करंट अफेअर्स
गुरुवार, 5 एप्रिल 2018
स्पर्धा परिक्षांचा गेटवे
करंट अफेअर्स
राष्ट्रीय
भारतातील पहिले कीटकालय
- कोइम्बतुर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागात देशातील पहिले ‘कीटक संग्रहालय’ उभे राहिले आहे.
- तमिळनाडू राज्य सरकारने ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून उभारलेल्या या संग्रहालयात विविध ५० जातींच्या सुमारे २० हजार कीटकांचे जतन करण्यात आले आहे.
- काही जिवंत तसेच मृत व जतन केलेल्या कीटकांच्या नमुन्यांसह त्यांची जीवनसाखळी दाखविणारे तक्ते, चित्रे, चित्रफिती तसेच कीटकांच्या वर्तन, सवयी व निवारे यांवर आधारित प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत.
- ‘बग्ज आर किंग्ज’ हे घोषवाक्य असलेल्या या संग्रहालयात कीटकविविधता, कीटक जीवशास्त्र, कीटक व वनस्पती, कीटकांची उपयुक्तता आणि सांस्कृतिक कीटकशास्त्र या पाच विभागांत कीटकांची व त्यांच्या माहितीची मांडणी केली आहे.
- प्राणिशास्त्र या विषयातील तज्ज्ञ आणि संशोधकांसोबतच हे
- संग्रहालय शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य लोकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
आयएनएस गंगा निवृत्त
- तीन दशकांहून अधिक वर्षे सेवा पुरवलेल्या आयएनएस गंगा या देशी बनावटीच्या युद्धनौकेस मुंबई येथे निवृत्त करण्यात आले.
- मुंबईतील माझगाव डॉक येथे तयार करण्यात आलेली ही नौका डिसेंबर १९८५ या वर्षापासून भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू करण्यात आली होती.
- भारतीय नौसेनेने हाती घेतलेल्या ‘गोदावरी’ या पहिल्या देशांतर्गत युद्धनौका निर्मितीच्या उपक्रमातील असलेली आयएनएस गंगा ही क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणारी नौका होती.
जगातील सर्वांत लांब गुहा
- मेघालय राज्यातील खासी टेकड्यांच्या पूर्वेकडील जिल्ह्यात लैत्सोहम गावानजीक जगातील सर्वाधिक लांबलचक वालुकामय गुहेचा शोध लागला आहे.
- सदर गुहेच्या अस्तित्वाचा शोध २०१६ या वर्षीच लागला होता. परंतु आता मेघालय ॲडव्हेंचर असोसिएशनला गुहेचा अभ्यास करताना तिच्या लांबीची माहिती मिळाली आहे.
- ‘क्रेम पुरी’ असे नामकरण करण्यात आलेली ही गुहा २४.५८ किलोमीटर लांब असून यापूर्वी व्हेनेझुएला देशातील १८.२ किलोमीटर लांबीची कुएव्हा डेल सलमान ही गुहा जगातील सर्वाधिक लांबीची वालुकामय गुहा म्हणून ओळखली जात होती.
- खडकाळ टेकड्यांच्या खाली सापडलेली क्रेम पुरी गुहा ही वालुकामय खडकांची (sandstone) असून तिची रचनाही जटिल आहे.
- या गुहेमध्ये डायनोसॉरच्या काळातील मोझासॉर तसेच काही सरपटणाऱ्या प्राण्यांचे तब्बल ६६-७६ दशलक्ष वर्षे जुने जीवाश्म आढळले आहेत.
- लांबीच्या दृष्टीने वालुकामय खडक प्रकारांत भारतात प्रथम असणारी क्रेम पुरी मात्र एकूण गुहांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- एकूण गुहा प्रकारांत चुनखडकांतील क्रेम लियात प्राह-उमिम-लाबिट ही ३१ किलोमीटर लांबीची भारतातील सर्वाधिक लांबीची गुहा असून ती मेघालयातील जैतिया टेकड्यांमध्ये आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान
GSAT-6A उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- इस्रोने GSAT-6A या दळणवळणाच्या उपग्रहाचे आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले.
- जीएसएलव्ही यानामार्फत प्रक्षेपित केलेला हा उपग्रह भारतीय बनावटीचा आजवरचा सर्वांत मोठा उपग्रह असून तीन वर्षांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या GSAT-6 या उपग्रहाला हा मदत करणार आहे.
- या उपग्रहाच्या निर्मितीसाठी २७० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षांचे आहे. या उपग्रहाचे वजन २०६६ किलोग्रॅम आहे.
- दळणवळणाच्या उद्देशाने प्रक्षेपित करण्यात आलेला हा उपग्रह संपर्काचे जाले वाढविण्यासोबत भारतीय लष्करासाठी उपयुक्त ठरणार आहे.
आबेल : गणिताचे नोबेल
- गणित क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा ‘आबेल पुरस्कार’ कॅनडातील प्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. रॉबर्ट लॅंगलॅंडस् यांना प्रदान करण्यात आला असून त्यांचे संशोधन ‘लॅंगलॅंडस् प्रोग्रॅम’ या नावाने प्रसिद्ध आहे.
- ‘लॅंगलॅंडस् प्रोग्रॅम’ हा प्रकल्प आधुनिक गणिती क्षेत्रातील सर्वांत मोठी फलनिष्पत्ती असल्याचे म्हटले गेले आहे.
- लॅंगलॅंडस् प्रोग्रॅमशिवाय क्लास फील्ड थिअरी, ऑटोमॉर्फिक फॉर्म आणि नंबर थिअरी यांतही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
- आइन्स्टाईनने गणितज्ज्ञ म्हणून काम केलेल्या प्रिन्स्टन येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज’ या संस्थेत रॉबर्ट लॅंगलॅंडस् मानद प्राध्यापक म्हणून काम करतात.
समस्या आणि ऊहापोह
फेसबुक हटाव मोहीम
- अमेरिकेतील निवडणूक मोहिमेला २०१६ या वर्षामध्ये, ‘केंब्रिज ॲनालिटिका’ या ब्रिटिश कंपनीने तब्बल पन्नास लाख लोकांची फेसबुक माहिती पुरवून साहाय्य केले असल्याची बातमी अलीकडेच उघड झाली.
- सदर माहिती केंब्रिज अनालिटीकाचा माजी संशोधक संचालक ख्रिस्तोफर वायली यानेच प्रसार माध्यमांना पोहोचवली.
- त्यानंतर सध्या फेसबुकच्या मालकीचे असलेल्या ‘व्हॉटस् अप’ कंपनीचे सह-संस्थापक ब्रायन अक्टन यांनी लोकांना ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकवरील आपले अकाऊंट बंद करून निषेध व्यक्त करायचे आवाहन केले.
- यानंतर सुप्रसिद्ध ‘स्पेस एक्स’ कंपनीचा संस्थापक इलॉन मस्क यानेही फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गशी असलेले जुने वैर साधत ‘फेसबुक हटाव’ (#DeleteFacebook) मोहिमेस प्रोत्साहन दिले.
पार्श्वभूमी
- सप्टेंबर २०१६ मध्ये स्पेस एक्सने निर्माण केलेल्या ‘फाल्कन ९’ या यानाची चाचणी घेत असताना प्रक्षेपणापुर्वीच त्याच्यात स्फोट घडून आला.
- या स्फोटात यानाच्या काही भागासह ‘अमोस-६’ हा इस्रायली बनावटीचा फेसबुक कंपनीचा संदेशवाहक उपग्रह जाळून खाक झाला.
- यामुळे फेसबुकचे अंतराळस्थित इंटरनेट सेवा पुरविण्याचा प्रकल्प धुळीस मिळाला तसेच त्या उपग्रहाशी निगडित आफ्रिकेतील अनेक उद्योजकांना हाताशी घेऊन होऊ घातलेला व्यवसाय बुडीत गेला.
- या नुकसानीसाठी आपण एका ग्रहाचे संपूर्ण मोफत
- प्रक्षेपण दिले असून जळालेल्या उपग्रहाचा विमाही
- फेसबुकला मिळाला असल्याचे इलॉन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
- फेसबुकच्या व्यावसायिक नुकसान भरून येण्यापूर्वी स्पेस एक्सने मात्र अंतराळस्थित इंटरनेट सेवेचे उद्दिष्ट ठेवत या क्षेत्रात बरीच प्रगती केली.
- याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) या विषयावरून मस्क आणि मार्क यांच्यात वैचारिक मतभेदांमुळे शाब्दिक चकमक सुरू आहे.
सद्यःस्थिती
- ब्रायन अक्टन यांच्या आवाहनाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने
- मस्क यांनी आपली ‘स्पेस एक्स’, ‘हायपरलूप’, ‘टेस्ला’, ‘सोलार सिटी’ अशी ‘बोरिंग कंपनी’ ‘ओपन AI’ वगळता अनेक पेजेस बंद केली.
- प्रत्यक्षात इलॉन मस्क यांच्या कंपन्यांच्या व्यवसायाला त्यांच्या फेसबुकवरील पेजेसचा विशेष व्यावसायिक लाभ नव्हता तसेच त्यांच्यासाठी ते प्रसिद्धी माध्यमही नव्हते.
- एकीकडे फेसबुकवर निषेध व्यक्त करताना मस्क यांनी फेसबुकच्या मालकीचे असणाऱ्या ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावरून माघार घेतली नाही.
निष्कर्ष
- सध्या जोर धरत असलेली ‘फेसबुक हटाव’ची मोहीम ही लोकांच्या गोपनीयतेच्या हक्कांसाठी नसून मुख्यतः ती मोठ्या व्यावसायिकांच्या राजकारणातून उभी राहिली आहे.
- इंटरनेटच्या बाबतीत म्हटले जाते की, ‘जेथे उत्पादन मूल्यारहित असते तेथे, त्याचा वापरकर्ताच उत्पादनासाठीचे मुख्य उत्पादन असते’; थोडक्यात सामान्य लोकांचा या समाजमाध्यमांद्वारे अनेकदा वापर केला जातो.
- अशा वेळी समाजमाध्यमे हाताळताना आपल्या गोपनीयतेची अधिकाधिक सुरक्षा ठेवून कोणत्याही वैचारिक प्रवाहाशी स्वतःस बांधून न घेणे हेच इष्ट.