स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 20 मे 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
गव्हावरील आयात शुल्कात वाढ

 • यावर्षी देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन निघाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने गव्हावरील आयात शुल्क ३० टक्‍क्‍यांवरून ४० टक्के केले आहे.
 • गव्हाचे २०१८-१९ या शेतकी वर्षातील राष्ट्रीय उत्पादन हे आधीच्या वर्षाच्या उत्पादनाहून दोन टक्के अधिक असून यावर्षीचे गव्हाचे एकूण उत्पादन ९९१.२ लाख टन एवढे आहे.
 • सलग दोन वर्षे गव्हाचे भरघोस उत्पादन झाल्याने सध्या राष्ट्रीय बाजारात धान्याचा अतिरिक्त पुरवठा होत आहे. त्यामुळे गव्हाचे बाजारभाव उतरून शेतकऱ्यांच्या हाती फार कमी किंमत येत आहे.
 • भारतीय अन्न महामंडळाकडे या पूर्वीचा १६९.९ लाख टन गव्हाचा साठा असून शासनाने पुढची खरेदी केल्यानंतर हा साठा सुमारे ५७० लाख टन एवढा होणार आहे.
 • मागील वर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने गव्हाचा हमीभाव (या दराने भारतीय अन्न महामंडळ शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेते.) तब्बल सहा टक्‍क्‍यांनी वाढविल्याने व जोडीला गव्हावरील आयात शुल्क २० टक्‍क्‍यांवरून ३० टक्‍क्‍यांवर नेल्याने गव्हाच्या लागवडीत व उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
 • भारतात यापूर्वी ऑस्ट्रेलिया, युक्रेन आणि रशियाकडून गहू आयात केला जात असे. मात्र, आता जागतिक बाजारभाव आणि जोडीला ४० टक्के आयात शुल्क यांमुळे गव्हाची आयात अशक्‍य होऊन स्थानिक गव्हाला मागणी वाढू शकणार आहे.

पर्यावरण
पर्यावरण गोल्डमन पारितोषिक 

 • यावर्षी तळागाळात काम करणाऱ्या सहा पर्यावरण कार्यकर्त्यांना गोल्डमन पारितोषिक जाहीर झाले असून लवकरच कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथील ऑपेरा हाउसमध्ये त्याचे वितरण केले जाणार आहे.
 • हा पुरस्कार १९८९ मध्ये अमेरिकी सामाजिक कार्यकर्ते रिचर्ड आणि ऱ्होडा गोल्डमन यांनी सुरू केला. दोन लाख अमेरिकी डॉलर्स असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
 • हरित नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे हे पारितोषिक केवळ अमेरिकी नागरिकांपुरते मर्यादित नाही. प्राण पणाला लावून निसर्ग व औद्योगिक प्रकल्पामुळे होरपळणाऱ्या माणसांसाठी काम करणाऱ्या जगभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांना हे दिले जाते.
 • गोल्डमन पारितोषिक मिळालेले भारतीय : मेधा पाटकर, प्रफुल्ल समांतर, सी. मेहता, रमेश अगरवाल, रशिदा बी व चम्पादेवी शुक्‍ल

आंतरराष्ट्रीय

इंडोनेशियाची राजधानी बदलणार

 • इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी राष्ट्राची राजधानी जकार्ता येथून हलवून जावा बेटाच्या बाहेर नेणार असल्याचे जाहीर केले आहे.
 • यापुढे राजधानी म्हणून विकसित होणारे शहर हे राजकीय राजधानी, तर जकार्ता ही आर्थिक व व्यावसायिक राजधानी असणार आहे.
 • पूर्व इंडोनेशियाचा विकास साधण्याच्या दृष्टीने नवी राजधानी ही देशाच्या मध्यवर्ती भागात ठेवण्यात येणार आहे.
 • जावा बेटाची वाढत चाललेली लोकसंख्या व त्यामुळे तिथली व्यवस्था व पर्यावरण यांवर येणारा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • याशिवाय जकार्ता हे जगातील सर्वाधिक वेगाने बुडत चाललेले शहर आहे. अर्ध्याहून अधिक शहराची भूपातळी ही समुद्र पातळीच्या खाली आहे आणि २०५० पर्यंत शहराचा मोठा भाग पूर्णतः पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे.
 • भूपातळी समुद्र पातळीच्या खाली जाण्यामागे पिण्यासाठी व अंघोळीसाठी भूजलाचा अतिरिक्त उपसा हे महत्त्वाचे कारण आहे.

हिंदी-प्रशांत प्रदेश

 • भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने परराष्ट्र कार्यालयाच्या अंतर्गत हिंदी-प्रशांत (Indo-Pacific) प्रदेश स्थापन केला असून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये शांग्री-ला संवादामध्ये याचा उल्लेख केला होता.
 • नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या हिंदी-प्रशांत प्रदेशाचे प्रमुख संयुक्त सचिव विक्रम दोराईस्वामी हे आहेत.
 • हिंदी-प्रशांत प्रदेश हा आसियान, क्वाड आणि हिंदी महासागर रिम संघटना यांतील संबंध अधिक दृढ करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
 • प्रशांत आणि हिंदी महासागरातील देशांसाठी नवे धोरण आखण्याच्या उद्देशाने अमेरिकेनेही आपल्या प्रशांत कमांडचे नामांतरण करून हिंदी-प्रशांत कमांड (Indo-Pacific) असे केले आहे.
 • या पार्श्वभूमीवर भारताने केलेली हिंदी-प्रशांत प्रदेशाची स्थापना हे आंतरराष्ट्रीय राजकारणात व व्यापारात महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

व्हेनिसच्या द्वैवार्षिक मेळाव्यात भारत

 • व्हेनिस येथे जगातील सर्वांत जुना द्वैवार्षिक कला मेळावा भरत असून यावर्षी त्याच्या ५८ व्या आवृत्तीत भारत सहभागी होणार आहे.
 • या मेळाव्यात सहभागी होण्याची भारताची ही दुसरी वेळ असून आठ वर्षांपूर्वीच्या मेळाव्यात भारत प्रथमच सहभागी झाला होता.
 • सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केल्याप्रमाणे ‘महात्मा गांधी यांची १५० वर्षे’ हा भारतीय तंबूचा (Pavilion) मुख्य विषय असून भित्तिचित्रांमध्ये १६ हरिपूर चित्रांचा समावेश असणार आहे.
 • हरिपूर (गुजरात) येथे १९३८ मध्ये झालेल्या भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधी यांनी नंदलाल बसू नावाच्या कलाकाराकडून भारतीय जीवनाचे विविध पैलू दाखविणारी तब्बल ४०० भित्तिचित्रे करून घेतली होती. त्यांनाच हरिपूर चित्रे म्हटले जाते.
 • व्हेनिस येथील हा ५८ वा कला मेळावा ११ मे ते २४ नोव्हेंबर २०१९ असा साधारण सहा महिने चालणार असून ‘भविष्य संगोपनासाठी आपला काळ’ हा संपूर्ण मेळाव्याचा मुख्य विषय असणार आहे.
 • हा कला मेळावा जगातील सर्वांत मोठ्या मेळाव्यांपैकी एक असून याची सुरुवात १८९५ मध्ये झाली.
 • समकालीन कला, चलचित्रपट, नाटके, नृत्य विविध कार्यक्रम अशा सर्वांना हा कला मेळावा सामावून घेतो.

मसूद अझर आंतरराष्ट्रीय दहशतवादी 

 • चीनच्या दीर्घ आडकाठीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षण परिषदेने पाकिस्तानातील जैशे महम्मद संघटनेचा म्होरक्‍या असणाऱ्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
 • भारताच्या २००९ पासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आल्याने हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय मानला जात आहे.
 • भारताने २००९ मध्ये केलेल्या प्रथम प्रस्तावाला नकार मिळाल्यानंतर २०१६ पासून P३ राष्ट्रांमार्फत (UNSC चे कायमस्वरूपी सभासद : अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स) पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले.
 • P३ राष्ट्रांकडून २०१७ मध्ये मान्यता मिळूनही चीनने मात्र वेळोवेळी आपला नकाराधिकार वापरल्याने भारताचा प्रस्ताव अंतिम समितीत मंजूर होत नव्हता.
 • पुलवामा हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या संरक्षण परिषदेतील सर्व लहान-मोठ्या राष्ट्रांना भारताच्या बाजूने एकत्र घेऊन P३ राष्ट्रांनी हाच प्रस्ताव नव्याने मांडला.
 • याही वेळी काही तांत्रिक बाबींची करणे देत चीनने चौथ्यांदा आडकाठी आणली. मात्र, १ मे रोजी अखेर चीनने मान्यता देत मसूद अझर यास आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले.
   

संबंधित बातम्या