स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 29 एप्रिल 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
वरुण युद्धअभ्यास 

 • भारत आणि फ्रान्स दरम्यान होणारा ‘वरुण’ नौदल युद्धअभ्यास येत्या मे महिन्यात गोवा येथे अतिशय मोठ्या प्रमाणात घेतला जाणार आहे.
 • सरावात मुख्यतः भारताकडून मिग-29के या लढाऊ विमानासह आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका, तर फ्रान्सकडून राफेल-एम नौदल जेट विमानासह एफएनएस चार्ल्स डे गाउल ही विमानवाहू युद्धनौका सहभागी होणार आहे.
 • याव्यतिरिक्त विविध आयएनएस शंकुल (डिझेल पाणबुडी), आयएनएस तारकाश (नौदल नाव), आयएनएस चेन्नई (क्षेपणास्त्र विनाशक), आयएनएस दीपक (मालवाहू जहाज) आणि तत्सम फ्रेंच नौदलही सहभागी होणार आहेत.
 • मार्च २०१८ पासून भारत व फ्रान्स ही दोन्ही राष्ट्रे हिंदी महासागर क्षेत्रात सक्रिय सहकार्य दृष्टिकोनावर काम करत आहेत.

भारत व्हिएतनाम नौदल युद्धअभ्यास 

 • भारत आणि व्हिएतनाम दरम्यान १३ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान सक्रिय सहकार्याच्या उद्दिष्टाने चार दिवसीय संयुक्त नौदल अभ्यास घेण्यात आला.
 • व्हिएतनाममधील कॅम राहन उपसागरात घेण्यात आलेल्या या युद्धसरावात भारताकडून आयएनएस कोलकता आणि आयएनएस शक्ती या युद्धनौका सहभागी झाल्या होत्या.
 • हा युद्धसराव सद्यःस्थितीत चालू असणाऱ्या पौर्वात्य आरमाराच्या आग्नेय आशियाई देशांतील नेमणुकांच्या अंतर्गतच घेण्यात आला.

गुवाहाटी रेल्वेस्थानकास ISO चे प्रमाणीकरण

 • गुवाहाटी रेल्वे स्थानक हे ‘आयएसओ’चे प्रमाणीकरण (ISO १४००१ : २०१५) मिळवणारे भारतातील पहिलेच रेल्वेस्थानक ठरले आहे.
 • पर्यावरणीय व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन केल्याने राष्ट्रीय हरित लवादाने हे प्रमाणीकरण दिले आहे.
 • सध्या गुवाहाटी रेल्वेस्थानकावर सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून तेथे स्वच्छतेचा दर्जाही उत्तम राखला आहे.
 • सन २०२० मध्ये हे प्रमाणीकरण अद्ययावत केले जाईल.

रशियाकडून रणगाडा खरेदी

 • लष्कराच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकारने लष्करास रशियाकडून अतिशय शक्तिशाली असे टी-९० (एमएस) रणगाडे खरेदी करण्यास मंजुरी दिली असून भारतीय लष्कर असे ४६४ रणगाडे खरेदी करणार आहे.
 • सुमारे १३५०० कोटी रुपयांच्या या संरक्षण करारास केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याने आत लवकरच या करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होतील.
 • सध्या भारतीय ताफ्यात रशियन बनावटीचे टी-९० (एस) प्रकारातील १६५० रणगाडे असून नवीन रणगाड्यांच्या खरेदीनंतर ही संख्या हजारच्या पुढे जाणार आहे.
 • टी-९० प्रकारातील रणगाड्यांचे भारताने ‘भीष्म’ असे नामकरण केले आहे.

सासरच्या छळाची तक्रार कुठूनही करता येणार

 • सासरी होणाऱ्या छळामुळे एखाद्या महिलेने भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अंतर्गत एखाद्या ठिकाणी आसरा घेतला असल्यास तिला तेथूनही सासरच्या मंडळींविरुद्ध खटला दाखल करता येऊ शकतो, हा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
 • दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १७७ नुसार गुन्हेगारीचे प्रकरण केवळ संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकातच दाखल केले जाऊ शकते.
 • मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर छळ सोसलेल्या महिलेस कुठूनही खटला दाखल करता येणार आहे.
 • उत्तरप्रदेश राज्यातील रूपाली देवी यांच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयात रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

पर्यावरण
माउंट अगुंगचा उद्रेक

 • इंडोनेशियातील जागृत अवस्थेत असणाऱ्या माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून पर्यटकांत लोकप्रिय असणारे माउंट ब्रोमो व माउंट मेरापि हे ज्वालामुखीदेखील भडकण्याची चिन्हे आहेत.
 • माउंट अगुंग : हा ज्वालामुखी बालीतील सर्वोच्च शिखरावर असून याचा आजूबाजूच्या परिसरातील एकूण पर्यावरणीय स्थिती व पर्जन्यमानाशी थेट संबंध आहे.
 • माउंट ब्रोमो : हा ज्वालामुखी जावा बेटाच्या पूर्वेस असून याचे नाव हिंदू धर्मातील विश्वनिर्मितीसाठी मानल्या गेलेल्या ब्रह्मावरून ठेवले आहे.
 • माउंट मेरापि : हा ज्वालामुखी मध्य जावाच्या योग्याकर्ता प्रांतातील जागृत ज्वालामुखी असून याचे नाव मेरू (पर्वत) आणि अपि (अग्नी) यातून तयार झाले आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
नेपाळचा पहिला उपग्रह

 • नेपाळने अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या साह्याने राष्ट्राचा पहिलावहिला उपग्रह प्रक्षेपित केला असून हे प्रक्षेपण नासाच्या व्हर्जिनिया येथील तळावरून केले गेले.
 • राष्ट्राच्या प्रादेशिक भूगोलाची व चुंबकीय क्षेत्राची पाहणी करण्याकरिता प्रक्षेपित करण्यात आलेल्या या उपग्रहावर नेपाळी विज्ञान व तंत्रज्ञान अकादमीचे (NAST) नाव आणि नेपाळचा राष्ट्रध्वजही आहे.
 • या उपग्रहाची निर्मिती आभास मास्की व हरिनाम श्रेष्ठ या दोन नेपाळी नागरिकांनी जपानच्या क्‍युशु या तंत्रज्ञान संस्थेत केली आहे.

श्रीलंकेचा पहिला उपग्रह

 • नेपाळप्रमाणेच श्रीलंकेनेही १८ एप्रिल रोजी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या साह्याने राष्ट्राचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला असून हे प्रक्षेपण नासाच्या व्हर्जिनिया येथील तळावरून केले गेले.
 • ‘रावण १’ नामक या श्रीलंकन उपग्रहाची निर्मितीदेखील जपानच्या क्‍युशु या तंत्रज्ञान संस्थेत करण्यात आली आहे.
 • साधारण एक किलो वजनाचा आणि दीड वर्ष किमान आयुर्मर्यादा असणारा हा उपग्रह अंतराळात पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावरून श्रीलंका व शेजारील देशांच्या प्रादेशिक रचनेची छायाचित्रे घेणार आहे.

शनीच्या ‘टायटन’वर मिथेनचा शोध

 • नासाने प्रक्षेपित केलेल्या कॅसिनी या यानाने दिलेल्या माहितीनुसार टायटन या शनीच्या सर्वांत मोठ्या चंद्रावर साधारण १०० मीटर खोल द्रवावस्थेतील मिथेनची लहान लहान सरोवरे आहेत.
 • कॅसिनीने पाठवलेल्या माहितीवरून करण्यात आलेले हे नवे संशोधन ‘नेचर ॲस्ट्रोनॉमी’ नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
 • वैज्ञानिकांच्या मते आजूबाजूच्या शिलावरणाचे रासायनिक विघटन होऊन तो भाग पडल्याने तेथे असे सरोवर निर्माण झाले असावे. अशा प्रकारची प्रक्रिया सामान्यतः पृथ्वीवरील काही तलावांतही होत असते.
 • सौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा चंद्र अशी ओळख असणाऱ्या ‘टायटन’वर तुलनात्मक दृष्ट्या पृथ्वीसारखीच जलचक्राची प्रक्रियाही होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आंतरराष्ट्रीय
सुदानमधील भारतीय शांतीसुरक्षकांचा युएनकडून सन्मान

 • दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेसह (UNMISS) काम करणाऱ्या १५० भारतीय शांती सुरक्षकांचा त्यांच्या त्यागपूर्ण व समर्पित कार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पदके देऊन गौरव केला.
 • हिंसाचाराच्या भीतीने पलायन केलेल्या दक्षिण सुदानी नागरिकांना सुरक्षित वातावरण देऊन नागरी क्षेत्रात त्यांचे पुनर्प्रस्थापन करण्याचे काम युएन-मिस या शांतता मोहिमेद्वारे केले जात आहे.
 • याशिवाय सुरक्षित नागरी क्षेत्रात अन्न, पेय पाणी, पुरेसा निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कामही या मोहिमेतून केले जात आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या या शांतता मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रमुख राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होत असून विविध राष्ट्रांतील युएन-मिसमध्ये आजवर भारतातून दोन लाखांहून अधिक लष्करी व पोलिस कर्मचारी/अधिकाऱ्यांनी भाग घेतला असून जवळपास १६८ लष्करी अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले आहे.

पुलित्झर पुरस्कार २०१९ जाहीर

 • पत्रकारिता, लेखन व संगीत क्षेत्रातील कार्यासाठी दिले जाणारे अमेरिकी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
 • हा पुरस्कार १९१७ पासून जोसेफ पुलित्झर यांच्या स्मरणार्थ दिला जातो.  
   

संबंधित बातम्या