स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 18 मार्च 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
किमान मजुरी दरपद्धती निश्‍चित होणार

 • राष्ट्रीय मजुरी दर ठरविण्यासाठीची पद्धत निश्‍चित करण्याचे काम डॉ. अनुप सतपथी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्यात आले होते.
 • सदर समितीने मजुरी दर निश्‍चितीच्या पद्धतींचे परीक्षण व पुनरवलोकन करून एक अहवाल शासनाकडे दिला आहे.

  अहवालातील शिफारशींनुसार :

 1.  मजुरी दरांमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मानकानुसार समतोल आहाराचा (२४०० उष्मांकांसह ५० ग्रॅम प्रथिने आणि ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थ) विचार समाविष्ट असावा.
 2. याशिवाय कपडे, घरभाडे, इंधन, शिक्षण, वीज, आरोग्य, वाहतूक अशा अन्नेतर खर्चांचाही विचार करण्यात यावा.
 3. घरभाडे व भत्ता म्हणून शहरी भागातील मजुरांना किमान मजुरी वेतनाव्यतिरिक्त ५५ रुपये प्रतिदिन (दरमहा १४३० रुपये) अधिक देण्यात यावेत.
 4. दर पाच वर्षांनी किमान मजुरी दराचे पुनरवलोकन करून त्यात तेव्हाच्या परिस्थितीनुसार योग्य ते बदल करून घ्यावेत. सदर समितीने विविध भौगोलिक भागांसाठी सामाजिक, आर्थिक आणि श्रमिक बाजारपेठेतील स्थितीनुसार वेगवेगळे किमान मजुरी दर निश्‍चित केले आहेत.
 • प्रदेश १ - आसाम, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओडिशा, प. बंगाल
  प्रतिदिन मजुरी - ३४२ रुपये
   
 • प्रदेश २ - उत्तराखंड, तेलंगणा, छत्तीसगड, जम्मू-काश्‍मीर, राजस्थान
  प्रतिदिन मजुरी - ३८० रुपये
   
 • प्रदेश ३ - महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू
  प्रतिदिन मजुरी - ४१४ रुपये
   
 • प्रदेश ४ - हिमाचल प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली, गोवा
  प्रतिदिन मजुरी - ४४७ रुपये
   
 • प्रदेश ५ - त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, आसाम, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नागालॅंड, मणिपूर
  प्रतिदिन मजुरी - ३८६ रुपये

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ

 • केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात (MSP) प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ करून साखरेचा दर ३१ रुपये प्रतिकिलो केला आहे.
 • साखर कारखान्यांवरील कर्जाचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यात सुमारे सहा टक्‍क्‍यांनी वाढ होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. (मानांकन संस्था इक्राचा अहवाल)
 • गेल्या अनेक महिन्यांपासून किमान विक्री दर २९ हजार रुपये प्रतिटनांवर स्थिर राहिल्याने जानेवारी २०१९ पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी २० हजार कोटी रुपयांवर पोहोचली.
 • किमान विक्री दराच्या वाढीनंतर कारखान्यांच्या नफ्यात वाढ होऊन त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांस होणे 
 • अपेक्षित असून त्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यान्वित असणार आहे.
 • त्या अनुषंगाने संकटग्रस्त साखर कारखान्यांसाठी शासनाने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क लागू करून निर्यात शुल्क रद्द केले आहे.
 • सन २०१८-२०१९ मध्ये ३.०७ कोटी टन साखर उत्पादन होणे अपेक्षित असून देशांतर्गत मागणीपेक्षा ४५ लाख टन साखरेचे अधिक उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
अमेरिकेचे ‘ऑपोर्च्युनिटी’ संपुष्टात

 • अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या ‘ऑपोर्च्युनिटी रोव्हर’ या यानाची मोहीम संपल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
 • सन २००३ मध्ये ‘स्पिरीट’ हे पहिले यान प्रक्षेपित केल्यानंतर ९० दिवसांनी २००४ मध्ये जानेवारी महिन्यात ‘ऑपोर्च्युनिटी’ हे यान प्रक्षेपित करण्यात आले होते.
 • सौरउर्जेवर कार्यप्रणाली करणारी स्पिरीट आणि ऑपोर्च्युनिटी 
 • ही दोन्ही याने क्रमशः मंगळावरील ‘ग्रुसेव क्रेटर’ आणि ‘मेरीडीयेनी प्लेनम’ या परस्पर विरुद्ध दिशेला असणाऱ्या ठिकाणी उतरली होती.
 • मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या धुळीच्या प्रचंड वादळामुळे सूर्यकिरणांअभावी ‘ऑपोर्च्युनिटी’ निद्रिस्त अवस्थेत जाऊन १० जूननंतर संपर्कात आलेच नाही.
 • मंगळाच्या दक्षिण गोलार्धात सुरू होत असणारा हिवाळा लक्षात घेता कमी सूर्यप्रकाश आणि तापमान यांमुळे हे यान पुन्हा सुरू होण्याच्या शक्‍यता धूसर झाल्याने नासाने ही मोहीम संपल्याचे जाहीर केले.
 • केवळ ९० दिवसांचा कार्यकाळ गृहीत धरून प्रक्षेपित केलेल्या या यानांपैकी ‘स्पिरीट’ने आठ वर्षांत आठ किलोमीटरचा प्रवास करून मे २०११ पर्यंत, तर ‘ऑपोर्च्युनिटी’ने १५ वर्षांत ४५ किलोमीटरचा प्रवास करून जून २०१८ पर्यंत कार्य केले.

आर्थिक
एफपीआय गुंतवणुकीवर मर्यादा नाही

 • भारतीय रिझर्व्ह बॅंकेने अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीवर (FPI) बाँडस्‌मध्ये २० टक्के गुंतवणुकीची मर्यादा घालणारा आदेश मागे घेतला आहे.
 • कॉर्पोरेट ऋण बाजारातील एफपीआय गुंतवणुकीच्या एप्रिल २०१८ मध्ये घेतलेल्या आढाव्यानंतर एफपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ही २० टक्‍क्‍यांची मर्यादा लागू करण्यात आली होती.
 • मात्र यामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार प्रतिबंधित होत असल्याचे लक्षात आल्याने बाँडस्‌ गुंतवणुकीवरील २० टक्‍क्‍यांची मर्यादा मागे घेण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय
अमेरिकेत आणीबाणी लागू

 • अमेरिका आणि मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे.
 • आणीबाणीच्या काळात अमेरिकेतील विकासकामे, लष्करी व आपत्तीव्यवस्थापनाचा निधी आणि इतर प्रकल्प थांबविण्यात येणार असून भिंत उभारण्यासाठी आठ अब्ज डॉलर्सचा निधी उभा केला जाणार आहे.
 • निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. मात्र, निधी उभा राहू न शकल्याने ते अजून पूर्ण झालेले नाही.
 • अमेरिकी संविधानानुसार परकीय अथवा देशांतर्गत संकटाच्या काळातच देशात आणीबाणी लागू करता येत असून याकाळात प्राप्त होणाऱ्या विशेषाधिकारांनुसार संसदेच्या मंजुरीशिवाय राष्ट्राध्यक्ष निर्णय घेऊ शकतात.
 • मेक्‍सिकोतून येणाऱ्या शरणार्थींची वाढती संख्या हे ट्रम्प यांनी आणीबाणीसाठी दिलेले कारण संविधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.

भारत-अर्जेंटिना सामंजस्य करार 

 • अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मोरेशियो मक्री यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि अर्जेंटिनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले.
 • भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील परस्पर राजनैतिक सबंध आणि मैत्रीला ७० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींचा हा विशेष दौरा होता.
 • संरक्षण, अणुऊर्जा, कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी तसेच इतरही अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार, भारतातील प्रसार भारती आणि अर्जेंटिनामधील फेडरल सिस्टीम ऑफ मीडिया ॲण्ड पब्लिक कॉन्टेन्ट्‌स यांच्यात सामंजस्य करार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, अर्जेंटिना आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्यात अंटार्क्टिकातील सहकार्यासाठी सामंजस्य करार, भारतीय केंद्रीय औषध मानके संघटना आणि अर्जेंटिनाच्या औषधे, खाद्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशासन यांच्यात सामंजस्य करार या करारांचा समावेश आहे. 

इराणची अत्याधुनिक फतेह

 • अमेरिकेने अणू कार्यक्रमातून माघार घेऊनही आणि अमेरिकेच्या दबावाला न झुकता इराणने आपले आक्रमक शस्त्रास्त्र धोरण कायम राखत फतेह या अत्याधुनिक पाणबुडीची निर्मिती केली आहे.
 • इराणने बनवलेली ही पहिलीच स्वदेशी बनावटीची पाणबुडी असून ती मध्यम श्रेणीतील आहे. तिचे अनावरण राष्ट्रपती हसन रोहानी यांच्या हस्ते अब्बास या शहरातील बंदरात केले.
 • दोन हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासह समर्थ असणारी सुमारे सहाशे टन वजनाची फतेह पाणतीर आणि नौदल सुरुंगानी सज्ज आहे.
 • दोन फेब्रुवारी रोजी इस्लामिक क्रांतीच्या चाळीसाव्या स्मृतिदिनानिमित्त होईवेझ या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची केलेली चाचणी आणि आता फतेहची निर्मिती यामुळे जागतिक पटलावर तणाव वाढत चालला आहे.      

 

संबंधित बातम्या