स्पर्धा परिक्षांचा गेटवे

सायली काळे 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय

आदिवासी भाषा शब्दकोश

 • ओडिशा राज्य सरकारने आदिवासी भाषांच्या जतनासाठी राज्यातील २१ आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले आहेत.
 • द्विभाषिक आदिवासी शब्दकोश हे आदिवासी जमात असलेल्या जिल्ह्यात प्रथम राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या बहुभाषिक शिक्षणामध्ये वापरले जातील.
 • ओडिशा राज्यात ६२ आदिवासी समुदाय असून त्यातील १३ समुदाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
 • या सर्व जमातींच्या २१ मुख्य भाषा व ७४ बोलीभाषा असून त्यातील केवळ ७ भाषांना स्वतःची लिपी आहे.

भाषा संगम

 • केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मोहिमेअंतर्गत ‘भाषा संगम’ हा उपक्रम आयोजित केला असून तो २८ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे.
 • या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील २२ भारतीय भाषांचा परिचय करून देण्यात येणार असून यामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) आणि इतर मान्यताप्राप्त शाळांच्या इ. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे.
 • राष्ट्रीय व भाषिक एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषांची तोंडओळख करून देण्यात येणार आहे.
 • त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक भाषेतील ५ वाक्‍ये शिकविली जाणार असून ती बोलण्याचा सराव करून घेण्यात येणार आहे.

रक्षा ज्ञान शक्ती मोहीम

 • स्वदेशी संरक्षण निर्मिती क्षेत्रात बौद्धिक संपदा अधिकार संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते रक्षा ज्ञान शक्ती मोहिमेचा आरंभ करण्यात आला.
 • या मोहिमेची सुरुवात संरक्षण उत्पादन विभागाद्वारे करण्यात आली असून संरक्षण निर्मितीच्या क्षेत्रात भारतास स्वयंपूर्ण बनविणे हा त्यामागचा उद्देश आहे.
 • सदर मोहिमेच्या समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी ही गुणवत्ता आश्वासन महासंचालकांना देण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुनील अरोरा यांची आगामी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली असून ते भारताचे तेविसावे मुख्य निवडणूक आयुक्त ठरणार आहेत.
 • एक डिसेंबर रोजी पूर्वीचे आयुक्त ओ.पी.रावत हे निवृत्त झाल्यानंतर अरोरा यांनी या पदाची सूत्रे हातात घेतली.
 • पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळात अरोरा कार्यरत राहणार असून आगामी लोकसभा निवडणुका (२०१९) त्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहेत.
 • यापूर्वी सुनील अरोरा यांनी राजस्थान विभागामध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्य केले असून २०१७ पासून त्यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती.

विज्ञान-तंत्रज्ञान
ई.-दृष्टी सॉफ्टवेअर

 • प्रवासी रेल्वे तसेच मालगाडी या दोन्हींच्या वक्तशीरपणावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने या सॉफ्टवेअरची निर्मिती केली असून त्याचा वापर देशभरातील कोणत्याही ठिकाणी करण्यात येणार आहे.
 • केंद्रीय रेल्वे माहिती प्रणालीद्वारे विकसित करण्यात आलेले हे सॉफ्टवेअर विविध रेल्वेगाड्यांचे उत्पन्न, रेल्वे स्थानकांबाबत माहिती तसेच प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यासही उपयोगी पडणार आहे.
 • ‘ई.-दृष्टी’ला आयआरसीटीसीच्या बेस किचनशी जोडण्यात येणार असून प्रवाशांकरिता आरक्षित व अनारक्षित जागांची माहिती मिळू शकणार आहे.

भारत कौशल्य अहवाल २०१९

 • भारत कौशल्य अहवालाची सहावी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली असून रोजगार प्रदानामध्ये आंध्रप्रदेश राज्य देशात अव्वल असून त्याखालोखाल राजस्थान व हरियाना ही राज्ये आहेत.
 • व्यावसायिक मार्गदर्शनाअभावी ७० टक्के तरुणांना आपल्या कौशल्याप्रमाणे नोकरी मिळत नसल्याचे दिसून आले आहे.
 • हे सर्वेक्षण व्हीबॉक्‍स, पीपल स्ट्राँग आणि भारतीय उद्योग महासंघाद्वारे (CII) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (NICTE), संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि भारतीय विद्यापीठ संघ यांनी एकत्रितपणे केले आहे.

पर्यावरण
उलूक महोत्सव

 • पुरंदर तालुक्‍यातील पिंगोरी येथे २९ व ३० नोव्हेंबर रोजी देशातील पहिला उलूक (घुबड) महोत्सव पार पडला असून त्याचे आयोजन इला फाउंडेशनने केले होते.
 • अंधश्रद्धा आणि गैरसमज यांमुळे होणाऱ्या कत्तलींमुळे घुबडांच्या २६२ प्रजातींपैकी केवळ ७५ प्रजाती भारतात आढळून येत असून त्यातील सुमारे ४० प्रजाती महाराष्ट्रात दिसून येतात.
 • घुबडांच्या अधिवासासाठी आवश्‍यक असणारे मोठे वृक्ष नष्ट होणे हेही घुबडांची संख्या होण्यामागचे कारण आहे.
 • घुबडाच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी निसर्गाच्या अन्न साखळीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे कार्य या पहिल्या उलूक महोत्सवातून करण्यात आले.

पर्वतीय औषधींवर काँग्रेस

 • नेपाळमधील काठमांडू येथे २१ ते २४ डिसेंबर दरम्यान पर्वतीय औषधींवर बारावी जागतिक काँग्रेस पार पडली असून ‘हिमालयाच्या हृदयातील पर्वतीय औषधी’ हा यावेळच्या काँग्रेसचा मुख्य विषय होता.
 • दर दोन वर्षांनी होणाऱ्या या संमेलनात उंच डोंगराळ भागात आढळणाऱ्या औषधांच्या संशोधन कार्यावर चर्चा केली जाते.
 • यावर्षीच्या काँग्रेसमध्ये भारत, चीन, जपान, इंग्लंड, इटली, अमेरिका इत्यादी ४० देशांतील ४०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.
 • या काँग्रेसचे आयोजन हे इंटरनॅशनल सोसायटी फॉर माऊंटन मेडिसिनद्वारे केले जात असून नेपाळमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय
कोप इंडिया 

 • तीन ते चौदा डिसेंबर दरम्यान पश्‍चिम बंगाल येथे कोप इंडिया हा भारत व अमेरिकेदरम्यान हवाई युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला आहे.
 • हा द्विपक्षीय उड्डाण कार्यक्रम कलाईकुंडा आणि अर्जुनसिंह या पश्‍चिम बंगाल राज्यातील दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर होणार आहे.
 • परस्पर सहकार्य आणि कौशल्याची देवाण-घेवाण हा या युद्ध सरावाचा मुख्य उद्देश आहे.
 • यावर्षीच्या ‘कोप इंडिया’मध्ये १५ विमानांसह अमेरिकेचे २०० वायुसैनिक सहभागी होणार आहेत.

कोकण १८ 

 • ‘कोकण १८’ हा भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारा संयुक्तिक नौदल सराव २८ नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून पुढील ६ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
 • या सरावात इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचे प्रतिनिधित्व ‘HMS Dragon’ ही युद्धनौका आणि वाईल्ड्‌कॅट हे हेलिकॉप्टर करणार असून भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व ‘आयएनएस कोलकता’ करणार आहे.
 • सागरी भागात गस्त घालणारी भारती नौदलाची ‘सीकिंग’ आणि ‘डॉर्निअर’ देखील या युद्ध सरावात सहभागी होणार आहेत.
 • युद्ध कौशल्य आणि तंत्रज्ञानाची परस्पर देवाण-घेवाण हे या युद्ध सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 • ‘कोकण’ या द्वीपक्षीय नौदल युद्ध सरावाची सुरुवात २००४ मध्ये करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव

 • हरियानातील कुरुक्षेत्र येथे ७ ते २३ डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ही या कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आहे.
 • कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भारतातून गुजरात राज्य सहभागी असून याशिवाय मॉरिशसदेखील सहभागी होणार आहे.
 • कुरुक्षेत्र विकास मंडळ, हरियाना पर्यटन तसेच जिल्हा प्रशासन व माहिती आणि जलसंपर्क विभाग हेही सदर महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असणार आहे.
 • या कार्यक्रमामध्ये कुरुक्षेत्रमधील भिंतींवर २०० हून अधिक चित्रकार महाभारतातील कथांवर आधारित चित्रे रेखाटणार असून यात भारत, मॉरिशस, इंडोनेशिया, इराण, तुर्कमेनिस्तान आणि रशिया येथील कालाकारांचा सहभाग असणार आहे.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या