स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018
करंट अफेअर्स
राष्ट्रीय
भारत आणि झेक रिपब्लिक यांच्यात पाच करार
- भारत आणि झेक रिपब्लिक या देशांनी लेझर तंत्रज्ञान, शेती, व्हिसा, संरक्षण,वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन या क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
- झेक रिपब्लिकची राजधानी प्रागमध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि झेक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष मालोस जामन यांच्यात चर्चा होऊन मग या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सायप्रस, बल्गेरिया आणि झेक
- रिपब्लिक अशा तीन दिवसीय युरोपीय दौऱ्यावर असताना हे करार झाले.
समलैंगिकता कायदेशीर
- सहा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कलंकातून मुक्त करत कलम ३७७ रद्द केले
- आहे.
- यापूर्वी परस्पर संमतीने समलैंगिक संबंध ठेवण्यास विरोध करणाऱ्या कलम ३७७ विरोधात नाझ फाउंडेशनने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश आर. एफ. नरिमन, न्यायाधीश ए. एम. खानविलकर, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.
- या निर्णयामुळे मागील तब्बल १५८ वर्षांपासून अमलात असलेल्या कलम ३७७ मधील वादग्रस्त समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या तरतुदी कालबाह्य होणार आहेत.
पर्यावरण
हिंदी महासागरात त्सुनामी सराव
- चार आणि पाच सप्टेंबर २०१८ रोजी भारतासह तेवीस देशांमध्ये ‘IOwave१८’ हा त्सुनामी सराव हिंदी महासागरात घेण्यात आला.
- या सरावाचे आयोजन युनेस्कोच्या आंतरसरकारी सागरी विज्ञान आयोगातर्फे करण्यात आले होते, तसेच सरावामध्ये किनारपट्टीवरील १२ राज्यांतील हजारो नागरिकांचे स्थलांतर करणे हा या सरावाचा एक भाग होता.
- या सरावात भारतातर्फे राष्ट्रीय सागरी सेवा, भूविज्ञान मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृहमंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बळ आणि किनारी भागातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.
- दोन दिवस चाललेल्या या सरावादरम्यान GTS, FAX, लघुसंदेश आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून १५ त्सुनामी वार्तापत्रे जारी करण्यात आली.
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त मेजर जनरल व्ही. के. नाईक यांच्या देखरेखीखाली सदर त्सुनामी सराव पार पडला.
गंगेला प्रदूषणाचा विळखा
- वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरने (WWFN) दिलेल्या अहवालानुसार गंगा नदी ही जगातील सर्वाधिक संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.
- प्रदूषणामुळे गंगा नदीची अवस्था अतिशय वाईट असून हृषिकेश या तीर्थस्थळपासूनच गंगेचा प्रदूषित भाग सुरू होतो.
- या परिसरातील शौचालयांची अवस्था दयनीय असून बहुसंख्य लोक नदीकाठी शौचास बसत असल्याने या भागात नदी प्रदूषित होत आहे.
- कानपूरपासून चारशे किलोमीटरवरील गंगेचे पाणी सर्वाधिक अशुद्ध असून तेथे असणारे वीजनिर्मिती प्रकल्प व त्यातून होणारा रसायनांचा थेट विसर्ग हे त्यामागचे मुख्य कारण आहे.
- याशिवाय गंगेच्या काठावरील अनेक कारखाने आपले सांडपाणी कोणत्याही पूर्वप्रक्रियेविना नदीच्या पाण्यात सोडत असल्याचे दिसून आले आहे.
- केंद्र सरकारकडून ‘नमामि गंगे’ या उपक्रमातून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही गंगेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
जपानमध्ये ‘जेबी’ वादळ
- जपान राष्ट्रास ‘जेबी’ वादळाचा तडाखा बसला असून गेल्या पंचवीस वर्षांतील जपानमधील हे सर्वांत मोठे वादळ आहे.
- जेबी जपानच्या किनाऱ्यास धडकले तेव्हा वाऱ्यांचा वेग २११ किमी प्रतितास एवढा होता.
- जेबीमुळे अतिवृष्टी, वेगवान वारे आणि भूस्खलन होऊन ११ लोकांचे प्राण गेले असून ३०० लोक जखमी झाले आहेत.
- यापूर्वी वर्ष १९९३ मध्ये जपानमध्ये असे विनाशकारी वादळ आले होते.
आंतरराष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद
- नेपाळची राजधानी काठमांडू येथे ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषद आयोजित करण्यात आली होती.
- या परिषदेचे उद्घाटन नेपाळचे उपराष्ट्रपती नंद बहाद्दूर यांनी केले तर ‘आर्थिक सशक्तीकरणातून समता’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता.
- या परिषदेचे आयोजन दक्षिण आशियायी महिला विकास मंचाकडून करण्यात आले होते.
- यशस्वी व आघाडीच्या महिला व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय सेवा प्रदाते, संसाधन संस्था, विशेषज्ञ, सरकारी प्रतिनिधी यांना एका व्यासपीठावर आणून चर्चा आणि सहकार्याद्वारे आर्थिक परिवर्तन घडविण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते.
- या परिषदेमध्ये सार्क, आसियान, युरोपियन युनियन, आफ्रिका, अरबी देश आणि चीनमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
चिनी बंदरांमध्ये नेपाळला प्रवेश
- चीनने नेपाळला व्यापारासाठी शेन्जेन, लियानयुगांग, झाजियांग आणि तियानजीन ही बंदरे खुली करून दिली आहेत.
- व्यापारासाठी केवळ भारतीय बंदरावर अवलंबून असणाऱ्या नेपाळला चीनच्या या निर्णयामुळे दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.
- भारताच्या शेजारी राष्ट्रांना मदत करून भारताची कोंडी करण्यासाठीच चीनने आपली बंदरे नेपाळसाठी खुली करून दिली आहेत.
- मात्र नेपाळसाठी उपलब्ध झालेला हा दुसरा पर्याय त्यांच्यासाठी सोपा नसून चीनचे सर्वांत जवळचे बंदर नेपाळपासून तब्बल २६०० किलोमीटर अंतरावर आहे.
सेऊल येथे ‘असेम’ची तिसरी बैठक
- जागतिक वृद्धत्व आणि वृद्धांचे मानवाधिकार हा विषय मध्यवर्ती ठेवून तिसऱ्या ASEM (आशिया युरोप बैठक) परिषदेचे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे आयोजन करण्यात आले होते.
- यावर्षीची ही परिषद दक्षिण कोरिया आणि कोरियन मानवाधिकार आयोगाने संयुक्तपणे आयोजित केली होती.
- या तीन दिवसीय परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघ (UN), (UNESCAP), युरोपियन युनियन (EU), आसियान, GANHRI अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला.
- सदर परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थवरचंद गेहलोत यांनी केली.
- या बैठकीत वृद्ध व्यक्तींचे अधिकार आणि त्यांच्या बाबत होणाऱ्या भेदभावांवर चर्चा करण्यात आली.
- या परिषदेतून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग ज्येष्ठ नागरिकांसाठीची धोरणे राबविण्यासाठी करण्यात येणार आहे.
आर्थिक
अटल निवृत्तिवेतन योजनेतील बदल
- ऑगस्ट २०१८ मध्ये अटल निवृत्तिवेतन योजनेची मुदत संपत असली तरीही योजनेला असणाऱ्या लोकांच्या उत्तम प्रतिसादामुळे अनिश्चित काळासाठी ही मुदत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
- याशिवाय अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी योजनेच्या वयोमर्यादेतही बदल करण्यात आले असून ती साठ वर्षांवरून पासष्ट करण्यात आली आहे.
- अपघात विम्याची रक्कमही एक लाख रुपयांवरून दोन लाख रुपये इतकी करण्यात आली असून ही वाढीव रक्कम ऑगस्ट २०१८ नंतर या योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी असणार आहे.
- तसेच ओव्हरड्राफ्ट सुविधेची मर्यादाही वाढविण्यात आली असून ती पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
ॲमेझॉनचे बाजारमूल्य वधारले
- ऑनलाइन सेवेद्वारे वस्तू पुरविणाऱ्या ॲमेझॉन कंपनीच्या आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याने पाच सप्टेंबर रोजी एक हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला.
- एवढे मोठे बाजारमूल्य असणारी ॲमेझॉन ही अमेरिकेतील दुसरी तर जगातील तिसरी कंपनी ठरली आहे.
- यापूर्वी ॲपल कंपनीने ऑगस्ट २०१८ मध्ये १ हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला होता, तर २००७ या वर्षी शांघाय बाजारात ‘पेट्रोचायना’ या कंपनीचे मुली एक हजार अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते.