होम अप्लायन्सेस

रूपाली कदम
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शॉपिंग स्पेशल
 

घरातील रोजचे काम सुकर करण्यासाठी घरात अत्याधुनिक साधने असणे खूप गरजेचे असते. आपल्या सोयीसाठी अशा वस्तूंचा आपण घरात जणू संग्रहच करत असतो. पण या संग्रहात असणाऱ्या वस्तू फक्त ठेवण्यासाठी नाही, तर त्यांचा नित्यनियमित वापरही होत असतो. यामध्ये मिक्सर, आटा चक्की, टोस्टर, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, इस्त्री, शेगडी, लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर, डीव्हीडी प्लेअर, होम थिएटर, ड्रायर्स, टीव्ही, ओव्हन, ज्युसर यांसारख्या छोट्या मोठ्या उपकरणांचा समावेश असतो. आज या सर्व वस्तू वापरणे प्रत्येकाची गरज झाली आहे, म्हणूनच या सर्व वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण या वस्तूंची रोजची मागणी वाढत असल्याने त्यांच्या किमतीही सतत बदलत असतात.  

सध्या मार्केटमध्ये प्रत्येक वस्तूचे अनेक ब्रँड बघायला मिळतात. रोज कितीतरी नवीन कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लॉंच करून ग्राहकांना आकर्षित करू लागल्या आहेत. आपल्या वस्तू सर्वांपर्यंत पोचाव्यात म्हणून सवलतीच्या दरात विक्री करू लागल्या आहेत. त्यामुळे प्रस्थापित नवीन अशा सर्वच कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढलेली दिसते. त्याला जोडी असते ती फायनान्स कंपन्यांची. या फायनान्स कंपन्या अक्षरशः शून्य टक्के व्याजाने वस्तू खरेदीसाठी कर्ज देऊ लागल्या आहेत. सुलभ हप्त्यांमध्ये महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील सर्वसामान्यांच्या घरात पोचण्यास यामुळे नक्कीच मदत झाली आहे. त्याचा फायदा कंपन्यांना होणे सहाजिकच आहे, पण सर्वसामान्यांनादेखील याचा फायदा होत आहे. ऑनलाइन मार्केटदेखील सध्या जोमात आहे. दुकानात जाऊन प्रत्यक्ष वस्तू निवडीचा पर्याय, फायनान्सचा पर्याय आणि ऑनलाइन खरेदीचा पर्याय मिळू लागल्याने वस्तू खरेदी करणे सोपे झाले आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे जेवढे सोपे झाले आहे, तेवढीच सोपी प्रक्रिया त्याला घरामध्ये बसवण्याची झाली आहे. कारण खरेदी केलेल्या दुकानातून फ्री होम डिलिव्हरी मिळते. तर कंपनीचा व्यक्ती स्वतः घरी येऊन जोडणी करून देतो. त्यामुळे ग्राहकांसाठी बऱ्याच गोष्टी सहजसोप्या होऊ लागल्या आहेत.                                     

मार्केटमध्ये प्रत्येक वस्तूंचे मुबलक ब्रॅंड्स आहेत. परिणामी प्रत्येकात असलेले फिचर पाहून ग्राहक आपल्या गरजेनुसार वस्तूची निवड करतो. यामध्ये फ्रीजचे उदाहरण घेतले, तर अनेक कंपन्यांचे फ्रीज बाजारात पाहायला मिळतात. कंपनी आणि ब्रॅंडनुसार फ्रीजमध्ये अनेक व्हरायटीज उपलब्ध असून त्यांच्या किमतीदेखील वेगवेगळ्या आहेत. ही किंमत ठरते ती त्या वस्तूंच्या क्षमतेनुसार आणि गुणवत्तेनुसार. हल्लीच्या जीवन शैलीला विचारात घेऊन फ्रीजमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाल्याचे दिसते. कारण लहान कुटुंब असेल, तर छोटा फ्रीज आणि मोठे कुटुंब असेल, तर त्यानुसार मोठा फ्रीज घेतला जातो. सध्या बाजारात कमीत कमी ४५ लीटरपासूनचे फ्रीज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एलजी, सॅमसंग, हायर, व्हर्लपूल, पॅनासॉनिक, बॉश, गोदरेज इत्यादी कंपन्यांचे फ्रीज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हायर कंपनीच्या १७० लीटरच्या फ्रिजची किंमत साधारण १० हजारपासून पुढे आहे. १८३ लीटर - १० हजार ८०० पासून पुढे, २५८ लीटर - २३ हजार ५०० रुपये अशा किमती आहे. लीटर व कंपनीनुसार किमतीमध्ये बदल होताना दिसतो. एलजीचा ९ हजार २०० रुपयांपासून अडीच लाखांपर्यंत, तर सॅमसंगचा १३ हजारांपासून अडीच लाखांपर्यंत आहे. व्हर्लपूलचा १२-१३ हजारांपासून सव्वा लाखांपर्यंत, तर पॅनासॉनिक १३ हजार ते दोन लाखांपर्यंत आहे. बॉशचा फ्रीज ३० हजारांपासून दोन लाखांपर्यंत, तर गोदरेजचा १२-१३ हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच ब्लू स्टार कमर्शिअल फ्रीज किमान १५ हजार ते सव्वा लाखापर्यंत आहेत. यामध्ये एलजी कंपनीच्या फ्रीजला जास्त मागणी आहे. हे फ्रीज सिंगल डोअर व डबल डोअरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच १० वर्षांची वाॅरंटी प्रत्येक कंपनीच्या मशीनवर आहे आणि पॉवर सेव्हिंगसाठी प्रत्येक कंपनीने पाच स्टारचे रेटिंग दिले आहे.

वॉशिंग मशीनमध्ये पॅनासॅनिक, गोदरेज, सॅमसंग, एलजी आदी कंपन्यांचे मॉडेल्स आहेत. त्यात फ्रंट डोअर आणि टॉप डोअर असलेले मशीन आहेत. तसेच आयएफबी कंपनीच्या मशीनची कपॅसिटी ७ किलोची आहे. त्यामध्ये 'थ्रीडी वॉश सिस्टीम’ उपलब्ध आहे. जी इतर कोणत्याही कंपनीच्या मशीनमध्ये नाही. याची किंमत साधारण २३,९९० रुपये आहे. व्हर्लपूल या कंपनीच्या वॉशिंग मशीनमध्ये इनबिल्ट हीटर आहे, ते इतर कोणत्याही मशीनमध्ये नाही व त्याची साधारण किंमत ३२,४०० पर्यंत आहे. यामध्ये सेमी अ‍ॅटोमॅटिक हायर कंपनीचे वॉशिंग मशीन स्वस्त आहे. त्याची किंमत ८ हजारांपासून ते ८० हजारांपर्यंत आहे.

वॉटर प्युरीफायरमध्ये हिंदुस्थान, युनिलिव्हर प्युअर, ऑक्वाशुअर, केंट या कंपनीची उत्पादने आहेत. त्यांच्या किमती २,५०० पासून ते ८ हजार रुपयांपर्यंत आहेत. दोन ते तीन वर्षांची वॉरंटी यावर दिली जाते.

फॅनमध्ये टेबल फॅन व सिलिंग फॅन येतात. त्यात हॅवन, फिलिप्स, अॅंकर, बजाज, प्रोंटन इत्यादी कंपनीचे फॅन दिसतात. यांच्या किमती साधारण १,६०० रुपयांपासून सहा हजार रुपयांपर्यंत आहेत.

आटा चक्कीमध्ये नटराज, मिलसेंट, मिल्सन यांना मागणी आहे. यांच्या किमती साधारण १५ हजार ते २३ हजारांच्या दरम्यान आहेत. यामध्ये मिल्सन कंपनीच्या आटा चक्कीला जास्त मागणी आहे.

इस्त्रीमध्ये अपर्णा, फिलिप्स, बजाज इत्यादी कंपनीचे प्रोड्क्ट्स दिसतात. यांची किंमत वॅटनुसार ठरते. उदा - ७,५०० वॅटची किंमत ५५० रुपये आहे. पुढे घेईल तशा म्हणजे १,५०० रुपयांपर्यंत किमती आहेत.

मिक्सरमध्ये फिलिप्स, बजाज, मॉर्फी रिचर्ड्‌्‌स, प्रीती, प्रेस्टीज, ज्योती या कंपन्यांचे मिक्सर उपलब्ध आहेत. त्यांच्या साधारण किमती एक हजार ८०० पासून १० हजारांपर्यंत आहेत. यामध्ये फिलिप्स कंपनीच्या मिक्सरला जास्त मागणी आहे. टोस्टरमध्ये बजाज, महाराजा, फिलिप्स, मॉर्फी रिचर्ड्‌्‌स उत्पादने आहेत. यातदेखील फिलिप्सला जास्त मागणी आहे. यांच्या किमती एक हजार २०० रुपयांपासून पाच - सहा हजारांपर्यंत आहेत.

जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये गरमागरम पदार्थ सर्वांनाच हवे असतात. या धावपळीमध्ये घरातील प्रत्येकालाच कामानिमित्त बाहेर पडावे लागते. त्यामुळे प्रत्येकवेळी गरम जेवण मिळेलच असे नाही. मग त्यामुळे किचनमध्ये दाखल झाला ओव्हन. ओव्हन घरातील सदस्यांची गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करतो. ओव्हनचा बाजारात सध्या चांगला बोलबाला आहे आणि मागणीदेखील दिवसेंदिवस वाढत असल्याचे विक्रेते सांगतात. सध्या मार्केटमध्ये एलजी, सॅमसंग, बजाज, पॅनासॉनिक, प्रेस्टिज, गोदरेज असे अनेक कंपन्यांचे विविध फिचर्समधील ओव्हन उपलब्ध आहेत. यात एलजीला जास्त मागणी आहे. यांच्या किमती पाच हजार ९९० पासून ९० हजारांपर्यंत आहेत.

यासंदर्भात बाबर इलेक्ट्रॉनिक्सचे प्रदीप बाबर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, ''सध्या लोकांचा कल हा घरपोच सेवा आणि फायनान्स होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे आहे. मोठ्या सणउत्सावाला सर्व प्रॉड्‌क्ट्‌सवर ऑफर सुरू असतात, त्यावेळी खरेदी करणारा एक मोठा वर्ग आहे. तर रोज खरेदी करणारा वर्गदेखील आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना नागरिकांवर जाहिरातींचा मोठा पगडा आहे. आल्यानंतर थेट अमुक अमुक ब्रँडची वस्तू मागतात. परंतु, अनेकदा असेही घडते सेम तेच फिचर असणाऱ्या इतर दुसऱ्या कमी किमतीच्या कंपनीची वस्तू ग्राहक घेऊन जातात. आमच्याकडे घरातील वापरासाठी लागणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. म्हणजेच शेगडीपासून ते फ्रिजपर्यंत सर्व वस्तू येथे मिळतात.''

वातानुकूलित घर करण्यासाठी सध्या एसी घेण्याकडे प्रत्येकाचा कल दिसतो. घराच्या आकारमानानुसार किती टनाचा एसी पुरेसा होईल हे ठरवले जाते. त्यांच्या किमती कंपनीनुसार आणि टनानुसार वेगवेगळ्या आहेत. यामध्ये एलजी, व्हर्लपूल, व्होल्टास, उषा, ब्लू स्टार, हायर, डाइकइन यांसह आणखी कंपन्या आहेत. एसीच्या किमती इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तुलनेत अधिक आहेत. यांच्या किमती साधारण २० हजार ते ३० लाख रुपयांपर्यंत आहेत. इलेक्ट्रॉनिक शेगडीमध्ये सूर्या, फिलिप्स, बजाज, प्रेस्टीज, इंडक्शन कुकर, हॉट प्लेट इत्यादी कंपन्यांच्या शेगडी दिसतात. यांची किंमत वॅटनुसार बदलते. कमीत कमी एक हजार ते पाच हजारपर्यंत किंमत आहे.

टीव्हीमध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, हायर, एमआय, टीसीएल, हुंदाई, व्हीयू, पॅनासॉनिक उपलब्ध आहे. टीव्हीची सरासरी किंमत ७९९० ते नऊ लाखांपर्यंत आहेत. टीव्हीमध्ये सोनी, सॅमसंग, एलजीला जास्त मागणी आहे. एलईडी टीव्ही ३२ इंचाची किंमत ६,५०० असून पुढे ६५ ते ७० हजारांपर्यंत किमती आहेत. यामध्ये आता वॉलपेपर म्हणून नवीन एलईडी आला आहे. जो भिंतीवर लावता येतो. 

आज प्रत्येकाची गरज असलेल्या लॅपटॉपमध्ये डेल, एचपी, लेनोवो, असूस, मायक्रोसॉफ्ट या कंपनीची उत्पादने आहेत. यांच्या किमती २० हजारांपासून ते दोन-अडीच लाखांपर्यंत आहेत. लॅपटॉपमध्ये अनुक्रमे एचपी, डेल, लेनोवो यांना जास्त मागणी आहे. यांसारखी घरगुती वापरासाठी आवश्यक असणारी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीनुसार किमतीमध्ये कमी जास्त प्रमाण दिसते. असे असले तरी सध्याच्या आर्थिक मंदीचा मोठा फटका विक्रेत्यांना जाणवत असल्याचे तसेच मंदीचा फटका इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लवकर होत असल्याचे मत काही विक्रेत्यांनी व्यक्त केले. मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्यांना मंदीचा सामना करावा लागत असून मागच्या महिन्यापासून आर्थिक मंदीमुळे २५ ते ३० टक्के विक्रीमध्ये घट झाल्याचेही काही विक्रेत्यांनी सांगितले. 

(लेखामध्ये दिलेल्या वस्तूंचे आकार व किमतींत बदल होऊ शकतो.) 

संबंधित बातम्या