स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय
जहाज पुनश्‍चक्रण विधेयक २०१९

 • जहाज पुनश्‍चक्रण विधेयकास कायद्यात रूपांतरित करण्याची संमती केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मिळाली आहे. संबंधित विषयावर हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत (HKC) सहभागी होण्याच्या प्रस्तावासही मंजुरी मिळाली आहे.
 • सदर विधेयकामध्ये जहाजांच्या विघटनासाठी आंतरराष्ट्रीय मानके निश्‍चित करण्यात येणार असून त्या मानकांच्या अंमलबजावणीसाठी वैधानिक तरतुदीदेखील करण्यात येणार आहेत.
 • जहाज पुनश्‍चक्रण उद्योगामध्ये भारत अग्रेसर असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या उद्योगात भारताचा ३० टक्के वाटा आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१८ च्या सागरी परिवहन पुनरावलोकन अहवालानुसार भारताने २०१७ या वर्षात सहा हजार टनांहून अधिक वजनाच्या जहाजांचे पुनश्‍चक्रण केले आहे.
 • जहाज पुनश्‍चक्रण उद्योग हा श्रमकेंद्रित असल्याने रोजगार देत असला तरी पर्यावरणास अपायकारक आहे.
 • हाँगकाँग येथे होणाऱ्या परिषदेत जहाजांच्या विघटन प्रक्रियेत पर्यावरणाची अनुकूलता आणि सुरक्षितता यावर भर देण्यात येणार आहे.

केरळचा प्रतिजैविक प्रतिरोध कार्यक्रम

 • केरळ प्रतिजैविक (Antibiotics) रणनैतिक कृती योजनेच्या अंतर्गत (KARSAP) केरळ राज्याने प्रतिजैविक औषधांबाबत जनजागृतीसाठी अभियान सुरू केले आहे.
 • या अभियानासाठी जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहाचे (WAAW १८ ते २४ नोव्हेंबर) औचित्य साधण्यात आले आहे.
 • केरळ राज्याने २०१७ मध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू केलेल्या ‘आर्द्रम’ या कार्यक्रमाअंतर्गत हे सर्व उपक्रम घेण्यात येत आहेत.
 • प्रतिजैविक प्रतिरोधास (Antibiotics Resistance) लोकांमध्ये सार्वजनिक आरोग्यासंबंधी गंभीर प्रश्‍न म्हणून समाविष्ट करण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.
 • प्रतिजैविक प्रतिरोध : प्रतिजैविक औषधांचे मर्यादेपेक्षा अधिक सेवन केल्यास शरीर त्यास प्रतिरोध करू लागते आणि त्यानंतर ती औषधे शरीरातील आजारांवर परिणाम करू शकत नाहीत.

एमके-४५ नौदल तोफा

 • अमेरिकेने भारतास एकूण १३ ‘एमके-४५’ नौदल तोफा (MK-45 Naval guns) व संबंधित उपकरणांची विक्री करण्याच्या करारास मान्यता दिली असून त्यांचा उपयोग परकीय युद्धनौका व युद्धविमाने किनाऱ्याजवळ आल्यास होऊ शकतो.
 • त्यांची मारक क्षमता २० सागरी मैलांपेक्षा अधिक असून त्यांची निर्मिती ‘बीएई सिस्टीम लँड्‌सकडून केली जाणार आहे.
 • या तोफा मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया, जपान, द. कोरिया आणि थायलंडनंतर या तोफांची नवी आवृत्ती असणारा भारत हा पाचवा देश ठरणार आहे.

आयसीजीएस अमृत कौर

 • आयसीजीएस अमृत कौर ही वेगवान गस्त नौका भारतीय तटरक्षक दलात तैनात करण्यात आली असून तिचा उपयोग बचाव व मदत कार्यासाठीदेखील करण्यात येणार आहे.
 • ही नौका ३०८ टन वजन वाहून नेण्यास सक्षम असून सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम असणाऱ्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सची निर्मिती आहे.
 • नौकेची लांबी ५० मीटर तर रुंदी ७.५ मीटर आहे.

पश्‍चिम बंगालच्या नामांतरास नकार

 • पश्‍चिम बंगाल राज्याने राज्याचे नामांतर ‘बांगला’ असे करण्याचा केलेला प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आहे.
 • राज्य सरकारने २०११ मध्ये सुचवलेले ‘पश्‍चिम बंग’ हे नावदेखील केंद्र सरकारने नाकारले होते.
 • त्यानंतर २०१६ मध्ये राज्य सरकारने इंग्रजीत ‘बेंगल’, हिंदीत ‘बंगाल’ आणि बंगालीत ‘बांगला’ असे नामांतर सुचवले होते.
 • मागील वर्षी २६ जुलै रोजी राज्याचे नाव ‘बांगला’ करावे असा ठराव राज्य विधानसभेत पारित करून गृहमंत्रालयास प्रस्ताव पाठवला होता.
 • हे सर्व प्रस्ताव फेटाळत ‘बांगला’ हे नाव बांगलादेशाशी साधर्म्य साधणारे असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन नावांमध्ये गोंधळ होऊ शकतो असे कारण केंद्र सरकारने दिले आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान
ग्लोबल बायो-इंडिया २०१९

 • केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव-तंत्रज्ञान विभागाचा सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या ‘जीव-तंत्रज्ञान उद्योग संशोधन’च्या साहाय्याने ‘ग्लोबल बायो-इंडिया २०१९’ या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले.
 • भारतीय उद्योग संघ, इन्व्हेस्टर इंडिया आणि असोसिएशन ऑफ बायोटेक्नोलॉजी लेड एन्टरप्रायजेस हे या शिखर संमेलनाचे भागीदार होते.
 • भारतात प्रथमच अशा प्रकारच्या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे या क्षेत्रातील नवसंशोधक, शिक्षणसंस्था, मध्यम व मोठ्या उद्योगांना व्यासपीठ उभे करून देणे हा यामागचा उद्देश होता.
 • या संमेलनात जैव-औषधोत्पादन, जैव-शेती, जैव-उद्योग, जैव-ऊर्जा आणि जैव-सेवा संबंधित क्षेत्रातील महत्त्वाच्या आव्हानांवर आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताच्या जैव-तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रदर्शन करण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची संधी देण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार २०१९

 • नवी दिल्ली येथे प्रवासी भारतीय केंद्रात स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९चे वितरण करण्यात आले. यात राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हा अशा तीन श्रेणी होत्या.
 • राज्यांच्या श्रेणीमध्ये तामिळनाडू राज्यास प्रथम स्थान, हरयाणास द्वितीय तर गुजरातला तृतीय स्थान मिळाले आहे.
 • जिल्हा श्रेणीमध्ये तेलंगणा राज्यातील पेडापल्ली प्रथमस्थानी असून हरयाणा राज्यातील फरिदाबाद व रेवाडी हे जिल्हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर आहेत.
 • स्वच्छता मोहिमेतील लोकसहभागासाठी उत्तरप्रदेश राज्य अग्रेसर आहे.
 • प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाच्या अंतर्गत सिमेंट मॅन्युफ्रॅक्चरर असोसिएशन, अमूल आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या महामंडळांना त्यांच्या कार्यासाठी गौरविण्यात आले. 
 • पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने परिणामात्मक आणि गुणात्मक स्वच्छता मानकांवर आधारित भारतातील सर्व जिल्ह्यांची क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९’ची सुरुवात केली होती.
 • या सर्वेक्षणात भारताच्या सर्व गावांमधील शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक आरोग्यकेंद्रे, मंडया, धार्मिक स्थळे इत्यादींना समाविष्ट करण्यात आले होते.

पृथ्वी २ची यशस्वी चाचणी

 • स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी २’ या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथे यशस्वीपणे घेण्यात आली.
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र ९ मीटर उंच असून एक हजार किलो वजनाची स्फोटके घेऊन जाण्यास सक्षम आहे.
 • क्षेपणास्त्राचा मारक पल्ला ३५० किलोमीटरचा असून त्याच्या दोन इंजिन्समध्ये द्रव इंधनाचा वापर करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय
भारत ‘नाटो’मध्ये समाविष्ट होणार

 • अमेरिकी संसदेने भारतास ‘नाटो’ देशाचा दर्जा देणारे विधेयक मजूर केले असल्याने अमेरिका संरक्षण क्षेत्रातील व्यवहारांमध्ये भारताचे नाटो सहकारी असणाऱ्या इस्राईल व दक्षिण कोरियाप्रमाणे व्यवहार करेल.
 • आर्थिक वर्ष २०२० साठी ‘नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट’ला अमेरिकेतून यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.
 • भारतास नाटो देशाचा दर्जा मिळाल्यामुळे भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री खरेदी करू शकणार आहे.   

संबंधित बातम्या