नोंद ठेवावी असे 

सायली काळे 
मंगळवार, 27 एप्रिल 2021

करिअर

पर्यावरण

चिल्का सरोवरात डॉल्फिन झाले उदंड 

 • ओडिशातील चिल्का या भारतातील खाऱ्या पाण्याच्या सर्वात विशाल सरोवरातील डॉल्फिन्सच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 
 • डॉल्फिनच्या या गणनेसाठी विविध पर्यावरण रक्षक, शिक्षणतज्ज्ञ, वनाधिकारी, स्वयंसेवी संस्था, नावाडी आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे अभ्यासक यांनी ४१ लहान लहान तुकड्या तयार करून काम केले. या सर्व तुकड्या संपूर्ण राज्याच्या किनारपट्टीवर तैनात होत्या. 
 • चिल्का सरोवरात तीन प्रजातींचे डॉल्फिन आढळत आहेत. यात बॉटल-नोज डॉल्फिन, हम्पबॅक डॉल्फिन आणि इरावड्डी डॉल्फिन यांचा समावेश आहे. तिन्ही प्रजाती मिळून ५४४ डॉल्फिन्सची नोंद केली आहे. मागील वर्षी ही संख्या २३३ एवढी होती.
 • ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या (आयूसीएन) असुरक्षित (Vulnerable) प्रजातींच्या आणि ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) चिंताजनक (Endangered) प्रजातींच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या इरावड्डी डॉल्फिन्सची संख्या १४६ वरून १६२ वर गेली आहे.  मात्र याच डॉल्फिन्सची राजनगर खारफुटी परिसरातील संख्या ६० वरून ३९ वर आल्याचे दिसून आले आहे.
 • चिल्का सरोवर परिसरातील बेकायदा मासेमारीला लावलेला चाप आणि कोविडच्या साथीमुळे पर्यटकांच्या संख्येत झालेली घसरण यांमुळे डॉल्फिन्सच्या संख्येत वाढ झाली असल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त 

 • माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ १२ एप्रिल रोजी संपला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुशील चंद्र यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. 
 • सुशील चंद्र हे भारताचे २४वे मुख्य निवडणूक अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी त्यांनी अशोक लवासा यांच्याबरोबर निवडणूक उपायुक्तपदी २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महत्त्वाचे कार्य केले आहे. 
 • येत्या काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकांची मोठी जबाबदारी नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्तांवर असणार आहे.
 • त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे.

लष्करी सराव

शांतीर ओग्रोशेना २०२१

 • या वर्षीच्या बांगलादेशातील ‘शांतीर ओग्रोशेना’ या बहुराष्ट्रीय लष्करी सरावामध्ये भारतीय लष्कर सहभागी झाले होते. 
 • दहा दिवसांचा हा लष्करी सराव बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. लष्करी सराव १२ एप्रिल रोजी पूर्ण झाला. 
 • या सरावात भूतान, श्रीलंका व बांगलादेशाच्या सैन्यासह भारतीय सैन्याची डोग्रा रेजिमेंटची ३० सैनिकांची तुकडी सहभागी झाली होती. 
 •  ‘रोबस्ट पीस कीपिंग ऑपरेशन्स’ हा या लष्करी सरावाचा मुख्य विषय होता. 
 • या लष्करी सरावास अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, तुर्की, कुवेत आणि सिंगापूरचे सैन्य निरीक्षकही उपस्थित राहिले.

आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याची माघार

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण सैन्य मायदेशी परतणार आहे.
 •  सैन्य परतीची ही कारवाई अमेरिका व तालिबान यांच्यात झालेल्या 'दोहा शांती करारा'च्या अंतर्गत होत आहे. 
 • सद्यःस्थितीत अफगाणिस्तानात सुमारे अडीच ते तीन हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. याशिवाय 'नाटो'ची (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) आठ हजारांची फौजही तैनात आहे. 
 • अकरा सप्टेंबर २०२१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यास वीस वर्षे पूर्ण होत असल्याने त्या घटनेमुळे तैनात केलेले सैन्य त्याच दिवसाच्या स्मृतीने मागे घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
 • अमेरिकेच्या या कारवाईच्या परिणामांना अफगणिस्तानसह भारत, चीन व पाकिस्तान यांना सामोरे जावे लागणार आहेत. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी अंमल वाढल्यास भारत-अफगाणिस्तान संबंधांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुक्तिजोद्धा शिष्यवृत्ती 

 • भारत सरकारने आपल्या 'मुक्तिजोद्धा शिष्यवृत्ती'चा भाग म्हणून बांगलादेशच्या मुक्तिसंग्राम सेनानींच्या २ हजार वंशजांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 
 • या नव्या योजनेची संकल्पना २०१७ साली बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुख शेख हसीना यांच्या भारतभेटीदरम्यान मांडण्यात आली होती. 
 • ढाका येथील भारतीय उच्च आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार उच्च माध्यमिक आणि पदवीधर श्रेणीतील प्रत्येकी हजार विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. 
 • येत्या पाच वर्षांत बांगलादेशातील किमान १० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 
 • ही योजना बांगलादेशातील 'मुक्तिजोद्धा' म्हणजेच मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या सेनानींच्या थेट वंशज असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी २० हजार टका व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ५० हजार टका एवढी रक्कम प्रदान करते. 
 • भारताने या योजनेसाठी एकूण ३५ कोटी टका एवढ्या मूल्याच्या रकमेची तरतूद केली आहे.
 • बांगलादेश सरकारने २००६ साली ही योजना सुरू केलेली आहे. त्यावेळी उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना २ वर्षे मुदतीकरिता प्रतिवर्षी १० हजार टका, तर पदवीधर विद्यार्थ्यांना ४ वर्षे मुदतीसाठी प्रतिवर्षी २४ हजार टका एवढी रक्कम दिली जात असे.

आंतरराष्ट्रीय कलह
भारतीय हद्दीत अमेरिकेची नौदल मोहीम 

 • सात एप्रिल रोजी अमेरिकी नौदलाने लक्षद्वीप जवळील भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) कोणत्याही परवानगीशिवाय आपल्या 'यूएसएस जॉन पॉल जोन्स' युद्धनौकेसह मुक्तसंचार मोहीम (FONOP) राबवली.
 • अमेरिकी नौदलाने केलेली ही कृती भारताच्या समुद्र नौवहन संरक्षण धोरणाचे उल्लंघन आहे. 
 • लक्षद्वीपपासून १३० सागरी मैलांवर राबवलेली ही मोहीम म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सागरीसंधीचे (UNCLOS) उल्लंघन नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
 • भारताच्या सागरी हद्दीत असणाऱ्या लक्षद्वीपजवळील विशेष आर्थिक क्षेत्राच्या भारतीय दाव्यास अमेरिकेने दिलेले हे आव्हान मानले जात आहे.
 • व्हीटसन प्रवाळी बेटांनजीक चिनी जहाजांचा तळ
 •  मार्च महिन्यापासून दक्षिण चिनी सागरातील फिलिपाईन्स देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) येणाऱ्या व्हीटसन प्रवाळी बेटांनजीक २०० चिनी जहाजांनी बसवलेला तळ अखेर १३ एप्रिल पासून हलविण्यास सुरुवात केली आहे.
 • ही सर्व जहाजे केवळ मासेमारीसाठी आल्याचा चीनचा दावा असला, तरी या प्रदेशावर कब्जा करण्याचे चीनचे जुनेच मनसुबे असल्याचे फिलिपाईन्सचे म्हणणे होते.
 • सदर प्रवाळी बेटे फिलिपाईन्सच्या पलवान या उत्तरी राज्याच्या पश्चिमेकडे १७० सागरी मैलांवर आहेत.
 • दर काही काळाने दक्षिण चिनी सागरामध्ये चीनची अशी निमलष्करी स्वरूपाची मासेमारी करणाऱ्या जहाजांसारखी  जहाजे, दक्षिण आशियायी प्रदेशातील देशांच्या मच्छीमारांना धमकावण्यासाठी गस्त घालत असल्याचा इतिहास असल्याने चीनच्या सध्याच्या कुरापती विरोधात फिलिपाईन्सने आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला. 
 • फिलिपाईन्सच्या आक्रमक धोरणामुळे चीनने आपली जहाजे वेगाने हलवण्यास सुरुवात केली असून सध्या केवळ नऊ चिनी जहाजे त्या परिसरात शिल्लक आहेत.

संबंधित बातम्या