स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स 

सायली काळे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

करंट अफेअर्स

राष्ट्रीय 
"धूप' प्रकल्प 

 • भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशाच्या विशेषतः तरुण नागरिकांतील "ड.' जीवनसत्त्वाचा अभाव कमी करण्यासाठी "धूप' प्रकल्प हाती घेतला आहे. 
 • याद्वारे शाळांना त्यांचे सकाळच्या वेळेतील उपक्रम हे दुपारी 11 ते 1 वेळेत घेण्याचे आवाहन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या शरीरात सूर्यप्रकाशाद्वारे अधिकाधिक जीवनसत्त्व शोषले जावे हा त्यामागचा उद्देश आहे. 
 • NCERTच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण हा उपक्रम प्रथम नवी दिल्लीतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबविणार आहे. 

कोल इंडियाला मिथेनसाठी मोकळीक 

 • आर्थिक कॅबिनेट समितीने कोल इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीवरील कोळसा खाणीतील मिथेन वायू काढण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. 
 • यापूर्वी आपल्याच खाणीतील कोळश्‍याखाली मिळणारा मिथेन वायू व्यावसायिक उपयोगाकरिता काढण्यासाठी कोल इंडिया कंपनीला परवाना मिळवण्यासाठी तेल मंत्रालयाला अर्ज करावा लागत असे. 
 • यासाठी 1948च्या तेल क्षेत्र (नियंत्रण व विकास) कायद्याअंतर्गत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढलेल्या 2015च्या सूचनापत्रकात बदल करण्यात आला. 
 • यामुळे मिथेन वायूच्या उपसा आणि वापर यांना वेग येणार असून व्यवसाय सुगमतेसाठीच (Ease of doing business) या सुधारणा केल्या आहेत. 
 • हा मिथेन वायू आपल्या ज्वलनातून केवळ कार्बन डायऑक्‍साईड आणि पाण्याची वाफ बाहेर सोडत असल्याने पर्यावरणीयदृष्ट्या तो सुरक्षित असतो. 

आंतरराष्ट्रीय
​आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच 

 • आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या 16व्या बैठकीचे मुख्य यजमानपद भारताने स्वीकारले असून ही बैठक नवी दिल्ली येथे 10 ते 12 एप्रिल दरम्यान पार पडली. 
 • "ऊर्जासुरक्षेचे भविष्य: तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक' हा या वर्षीच्या बैठकीचा मुख्य विषय होता. तर देशांचे ऊर्जामंत्री या बैठकीस हजर होते. 
 • चीन आणि दक्षिण कोरिया यांनी बैठकीचे सह-यजमानपद स्वीकारले होते. 
 • बैठकीत उपस्थित राष्ट्रांमध्ये राजकीय आणि तांत्रिक पातळीवर एक अनौपचारिक संवाद झाला. 
 • ही बैठक दुसऱ्यांदा भारतात होत असून यापूर्वी 1996 मध्ये गोवा येथे पार पडली होती. 

​आर्थिक 

ईशान्य भारतासाठी "नीती मंच' 

 • आर्थिक विकासाचे उद्दिष्ट ठेवून खास ईशान्य भारतातील राज्यांसाठी फेब्रुवारी 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या नीती मंचाची पहिली बैठक त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे पार पडली. 
 • या बैठकीचे आयोजन नीती आयोग आणि ईशान्य भारत परिषदेने केले होते तर ईशान्येकडच्या आठही राज्यांचे प्रतिनिधी बैठकीस हजर होते. 
 • पाच विकास मोहिमा 
 • फळबाग, पर्यटन, अन्नप्रक्रिया, बांबू हस्तकला आणि "इन नॉर्थ-ईस्ट' अंतर्गत मध्यम दर्जाचे उद्योग या पाच क्षेत्रात विकास घडवून आणण्याच्या मोहिमेचा आराखडा या बैठकीत तयार करण्यात आला. 
 • HIRA विकास पद्धती 
 • महामार्ग, इंटरनेट मार्ग, रेल्वेमार्ग आणि हवाई मार्ग यांवर भर असणारी ही विकास पद्धती ईशान्य भारतात राबवली जाणार असून यासोबत शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यांकडेही विशेष लक्ष पुरवले जाणार आहे. 

 

पर्यावरण 

इ-कचऱ्यावर नवा उपाय 

 • भारतातील आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या मूळ भारतीय वंशाच्या वीणा सज्जाहवाला या ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकेने जगातील पहिला सूक्ष्म कारखाना (microfactory) तयार केला आहे. 
 • हा आगळावेगळा कारखाना लोकांनी टाकून दिलेल्या इलेक्‍ट्रॉनिक कचऱ्यातून लोकोपयोगी अशा नव्या वस्तू बनवून त्यांना पुनर्वापरात आणण्याचे काम करतो. 
 • अवघ्या 50 चौ.मी. एवढी जागा व्यापणारा हा सूक्ष्म कारखाना जेथे ई-कचऱ्याचा स्रोत आहे. तेथे हलविता येतो. 
 • या कारखान्यात ई-कचऱ्याव्यतिरिक्त काच, प्लास्टिक, लाकूड अशा इतर घन कचऱ्याचेही विविध हरित तंत्रज्ञानामार्फत व्यापारी उत्पादनांमध्ये रूपांतर केले जात आहे. 
 • कारखान्यातील वेगवेगळी यंत्रे अथवा यंत्रमालिका वापरून केलेल्या या तंत्रज्ञानाचे त्यांनी अधिकृत पेटंट घेतले आहे. 

 

विज्ञान-तंत्रज्ञान 

"IRNSS-1I` उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या "IRNSS-1I' या दिशादर्शक उपग्रहाचे आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केले. 
 • सुमारे 321 टन वजनाचा हा उपग्रह "PSLV-C41' या प्रक्षेपकामार्फत अंतराळातील सुनियोजित कक्षेत प्रक्षेपित करण्यात आला. 
 • PSLV या प्रक्षेपकाचे हे 43वे तर यशस्वी असे 41वे आणि त्याच्या "PSLV-XL' आवृत्तीचे हे 20 वे उड्डाण होते. 
 • इस्रोच्या अंतराळातील नाविक (NavIC) या दिशादर्शक उपग्रह समूहातील "IRNSS-1I' हा 8वा उपग्रह ठरणार असून तो आधीच्या उपग्रह सप्तकातील "IRNSS-1A' या पहिल्या उपग्रहाची जागा घेणार आहे. 
 • IRNSS-1A या उपग्रहातील रुबिडीअमची तिन्ही स्वयंचलित घड्याळे निकामी झाल्याने या नव्या उपग्रहाची सोय करावी लागली आहे. 
 • IRNSS-1I या उपग्रहाची निर्मिती ही इस्रोने बेंगळूरूतील अल्फा डिझाईन टेक्‍नोलॉजीज्‌ यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. 
 • सुमारे 10 वर्षांचे आयुष्य असणारा IRNSS-1I हा उपग्रह 36 हजार किलोमीटर उंचीवर भूसमांतर कक्षेत स्थानबद्ध राहील. 

 

समस्या ऊहापोह 

सीरिया युद्धाचे "रसायन' 

 • सिरीयामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याचा निषेध करताना या निर्घृण हल्ल्यावर एक जबाबदार पाश्‍चात्त्य नेता या नात्याने आपण कडक कारवाई करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
 • याचवेळी रशिया, इराण आणि खुद्द सीरिया हे नागरी भागात झालेल्या या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झालाच नसल्याचे म्हणत आहेत. 
 • या तथाकथित "रासायनिक हल्ल्याची' स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी रशिया संयुक्त राष्ट्रसंघाकडे करणार आहे. 
 • विरोधकांच्या मते पाश्‍चात्त्य देशांना सिरीयामध्ये आपल्या हालचाली करण्यास मुभा मिळावी व सध्याचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल्‌-असद यांचा सीरियातील नागरी युद्धात पराभव व्हावा यासाठी रासायनिक हल्ल्याचा बनाव रचला जात आहे. 

रासायनिक हल्ला व मतभेद 

 • सात एप्रिलच्या दिवसअखेरीस सीरियाच्या "डोमा' या बंडयुक्त भागात हल्ला झाल्यानंतर तेथे काम करणारे स्वयंसेवी पोलिस (white helmets) सर्वप्रथम नागरिकांच्या मदतीसाठी आले होते. 
 • या व्हाइट हेल्मेट दलाच्या मते या हल्ल्यात विषारी क्‍लोरिन वायूचा वापर करण्यात आला होता. 
 • रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये महिला व बालकांचे यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यामध्ये रासायनिक घटकांची लक्षणे ठळकपणे दिसून आली. 
 • घराघरांत सापडलेल्या मृतदेहांमध्येही रासायनिक हल्ल्याचीच लक्षणे दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

रशियाचा आरोप 

 • सिरीयन बंडखोर विरुद्ध सिरीयन मित्रराष्ट्रे रशिया यांत अमेरिकेला खेचून आपला फायदा करून घेण्यासाठी हा हल्ला रासायनिक असल्याचे बंडखोर सांगत आहेत. 
 • पुरेसा तपास होण्याआधीच रशियाने आपल्या लष्करास घटनास्थळी पाचारण केल्याने इथून पुढे सीरिया किंवा रशिया यांच्या तपासयंत्रणेवर विश्वास नसल्याचे पाश्‍चात्त्य देशांनी स्पष्ट केले आहे. 
 • याशिवाय सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल्‌-असद यांनी गेल्या काही वर्षांत अनेकदा आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले असून त्यांना रशियाचे पूर्ण पाठबळ असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. 

युद्धाचा मुख्य बळी 

 • गेले सात वर्ष चालू असलेला सिरीयामधील नागरी युद्धावर राजकीय तोडगा काढण्यास अपयश आल्याने तो जागतिक चिंतनाचा व चिंतेचा विषय बनला आहे. 
 • युद्धाच्या सात वर्षांत वादातीत राष्ट्राध्यक्ष बशर-अल्‌-असद यांनी अनेकदा रासायनिक हल्ले करून मोठा नरसंहार केल्याचे म्हटले जात असले तरी त्याबाबत अधिकृत पुरावे नाहीत. 
 • या युद्धाद्वारे रशिया, इराण आणि अमेरिकेसह मोठी पाश्‍चात्त्य राष्ट्रे आपापला फायदा करून घेत असताना नागरी युद्ध आणि इसिसच्या संकटात होरपळून गेलेल्या सिरीयन नागरिकांकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.

संबंधित बातम्या