एक वादळी वर्ष
वेध
उत्तर हिंदी महासागराच्या अरबी समुद्राच्या भागात या वर्षी ७ डिसेंबरपर्यंत सर्वाधिक चक्रीवादळांची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरापेक्षा नेहमीच कमी वादळे होतात आणि जी होतात ती जास्त तीव्रतेची कधीच नसतात. मात्र यावर्षी वादळांचा हा आकृतिबंध (Pattern) पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले. मॉन्सूनोत्तर (Post monsoon) काळात या भागात तयार होणाऱ्या वादळांची संख्याही कमी असते, तीही यावर्षी वाढल्याचे आढळले. सामान्यपणे दर वर्षी अरबी समुद्रात दोन लघू भाराची (Low pressure) आवर्ते तयार होतात आणि त्यातल्या एकाचे तीव्र वादळात रूपांतर होते. मात्र यावर्षी डिसेंबरमध्ये तयार झालेल्या ‘सोबा’ आणि ‘पवन’ वादळांसहित अरबी समुद्रात तयार झालेल्या सात वादळांपैकी चारांचे रूपांतर अतितीव्र वादळांत झाले. येत्या काही दिवसांत वर्षअखेरीपर्यंत अजून दोन वादळे तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून तीही तीव्र झाली, तर मोठ्या वादळांची संख्या सहा होईल.
‘सोबा’ या अल्पायुषी वादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर, तर ‘पवन’ वादळाने सोमालियाच्या किनारपट्टीवर डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोराचा तडाखा दिलाच आहे. ‘पवन’बरोबरच आता ‘अम्फन’ हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही आहे. या अगोदर ‘क्यार’ आणि ‘महा’ या दोन चक्रीवादळांनी अरबी समुद्रात ज्याप्रमाणे स्थिती निर्माण केली होती, त्याचप्रमाणे सध्या समुद्रात स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाचवेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणे ही परिस्थिती दुर्मीळ मानली जाते. याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार ‘अम्फन’ चक्रीवादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो. तर, ‘पवन’ चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून ते अगोदर उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग प्रतितास ४० ते ५० किलोमीटर राहण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणला पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.
यावर्षी दक्षिण अरबी समुद्र उत्तर अरबी समुद्रापेक्षा जास्त उबदार होता. त्यामुळेच ही वादळे निर्माण झाली. शिवाय बाष्प वाहून नेणाऱ्या ढगांची निर्मितीही यावर्षी मोठ्या प्रमाणावर झाली. येत्या काही दिवसांत मादागास्कर, रियुनिअन, मॉरीशस आणि सेचेलीस यांच्या किनाऱ्यांवर उंच उंच लाटा, पूर आणि जोराच्या वादळी वाऱ्यांचे भाकीत करण्यात आले आहे. तामिळनाडूचे दक्षिण टोक, दक्षिण केरळ आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यावरही भरपूर पाऊस आणि पुराची समस्या निर्माण होऊ शकते.
वादळांच्या संख्येतील ही वाढ मुख्यतः हवामान बदलामुळे जमीन आणि पाण्याच्या तापमानात झालेल्या वाढीचाच परिणाम असावा, असे हवामानशास्त्रज्ञांचे मत आहे. इतक्या मोठ्या संख्येने तीव्र वादळांची निर्मिती झाल्यामुळे २०१९ च्या उत्तर हिंदी महासागरातील वादळ ऋतूला (Cyclone Season) आजपर्यंतच्या या प्रदेशाच्या इतिहासातला सगळ्यात जास्त वादळी कालखंड म्हणून दर्जा देण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही प्रदेशांतील उष्णकटिबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भारतीय हवामान खात्याकडून उपलब्ध होणाऱ्या सांख्यिकीतून (डेटा) स्पष्ट झाले आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळांपेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षी नोव्हेंबरपर्यंतच हिंदी महासागराच्या या भागात २५ वादळे निर्माण झाली. वर्ष २०१९ मध्ये ११ वादळांची निर्मिती झाली. १९८५ नंतर इतक्या मोठ्या संख्येने वादळ निर्मिती झाली नव्हती. यातल्या सात वादळांची तीव्रता वाढून त्यांची संहारक वादळे झाली, तीही याच काळात.
या वर्षी जानेवारीमध्ये अंदमानच्या समुद्रावर पाबुक (pabuk) हे पहिले वादळ तयार झाले. त्यानंतर अतिसंहारक व अतितीव्र असे ‘फणी’ वादळ एप्रिलच्या अखेरीस व मेच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात तयार झाले आणि त्याने ओडिशाच्या किनाऱ्याला मोठाच तडाखा बसला. १९६५ नंतर मॉन्सूनपूर्व काळात ओडिशा किनारा ओलांडणारे हे विध्वंसक वादळ. याच्या तडाख्यातून अजूनही ओडिशाच्या किनारपट्टीवरचे जनजीवन सावरलेले नाही. यावर्षी १० ते १७ जून या काळात अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अतितीव्र, आवर्ती, लघुभार प्रदेशाच्या ‘वायू’ नावाच्या वादळामुळे मॉन्सून आठ दिवस उशिरा सुरू झाला. महाराष्ट्रात तो २४ जूनला म्हणजे त्याच्या निर्धारित वेळेनंतर १४ दिवसांनी दाखल झाला. पुढच्या काही महिन्यांत ‘क्यार’ आणि ‘महा’ अशी आणखी दोन वादळे अरबी समुद्रावर तयार झाली, त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार अतिवृष्टी झाली. याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरावर ‘बुलबुल’ वादळाची निर्मिती झाली. या वादळाने गंगेचा दक्षिण त्रिभुज प्रदेश आणि सुंदरबन या भागांना अक्षरशः झोडपून काढले! याच म्हणजे डिसेंबर महिन्यात ‘सोबा’ हे अत्यल्पजीवी वादळ आले. ‘पवन’ व ‘अम्फन’ या जोडगोळीची आणि पुढच्या काही दिवसांत आणखीही काही वादळांच्या निर्मितीची शक्यता वर्तविण्यात आली आहेच!
भारताच्या किनाऱ्यावर १९८० ते २०१० या ३० वर्षांत दरवर्षी सरासरी तीन वादळे निर्माण झाली. पण २०१०-२०१९ या काळात दरवर्षी चार या प्रमाणात वादळे तयार झाली. उत्तर हिंदी महासागरातील ही उष्णकटिबंधीय वादळे (ट्रॉपिकल सायक्लोन्स) सामान्यपणे एप्रिल ते सप्टेंबर या काळात तयार होतात. उत्तर हिंदी महासागरातील उष्णकटिबंधीय वादळातील वाऱ्यांचा वेग जेव्हा ताशी ६५ किमीपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्या वादळांचे नामकरण केले जाते.
यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात बंगालचा उपसागर व हिंदी महासागर या भागात वास्तविक पाहता ११ वादळे तयार झाली. पण त्यापैकी चार वादळे (बॉब ३, लँड १, सोबा व पवन) ही कमी तीव्रतेचे कमी भाराचे भोवरे (डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन) होते. इतर सात मात्र मोठी वादळे होती. १८९१ पासूनच उत्तर हिंदी महासागरात अशा वादळांची नोंद होत असली, तरी यावर्षी इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या तीव्र वादळांची निर्मिती ही अनपेक्षितच होती. शिवाय त्यातील वाऱ्यांचा वेग, त्यांचे प्रवासमार्ग (ट्रॅजेक्टरी), निर्मिती स्थान, विस्तार आणि त्यांच्यामुळे किनाऱ्यांवर झालेले परिणाम याबाबतीत ही वादळे सर्वथैव भिन्न होती. एप्रिल ते सप्टेंबर हा या प्रदेशात वादळे निर्माण होण्याचा आदर्श काळ. पण या वर्षी जुलैमध्ये एकही वादळ तयार झाले नाही. उष्णकटिबंधीय वादळांशी निगडीत अशा वादळी वारे, भरपूर पाऊस आणि महाऊर्मि (सर्ज) या नेहमीच्या घटनांची तीव्रताही यावर्षीच्या वादळांत वाढलेली आढळून आली. त्यांनी ताशी ६० ते २२० किमी वेगाने भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर आक्रमण केले.
भारताच्या पूर्व किनाऱ्याला सामान्यपणे मॉन्सूनोत्तर काळात ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चक्रवात (Cyclones) अनुभवाला येतात. १९६५ ते २०१७ या काळात अतिविध्वंसक अशी ३९ वादळे होऊन गेली. या काळातल्या एकूण ५२ पैकी ६० टक्के, म्हणजे २३ वादळे ही ऑक्टोबर - नोव्हेंबरमधली होती. तीव्र वादळात वाऱ्याचा वेग ताशी ४८ ते ६३ नॉट्स इतका असतो. (एक नॉट वेग म्हणजे ताशी १.८ किमी) अतितीव्र वेग म्हणजे ९० ते ११६ नॉट्स आणि विध्वंसक वेग म्हणजे १२० नॉट्स किंवा त्यापेक्षा जास्त.
सामान्यपणे बंगालच्या उपसागरात मे महिन्यात चक्रवात अभावानेच निर्माण होतात. अनेक प्रकारे वेगळेपणा असलेल्या या वर्षीच्या या वादळांनी जागतिक तापमानवृद्धी आणि हवामान बदल या गोष्टींवर आता शिक्कामोर्तबच केले आहे असे म्हणायला हरकत नाही. मे महिन्यात भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणारे गेल्या ५२ वर्षांतले ‘फणी’ हे १०वे वादळ होते.
प्रबळ अभिसरण प्रवाह, भरपूर क्युम्युलोनिम्बस ढग आणि विशाल रुंदीचा आवर्त डोळा (Eye of the cyclone) हे गुणधर्म असलेल्या काही वादळांचे रूपांतर झपाट्याने विध्वंसक आवर्तात झाले आणि दोन्ही किनाऱ्यांना अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन अशा संकटांना सामोरे जावे लागले. वादळाच्या प्रभावामुळे वीज आणि दळणवळण सेवा अनेक ठिकाणी ठप्प झाली आणि पूर परिस्थिती निर्माण झाली.
अशा वादळांना टिकून राहण्यासाठी भरपूर उबदार बाष्प आवश्यक असते. तीच त्यांची मुख्य ऊर्जा असते. अशी वादळे हा मुख्यतः उष्णकटिबंधीय आवर्ताचा (Tropical cyclones) प्रकार आहे. कर्क आणि मकरवृत्तांच्या दरम्यान अशी आवर्ते म्हणजे लघू भार प्रदेशांची बंदिस्त प्रणाली असते. ६५० किलोमीटर इतक्या विस्तृत व्यासाची ही आवर्ते म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रचंड भोवरेच असतात. पृथ्वीवरची सर्वांत प्रबळ व विध्वंसक वादळे म्हणून ती ओळखली जातात. यातील वाऱ्याचा वेग ताशी १८० ते ४०० किमी असतो. या वादळाबरोबरच भरतीच्या महाकाय लाटा (Tidal surge) तयार होतात आणि भरपूर पाऊसही पडतो. यातील अतिशय कमी वायुभारामुळे समुद्राची पातळी उंचावते. आकार, विस्तार, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान आणि टिकून राहण्याचा कालखंड या सर्वच बाबतीत या वादळांत भरपूर विविधता आढळून येते. यांचा सरासरी वेग ताशी १८०० किमी तरी असतोच. समुद्रावर त्यांचा वेग व तीव्रता नेहमीच जास्त असते. मात्र किनारा ओलांडून जमिनीच्या दिशेने येताना ही वादळे नेहमीच दुर्बळ व क्षीण होतात. किनारी प्रदेशात ती नेहमीच संहारक ठरतात. यांचा केंद्रबिंदू हा अतिशय कमी वायुभाराचा प्रदेश असतो.
वातावरणात उष्ण व आर्द्र हवेचा पुरेसा व सततचा पुरवठा हे त्यांच्या निर्मितीमागचे मुख्य कारण आहे. जिथे ६० ते ७० मीटर खोलीपर्यंत २७ अंश सेल्सिअस एवढे तापमान असते, अशा उष्णकटिबंधीय, उबदार समुद्रपृष्ठावर त्यांचा जन्म होतो. समुद्रपृष्ठाच्यावर ९ ते १५ हजार मीटर उंचीवर प्रत्यावर्ती अभिसरण असले, तर अशी चक्रीवादळे तयार होण्याची प्रक्रिया सुलभ होते. या वादळांच्या रचनेत काही महत्त्वाचे वर्तुळाकृती पट्टे आढळतात. मध्यभागी मंद वाऱ्यांचा, उच्च तापमानाचा, लघुतम वायुभाराचा प्रदेश असतो, यास आवर्ताचा डोळा म्हटले जाते. याच्या भोवती पर्जन्यमेघांचा १० ते २० किमी रुंदीचा पट्टा असतो. जोराचे वारे, तीव्र उर्ध्वगामी हवा आणि भरपूर पाऊस असे यांचे सर्वसाधारण स्वरूप असते. याच्या बाहेर क्रमशः कमी होत जाणारे ढगांचे प्रमाण, क्षीण उर्ध्वगामी हालचाल, अत्यल्प पर्जन्य अशी परिस्थिती असते.
अशा महाविध्वंसक वादळांची भरपूर माहिती अशा वादळादरम्यान सतत मिळत असते. पूर्वी आग्नेय आशिया व आशियातील इतर देशात अशा वादळांच्या पूर्वसूचनेची यंत्रणा परिणामकारक नसल्यामुळे अशा वादळांपासून मोठे नुकसान होत असे. आता ही परिस्थिती बदलली असून भारतातही या आपत्तीचे नेमके अनुमान केले जाऊ लागले आहे.
भारतात मॉन्सूनोत्तर (पोस्ट मॉन्सून) वादळे नेहमीच हजेरी लावत असली, तरी गेल्या काही वर्षांपासून ती अधिक विध्वंसक आणि बेभरवशाची होऊ लागली आहेत हे या वर्षीच्या ‘फणी’ आणि ‘क्यार’ वादळांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. या वर्षीची भारतातली, अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील, मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनोत्तर अशी ही सगळी उष्णकटिबंधीय वादळे अनेक दृष्टींनी वेगळी, अतिसंहारक व अतितीव्र होती. त्यांचे प्रवास मार्ग, तीव्रता आणि ती तयार होण्याच्या प्रक्रियेची वाढत असलेली वारंवारता (Frequency) या सगळ्याच गोष्टी अनपेक्षित, थोड्याशा अनाकलनीय आणि असंबद्ध होत्या.
भारताच्या आजूबाजूच्या विशाल भूप्रदेशावर आणि समुद्रपृष्ठावर होणाऱ्या हवामान बदलाचा बारकाईने अभ्यास केला, तर एप्रिलपासूनच तयार होऊ लागणाऱ्या वादळांच्या या यंत्रणेचा थोडाफार तरी अंदाज करता येणे शक्य होईल. जगातल्या सगळ्या महासागरांच्या सरासरी तापमानात सध्या वाढ होत आहे. समुद्राच्या ७०० मीटर खोलीपर्यंत एक दशांश अंश सेल्सिअसने वाढ जाणवते आहे आणि त्याचा मोठा परिणाम या वादळांच्या निर्मितीवर होतो आहे. गेल्या काही वर्षांपासून, जवळजवळ दर वर्षी समुद्र आणि जमिनीच्या तापमान बदलाचे आकृतिबंध स्पष्ट करणारे संशोधन समोर येत आहे. समुद्रपृष्ठाचे वाढलेले तापमान या घटनेची नोंद आज अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. अवेळी येणारी वादळे, मॉन्सूनच्या वेळापत्रकात होत असलेले बदल यासारख्या घटनांची सुरुवात समुद्रपृष्ठावरच होत असते. अशा अभ्यासातून या वादळांच्या निर्मितीची चाहूल लागत असली, तरी ते संशोधन अजूनही तोकडेच पडत आहे. मात्र एक गोष्ट नक्की, की ही वादळे भविष्यात भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर येऊ शकणाऱ्या संकटांची पूर्वसूचक आहेत आणि या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला नेहमी तयार राहणे गरजेचे आहे. मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनोत्तर वादळे, अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील वादळे, त्यांची वाढती तीव्रता आणि सतत बदलते मार्ग, वाढती बाष्पधारण क्षमता यामुळे किनारी प्रदेशांवर होऊ शकणाऱ्या परिणामांचे नेमके आणि अचूक पूर्वआकलन यामुळेच हे होऊ शकेल हे नक्की.