नोंद ठेवावी असे

सायली काळे
सोमवार, 24 मे 2021

नोंद ठेवावी असे
 

पायाभूत सुविधा

पुद्दुचेरीमध्ये प्रत्येक घरात नळ 

 • पुद्दुचेरी हे आता प्रत्येक ग्रामीण घरात नळाने पाणी पोहोचवणारे राज्य/केंद्रशासित प्रदेश ठरले आहे. हे काम केंद्र सरकारच्या जल जीवन मोहिमेअंतर्गत करण्यात आले आहे. 
 • या पूर्वी गोवा, तेलंगणा आणि अंदमान-निकोबार येथे हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे.
 • जल शक्ती मंत्रालयाच्या माहितीनुसार पुद्दुचेरीच्या १.१६ लाख ग्रामीण घरांमध्ये नळांमार्फत पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
 • या मोहिमेद्वारे २०२४पर्यंत देशातील सर्व ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.

भारतीय नौदल

गोवा मेरीटाईम सिम्पोझिअम २०२१

 • शेजारील सागरी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नौदलाने गोव्याच्या नौदल युद्ध महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ मे रोजी ‘गोवा मेरीटाईम सिम्पोझिअम २०२१’ या परिसंवादाचे नियोजन केले होते.
 • कोविड संक्रमणाचे संकट लक्षात घेता प्रथमच याचे आयोजन आभासी (virtual) पद्धतीने करण्यात आले.
 • हिंदी महासागरातील भारतासह १३ किनारी राष्ट्रांनी या परिसंवादात सहभाग घेतला. सहभागी राष्ट्रे : बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेचल, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलँड. 
 • परिसंवादाचा मुख्य विषय : सागरी सुरक्षा आणि अपारंपरिक धोके (हवामान बदल, पर्यावरणीय झीज, सायबर गुन्हे, चाचेगिरी, अमलीपदार्थांचे व्यापार इत्यादी)

आंतरराष्ट्रीय

दक्षिण सुदानची शांततेच्या दिशेने वाटचाल 

 • द. सुदानचे अध्यक्ष सलवा कीर यांनी २०१८मध्ये झालेल्या शांतता कराराला अनुसरून संसदेचे अधिवेशन विसर्जित केले. पुढील अधिवेशन केव्हा होईल याबाबत कोणतेही वक्तव्य त्यांनी केलेले नाही. 
 • जुन्या संसदेच्या विसर्जनानंतर नव्या कायदेमंडळाची स्थापना हाही सप्टेंबर २०१८मध्ये अध्यक्ष कीर आणि उपाध्यक्ष रीक मचर यांच्यात झालेल्या शांतता कराराचाच भाग आहे. या नव्या संसदेत ५५० सभासद असणार आहेत.
 • देशातील विविध नागरी संघटनांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी आगामी प्रक्रियेस लागणारा वेळ आणि त्याबाबतची शाश्वती याबाबत शंका व्यक्त केली आहे.
 • द. सुदानमधील पाच वर्षांच्या नागरी युद्धामध्ये सुमारे ३ लाख ८० हजार नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर ४० लाख नागरिक विस्थापित झाले आहेत.
 • इस्राईल आणि पॅलेस्टाईन धुमश्चक्री
 • दहा मे रोजी इस्राईलने पूर्व जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांत धुमश्चक्री सुरू झाली. इस्रायली फौजांवरील पॅलेस्टाईनच्या सततच्या कारवायांमुळे हा हल्ला केल्याचे इस्राईलचे म्हणणे आहे. 
 • इस्राईलच्या ‘जेरुसलेम दिवस’ आणि पॅलेस्टाईनमधील रमजान महिन्या दरम्यान झालेल्या या हल्ल्यात सुमारे ३०० लोक जखमी झाले आहेत.
 • यानंतर १४ मे रोजी हमास या पॅलेस्टाईनच्या कट्टरपंथी संघटनेने गाझा पट्टीतून इस्राईलवर सुमारे १५०० क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. मात्र इस्राईलच्या आयर्न डोम या आधुनिक तंत्रज्ञानाने त्यापासून बचाव करणे शक्य झाले.
 • प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा येथील ‘अल जझीरा’सारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांची कार्यालये असणाऱ्या मोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या हल्ल्याच्या एक तासापूर्वी इमारती रिकाम्या करण्याचा इशारा देण्यात आला होता. 
 • हमास आणि इस्राईल यांच्या या चढाओढीत आत्तापर्यंत अनेक निष्पाप बळी गेले असून त्यात अनेक बालकांचाही समावेश आहे.

पर्यावरण
एन्व्हायर्न्मेंटल रिस्क आऊटलुक २०२१

 • गुरुवार, १३ मे रोजी व्हेरीस्क मॅपलक्रॉफ्ट या संशोधन संस्थेने जगातील मोठ्या शहरांचा पर्यावरणास असणारा धोका लक्षात घेऊन शहरांची क्रमवारी देणारा एक अहवाल प्रकाशित केला आहे.
 • या अहवालानुसार आशियायी शहरांमध्ये वायू प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका सर्वाधिक आहे. सुमारे ६०० शहरांच्या क्रमवारीतील पहिल्या १०० प्रदूषित शहरांमध्ये ९९ शहरे आशिया खंडातील असून त्यापैकी ४३ शहरे भारतात, तर ३७ शहरे चीनमध्ये आहेत.
 • अहवालानुसार जागतिक वायुप्रदूषणातील ८० टक्के उत्सर्जन हे G20 देशांमधून होत आहे. उत्सर्जक म्हणून चीन आणि भारत अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाची राजधानी लिमा हे एकमेव आशियाच्या बाहेरील शहर पहिल्या १०० प्रदूषित शहरांच्या यादीत आहे.
 • दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्वांत धोकादायक २० शहरांमधील १३ शहरे भारतात आहेत. त्यात देशाची राजधानी दिल्ली ही दुसऱ्या, चेन्नई तिसऱ्या, आग्रा सहाव्या, तर कानपूर १०व्या स्थानावर आहे. याशिवाय जागतिक क्रमवारीत जयपूर २२व्या, लखनौ २४व्या, बंगळूर २५व्या, तर मुंबई २७व्या स्थानावर आहे.
 • अहवालानुसार शहरी नागरिकांच्या आरोग्याला वायुप्रदूषण सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकानुसार (Air Quality Index) पहिल्या २० शहरांमध्ये बहुतांश शहरे भारतीय आहेत, तर १२व्या व १५व्या स्थानावर अनुक्रमे लाहोर व कराची ही पाकिस्तानी शहरे आहेत.
 • नैसर्गिक संकटांशी सामना करणाऱ्या शहरांमध्ये चीनमधील गुआंगझोऊ आणि डाँगगुआन ही शहरे अग्रणी आहेत. ओसाका आणि टोकियो ही जपानी शहरे सातत्याने भूकंप व वादळांच्या विळख्यात आहेत.
 • मुख्य आशिया खालोखाल पश्चिम आशिया (मध्य पूर्व) आणि उत्तर आफ्रिका या भागातील शहरेदेखील प्रदूषणाचा आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहेत.
 • पर्यावरणीय बदलांच्या निर्देशांकानुसार लागोस आणि किंशन्सा ही दोन आफ्रिकी शहरे धोक्यात आहेत. या श्रेणीत जाकार्ता, कराकस, कराची, मनीला यांचाही समावेश आहे.
 • युरोपातील शहरे या क्रमवारीत मागच्या स्थानावर आहेत. क्रमवारीत सर्वांत खाली असणाऱ्या २० शहरांमध्ये १४ युरोपीय शहरे असून त्यात मुख्यतः क्रास्नोयार्स्की, ओस्लो, व्हॅंक्यूव्हर, ग्लासगो, ओटावा, हेलसिंकी आणि कोपनहेगन यांचा समावेश आहे. यात आफ्रिकेतील कैरो, आशियातील शिझुका आणि उलनबाटोर ही समाविष्ट आहेत.  
 • वेगाने वाढणारी लोकसंख्या हे शहरांतील वायू प्रदूषण, पाण्याचा तुटवडा आणि नैसर्गिक आपत्तींच्या वाढीमागील मुख्य कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. जागतिक पातळीवर ४१४ शहरांमधील १.४ अब्जांहूनही अधिक नागरिक या सर्व समस्यांचा सामना करत आहेत.
 • केनियातील चहा शेती धोक्यात
 • सततच्या वातावरणीय बदलांमुळे केनिया या जगातील मोठ्या चहा उत्पादकास मोठा फटका बसणार आहे. त्याची झळ तेथील शेतमजुरांना बसणार आहे.
 • ‘ब्रिटिश चॅरिटी ख्रिश्चन एड’ने १० मे रोजी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २०५० सालापर्यंत केनियातील चहाच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरणीय परिस्थिती २६.६ टक्क्यांनी घट होणार आहे.
 • सन २०००पासून वाढत चाललेले तापमान २०५०पर्यंत २.५ टक्क्यांनी वाढणार आहे. माऊंट एलगॉन आणि मिब्री जिल्हा या चहासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रदेशातील पर्जन्यमानात अतिरिक्त वाढ होणार आहे.
 • याशिवाय देशात चहाचे सर्वसाधारण प्रमाणात उत्पन्न निघणाऱ्या भागातील उत्पन्नातही ३९ टक्क्यांनी घट होणार आहे.

संबंधित बातम्या