नाोंद ठेवावी असे 

सायली काळे 
सोमवार, 17 मे 2021

नाोंद ठेवावी असे 

पर्यावरण
खाद्यतेलापासून बायोडिझेल

 • वापरलेल्या खाद्यतेलापासून (UCO) निर्माण केलेल्या बायोडिझेलच्या नेहमीच्या डिझेलबरोबरच्या मिश्रणास खनिज तेल आणि नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अधिकृत अनुमती दिली.
 • केंद्र सरकारच्या ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ या योजनेअंतर्गत इंडियन ऑईलच्या उत्तरप्रदेशातील टिकरीकलॉँ टर्मिनलपासून हा उपक्रम चालू होणार आहे.
 • वापरलेल्या खाद्यतेलापासून दरवर्षी सुमारे २२२ कोटी लिटर बायो डिझेल निर्माण करण्याची भारताची क्षमता आहे. मात्र वापरलेले खाद्यतेल गोळा करण्याची यंत्रणा आपल्याकडे नसल्याची खंत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी व्यक्त केली.
 • सध्याच्या प्रायोगिक उपक्रमासाठी डिझेलबरोबर सात टक्के UCO बायोडिझेल मिसळण्यात आले आहे. 
 • डिझेल हे भारतातील प्रमुख इंधन असून देशाच्या गरजेच्या ८५ टक्के डिझेल आयात केले जाते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कार्बन उत्सर्जनाबरोबर आयात खर्चाचा भारही कमी होणार आहे.
 • उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांत मिळून इंडियन ऑईलने आठ बायोडिझेल संयंत्र बसवली आहेत.

सौदी अरेबियाचे हरित उपक्रम 

 • जल आणि वायू प्रदूषणाच्या समस्येशी दोन हात करण्याच्या दृष्टीने सौदी अरेबियाने ‘सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह’ (एसजीआय) उपक्रम आणि ‘मिडल ग्रीन इनिशिएटिव्ह’ (एमजीआय) या दोन हरित उपक्रमांची घोषणा केली आहे. 
 • एसजीआय : वनांचे प्रमाण वाढवणे, कार्बन उत्सर्जनास आळा घालणे, मातीची झीज कमी करणे आणि सागरी जीवांचे संरक्षण करणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
 • एमजीआय : सागरी किनाऱ्यांचे संरक्षण, नैसर्गिक संपत्ती आणि राखीव जमिनींच्या प्रमाणात वाढ होण्यास मदत करणे, तेलउत्पादनाच्या नियमनात सुधारणा, ऊर्जेच्या अपारंपरिक आणि स्वच्छ स्रोतांना प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
 • या दोन्ही प्रकल्पांच्या अंतर्गत ५० अब्जांपर्यंत वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. त्यात १० अब्ज वृक्षांचा वाटा एकट्या सौदी अरेबियाचा असल्याचे सौदीचे राजकुमार मुहम्मद बिन सलमान यांनी माध्यमांना सांगितले.

आरोग्य

मोहीम समुद्र सेतू २

 • कोविड १९च्या देशव्यापी साथीने आरोग्य यंत्रणेपुढे उभ्या राहिलेल्या समस्यांशी लढण्यासाठी भारतीय नौदलाने समुद्र सेतू २ ही मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत नौदलाची सात जहाजे तैनात करण्यात आली आहेत. 
 • या युद्धनौकांमध्ये आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची, आयएनएस तलवार, आयएनएस टाबर, आयएनएस त्रिकाण्ड, आयएनएस जलाश्‍व आणि आयएनएस ऐरावत समाविष्ट आहेत. 
 • ही सर्व जहाजे विविध देशांतून द्रवरूपी ऑक्सिजनचे क्रायोजेनिक कंटेनर्स आणि संबंधित वैद्यकीय साधने घेऊन येणार आहेत.
 • पर्शियन आखातात एका वेगळ्याच मोहिमेसाठी तैनात असणाऱ्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस तलवार यांना तातडीने बाहरीनच्या मनामा बंदराच्या दिशेने रवाना होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी आयएनएस तलवार ४० मेट्रिक टन एवढा वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा घेऊन भारताच्या दिशेने मार्गस्थ झाले असून ते मुंबई येथे पोहोचणार आहे.
 • वैद्यकीय साधनांच्या पूर्ततेसाठी आयएनएस कोलकाता हे कतारमधील दोहाच्या दिशेने गेले आहे. यानंतर कुवेतमधून ऑक्सिजनचे कंटेनर्स घेऊन ते भारताच्या दिशेने परतणार आहे.
 • याच कामासाठी आयएनएस जलश्वने सिंगापूर, तर आयएनएस ऐरावतने बँकॉकच्या (थायलँड) दिशेने कूच केले आहे.
 • अरबी समुद्रात वेगवेगळ्या मोहिमांवर असणाऱ्या आयएनएस कोची आणि आयएनएस टाबर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्यासाठी तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 • मागील वर्षी राबवण्यात आलेल्या पहिल्या समुद्र सेतू मोहिमेत नौदलाच्या जहाजांद्वारे कोविड काळात बाहेरील देशात अडकलेल्या सुमारे चार हजार भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याचे काम करण्यात आले होते.

डीआरडीओचे योगदान 

 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) समुद्रसपाटीपासून अतिरिक्त उंचीवर तैनात असणारे भारतीय जवान आणि सध्याचे कोविडच्या साथीचे संकट या दोन्ही बाबी डोळ्यासमोर ठेवून एक ऑक्सिजन पुरवठा प्रणाली तयार केली आहे.
 • बंगळूर येथील डीआरडीओच्या संरक्षण जैव-अभियांत्रिकी व विद्युत-वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये (DEBEL) ही ‘हायपॉक्सिया’ अवस्था टाळू शकणारी ऑक्सिजन पूरक प्रणाली विकसित केली आहे.
 • शरीरातील बहुतांश उतींना ऑक्सिजन कमी पडून त्यांच्यातील त्राण जाण्याच्या अवस्थेला ‘हायपॉक्सिया’ म्हणतात. सध्याच्या कोविडच्या लाटेत बहुसंख्य रूग्ण हे हायपॉक्सिया अवस्थेपर्यंत पोहोचल्याने दगावले आहेत.
 • समुद्रसपाटीपासून अतिरिक्त उंच भागातील अतिरिक्त कमी हवेचा दाब, आर्द्रता आणि तापमान यात काम करू शकणारी ही यंत्रणा व्यक्तीच्या मनगटावर बांधलेल्या पट्ट्यावरून ऑक्सिजन पातळी पडताळून पाहते आणि ऑक्सिजनच्या सिलिंडरमधून गरजेनुसार पुरवठा करते.
 • या यंत्रणेतील ऑक्सिजनचे सिलिंडर वजनाने हलके व कुठेही सहज नेता येण्यासारखे (portable) आहेत. एक किलो वजन व १५० लिटर ऑक्सिजन क्षमता इथपासून ते १० किलो वजन व १५०० लिटर ऑक्सिजन क्षमता इथपर्यंत विविध श्रेणींमध्ये सिलिंडर उपलब्ध आहेत. 
 • ही प्रणाली एतद्देशीय वातावरण विचारात घेऊन निर्माण केली असल्याने किमतीला अतिशय कमी, मजबूत आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
 • या प्रणालीतील स्वयंचलित यंत्रणेमुळे रुग्णाच्या गरजेनुसार ही प्रणाली इशारा देऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा वेग कमी अधिक करण्यास सक्षम आहे आणि म्हणूनच सौम्य संसर्गाच्या कोविड रुग्णांना ही प्रणाली घरगुती वापरासाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.
 • डीआरडीओ विकसित या स्वयंचलित यंत्रणेमुळे डॉक्टर व परिचारकांवरील ताण, तसेच सातत्याने ऑक्सिजन पातळी तपासण्याचा वेळ या दोन्हीची बचत होणार आहे.

संबंधित बातम्या