स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
मंगळवार, 11 जून 2019

करंट अफेअर्स

राष्ट्रीय
आयसीजीएस विग्रह सेवानिवृत्त

 • भारतीय तटरक्षक दलाची गस्ती नौका ‘आयसीजीएस विग्रह’ २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर १६ मे रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सेवानिवृत्त झाली.
 • भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत १२ एप्रिल १९९० रोजी रुजू झालेल्या या गस्ती नौकेची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात आली होती.
 • ऑगस्ट २००८ ते जानेवारी २०११ या काळात ही गस्ती नौका श्रीलंकेच्या नौदलास भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.
 • भारतीय नौदलातील प्रमुख गस्ती नौकांपैकी एक असणाऱ्या आयसीजीएस विग्रहने अनेक शोध व बचावकार्यात आणि संयुक्त सरावांमध्ये सहभाग घेतला.

नौदलाची क्षेपणास्त्र चाचणी

 • भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी घेतली.
 • ही चाचणी भारतीय नौदल, संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.
 • डीआरडीएल हैदराबाद, डीआरडीओ प्रयोगशाळा आणि इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्री यांच्या सहयोगाने विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत डायनामिक्‍स लिमिटेड यांच्याद्वारे झाली आहे.
 • जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र सध्या कोलकता श्रेणीतील विनाशिकेवर, तर भविष्यात सर्व भारतीय युद्धनौकांवर तैनात केले जाईल.
 • सदर चाचणी ही पश्‍चिम समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे करण्यात आली.
 • हे क्षेपणास्त्र हवेतील किमान ५० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे.
 • MRSAM: Medium Range Surface to Air Missile

नौदलाचे सेवा निवड मंडळ

 • नौदल सेवा निवड मंडळाद्वारे कायमस्वरूपी व अल्पकाळ सेवा या दोन्हीसाठी स्त्री व पुरुषांची नौदलात निवड केली जाते.
 • कोलकत्यामध्ये ॲडमिरल सुनील लांबा यांनी नौदलाचे देशातील पाचवे सेवा निवड मंडळ (Service Selection Board) सुरू केले असून याद्वारे नौदलामध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
 • सेवा निवड मंडळ कोलकता येथे स्थापन केल्यामुळे ईशान्य व पूर्व भारतातील उमेदवारांना नौदलात सामील होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांसाठी देशात दूरवर प्रवास करावा लागणार नाही.
 • भारतातील यापूर्वीची नौदल सेवा निवड मंडळे भोपाळ, बंगळूर, विशाखापट्टणम आणि कोइम्बतुर येथे असून या मंडळांमध्ये एकाच वेळी १६० उमेदवारांचे परीक्षण करता येते.

विज्ञान-तंत्रज्ञान
गेंड्यांचा जनुकीय माहितीकोश

 • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने देशातील गेंड्यांचा जनुकीय माहितीकोश (DNA database) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार असून २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
 • हा प्रकल्प ‘गेंडा संरक्षण कार्यक्रमा’च्या अंतर्गत राबविण्यात येणार असून भारतीय जनुकीय माहितीकोश असणारा हा देशातील पहिला प्राणी ठरणार आहे.
 • सद्यःस्थितीत भारतात असणाऱ्या सुमारे २६०० गेंड्यांपैकी ९० टक्के गेंड्यांचा अधिवास हा काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात आहे.
 • गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाबाहेर असणाऱ्या गेंड्यांचे ६० वेगवेगळे नमुने गोळा करण्यात आले आहेत. प्रकल्पात गोळा करण्यात येणारी जनुकीय माहिती भारतीय वन्यजीव संस्थेच्या डेहराडून येथील मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे.
 • गेंड्यांच्या व इतर प्रजातींच्या संरक्षणाच्या दृष्टीने काझिरंगा उद्यानातील काही गेंड्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी भारत सरकार १९८० पासून प्रयत्न करीत आहे.
 • सध्या गेंड्यांच्या स्थलांतराच्या या प्रक्रियेसाठी मानस राष्ट्रीय उद्यान आणि पोबितारा वन्यजीव अभयारण्य ही ठिकाणे शासनाकडून निवडण्यात आली आहेत.

शिंकासेन बुलेट ट्रेन

 • जगातील सर्वांत वेगवान ट्रेन अशी ओळख असणाऱ्या शिंकासेन म्हणजेच जपानी बुलेट ट्रेन ‘अल्फा एक्‍स’च्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे.
 • दहा डबे असणारी शिंकासेन अल्फा एक्‍स प्रतितास ३६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. २०३० पर्यंत सर्व चाचण्या होऊन ही ट्रेन सेवेत रुजू होणार आहे.
 • जपानमधील सेन्दाई आणि ओमोरी या शहरांदरम्यान असणाऱ्या २८० किलोमीटर लांबीच्या अंतरावर या ट्रेनची चाचणी होणार आहे. दर आठवड्याला दोन वेळा रात्रीच्या वेळात ही ट्रेन या मार्गावरून धावणार आहे.
 • यापूर्वी प्रतितास ३०० किलोमीटर कमाल वेग असणाऱ्या शिंकासेन N7००S या ट्रेनची चाचणी जवळपास वर्षभरापूर्वी घेण्यात आली होती व २०२० पासून ती सेवेत रुजू होणार आहे.
 • वेगाच्या बाबतीत शिंकासेन अल्फा एक्‍सने चीनी फुशिंग ट्रेनला (प्रतितास ३५० किमी) मागे टाकले आहे.
 • शिंकासेन : जपानी भाषेत अतिजलद ट्रेन.

आर्थिक
केरळमध्ये मसाला बॉण्ड

 • केरळ इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्डाने मसाला कर्जरोखे (बॉण्ड) जारी केले आहेत. हे कर्जरोखे जारी करणारे केरळ देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
 • हे कर्जरोखे लंडन स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये (LSE) सूचीबद्ध करण्यात आले असून त्यांचे एकूण मूल्य २,१५० कोटी रुपये तर कालावधी पाच वर्षांचा आहे.
 • केरळमधील मोठ्या आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणुकीसाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने मसाला कर्जरोख्यांद्वारे पाच हजार कोटी रुपये उभारण्याची केरळ सरकारची योजना आहे.
 • मसाला कर्जरोखे : ही एक प्रकारची ऋणपत्रे असून याद्वारे कॉर्पोरेट विदेशी गुंतवणूकदारांकडून स्वदेशी चलनात म्हणजेच भारतीय रुपयात गुंतवणूक प्राप्त करून घेता येते.

पर्यावरण
केरळमध्ये ‘ई-विधान’

 • ‘ई-विधान’ हा केरळ विधानसभेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या अंतर्गत संपूर्ण विधानसभा कागदविरहित करण्यात येणार आहे.
 • या करिता सर्व नोंदी, दस्तावेज आणि कार्यवाही संगणकीकृत केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
 • संगणकीकरणानंतरचा पुढील टप्पा १४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून ‘ई-विधान’ प्रकल्पाच्या पूर्तीस दोन वर्षे लागणार आहेत.
 • संगणकीकरणाचे महाकाय काम सायबर पार्क या संस्थेस दिले असून या प्रकल्पासाठी निधी राज्य सरकारच देणार आहे.
 • हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सूचना बजावणे, प्रश्‍नोत्तरे विचारणे याशिवाय विविध बिले, माहिती आणि समिती अहवाल हे सर्वच कागदविरहित होणार आहे.
 • कागदविरहित कामकाजामुळे प्रतिवर्षी केरळ विधानसभेच्या सुमारे ३५ ते ४९ कोटी रुपयांची बचत होणार आहे.

आंतरराष्ट्रीय
आरोही पंडितचा विश्‍वविक्रम

 • मुंबईची आरोही पंडित ही लाइट स्पोर्ट्‌स विमानातून एकट्याने अटलांटिक महासागर पार करून जाणारी पहिली महिला व सर्वांत तरुण वैमानिक ठरली आहे.
 • विमेन एम्पॉवर (WE) एक्‍स्पिडीशनच्या मोहिमेअंतर्गत कॅप्टन आरोहीने हा विश्‍वविक्रम केला आहे. या मोहिमेस भारतातून महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या मोहिमेचे सहकार्य लाभले होते.
 • आरोही पंडित हिने युनायटेड किंग्डम ते कॅनडा हे अंतर पाच टप्प्यांत एकटीने गाठले असून प्रवासादरम्यान तिने आईसलॅंड आणि ग्रीनलॅंड येथे मुक्काम केला होता.
 • कॅनडातील इकालुईत विमानतळावर उतरून आरोहीने आपला विक्रम नोंदविला.    

संबंधित बातम्या