माझे मित्र येणार आहेत...

विजय तरवडे
सोमवार, 1 जून 2020

ललित
असंख्य तारकांभोवतीच्या एखाद्या ग्रहावर आपल्यापेक्षा प्रगत सजीव असतील का? मी आक्रोश केला तर ते ऐकतील का? मनातल्या मनात मी जोरात ओरडतो. माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या जगासाठी असाल तिथून या. आम्हाला मदत करा. आम्हाला वाचवा... एखाद्या तरी ग्रहावर एलियन्स असतीलच. ते माझे मित्र आहेत. ते नक्की आपल्या मदतीला येतील. 

अपरात्रीची वेळ असते. दिवसभर घरातल्या घरात वावरल्यामुळे रात्री फार वेळ झोप येत नाही. घरातली सगळी पुस्तके वाचून झाली आहेत. टीव्हीवर पुन्हा पुन्हा त्याच त्या बातम्या, त्याच जुन्या मालिका आहेत. लांबलचक सिनेमात मन लागत नाही. 

मी बाल्कनीत येऊन उभा राहतो. घराघरातले दिवे विझलेले आहेत. ओसाड रस्त्यावरचे दिवे उगीचच प्रखर आणि अनावश्यक वाटतात. रस्त्याच्या कडेला काही दुचाकी माना टाकून उभ्या आहेत. कुठेही माणसांची चाहूल नाही. सगळी माणसे आपापल्या घरात बातम्यांची पारायणे करीत मरणाच्या भयाने चिडीचूप लपली आहेत. लहानपणी रात्री भुताखेतांच्या गोष्टी ऐकल्यावर आपण पालकांच्या कुशीत किंवा डोक्यावर पांघरूण घेऊन गुडुप झोपायचो. पण ते घाबरणे किती निरागस होते. हा रस्ता आणि ही भीती बघितली, की हॅरी पॉटरच्या एका कथेची आठवण येते. त्यांच्या शाळेच्या बाहेर डिमेंटॉर्स नावाचे मृत्यूचे दूत घोंघावत असतात. सगळ्या मुलांना ताकीद दिलेली असते, की शाळेच्या बाहेर अजिबात जाऊ नका. आत्ता कोरोनाच्या अगोचर रूपाने डिमेंटॉर्स अहोरात्र घोंघावत आहेत.   

शरीर घरातच ठेवून मनातल्या मनात मी बाल्कनीतून खाली उतरतो. फाटकातून आरपार बाहेर पडतो. चौकात येतो. इथे रात्री उशिरापर्यंत असणारी वर्दळ कुठे गेली? चित्रपटगृहाच्या दर्शनी भिंतीवर साऊथच्या सिनेमातल्या शूर नायकाचे पोस्टर आहे. एका कोपऱ्यात खलनायक आणि दुसरीकडे टंच नायिकादेखील आहे. थोड्या वेळाने बारा वाजतील. पण सिनेमा सुटून प्रेक्षकांच्या गर्दीचा लोंढा बाहेर येणार नाही. सिनेमा सुटणार नाही. कारण तो सुरूच झालेला नाही. 

मी पुढे चालत राहतो. के. ई. एम. रुग्णालयाची भव्य इमारत. दगडी भिंतीत कोरलेल्या पारदर्शक खिडक्या. त्यातून डोकावणारे उजेडाचे आयत. आत घाबरलेले जागे पेशंट, बेशुद्ध पेशंट, किंचाळणारे पेशंट आहेत. थकलेले डॉक्टर्स आणि नर्सेस आणि सेवक-सेविका आहेत. पण आसपास घुमणाऱ्या गार गार या हवेत जिवंत माणसांची कोणतीही खूण नाही. 

परतीच्या वाटेवर अरेबियन नाईट्समधल्या कहाण्या आठवतात. माणसांचे निर्जीव पुतळे झालेल्या शहरात हातात तलवार आणि मनात श्रद्धा घेऊन जाणारा शूर राजा पुतळे बघतो. तिथल्या अटींचे पालन करतो आणि शहर जिवंत होते. माणसे, पशू, पक्षी, झाडे, वेली श्वासोच्छ्‍वास करू लागतात. हलू-बोलू-हसू-रडू लागतात. प्रेम करू लागतात, भांडू लागतात. पण मी शूर राजा नाही. माझ्या हातात तलवार नाही. मनात श्रद्धा नाही. मी पुन्हा बाल्कनीत परततो. आकाशाकडे बघत राहतो. या असंख्य तारकांभोवतीच्या एखाद्या ग्रहावर आपल्यापेक्षा प्रगत सजीव असतील का? मी आक्रोश केला तर ते ऐकतील का. मनातल्या मनात मी जोरात ओरडतो. मला माझ्या विज्ञानाचा, अध्यात्माचा आधार वाटेनासा झाला आहे. माझ्या हातातून दोघांचे हात सुटले आहेत. माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या जगासाठी असाल तिथून या. आम्हाला मदत करा. आम्हाला वाचवा. आकाश काही बोलत नाही. चांदण्या नुसत्याच लुकलुकत मंद हसत राहतात. मी थकून आत येतो आणि अंथरुणावर अंग टाकतो. 

पण एकातरी चांदणीच्या पोटी जन्मलेल्या ग्रहावर एलियन्स असतीलच. ते माझे मित्र आहेत. ते नक्की आपल्या मदतीला येतील. मी त्यांना मनापासून हाक मारली आहे.   

संबंधित बातम्या