स्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स

सायली काळे 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

करंट अफेअर्स
 

राष्ट्रीय

राष्ट्रीय सेंद्रिय महोत्सव

 • केंद्रीय अन्नप्रक्रिया व उद्योग मंत्रालय आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय यांनी खास महिला उद्योजकांसाठी ‘राष्ट्रीय सेंद्रिय महोत्सवा’चे आयोजन करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
 • हा कार्यक्रम हरयाणा राज्यातील सोनीपत येथील राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता व व्यवस्थापन संस्थेद्वारे (NIFTEM) आयोजित करण्यात येणार असून संस्थेच्या कुलगुरूंनी या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
 • भारतातील सेंद्रिय अन्नाच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याबरोबरच भारतीय महिला उद्योजक आणि शेतकऱ्यांना विक्रेत्यांशी संपर्क साधण्यास उत्तेजन देणे आणि आर्थिक समावेशातून त्यांना सक्षम करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
 • या महोत्सवासाठी महिला व बालविकास मंत्रालय NIFTEM च्या कुलगुरूंकडे निधी सुपूर्द करणार आहे.

लोकताक आंतर्देशीय जलमार्ग प्रकल्प

 • केंद्रीय नौवाहन मंत्रालयाने ईशान्य भारतातील लोकताक आंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पाच्या विकासासाठी मणिपूर राज्याने केलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
 • सदर प्रकल्पाच्या विकासाची मागणी लोकताक विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एल. सुसिंद्रो मेईतई आणि मणिपूर येथील आमदार खुरी यांनी केली होती.
 • पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पर्यटन व्यवसायाच्या विकासास हातभार लागावा यासाठी प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
 • या जलप्रकल्पाच्या विकासासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च येणार असून हे काम केंद्रीय क्षेत्र योजनेच्या कक्षेत मंजूर करण्यात आले आहे.

क्रीडाक्षेत्रासाठी राष्ट्रीय संहिता

 • केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने क्रीडा क्षेत्रातील सुशासनासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय संहिता २०१७ च्या मसुद्यावर निर्णय घेण्यासाठी १३ तज्ज्ञांच्या समितीची नेमणूक केली आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मुकुंद शर्मा हे या समितीचे अध्यक्ष असून गगन नारंग, पुलेला गोपीचंद, अंजू बॉबी जॉर्ज, बायचुंग भुतिया अशा अनुभवी खेळाडूंचा या समितीत समावेश आहे.
 • याशिवाय क्रीडा मंत्रालायचे सहसचिव या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
 • क्रीडा क्षेत्रातील सुशासनासाठी सदर मसुद्यावर भारतीय ऑलिंपिक असोसिएशन आणि इतरांकडून आलेल्या सूचना तपासून पाहणे तसेच सध्याच्या संहितेसह नव्या मसुद्याचे पुनरावलोकन करणे हे काम या समितीकडे आहे.

भ्रष्टाचार सर्वेक्षण २०१९

 • ‘लोकल सर्कल्स’ आणि ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया’द्वारे ऑक्टोबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत भ्रष्टाचार निगडीत एक राष्ट्रीय सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
 • आलेल्या अहवालानुसार राजस्थान आणि बिहार ही देशातील सर्वांत भ्रष्ट राज्ये असून दक्षिण भारतात तेलंगणा हे सर्वाधिक भ्रष्टाचारयुक्त राज्य आहे.
 • भ्रष्टाचाराच्या या यादीत राजस्थान आणि बिहार यांच्यानंतर उत्तरप्रदेश आणि झारखंड ही राज्ये तृतीय स्थानावर आहेत.
 • सदर यादीनुसार केरळ हे भारतातील सर्वांत कमी भ्रष्टाचार असणारे राज्य असून याशिवाय गोवा, गुजरात, ओडिशा, प. बंगाल, हरयाणा आणि दिल्ली येथेही भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी दिसून आले आहे.

मित्र शक्ती : भारत-श्रीलंका युद्धसराव

 • भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या ‘मित्र शक्ती’ या युद्धसरावाची सातवी आवृत्ती १ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रातील औंध (पुणे) येथील लष्करी तळावर सुरू झाली असून पुढील १४ दिवस हा सराव सुरू राहणार आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेवर तैनात असताना परस्पर कार्यकुशलतेचे प्रशिक्षण या सरावातून दिले जाणार आहे.
 • याशिवाय नागरी व ग्रामीण भागातील दहशतवादविरोधी मोहिमा आखण्याच्या कौशल्यांची देवाण-घेवाण केली जाणार आहे.
 • या २०१३ पासून सुरू केलेल्या वार्षिक सरावामागील प्रमुख उद्देश दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रभाव वाढवणे हा आहे. 

विज्ञान-तंत्रज्ञान

‘कार्टोसॅट ३’चे यशस्वी प्रक्षेपण

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पीएसएलव्ही-४७ या भारतीय प्रक्षेपकाच्या साहाय्याने १३ अमेरिकी व्यावसायिक लघू उपग्रहांसह ‘कार्टोसॅट ३’ या देशी बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
 • हे प्रक्षेपण श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले असून चांद्रयान-२ नंतर इस्रोने कमावलेले हे पहिले यश आहे.
 • कार्टोसॅट-३ हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. १६२५ किलो वजनाचा हा उपग्रह इतर उपग्रहांच्या तुलनेत दुप्पट वजनाचा व अतिशय गुंतागुंतीचा आहे.
 • पृथ्वीच्या भौगोलिक निरीक्षणासाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या उपग्रहामध्ये उच्च दर्जाची छायाचित्रण क्षमता आहे.
 • प्रक्षेपण झाल्यानंतर कार्टोसॅट-३ हा उपग्रह पृथ्वीपासून ५०९ किलोमीटर अंतरावर सौर समन्वित कक्षेत यशस्वीपणे स्थिरावला.
 • कार्टोसॅट या उपग्रहांच्या मालिकेस भारताचे नेत्र असे संबोधले जात असून सर्जिकल स्ट्राईकसारख्या महत्त्वाच्या कामगिऱ्यांसाठी हे उपग्रह उपयुक्त ठरले आहेत.

आंतरराष्ट्रीय

जागतिक स्थलांतर अहवाल २०२०

 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतर संस्थे’ने (IOM) जागतिक स्थलांतरचा अहवाल सादर केला असून या अहवालानुसार स्थलांतरात भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
 • अहवालानुसार १.७५ कोटी भारतीय हे मायदेशातून स्थलांतरित होऊन इतर देशात राहत आहेत. त्यांच्याकडून भारतास वार्षिक ७८.६ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळत आहे.
 • स्थलांतर प्रक्रियेत भारताखालोखाल चीन व मेक्सिको यांचे स्थान असून त्यांचे वार्षिक उपन्न अनुक्रमे ६७.४ अब्ज डॉलर्स आणि ३७.५ अब्ज डॉलर्स एवढे आहे.
 • जागतिक पातळीवर एकूण लोकसंख्येच्या ३.५ टक्के लोक हे मायदेश सोडून इतरत्र राहत असून ही लोकसंख्या सुमारे २७ कोटी एवढी आहे.
 • गेल्या दशकभरात स्थलांतरात लक्षणीय वाढ झाली असली तरी एकूण लोकसंख्येतही तेवढीच वाढ झाली असल्याने स्थलांतराचे गुणोत्तर स्थिर राहिले आहे.
 • स्थलांतराचा मोठा ओघ हा उत्तर अमेरिका व युरोपीय देशांत असून अविकसित व विकसनशील देशातील नागरिक अमेरिकेसह फ्रान्स, रशिया, यूएई आणि सौदी अरेबिया येथे जाणे पसंत करत आहेत.
 • पश्‍चिम आशियातील सर्वेक्षणानुसार आखाती देशात स्थलांतरित कामगारांची संख्या सर्वाधिक असून यूएईमध्ये ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के आहे.
 • मागील दोन वर्षांत म्यानमार, येमेन, दक्षिण सुदान, कांगो अशा अंतर्गत संघर्षाने गांजलेल्या देशांतून सुमारे ४.१३ कोटी लोकांना आपापले मायदेश सोडावे लागले आहेत.
 • देशातील अंतर्गत विस्थापित लोकसंख्येमध्ये सिरीया(६१ लाख), कोलंबिया (५८ लाख) आणि कांगो (३१ लाख) हे पहिल्या तीन स्थानांवर आहेत.
 • जगातील सुमारे २.६० कोटी लोक निर्वासित असून सिरीयातील नागरिक (६० लाख) प्रथम तर अफगाणिस्तानी नागरिक (२५ लाख) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.    

संबंधित बातम्या