स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 8 जुलै 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
गुगल मॅपच्या नव्या सेवा

 • गुगल मॅपने भारतामध्ये सार्वजनिक दिशादर्शनासाठी तीन नवीन सेवा सुरू केल्या असून दररोज प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांना या सेवांमुळे फायदा होणार आहे.
 • बसचे वेळापत्रक व रहदारीची माहिती, ट्रेनची सद्यःस्थिती आणि सार्वजनिक वाहतूक व रिक्षा यांद्वारे एकत्रित प्रवासाच्या सूचना अशा स्वरूपातील गुगल मॅपच्या या सेवा भारतातील दहा शहरांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
 1. बस प्रवासाची रिअल-टाइम माहिती : बस प्रवासाला नेमका किती वेळ लागणार हे सांगणारी ही सुविधा गुगल मॅपने प्रथमच सुरू केली असून ती भारतातून सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा दिल्ली, लखनौ, सूरत, मुंबई, पुणे, म्हैसूर, हैदराबाद, चेन्नई आणि कोइम्बतुर या शहरांमध्येच असणार आहे.
 2. ट्रेनची रिअल-टाइम स्थिती : ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या ॲपसह भागीदारीत असणारी ही सुविधा केवळ दूरच्या अंतरावरील ट्रेनसाठी उपलब्ध असणार आहे.
 3. मिक्‍स्ड-मोड दिशादर्शन सुविधा : एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी त्या वेळी रिक्षा, मेट्रो, ट्रेन अथवा बस यांपैकी कोणते सार्वजनिक वाहन अधिक उपयोगी आहे हे सांगणारी ही सुविधा केवळ दिल्ली आणि बंगळूर या दोन शहरांमध्येच उपलब्ध असणार आहे.

आंध्रप्रदेशात ‘सीबीआय’ला पुनर्प्रवेश

 • आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुन्हे अन्वेषण विभागास राज्यात धाडी घालण्यास केलेली बंदी उठवण्याचा निर्णय नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी घेतला आहे.
 • आठ नोव्हेंबर २०१८ पासून लागू झालेली ही बंदी उठल्यानंतर सीबीआयला आंध्रप्रदेश मधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्यात जाण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
 • चंद्राबाबू यांचे निकटवर्तीय असलेल्या अनेकांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर सीबीआयमधील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर आंध्रप्रदेश राज्यसरकारने राज्यात छापे टाकण्यावर बंदी घातली होती.

कॅबिनेट समित्यांची पुनर्रचना

 • नवनिर्वाचित केंद्र सरकारने कॅबिनेट समित्यांची पुनर्रचना केली असून पूर्वीच्या सहा समित्यांमध्ये रोजगार कौशल्य व विकास आणि गुंतवणूक व विकास अशा दोन नव्या समित्यांची भर घातली आहे.
 • पुनर्रचित आठ समित्यांपैकी सहा समित्यांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समावेश (निवास समिती व संसदीय कामकाज समिती) असून गृहमंत्री अमित शहा हे सर्वच समित्यांमध्ये आहेत.
 • पुनर्रचित समित्या : १) नियुक्ती समिती २) निवास समिती ३) आर्थिक व्यवहार समिती ४) संसदीय कामकाज समिती ५) राजकीय व्यवहार समिती ६) सुरक्षा समिती ७) गुंतवणूक व विकास समिती ८) रोजगार व कौशल्य विकास समिती

नीती आयोगाची पुनर्रचना

 • भारत सरकारचे थिंक टॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीती आयोगास अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवनिर्वाचित केंद्र सरकारने त्याची पुनर्रचना केली आहे.
 • पुनर्रचनेच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ जून रोजी नीती आयोगाची एक प्रशासकीय बैठक घेण्यात आली.
 • नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे पुनर्रचित नीती आयोगात असणार नाहीत.
 • पुनर्रचित नीती आयोग :
 • अध्यक्ष : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
 • उपाध्यक्ष : राजीव कुमार
 • पूर्णवेळ सदस्य : व्ही. के. सारस्वत, प्राध्यापक रमेश चंद, डॉ. व्ही. के. पॉल
 •  कार्यकारी सदस्य : गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर
 • विशेष निमंत्रित सदस्य : वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, सांख्यिकीमंत्री राव इंद्रजित सिंह. 

पर्यावरण
कचऱ्यातून ऊर्जा

 • वीज पुरवठ्यासाठी कचऱ्याच्या ऊर्जेचा वापर करणारा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) हा पहिला प्रकल्प ठरला असून पर्यावरणपूरक नेटवर्क स्थित करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.
 • जून २०१९ पासूनच डीएमआरसीने उत्तरप्रदेशमधील गाझीपूर येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या १२ मेगावॅट क्षमतेच्या संयंत्राच्या वापरास सुरुवात केली होती.
 • तेथून प्राप्त झालेल्या ऊर्जेचा वापर विनोद नगर रिसिव्हिंग सब स्टेशन येथे दिल्ली मेट्रोच्या पिंक लाइनची परिचालन आवश्‍यकता पूर्ण करण्यासाठी केला जात आहे.
 • कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा हा प्रकल्प दिल्ली वेस्ट प्रोसेसिंग कंपनीद्वारे (EDWPCL) सुरू करण्यात आला असून सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर त्यात दिल्ली सरकार व बृहन्‌ दिल्ली महानगरपालिकादेखील सहभागी आहेत.
 • युरो मानांकनांच्या आधारे उभारला गेलेला हा भारतातील पहिलाच कचरा ऊर्जानिर्मिती प्रकल्प असून प्रतिदिन १५०० टन कचऱ्यावरील प्रक्रियेतून १२ मेगावॅट हरित ऊर्जेची निर्मिती करण्यास सक्षम आहे.

क्रीडा
भारतीय हॉकी संघाचा विजय

 • जपानमधील हिरोशिमा येथे सुरू असलेल्या हॉकीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत (FIH series) भारतीय महिला हॉकी संघाने यश मिळविले आहे.
 • हिरोशिमा येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने जपानचा ३-१ असा पराभव करत विजय मिळविला असून ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
 • या मालिकेत २४ हॉकी संघांनी सहभाग घेतला असून एकूण ५२ सामने घेण्यात आले.
 • या मालिकेतील सामने जपान मधील हिरोशिमा, आयर्लंड मधील बनब्रिज आणि स्पेनमधील व्हासेलीना या तीन ठिकाणी घेण्यात आले.
 • याचबरोबर १४ जून रोजी याच आंतरराष्ट्रीय हॉकी मालिकेत भारतीय पुरुष संघदेखील विजयी ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय रग्बी चषक

 • फिलिपाईन्समधील मनिला येथे आशियायी रग्बी सामन्यांमध्ये सिंगापूर संघाला पराभूत करत भारतीय महिला संघाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविले.
 • भारताच्या क्रीडा इतिहासासाठी हे कांस्यपदक ऐतिहासिक असून यामुळे २०११ मध्ये होणाऱ्या रग्बी विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाला प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.
 • हे आशियायी रग्बी चषक २००६ पासून सुरू झाले आहे.

आंतरराष्ट्रीय
पाकिस्तान, चीनमधून येणाऱ्या नेपाळी नागरिकांना व्हिसा बंधनकारक

 • दिल्ली येथील नेपाळी दूतावासाने जारी केलेल्या नवीन सूचनेनुसार पाकिस्तान, चीन, हाँगकाँग आणि मकाऊ येथून भारतात येणाऱ्या नेपाळी नागरिकांना व्हिसा बाळगणे बंधनकारक असणार आहे.
 • नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ४० लाख नेपाळी नागरिक नोकरी अथवा शिक्षणासाठी भारतात राहत आहेत.
 • या शिवाय भारतात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांना सौदी अरेबिया, कतार, लिबेनॉन, ओमान, कुवेत आणि बहरीनसारख्या आखाती देशात जाण्यापूर्वी भारत सरकारकडून स्थलांतर परवानगीबरोबरच नेपाळी दूतावासाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक असणार आहे.
 • भारत व नेपाळ यांच्यात मुक्त सीमा करार असला, तरीही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी हे बदल आवश्‍यक असल्याचे नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.    

संबंधित बातम्या