स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 25 मार्च 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
दिव्यांगांसाठी क्रीडा केंद्र

 • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडास्पर्धांमध्ये देशातील अपंग नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे दिव्यांग क्रीडा केंद्राच्या उभारणीस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे.
 • २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित असणारे हे केंद्र सुमारे १७० कोटी रुपये खर्चातून येत्या पाच वर्षांत उभारले जाणार आहे. केवळ दिव्यांग क्रीडापटूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे हे देशातील पहिले केंद्र ठरणार आहे.
 • सदर केंद्राच्या देखरेखीसाठी साधारण १२ सदस्यांची एक शासकीय व्यवस्थापन संस्था तयार केली जाणार असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संघटना तज्ज्ञांचा समावेश केला जाणार आहे.
 • दिव्यांग अधिकार कायदा २०१६ च्या कलम ३० नुसार दिव्यांग नागरिकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी शासनाने त्यांना पायाभूत सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे.

राजकोट येथे नवे विमानतळ

 • प्रधानमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील अर्थविषयक केंद्रीय समितीने गुजरात राज्यातील राजकोट नजीक हिरासार येथे नवीन विमानतळ विकासासाठी (greenfield) मंजुरी दिली आहे.
 • गुजरात राज्यातील सौराष्ट्र विभागाचे मुख्य केंद्र असणाऱ्या राजकोट येथील सध्याचे विमानतळ हे अतिशय कमी क्षमतेचे असल्याने येथून मोठ्या विमानांचे उड्डाण शक्‍य होत नाही.
 • राज्यातील हे चौथ्या क्रमांकाचे सध्याचे विमानतळ शहराच्या मध्यभागी असून चहूबाजूंनी रेल्वे, राज्य महामार्ग तसेच निवासी व व्यावसायिक इमारतींनी वेढलेले असल्याने त्याचा विस्तार करणे अशक्‍य होते.
 • शहराच्या वाढीचा वेग लक्षात घेता मोठी धावपट्टी व अधिक क्षमता असणारे विमानतळ गरजेचे होते. त्यामुळे नवीन जमिनीची निवड करून नव्या विमानतळाच्या विकास, संचलन व देखभाल करण्यासाठी गुजरात सरकारने भारतीय विमान प्राधिकरणास विनंती केली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
वेस्ट नाईल व्हायरस

 • केरळातील एका सात वर्षांच्या मुलास वेस्ट नाईल या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून यासंदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक वैद्यकीय चमू केरळ येथे तत्काळ पाठवला आहे.
 • डासांमार्फत पसरणारा हा विषाणू मज्जासंस्थेवर परिणाम करत असून त्यामुळे मृत्यूदेखील ओढवू शकतो.
 • हा विषाणू १९३७ साली युगांडाच्या पश्‍चिम नाईल जिल्ह्यात एका स्त्रीमध्ये सर्वप्रथम आढळून आला होता; त्यानंतर १९५३ मध्ये नाईलच्या त्रिभुज परिसरातील काही पक्ष्यांना याची लागण झाली होती.

आंतरराष्ट्रीय
संप्रति युद्धाभ्यास

 • दोन मार्च ते १५ मार्च या कालावधीत भारत आणि बांगलादेश यांच्यात ‘संप्रति’ युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते.
 • युद्धाभ्यासाचे आयोजन बांगलादेशातील तंगेल येथे करण्यात आले. यावर्षी या अभ्यासाची ही आठवी आवृत्ती होती.
 • हा युद्धाभ्यास भारत व बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सहकार्याचा भाग म्हणून घेतला जातो.

अफिन्डेक्‍स २०१९

 • भारत आणि १६ आफ्रिकी राष्ट्रे यांच्यात संयुक्त युद्धभूमी प्रशिक्षण सराव होणार असून तो १८ मार्च ते २७ मार्च कालावधीत पुण्यातील खडकी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातील परराष्ट्र प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला आहे.
 • या संयुक्त लष्करी सरावात भारताकडून मराठा लाइट इन्फंट्रीतून आणि आफ्रिका खंडातील सहभागी देशांमधून प्रत्येकी १० कर्मचारी सहभागी होणार आहेत.
 • सहभागी कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक चर्चा, प्रात्यक्षिके आणि रणनैतिक सरावाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या जाहीरनाम्यातील शांतताप्रेरक मोहिमा (Peace Keeping Operations) आणि मानवी खाण सहकार्य (Humanitarian Mine Assistance) यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • प्रत्यक्ष सहभागी राष्ट्रे : सेनेगल, नायजेरिया, घाना, इजिप्त, टांझानिया, सुदान, दक्षिण आफ्रिका, नामीबिया, युगांडा, झांबिया, नायगर, मोझांबिक
 • निरीक्षक राष्ट्रे : रवांडा, काँगो, मादागास्कर

पर्यावरण
सिरसी सुपारीला भौगोलिक मानांकन

 • कर्नाटक राज्यातील ‘सिरसी’ सुपारीला भौगोलिक मानांकन मिळाले असून सुपारी वर्गातील फळास मिळालेले हे पहिलेच मानांकन आहे.
 • चपटा गोलाकार आणि मध्यम आकार असणाऱ्या या सुपारीची कर्नाटकातील सिरसी, येल्लापूर आणि सिद्धपूर या तालुक्‍यांमध्ये लागवड केली जाते.
 • आकारमान, रंग, चव अशा अनेक बाबतींत सिरसी सुपारी ही इतर सुपाऱ्यांहून वेगळी ठरते.
 • सिरसी सुपारीला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी २०१३ पासून प्रयत्न करण्यात आले असून या सुपारीचे वेगळेपण वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला.

एरोड हळदीला भौगोलिक मानांकन

 • आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तमिळनाडू राज्यातील एरोड हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
 • उष्ण आणि दमट हवामानात वाढणाऱ्या या पारंपरिक हळदीची लागवड ही तमिळनाडूमधील एरोड जिल्हा, कोईंबतूर जिल्ह्यातील अनुर व तोंदामुत्तूर तालुके आणि तीरपूर जिल्ह्यातील कन्ग्याम तालुका येथे होते.
 • या हळदीच्या लागवडीच्या भागातील वार्षिक पर्जन्यमान कमी असल्याने बहुतांश लागवड ही भवानी प्रकल्प आणि कालवा या सिंचनाच्या भागातच होते.
 • तेराव्या शतकातील अरबी व्यापाऱ्यांनी भारतातील या हळदीची खरेदी केल्याचे उल्लेख काही दस्तावेजांमध्ये आहेत.

 
कर्नाटकात जलामृत योजना

 • आगामी उन्हाळ्यातील संभाव्य दुष्काळाशी सामना करण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकारने नुकतीच ‘जलामृत’ नावाची जलसंचय योजना सुरू केली आहे.
 • जल साक्षरता, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, नवीन जलसंसाधनांची निर्मिती आणि वनीकरण असे या योजनचे चार मुख्य भाग असून जलस्रोतांचे संरक्षण हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील जलसंचयासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब होणार असून त्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि भौगोलिक माहिती यांचाही वापर करण्यात येणार आहे.
 • योजनेच्या अंमलबजावणीसाठी गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य अशा सर्व पातळ्यांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
 • या योजनेला एका सामुदायिक आंदोलनाचे स्वरूप देण्यात येणार असून यात संबंधित सरकारी विभाग, पंचायती राज संस्था तसेच गैरसरकारी संस्था या सर्वांना सहभागी केले जाणार आहे.

आर्थिक
उषा थोरात समिती

 • देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेसंबंधित समस्यांचे परीक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
 • सदर समिती स्थानिक चलनाच्या बाह्य मूल्याबाबत स्थिरता निश्‍चित करण्यासाठी धोरणात्मक योजनांची शिफारस करणार आहे.
 • ही अष्ट सदस्यीय समिती देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेच्या विकासाचे मूल्यांकनही करणार आहे.
 • स्थानिक बाजारपेठेतील रुपयाचे विनिमय दर आणि बाजारातील तरलता यावर देशाबाहेरील बाजारपेठेच्या प्रभावाचा अभ्यासही केला जाणार आहे.
 • याशिवाय ही समिती अनिवासी लोकांना स्थानिक बाजारात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांची शिफारस देखील करणार आहे.   

संबंधित बातम्या