स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय

एरो इंडिया २०१९

 • ‘एरो इंडिया ’ या संरक्षण व उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या १२ व्या प्रदर्शनाचे आयोजन बेंगळूरूतील हवाई दल केंद्रामध्ये २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान केले जाणार आहे.
 • या पाच दिवसीय कार्यक्रमात माहिती, कल्पना तसेच संरक्षण व हवाई-अंतराळ उद्योगातील नवीन उपक्रमांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात भारतासाठी व्यापाराच्या संधी निर्माण करणे हा ‘एरो इंडिया२०१९’ चा मुख्य उद्देश आहे. याद्वारे ‘मेक इन इंडिया’ला देखील चालना देण्यात येणार आहे.
 • हे प्रदर्शन द्विवार्षिक असून संरक्षण निर्मिती व खासगी उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
 • ‘एरो इंडिया’ मधील नियोजित कार्यक्रम : स्टार्ट-अप दिन (२१ फेब्रुवारी), तंत्रज्ञान व विद्यार्थी दिन (२२ फेब्रुवारी), महिला दिन (२३ फेब्रुवारी), ड्रोन ऑलिंपिक, छायाचित्रण स्पर्धा

दुर्बल सवर्णांचे आरक्षण राज्यातही लागू

 • खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्था यामध्ये १० टक्के आरक्षण देण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
 • केंद्रात हे आरक्षण १४ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात आले आहे. त्यानंतर असे आरक्षण देणारे गुजरात राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे.
 • खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षणात दिल्याने अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्ग यांच्या आरक्षणास कुठेही धक्का लागणार नाही. सवर्णांना आरक्षण देताना निकष ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असतील.
 • खुल्या प्रवर्गातील इतर कोणत्याही आरक्षणाचा लाभ न मिळालेले आणि कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांहून कमी असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
 • कौटुंबिक उत्पन्न लक्षात घेताना शेती, नोकरी, व्यापार व इतर सर्व उत्पन्नाचे स्रोत विचारात घेतले जाणार आहेत. तसेच आई-वडील व १८ वर्षांखालील भावंडे हे कुटुंबाचे सदस्य म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.
 • शेतजमीन ५ एकरांहून अधिक असेल किंवा १ हजार चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाचे घर असणाऱ्या कुटुंबांना हे आरक्षण लागू होणार नाही.
 • हे आरक्षण १ फेब्रुवारी २०१९ पासून  राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीमध्ये लागू केले आहे.  

पर्यावरण
सिंधूतील डॉल्फिनला राज्यप्राण्याचा मान

 • सिंधूनदीत आढळणाऱ्या व नामशेष होत चाललेल्या डॉल्फिनला पंजाब राज्याने ‘राज्य जलचर प्राणी’ म्हणून घोषित केले आहे.
 • मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 • सध्या पंजाबमध्ये काळवीट हा राज्यप्राणी आणि बहिर ससाणा (नॉर्दन गॉसहॉक) हा राज्यपक्षी आहे.
 • सिंधू नदीतील डॉल्फिन गेल्या हे ७० वर्षांपासून व्यास (बियास) नदीतही आढळून आले आहेत.
 • हेच डॉल्फिन पाकिस्तानात मुख्यत्वेकरून चष्मा व कोटरी या धरणांमध्ये दिसून येतात.
 • करड्या रंगाचे, दृष्टिहीन असणाऱ्या या डॉल्फिनचे सरासरी आयुर्मान ३० वर्षांचे असून सर्वेक्षणानुसार त्यांची संख्या केवळ  १८१६ इतकी आहे.
 • व्यास नदीत केवळ ७ ते ११ डॉल्फिन असल्याचे आढळून आले आहेत. पंजाब राज्य त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

नवीन भारतीय पाणबुड्यांना मंजुरी

 • भारतीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने नव्या ६ पाणबुड्या बांधण्याच्या ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे.
 • याचसोबत लष्करासाठी फ्रान्सकडून ५ हजार ‘मिलान २ टी’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या प्रकल्पासही मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
 • केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या धोरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे आहेत. 
 • पाणबुड्यांच्या प्रकल्पास ‘७५ आय’ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नौदलासाठी ६ इलेक्‍ट्रॉनिक पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
 • या सर्व पाणबुड्या ब्राह्मोस या अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह पाणतीर आणि शत्रूच्या शोधप्रणालीस चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असणार आहेत.
 • हिंदी महासागरातील चीनी नौदलाच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता भारतीय नौदलास अधिक सक्षम बनविण्यासाठी पाणबुड्यांचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
 • ‘संरक्षण खरेदी परिषद’ ही  २००१ मध्ये स्थापन झालेली भारताच्या संरक्षण क्षेत्रातील साहित्य खरेदीसंबंधी निर्णय घेणारी संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च समिती आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतात.

विज्ञान-तंत्रज्ञान
जीएसएटी-३१चे प्रक्षेपण 

 • भारतीय संदेशवाहक उपग्रह जीएसएटी-३१चे फ्रान्स येथील गयाना अंतराळ केंद्रातून एरियन स्पेसच्या ‘एरियन-५’ या प्रक्षेपकाद्वारे ६ फेब्रुवारी रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
 • भारताच्या जीएसएटी-३१ सोबतच सौदी अरेबियाच्या हेळस उपग्रह-४ याचेही प्रक्षेपण करण्यात आले. 
 • जीएसएटी-३१ हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा चाळिसावा संदेशवाहक उपग्रह असून तो इन्सॅट-४ या जुन्या संदेशवाहक उपग्रहाची जागा घेणार आहे.
 • हा उपग्रह भारतीय भूभागावरील संदेशवहनाच्या दूरदर्शन सेवांसोबतच अरबी समुद्र, बंगालची खाडी या क्षेत्रावरही संदेशवाहन करणार आहे.

मानव अंतराळ उड्डाण केंद्र

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या बेंगळूरूस्थित मुख्यालयात मानव अंतराळ उड्डाण (HSFC : Human Space Flight Centre) स्थापन करण्यात आले.
 • ‘गगनयान’या इस्रोच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी या केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. या केंद्रातून मोहिमेचे नियोजन, अभियांत्रिकी प्रणालीचा विकास, मोहिमेच्या चमूची निवड व प्रशिक्षण अशी संबंधित सर्व कामे पहिली जातील.

आंतरराष्ट्रीय
व्हेनेझुएलावर दुहेरी संकट

 • दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियन गणराज्य व्हेनेझुएला हा अंतर्गत राजकीय व आर्थिक अस्थिरतेच्या गर्तेत आहे. त्यामुळे सत्ताबदल न झाल्यास लष्करी कार्यवाही करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
 • व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरोधात जनआंदोलन चालू असतानाच विरोधी पक्षनेते जुआन गुएडो यांनी स्वतःला हंगामी अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे.
 • व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्या मृत्युनंतर त्यांच्या गोटातील तत्कालीन उपाध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सत्ता आपल्या हाती घेतली.
 • डिसेंबर २०१८मध्ये निवडणुकीत विजयी ठरल्याने मादुरो यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरु झाला, मात्र निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोप करत मादुरो यांच्या विरोधात निदर्शने होत आहेत.
 • युरोपीय महासंघाच्या १९ सदस्य देशांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि लोकशाही मार्गाने अध्यक्षीय निवडणुकीचे आवाहन करत गुएडो यांना समर्थन देणाऱ्या संयुक्त घोषणेवर स्वाक्षरी केली होती.
 • तसेच लिमा गटाच्या १४ पैकी ११ देशांनी व्हेनेझुएलाला तत्काळ सत्तांतराचे आवाहन केले होते. मात्र निकोलस मादुरो यांनी पुन्हा निवडणुका घेण्यास नकार दिला आहे.      

संबंधित बातम्या