असे हे डेस्टिनेशन वेडिंग

शिल्पा करकरे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेस्टिनेशन वेडिंग
 

लग्न म्हटले की सगळ्यांच्या मनात गुदगुल्या सुरू होतात. नवरदेव किंवा नवरीच्याच नव्हे, तर सगळ्यांच्याच, अगदी आईवडील, भाऊबहीण सगळ्यांची मनातल्या मनात लगबग सुरू होते. काय, कुठे? कसे? अशा किती प्रश्नांची रांग सुरू होते. पूर्वी लग्न म्हटले, की ८-१५ दिवसांचा सोहळा असायचा. पूर्वी घरे मोठी असायची. लग्न हे घरातच मांडव टाकून केले जायचे. गावागावांहून पाहुणे यायचे. हौशीने सर्व विधी सोपस्कार नीट निगुतीने आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शांतपणे केले जायचे. कुठेही गडबड गोंधळ नसायचा. सर्वजण आपापली जबाबदारी ओळखून कामांची विभागणी करून कामाला लागायचे. बाहेरून आचारी आणणे, त्यांनी स्वयंपाक करणे हे खूपच कमी प्रमाणात होते. अर्थात या सर्वांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने खूप गोष्टी सोप्या व्हायच्या, हे ही खरे! 

काळ बदलला. हळूहळू सर्वच पद्धती बदलल्या. एकत्र कुटुंबपद्धतीपण कमी झाली. घरे विभागली गेली. घरे आकाराने लहान आणि घरातील माणसे संख्येने कमी झाली. स्त्रियापण कामानिमित्त घराबाहेर पडल्या... आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून काही सोहळे करण्यावर बंधने आली. पुढचे पाऊल म्हणून लग्न हॉलवर म्हणजे घराच्या बाहेर करायला सुरुवात झाली. थोडे कार्यक्रम घरी आणि थोडे हॉलवर होऊ लागले. स्वयंपाकाचीपण कंत्राटे अथवा आचारी घरी बोलावण्याची पद्धत सुरू झाली. पण त्यातूनही म्हणावे तसे समाधान लोकांना मिळत नव्हते. दुधाची तहान ताकावर भागली जात नव्हती. 

हळूहळू लोक अशी ठिकाणे शोधायला लागली जिथे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी जाऊन लग्न सोहळा साजरा करू शकतील. तेच हे डेस्टिनेशन 
वेडिंग! जे हल्ली खूपच तरुण भाषेत सांगायचे, तर In Thing or Happening असे आहे.

तर काय आहे हे डेस्टिनेशन वेडिंग. आता पूर्वीसारखी घरे राहिली नाहीत. म्हणून मग अशा ठिकाणी जायचे जिथे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी एखाद्या शांत, निवांत, निसर्गरम्य ठिकाणी जाऊन हा सोहळा आणखी अविस्मरणीय करतील. हा सोहळा अशा ठिकाणी केला जातो जिथे काहीतरी वेगळेपण असेल, मोजकीच पण जवळची माणसे, मित्रमंडळी असतील आणि सगळेजण मिळून पूर्वीच्या काळासारखे एकत्र येऊन ही आयुष्यभराची आठवण अविस्मरणीय करतील.

या सगळ्यामध्ये लग्न ठरवणाऱ्या माणसाचे वेगळेपण दिसून येते. त्या माणसाचा उद्देश जगावेगळे काहीतरी करणे हा नसून सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांनी एकत्रितपणे येऊन केलेले शुभकार्य हा असतो. यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो, की दोन दिवस एकत्र राहिल्यामुळे वर आणि वधू या दोन्ही कुटुंबांच्या एकमेकांशी ओळखी होतात आणि नातेसंबंध दृढ व्हायला सुरुवात होते. मला वाटते हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली संगीत, मेंहदी, हळद इत्यादी कार्यक्रम होतात ते वेगवेगळ्या ठिकाणी करावे लागतात. पण बाहेर गावी लग्न केल्याने सगळे कार्यक्रम एकाच ठिकाणी होऊ शकतात. बजेट हा विषय घेतला, तर ते खूप चर्चात्मक होऊ शकते. कारण पैसे किती खर्च करायचे हे त्या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. कोणी राजस्थानमधल्या महालात जाऊन करतील किंवा कोणी निसर्गरम्य गावात, देवळात जाऊन करतील. त्याला मग काही बंधन नाही.

तर असे हे डेस्टिनेशन वेडिंग हल्लीच्या नवीन पिढीचा दुधावरची तहान ताकावर भागवण्याचा एक उपाय.

संबंधित बातम्या