उपकरणे, वरदान की शाप?  

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
 

तंत्रज्ञान आणि संगणकीय विज्ञान हे आजच्या जगातले परवलीचे शब्द आहेत. पंचवीस तीस वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज सहज शक्य झाल्या आहेत. माणसांचे विविध क्षेत्रातले शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कष्ट कमी होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. 

ही यांत्रिक उपकरणे कष्ट आणि वेळ नक्कीच वाचवतात, पण ती हाताळताना काही काळजी घ्यावी लागते. ती न घेतल्यास आरोग्याबाबत अनेक गहन प्रश्न उभे राहतात. काही बाबतीत तर जीवावरही बेतू शकते. शरीराचा त्रास वाचवणाऱ्या या यंत्रणांत सजगता बाळगली नाही, तर आपला घात करू शकतात. साहजिकच या यांत्रिक अवजारांची म्हणजेच गॅजेट्सच्या परिणामांची माहिती असणे, ही आजच्या संगणकाने भरलेल्या आयुष्यात एक अत्यावश्यक बाब ठरते.

स्वयंपाकघरातील उपकरणे
 तीन-चार पिढ्यांपूर्वी स्त्रिया रोज पहाटे उठून जात्यावर दळायच्या आणि रोजच्या भाकऱ्या करायला पीठ तयार करायच्या. नंतर यांत्रिक गिरणी आली आणि आता घरातील दळण करायला यांत्रिक चक्की आली. जोडीला खोबरे किसायचे असो किंवा भाज्या चिरायच्या असो किंवा फळांचा रस करायचा असो, वाटण करायचे असो, त्यासाठी मिक्सर-ग्राइंडर आणि तत्सम यंत्रे आली. अन्न शिजवायला लाकडे जाळून पेटवायची चूल होती, मग रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आले आणि नंतर गॅस आणि त्याची शेगडी आली. पाठोपाठ मायक्रोवेव्ह ओव्हन आले. आजच्या मॉड्युलर किचनने स्त्रियांचे स्वयंपाकघरातील शारीरिक कष्ट त्यांना सुसह्य झाले. पण या साऱ्यासाठी घ्यायची काळजी मात्र महत्त्वाची ठरते.

गॅस सिलिंडर
खरे तर गॅस सिलिंडर ही वरवर अगदी किरकोळ वाटणारी गोष्ट आहे. कदाचित अत्याधुनिक उपकरणात ते कसे येते? असा प्रश्नही अनेकांना पडेल. पण गॅस सिलिंडर हे एका दृष्टीने तंत्रजैविक गॅजेटच आहे. घरातील अपघातांमध्ये सर्वांत गंभीर आणि जीवघेणे अपघात गॅस सिलिंडरबाबत काळजी न घेतल्याने होतात. त्यासाठी -

 •  दोन गॅस सिलिंडर्स असल्यास दुसरा भरलेला सिलिंडर स्वयंपाकघरापासून दूरवर बाल्कनीत अथवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावा. 
 • सिलिंडर बदलताना गॅस कंपनीच्या प्रतिनिधीकडून त्यावरील प्लॅस्टिकचे सील तोडून घ्यावे. आतील प्लॅस्टिकचे झाकण काढून त्यामध्ये वॉशर असल्याची खात्री करून मग त्यावर प्लॅस्टिकचे झाकण लावून सिलिंडरचे तोंड बंद करावे. 
 • गॅसचा गळतीचा विशिष्ट वास येत असल्यास सिलिंडर त्वरित परत करावा.
 • बाहेरून घरात आल्यावर गॅसच्या गळतीची शक्यता वाटल्यास दिव्याची बटणे सुरू करू नयेत.
 • सिलिंडरच्या आजूबाजूला रॉकेलचा डबा, रिकामे खोके, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रद्दी पेपर्स अशा ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. 
 • काम पूर्ण झाल्यावर गॅस-सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करावा. तसेच दररोज रात्री व बाहेर जाताना न चुकता गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करावा. 
 • गॅस शेगडीच्या रबरी नळीची नियमित पाहणी करावी. घरात गॅसचा थोडा जरी वास येत असला, रबरी नळीला बारीकसे छिद्र आढळले, रबरी नळी नरम झालेली आढळली, तर ताबडतोब गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करून गॅस कंपनीच्या मेकॅनिकला बोलावून दुरुस्ती करून घ्यावी. 
 • गॅसच्या गळतीबाबत किंवा अन्य कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी असलेला गॅस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक स्वयंपाकघरात सहज दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवावा.

विजेची उपकरणे :  

 • फ्रीज, मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर ही उपकरणे स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असतात. 
 • विजेवर चालणारे नवीन उपकरण घेतल्यावर त्याबरोबर मॅन्युअलमध्ये दिलेल्या, ते उपकरण योग्यप्रकारे वापरण्याच्या आणि हाताळण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना व्यवस्थितपणे वाचाव्यात. मगच उपकरणाचा काळजीपूर्वक वापर करावा.
 • ओल्या हाताने विजेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणाचा वापर करू नये, त्याप्रमाणे ओल्या हाताने विजेची बटणे सुरू अथवा बंद करू नयेत. त्यामुळे शॉक बसण्याची शक्यता असते. 
 • स्वयंपाकघरात विजेची बटणे चालू अथवा बंद करताना, विजेची उपकरणे वापरताना रबरी, सुती अथवा फायबर मॅट्स पायाखाली असाव्यात.
 • मिक्सर चालवताना हातांकडे लक्ष द्यावे. त्यात बोटे सापडून गंभीर दुखापत आणि तीव्र रक्तस्राव होण्याची हमखास शक्यता असते.
 • मायक्रोवेव्ह, ओव्हन यांच्या तापमानाकडे आणि वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 
 • घरात लहान मुले असल्यास मिक्सर, ग्राईंडर, ओव्हन अशा वस्तू सुरक्षितपणे ठेवण्याची विशेष खबरदारी घ्यावी.

गॅस-सिलिंडरचा वापर करताना महिलांनी खालील सावधगिरी बाळगावी...

 • आंघोळीसाठी पाणी तापवायला गॅस वापरताना पाणी तापल्यावर गॅस बंद करावा. मगच गरम पाण्याने भरलेले पातेले सावधगिरीने खाली उतरून घ्यावे. निष्काळजीपणामुळे उकळते पाणी अंगावर पडून भाजण्याची शक्यता असते.
 • गॅसच्या शेगडीवरून गरम पाण्याचे, दुधाचे पातेले किंवा स्वयंपाकाची अन्य गरम भांडी उचलताना धातूची पक्कड किंवा सांडशी वापरावी. 
 • फडक्याच्या साहाय्याने गॅस शेगडीवरून गरम भांडी उचलायची सवय असल्यास, जाड सुती कापड वापरावे, नायलॉन किंवा तत्सम कापडांचा वापर कटाक्षाने टाळावा. गॅसच्या ज्वाळा लागून ते जळणार नाही याकडे लक्ष ठेवावे. 
 • गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करताना सुती कपडे वापरावेत. नायलॉनचे अगर तत्सम कपडे परिधान करणे टाळावे. नायलॉनची साडी, ड्रेस, ओढणी लगेच पेट घेते आणि पेट घेतल्यावर कातडीला चिकटते. 
 • हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नयेत. हात सतत गॅसच्या जवळ असल्यामुळे प्लॅस्टिकच्या बांगड्या गॅसच्या ज्वाळांच्या संपर्कात येऊन पेट घेण्याचा संभव असतो. 
 • आपले केस मोकळे न ठेवता बांधून ठेवण्याची सवय लावणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
 • स्वयंपाकघरातील ओट्यावरील रॅकमधून, कपाटातून भांडी अथवा डब्यातील वस्तू काढण्याच्या प्रयत्नात गॅसच्या ज्वाळांचा स्पर्श अंगावरील कापडास होऊन किंवा हातातील भांडे किंवा वस्तू जळत्या गॅसच्या शेगडीवर पडून गंभीर अपघात होतात.

संगणक आणि स्मार्टफोन
 आजचे युग हे स्मार्टफोनचे युग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा प्रत्येक कानाकोपरा आज मोबाइल तंत्रज्ञानाने व्यापला आहे. एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अवाढव्य आकारांच्या संगणकांपासून सुरुवात झालेल्या संगणकाची छोटी आवृत्ती टेबलावर स्थानापन्न झाली, लॅपटॉपच्या स्वरूपात तो मांडीवर बसला, टॅबच्या रूपाने तळहातांवर आला आणि मोबाइलशी संयोग होऊन स्मार्टफोनच्या अवतारात बोटांमध्ये घुसला. संगणकाच्या या नवनव्या अवतारांनी जगभरच्या जीवनशैलीत आमूलाग्र क्रांती झाली. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांबरोबर संगणकाचा आणि मोबाइलचा वापरदेखील जगायला आवश्यक अशी गोष्ट आज ठरू पाहतोय.

संगणक आणि इंटरनेटचे मायाजाल आज विजेचे बिल, मोबाइल-लॅंडलाईन टेलिफोनचे बिल, क्रेडिट कार्डाचे पैसे, विम्याचे हप्ते, महापालिकेचे कर, आयकर अशा महत्त्वाच्या गोष्टींचे शुल्क भरायला वापरावे लागते. रेल्वे, विमानप्रवास, हॉटेलचे बुकिंग करणे, कुणाला महत्त्वाचा अर्ज पाठवणे, संदेश पाठवणे, पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करणे या सर्व क्षेत्रात संगणकाला पर्याय नाही. फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियामुळे, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ऑनलाइन खरेदीच्या साइट्सवरील व्यवहारांसाठी आणि मनोरंजनासाठी चित्रपट किंवा हरतऱ्हेचे व्हिडिओ बघण्यासाठी संगणक आणि स्मार्टफोनचा वापर नित्यनेमाने होऊ लागला आहे.                                                     
संगणकामुळे होणारे विकार 
कॉम्प्युटरच्या वापरामुळे अनेक जीवनावश्यक कामे खूपच सोपी झाली आहेत पण अतिरेकी प्रमाणात तो वापरून निर्माण होणारे आरोग्यातील बिघाड आणि असंख्य विकार आज प्रामुख्याने समोर येऊ लागले आहेत. संगणकासमोर दीर्घकाळ बसून राहणे, बसताना शारीरिक ढब (पोश्चर) न सांभाळता वेडेवाकडे बसणे, संगणकातील रचनेचा दोष आणि संगणकाच्या पडद्यातून होणारा किरणोत्सर्ग या कारणांनी अनेक विकार निर्माण होतात.

कार्पल टनेल सिंड्रोम : संगणकावर अक्षरे टाइप करताना तासन्‌तास होणारी बोटांची हालचाल, की-बोर्डवर हात ठेवताना होणारा मनगटाची स्थिती, माऊस बोटात पकडून ठेवणे यामुळे हा आजार होतो. मनगटाच्या आतून हाताकडे जाणारे मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या यांच्यावर दबाव येतो. त्यामुळे मनगट, हातांची बोटे दुखणे, बधिर होणे, त्यांच्यातील शक्ती कमी होणे असे त्रास जाणवतात. माऊस वापरताना तर मनगट वाकलेले आणि बोटे आखडून ठेवावी लागतात. त्यामुळे बोटे बधिर होतात. एवढेच नव्हे तर बोटांच्या पेरांना सूज येऊन ती वाकडी होतात. सतत मोबाइलची बटणे दाबत त्याचा वापर करण्यानेही हा त्रास उद्‌भवतो. अत्यंत वेगाने काम कराव्या लागणाऱ्या व्यक्तींच्या बोटांची अशा वाकड्या स्थितीत दिवसातून लाखोवेळा अथक हालचाल झाल्याने त्यांना हा विकार झाल्यास नवल ते काय?

दृष्टिदोष : कॉम्प्युटरच्या आणि मोबाइलच्या अविश्रांत वापराने डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना खाज सुटणे, त्यांच्यात कोरडेपणा निर्माण होणे असे त्रास जाणवतात. कॉम्प्युटरचा स्क्रीन आणि ती वापरणारी व्यक्ती यात किमान दोन फुटांचे अंतर असावे लागते. पण संगणकाच्या आणि त्याच्या पडद्याच्या (मॉनिटर) रचनेमुळे हे अंतर फुटभरही राहत नाही. लॅपटॉप आणि स्मार्टफोनमध्ये तर ते आणखीनच कमी राहते. स्क्रीनमधून उत्सर्जित होणारा तीव्र प्रकाश आणि त्यातून बाहेर पडणारी किरणोत्सर्गी उष्णता डोळ्यांवर अनेक विपरीत परिणाम करतात. कॉम्प्युटरच्या आणि मोबाइलच्या सतत वापराने डोळे दुखणे, मधेच अस्पष्ट दिसणे, दृष्टी मंद होऊन चष्मा लागणे किंवा चष्म्याचा नंबर वाढणे हा त्रास मोठ्या प्रमाणात आढळू लागला आहे. काही रुग्णांत डोळ्याच्या आतील द्रावाचा दाब वाढून ग्लॉकोमा हा दुर्धर विकार होऊ शकतो.

पाठ-मान दुखणे : संगणक तसेच लॅपटॉप, त्याचा पडदा, की-बोर्ड, माऊस, यांची रचनाच अशी असते, की तो वापरताना पूर्णपणे ताठ बसणे अशक्य असते. साहजिकच कंबरेत पुढे झुकून, खांदे वाकवून, मान पुढे तुकवून, एक हात पुढे आणि दुसरा की-बोर्डवर असे बसावे लागते. या पद्धतीने दीर्घकाळ बसल्यामुळे मानेचा स्पाँडिलायसिस व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मान दुखणे, दंड दुखणे, हात बधिर होणे, हातांना मुंग्या येणे अशी लक्षणे दृग्गोचर होऊ लागतात. याशिवाय खांदे दुखणे, सतत पाठ भरून येणे, कंबर दुखणे असे त्रास वरचेवर होऊ लागतात. 

ताणतणाव आणि झोप : संगणक, टेलिव्हिजन आणि मोबाइल यांच्या स्क्रीनमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणांमुळे शरीरातील ''मेलॅटोनिन'' नावाचे संप्रेरक जास्त प्रमाणात स्रवते. परिणामतः झोपेचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे ताणतणाव, मानसिक चिंता आणि नैराश्य वाढीला लागते. कॉम्प्युटर आणि मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे स्वभावातला लहरीपणा वाढतो, बौद्धिक आकलनशक्ती कमी होते आणि दैनंदिन व्यवहारातल्या वागण्यातदेखील बदल होतात. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे विचित्र भास होण्याच्या तक्रारीदेखील आढळून येतात.

आभासी जग : सोशल मीडियाच्या अति वापराने एकटेपणा वाढणे, संशयी स्वभाव होणे, नैराश्य येणे या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतात. ब्लू-व्हेलसारख्या कॉम्प्युटर गेम्समुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याची हजारो उदाहरणे आहेत.
  वजनवाढ : कामासाठी असो किंवा मनोरंजनासाठी, दिवसभर कॉम्प्युटरला चिकटून बसणाऱ्यांची शारीरिक हालचाल खूप कमी होते आणि खाणे अतिरेकी होते. त्यातून वजनवाढ आणि स्थूलत्व निर्माण होते.

जीवनशैलीतील आजार : अविरतपणे कॉम्प्युटर वापराच्या व्यसनामुळे स्थूलत्वाबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, हृदयविकार उद्‌भवणे हे त्रास आज जगभर वाढत चालले आहेत.   

व्हिडिओ गेम्स
व्हिडिओ गेम्स आणि त्याची गॅजेट्स म्हणजे आजकालच्या मुलांचा जीव की प्राण असतात. व्हिडिओ गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुलांमधील वागणुकीतील बदलाबरोबरच अनेक मानसिक आजार उद्‌भवतात असे ध्यानात आले आहे.

 • मुलांमध्ये बंडखोरपणा, मस्तीखोरपणा, चंचलता वाढते. 
 • हुशार असूनही त्यांचे मन अभ्यासात फार काळ रमत नाही. 
 • त्यांची अतिरिक्त ऊर्जा मैदानी खेळ खेळण्याऐवजी व्हिडिओ गेम खेळण्याच्या रूपात वापरली जाते.
 • व्हिडिओ गेममधील आभासी जगात राहण्याचा आनंद मिळत असल्याने प्रत्यक्षात शारीरिक मेहनत, शालेय अभ्यास यामध्ये ही मुले कंटाळा करतात. 
 • त्यांच्या वर्तणुकीवर विपरीत परिणाम होतो. 
 • ती अधिक एकलकोंडी होतात. त्यांचा मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी, समाजाशी संवाद खुंटतो. या सर्वांशी त्यांचा संपर्क हळूहळू कमी होत जातो. कुटुंबात किंवा मित्र परिवारासोबत असतानाही त्यांच्यापासून वेगळे राहून ती व्हिडिओ गेम खेळत राहतात. 
 • आभासी जगात सतत राहिल्याने सद्य:परिस्थितीबाबत मुले अनभिज्ञ राहतात. त्यामुळे प्रत्यक्षात एखादी घटना घडली तर ती कशी हाताळावी, काय निर्णय घ्यावेत हे त्यांच्या लक्षात येत नाही.
 • स्वार्थीपणा आणि अनैतिक वृत्ती, व्यसनाधीनता वाढीस लागते. 
 • मुलांमधील लोकप्रिय व्हिडिओ गेम्स आक्रमक आणि हिंसक असतात. दोन गटांमधील स्पर्धा, जिंकण्याची धडपड, हाणामारी, लढाई त्यात चालू असते. हे गेम्स काल्पनिक असतात, पण मुलांना ते खरे वाटतात. त्यामुळे स्वभावात आक्रमकता आणि हिंसकता येते. 
 • वागणुकीत चिडचिडेपणा येतो. 
 • अभ्यासातील रस कमी होतो. 
 • अभ्यासाचे आणि अवांतर वाचन कमी होते. 
 • व्हिडिओ गेम खेळण्यासाठी मुले अनेकदा पालकांना उलट उत्तरे देतात, वेळप्रसंगी खोटेही बोलतात. 
 • व्हिडिओ गेम खेळत असताना मेंदूमध्ये जैविक बदल होत असतात. ज्यामुळे भावनिक नाते संपुष्टात येते.

विज्ञानाने आणि तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगतीने आज जग कुठच्या कुठे जाऊन पोचले आहे. मात्र, या तंत्रज्ञानाने मानवाला बहाल केलेली ही अत्याधुनिक उपकरणे सजगतेने वापरली तर वरदानच ठरतात. मात्र, त्यांच्या आहारी गेलात आणि ती वापरताना काळजी घेतली नाही तर ती केवळ आरोग्यालाच नाही, तर एखाद्या शापाप्रमाणे जीवनाला विघातक ठरू शकतात.  

संबंधित बातम्या