स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 8 एप्रिल 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
काशी विश्वनाथ मार्गिका

 • धार्मिक तीर्थस्थळांचा उद्धार करणाऱ्या काशी विश्वनाथ मार्गिकेच्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
 • या ५० फुटांच्या मार्गिकेद्वारे गंगेच्या मणिकर्णिका आणि ललिता घाटांना थेट काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिराशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिराच्या परिसरात उत्सवाच्या वेळी होणाऱ्या गर्दीची समस्या सुटणार आहे.
 • मार्गिकेवर पर्यटकांसाठी संग्रहालय तसेच वाराणसीचा सांस्कृतिक इतिहास दाखविणारे देखावे करण्यात येणार आहेत.
 • याशिवाय नव्या यज्ञशाळा तयार करण्यात येणार असून पुजारी व स्वयंसेवकांसाठी आश्रयस्थाने आणि पर्यटकांसाठी चौकशी केंद्र उभारण्यात येणार आहे.
 • सुमारे ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मंदिराच्या नजीक कार्यक्रमांसाठी एक विशाल सभागृहदेखील समाविष्ट करण्यात आले असून तेथे पर्यटकांसाठी वाराणसी व अवधची पक्वान्ने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

राष्ट्रीय अकादमी पुरस्कार जाहीर

 • ललित कला अकादमीने या वर्षीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षी १५ व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे.
 • मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ६० व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात त्यांचे वितरण होईल.
 • देशात आणि देशाबाहेर भारतीय कलांना राजाश्रय देण्याच्या उद्दिष्टाने १९५४ साली सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली.

सीबीएससी अभ्यासक्रमात नवीन भर

 • माध्यमिक शिक्षणाच्या केंद्रीय मंडळाने (सीबीएससी) येत्या शैक्षणिक वर्षात (२०१९-२०) शालेय अभ्यासक्रमातील कौशल्य विषयांत योग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिशुसंगोपन हे नवे विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून त्याची लगेच अंमलबजावणी केली जाणार आहे.
 • यापैकी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा विषय इयत्ता नववीसाठी असणाऱ्या सहा विषयांतील वैकल्पिक विषयांत ठेवण्यात येणार असून उर्वरित विषय उच्च माध्यमिक वर्गांना पर्यायी विषय म्हणून दिले जाणार आहेत.
 • गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली आहे. हे लक्षात घेता भविष्यात या विषयातील किमान तांत्रिक माहिती असणे आवश्‍यक असल्याने हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
 • त्याचप्रमाणे सध्या देशात असणारी व्यावसायिक योगशिक्षक व उत्तम बालशिक्षक (बालकवार्गांना शिकवणारे शिक्षक) यांची कमी संख्या लक्षात घेऊन योग आणि शिशुसंगोपन हे विषय घेण्यात आले आहेत.

भारतात येणार रशियन पाणबुडी

 • रशियाने भारतास अण्विक पाणबुडी भाडेतत्त्वावर देण्यासाठीच्या ३०० कोटी डॉलर्सच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार अकुला श्रेणीतील आयएनएस चक्र ३ ही अण्विक पाणबुडी दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे.
 • ही पाणबुडी अणुऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे. ऑक्‍सिजनसाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची गरज नसल्याने पाणबुडी दीर्घकाळ पाण्यात राहण्यासाठी उपयुक्त आहे.
 • भारताची पश्‍चिम सीमा अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने घेण्यात येणारी ही पाणबुडी मुंबईत मुख्यालय असणाऱ्या पश्‍चिम कमांडमध्ये तैनात होणार आहे.
 • रशियाकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणारी ही तिसरी पाणबुडी असून यापूर्वी १९८७ मध्ये घेतलेली पहिली पाणबुडी आयएनएस चक्र २००१ ला सेवानिवृत्त झाली. तर, २०१२ मध्ये घेतलेली दुसरी पाणबुडी आयएनएस चक्र २ ही सध्या विशाखापट्टणम येथील पूर्व कमांडमध्ये तैनात आहे.

ऑसिंडेक्‍स २०१९

 • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ऑसिंडेक्‍स या संयुक्त नौदल सरावाची तिसरी आवृत्ती २ ते १६ एप्रिल दरम्यान विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर आयोजित करण्यात आली आहे. यात पाणबुडी विरोधी युद्धकलेवर भर देण्यात येणार आहे.
 • सरावात ऑस्ट्रेलियाकडून एचएमएएस कॅनबेरा (हेलिकॉप्टरचे तळ असणारी युद्धनौका), एचएमएएस न्यूकॅसल व एचएमएएस paramatta ही दोन लढाऊ गलबते, एक सहाय्यक तेलवाहू जहाज आणि दोन समुद्रगस्त घालणारी विमाने सहभागी होणार आहेत.
 • याचवेळी भारताकडून किलो श्रेणीतील पाणबुडी, कामोत्रा श्रेणीतील पाणबुडी विरोधक जहाज, सरावात हवाई हल्ला करण्यासाठी लढाऊ विमान ‘हॉक’ आणि एक स्टेल्थ विनाशक सहभागी होणार आहे.
 • सरावामध्ये भारत व ऑस्ट्रेलियाच्या नौदलातील अधिकाऱ्यांची परस्परांच्या जहाजांवर नेमणूक होणार आहे.
 • हा सराव विशाखापट्टणमच्या किनाऱ्यापासून अधिकतम २०० किलोमीटरच्या परिसरात होणार आहे.

जेकेएलएफवर बंदी

 • जम्मू-काश्‍मीर राज्यातील यासीन मलिक पुरस्कृत ‘जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेस बेकायदा ठरवत त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 • केंद्र सरकारने ही कार्यवाही बेकायदा उपक्रम प्रतिबंध कायद्याच्या (UAPA) अंतर्गत असणाऱ्या तरतुदींनुसार केली आहे.
 • सन १९८८ पासून जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट ही संघटना काश्‍मीर खोऱ्यातील युवकांमध्ये फुटीरतेची भावना पसरवत असून हिंसात्मक उपक्रमांसाठी नेतृत्व पुरवत आहे.
 • सन १९८९ मध्ये झालेले काश्‍मिरी पंडितांचे हत्याकांड आणि हकालपट्टीमध्येही सदर संघटनेचा सक्रिय सहभाग असल्याचे म्हटले जाते.

पर्यावरण
भौगोलिक मानांकन : मरयूर गूळ

 • केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मरयूर गुळाला भौगोलिक मानांकन (GI tag) मिळाले आहे.
 • सुमारे ८० ते १०० रुपये प्रतिकिलो किंमत अपेक्षित असताना या गुळाची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो किंमत मिळत आहे.
 • सध्या आसपासच्या अनेक भागात मरयूर नावाने बनावट गुळाची निर्मिती व विक्री होत असून त्यामुळे अस्सल मरयूर गुळाची किंमत घसरत आहे.
 • या पार्श्वभूमीवर मरयूर गुळाला मिळालेले भौगोलिक मानांकन या गुळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे.

आंतरराष्ट्रीय
अल-नागा 

 • अल-नागा हा भारत आणि ओमान दरम्यान होणारा संयुक्त लष्करी सराव असून दर दोन वर्षांनी होणाऱ्या या सरावाची ही तिसरी आवृत्ती होती.
 • हा सराव १२ ते २५ मार्च दरम्यान ओमानमधील जबल अल अख्दार येथे पार पडला. या १४ दिवसांच्या सरावात दोन्ही देशांनी रणनीती व शास्त्रचालन कौशल्यांचे आदान-प्रदान केले.
 • या सरावात भारताच्या लष्करातर्फे गढवाल रायफल्सची दहावी बटालियन, तर ओमानच्या शाही लष्करातर्फे जबाल रेजिमेंट सहभागी झाली होती.
 • हा ओमान-भारत सराव २०१५ पासून सुरू झाला असून याची पहिली आवृत्ती मस्कतमध्ये, तर २०१७ मध्ये दुसरी आवृत्ती हिमाचल प्रदेशमध्ये पार पडली होती.

टेम्प्लेटॉन पारितोषिक

 • ब्राझीलचे भौतिकशास्त्रज्ञ मार्सेलो ग्लेझर यांना २०१९ साठीचे टेम्प्लेटॉन पारितोषिक प्रदान करण्यात आले असून हे पारितोषिक त्यांना विज्ञान आणि अध्यात्म यांचे सुरेख मिश्रण करणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात आले आहे.
 • टेम्प्लेटॉन पारितोषिक अमेरिकेतील जॉन टेम्प्लेटॉन संस्थेकडून अंतर्दृष्टी, संशोधन अथवा प्रत्यक्ष प्रयोग यांद्वारे आयुष्याच्या आध्यात्मिक अंगावर अपवादात्मक काम केलेल्या आणि हयात असणाऱ्या व्यक्तीस प्रदान केले जाते.

संबंधित बातम्या