नोंद ठेवावी असे

सायली काळे
सोमवार, 1 मार्च 2021

नोंद ठेवावी असे

संरक्षण
अर्जुन MK-1A भारतीय सैन्यात दाखल 

 • चौदा जानेवारी रोजी चेन्नई येथे एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशी बनावटीचे ‘अर्जुन MK-1A’ प्रकारातील ११८ रणगाडे भारतीय सैन्यास प्रदान करण्यात आले.
 • या रणगाड्यांची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि रणयान संशोधन व विकास कारखाना (CVRDE) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध १५ शैक्षणिक संस्था, ८ प्रयोगशाळा व काही लघु व माध्यम उद्योगांच्या (MSME) सहकार्याने करण्यात आली आहे.
 • या ११८ रणगाड्यांसाठी शासनाने तब्बल ८,४०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
 • नव्या अर्जुन रणगाड्यांमध्ये १४ सुधारणा करण्यात आल्या असून त्यातील स्वदेशीचा टक्का ४१ वरून ५४.३ वर नेण्यात आला आहे.
 • यापूर्वी २००९ साली ४५, तर २०११ साली १२४ अर्जुन रणगाडे भारतीय सैन्यात दाखल करण्यात आले होते.

पायाभूत सुविधा
महाबाहु-ब्रह्मपुत्रा प्रकल्प आणि दोन पूल

 • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १८ फेब्रुवारी रोजी एका व्हिडिओ परिषदेमार्फत ईशान्य भारतातील महाबाहु-ब्रह्मपुत्रा प्रकल्प आणि ढुबरी-फुलबारी पूल व माजुली पूल यांचे उद्‍घाटन केले.
 • महाबाहु-ब्रह्मपुत्रा: ईशान्य भारतातील दळणवळण अधिक सुकर व्हावे यासाठी योजलेल्या या प्रकल्पाची नियामतीघाट ते माजुली, ढुबरी ते हातसिंगीमारी आणि उत्तर-दक्षिण गुवाहाटी अशी प्रवासी नावसेवा (Ro-Pax), तसेच जोगीघोपा येथे जलवाहतूक केंद्र व नदी पर्यटनाच्या विकासासाठी नियामती, बिस्वनाथ घाट, पंडू आणि जोगीघोपा या चार पर्यटन स्थळांवर जेट्टीची सुविधा यांपासून सुरुवात करण्यात आली आहे. (प्रकल्पाचा खर्च रू. ९.४१ कोटी)
 • ढुबरी-फुलबारी पूल: ब्रह्मपुत्रा नदीला ओलांडत आसाममधील ढुबरीसह मेघालयातील फुलबारी, तुरा, रोंग्राम व रोंगजेंगपर्यंत जोडणारा, १९ किलोमीटर लांबीचा चारपदरी पूल. भविष्यात हा भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल ठरणार आहे. २०१२ साली ब्रह्मपुत्रा नदीत सुमारे ३०५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्यानंतर या पुलाच्या मागणीने जोर धरला होता. (प्रकल्पाचा खर्च रू. ५ हजार कोटी)
 • माजुली पूल: माजुली बेट (कमलबारी येथे) आणि जोरहाट (नियामतीघाट येथे) यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ‘७१५ के’ यात समाविष्ट असणारा, तसेच माजुली बेटास प्रथमच रस्त्याच्या मार्गाने मुख्य भूमीस जोडणारा दुपदरी पूल.

आंतरराष्ट्रीय
क्वाड : मंत्रिस्तरीय बैठक

 • क्वाड या चार राष्ट्रांच्या (भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका) समूहाची मंत्रिस्तरीय तिसरी बैठक १८ फेब्रुवारी रोजी झाली. आभासी माध्यमाद्वारे घेतलेल्या या बैठकीस चारही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हजेरी लावली.
 • या बैठकीत मुख्यतः म्यानमारमधील लष्करी सत्ता व लोकशाहीचा झालेला बीमोड, हिंद-प्रशांत प्रदेशातील प्रश्न व त्यावरील एकमेकांचे दृष्टिकोन आणि कोविड १९ महामारीमुळे उद्‍भवलेल्या समस्यांना सामोरे जाण्याचे काही उपाय यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
 • रास्त दरातील लशी, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे मिळण्याच्या उपायांच्या मुद्द्यावर ही बैठक संपली.

आर्थिक
सार्वजनिक बँकांचे खासगीकरण

 • यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयडीबीआय आणि अजून दोन बँकांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्याला अनुसरून या प्रक्रियेसाठी केंद्राने मध्यम आकाराच्या चार सार्वजनिक बँकांची निवड केली आहे.  
 • सार्वजनिक बँकांचा विस्तार, त्यांची कर्मचारी संख्या आणि कर्मचाऱ्यांची नोकरीबाबतची सुरक्षितता लक्षात घेता खासगीकरणाची ही प्रक्रिया क्लिष्ट आणि राजकीय दृष्ट्या जोखमीची असल्याने मोदी सरकारने यासाठी सध्या द्वितीय स्तरातील बँकांचीच निवड केली आहे.
 • या चार बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश असून यापैकी दोन बँकांचे खासगीकरण हे २०२१-२२ आर्थिक वर्षात होणार आहे. उरलेल्या दोन बँकांची प्रक्रिया पुढील वर्षी करण्याचा मानस आहे.
 • या खासगीकरणाच्या प्रक्रियेसाठी १९७० आणि १९८०च्या बँकिंग कंपनी (संपादन आणि कार्यहस्तांतरण) कायद्यांमध्ये बदलदेखील करण्यात येणार आहेत. 
 • भारतीय बँकांना दोन टप्प्यांत राष्ट्रीयीकृत करण्याच्या दृष्टीने उपरोक्त कायदे करण्यात आले होते, त्यामुळे बँकांचे खासगीकरण करताना त्यातील काही तरतुदी बदलणे आवश्यक आहे.
 • या सुधारणा संसदेच्या पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 • मागील आर्थिक वर्षापर्यंत शासनाने १० सार्वजनिक बँकांचे एकत्रीकरण करत चार बँका केल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक बँकांची संख्या (मार्च २०१७) २७ वरून १२ वर आली होती.

 

विज्ञान-तंत्रज्ञान

पर्सिव्हिअरन्स: नासाची मंगळ मोहीम

 • एकोणीस फेब्रुवारी रोजी नासा या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेचे पर्सिव्हिअरन्स नामक फिरस्त (Rover) यान यशस्वीरीत्या मंगळावर उतरले. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठविण्यात आलेले हे आत्तापर्यंतचे जगातील सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान ठरले आहे.
 • अठरा फेब्रुवारीला या यानाने मंगळाच्या वातावरणीय कक्षेत प्रवेश करून पुढील काही तासातच मंगळाच्या पृष्ठभागावर पूर्वनियोजित अशा ‘जेझेरो’ विवरात स्थान निश्चित केले. यानाच्या या पहिल्या थांब्यामध्ये मंगळावरील सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा मागोवा घेतला जाणार आहे.
 • जेझेरो विवरात सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी नद्यांचे अस्तित्व असावे असे यापूर्वीच्या अभ्यासात आढळून आले होते. वातावरणीय बदलांमुळे लुप्त झालेल्या या नद्यांच्या खोऱ्यात जीवसृष्टीच्या संभाव्य खुणा शोधण्याचे काम प्रथम केले जाणार आहे.
 • भविष्यात दीर्घकालीन मानवी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने मुबलक ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी मंगळावरील कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचा प्रयोगही या प्रकल्पामध्ये केला जाणार आहे.
 • हेलिकॉप्टर प्रतिकृती: या मोहिमेत इंजेन्युइटी नामक लहानसे हेलिकॉप्टर समाविष्ट असून मंगळाच्या विरळ वातावरणात ते उड्डाण करू शकल्यास ते ग्रहाची पाहणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 
 • भारतीय सहभाग: संपूर्ण मोहिमेत दोन भारतीय स्त्रियांची नावे आहेत. १) डॉ. स्वाती मोहन: भारतीय वंशाच्या अमेरिकी वैज्ञानिक, मोहिमेतील मार्गदर्शन, दिशादर्शन व नियंत्रण प्रणालीच्या प्रमुख, यान यशस्वीरीत्या उतरविण्याच्या प्रक्रियेत प्रमुख सहभाग २) वनिझा रूपानी: भारतीय वंशाची अमेरिकी उच्चशालेय विद्यार्थिनी, नासाच्या ‘नेम द रोव्हर’ स्पर्धेत निबंध पाठवून यानातील हेलिकॉप्टरचे नामकरण करण्याची संधी तिला मिळाली होती.
 • या ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी अमेरिकेने सुमारे २.७ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत.
 • पर्सिव्हिअरन्स हे मंगळाच्या भूमीला स्पर्श करणारे पाचवे अमेरिकी यान असून यापूर्वी अनुक्रमे सोजर्नर, स्पिरिट, ऑपॉर्च्युनिटी आणि क्युरिऑसिटी ही याने मंगळावर यशस्वीरीत्या पोहोचली होती.

संबंधित बातम्या