २०१३च्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत.
 • मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्व भारतीय नागरिकांसाठी गोपनीयतेचा हक्क संवैधानिक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर समलैंगिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला.

घटनाक्रम

 • लॉर्ड मकॉले याने १८६० मध्ये मनुष्य किंवा प्राण्यांशी अनैसर्गिक शरीरसंबंध गुन्हा ठरविणाऱ्या या कायद्याचा मसुदा तयार केला यावर आधारित भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार समलैंगिकता हा गुन्हा असून त्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
 • दिल्ली उच्च न्यायालयाने २००९ मध्ये या कायद्यास तिलांजली देण्याचा घेतलेला निर्णय २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावला.
 • यावेळी सर्वोच्च न्यायालयास विरोध करणाऱ्या लोकसमुहाने या कायद्यामुळे घटनेचे कलम १४ (समानतेचा हक्क), १५ (लिंग, जात इ. वरून भेद निषिद्ध) व २१ (जीविताचा व स्वातंत्र्याचा हक्क) यांवर गदा येत असल्याचा आरोप केला.
 • त्याचबरोबर बहुसंख्यांकांचा असणारा हिंदू धर्मदेखील समलैंगिकतेस विरोध करीत नाही हा मुद्दा मांडला होता.
 • सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑगस्ट २०१७ रोजी गोपनीयतेच्या हक्कास मूलभूत अधिकारांमध्ये जागा दिल्यावर गोपनीयतेच्या कक्षा व्यक्तीच्या लैंगिकतेपर्यंत वाढविण्यासाठी मागणी सुरू झाली.
 • LGBT समाजाच्या या मागणीवर विचार विनिमय करण्यासाठी न्यायाधीशांचे खंडपीठ बसविण्यात आले; या खंडपीठानेच कलम ३७७चा पुनर्विचार करण्याचा निर्णय दिला.

सद्यःस्थिती

 • समलैंगिकतेस निष्कलंक ठरवण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असले तरीही कलम ३७७ मध्ये समलैंगिकते व्यतिरिक्त विषमलैंगिक व्यक्तींना काही बंधने आणि मनुष्याने पशूंशी शरीरसंबंध ठेवण्यास प्रतिबंध यांचाही समावेश आहे.
 • समलैंगिक समाजास त्यांचे हक्क मिळवून देताना ३७७ कलमात उल्लेखलेल्या इतर पाशवी गोष्टींवरील बंधने राखणे यासाठी या कलमावर ऊहापोह होणे आवश्‍यक आहे.  

संबंधित बातम्या