लग्नाची फॅशन आणि मेकअप

सोनिया उपासनी
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेस्टिनेशन वेडिंग
 

दसरा-दिवाळी आटोपली आणि आता सगळीकडे लगीनघाई सुरू झाली आहे. लग्न म्हटले, की अगदी शेवटपर्यंत तयारी सुरूच असते. घरातील प्रत्येक व्यक्ती यादी घेऊन आपले काम करत असतो. अगदी गुरुजी बुक करण्यापासून ते ब्युटी पार्लर आणि फॅशन डिझायनर बुक करण्यापर्यंत सगळी कामे या यादीत समाविष्ट असतात.

हल्ली नवीन फॅड आले आहे, ते डेस्टिनेशन वेडिंगचे! म्हणजेच, घरापासून दूर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी किंवा शहरापासून लांब एखाद्या रिसॉर्ट, बीच किंवा अगदी ‘रॉयल’ राजवाड्यातसुद्धा लग्न केले जाते. एवढेच नाही तर परदेशातसुद्धा लग्न होतात. हा ट्रेंड आता बॉलिवूडपर्यंत सीमित राहिलेला नाही, तर सर्वसामान्यांनीसुद्धा आपापल्या क्षमतेनुसार स्वीकारलेला आहे आणि त्याचा आनंद घेत आहेत.

डेस्टिनेशन वेडिंग हे बहुतांश वेळा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी प्लॅन करत असते. ठिकाणांचे पर्याय लग्न करणाऱ्या जोडप्याबरोबर चर्चा करून ठरवले जातात. जोडप्याच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आवडी लक्षात घेऊन थीम ठरवली जाते. हे सगळे ठरत असतानाच त्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मेकअप आणि कपडे. वधू-वराचेच नाही, तर घरातील इतर मंडळी, जसे आईवडील, करवली, जाऊबाई, सासूबाई, दीर, नणंद आणि इतरांचेही. म्हणूनच आपण या लेखात माहिती करून घेऊया या दोन महत्त्वाच्या विषयांबद्दल - डेस्टिनेशन वेडिंगच्या मेकअप आणि फॅशनबद्दल. खाली नमूद केलेली माहिती वधू-वर या दोघांसाठीही आहे. त्वचेची काळजी घेण्यापासून ते फॅशन ट्रेंडपर्यंत दोघांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

हिल स्टेशन वेडिंग
आत्ताच्या ऋतूमध्ये होणारे लग्न म्हणजे गुलाबी थंडीत सगळे कार्यक्रम होणार. त्यात तुमचे लग्नाचे ठिकाण कोणते आहे, त्यावर मेकअप कोणता करायचा आणि कोणते कपडे घालायचे हे अवलंबून आहे. एखादे हिल स्टेशन लग्नाचे ठिकाण असेल, तर वधू-वराने घ्यावयाची प्राथमिक काळजी अशी, की त्वचा सतत मॉइस्चराइज्ड ठेवणे. उपयुक्त बॉडी लोशन आणि फेस क्रिमचा उपयोग करून त्वचा मुलायम आणि सतेज ठेवावी. ओठांना लिप बाम लावावे, म्हणजे ओठ उकलणार नाहीत. हिल स्टेशनवर थंडी जास्त असते, त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि निस्तेज दिसू लागते. त्यासाठी ही काळजी घ्यावी. 

थंड हवेच्या ठिकाणी मेकअप क्रीम आणि ऑईल बेस्ड असावा. असा मेकअप वॉटरप्रूफ तर असतोच, पण त्वचेमधील ओलावा कायम ठेवतो. त्वचा रूक्ष आणि कोरडी होऊ देत नाही आणि चेहरा चमकतो. डोळ्यांचा मेकअप ब्राइट असावा, म्हणजे नवऱ्या मुलीचा चेहरा अशा मेकअपमुळे आणखी खुलून दिसेल.

आपल्या कपड्यांची निवडसुद्धा वधू-वरांनी थीम आणि ठिकाणाप्रमाणे करावी. ओपन गार्डन असेल, तर वधूचे कपडे सिल्क आणि सॅटिनचे असावेत, म्हणजे या कपड्याने ऊब राहते. नऊवारी साडी असेल, तर साडीबरोबर भरजरी शेला घ्यावा. लेहेंगा चोली असेल, तर शक्य असल्यास हाय नेक चोली असावी आणि जरी जरदोसीचा दुपट्टा घ्यावा. 
मुलांच्या ड्रेसमध्ये शेरवानी ‘ऑल टाइम फेव्हरेट’ आहे. हल्ली बाजारात विविध डिझाइन्सच्या शेरवानी बघायला मिळतात. आपली उंची आणि अंगकाठी लक्षात ठेवून योग्य डिझाइन निवडावे. कॉन्टेंपररी थीम असेल तर थ्री पीस सूट शोभून दिसतो. वधूने साडी किंवा घागरा घातला असेल, तरी सूट शोभून दिसेल. पण वधूने जर नऊवारी नेसली असेल, तर वराचे कपडे शेरवानी किंवा कुर्ता पायजमा असावा.

रॉयल थीम वेडिंग
डेस्टिनेशन वेडिंगचा महत्त्वाचा भाग असतो वेडिंग थीम... आणि त्याप्रमाणे ठरतात कपडे आणि कपड्यांप्रमाणे ठरतो मेकअप! तुमच्या लग्नाचे ठिकाण जर एखादा पॅलेस किंवा राजवाडा असेल तर ती रॉयल थीम असते. अशा वेळेस वधू-वराचे कपडे हे त्या पारंपरिक ठिकाणानुसार ठरवावेत. जसे जोधपूर, उदयपूरसारख्या ठिकाणी वधूचे कपडेपण एखाद्या महाराणीला साजेसे डिझाइन करावेत. तर, वराचे कपडे एखाद्या महाराजासारखे. दागिन्यांची निवडही त्यानुसारच करावी. कुंदन, मोती आणि सोन्याचे दागिने निवडावेत. लग्नाचे ठिकाण जर महाराष्ट्रातील एखाद्या राजवाड्यात असेल, तर नऊवारी साडी आणि भरजरी शेला हा मुलीचा पोशाख असावा, तर धोतर (किंवा सोवळे), कुर्ता आणि पगडी हा मुलाचा पोशाख. अर्थात दागिनेही पारंपरिकच असावेत, पण एखाद्या राजा आणि राणीसारखे... एकदम रॉयल! अशा या रॉयल थीमचा मेकअपही रॉयल असावा, म्हणजे रॉयल लुक देणारा. थोडा बोल्ड आणि हेवी मेकअप करावा आणि हेअर स्टाइलदेखील तशीच करावी, हाय बन किंवा गजरा आणि फुलांनी सजविलेल्या मराठमोळ्या खोप्याची.

बीच वेडिंग
डेस्टिनेशन वेडिंगमध्ये आणखी एक थीम म्हणजे, बीच वेडिंग... समुद्रकाठी, रम्य ठिकाणी ओपन स्टेज असलेली थीम. या लग्नासाठी पोशाख हा कॉन्टेंपररी असावा. इंडो वेस्टर्न कपड्यांची निवड करावी. वधूसाठी नाजूक एम्ब्रॉयडरी केलेला वेडिंग गाऊन छान दिसतो, तर वरासाठी सूट बूट शोभून दिसतो. मेकअप पोशाखानुसार करावा. मेकअप करताना शक्य तेवढा नॅचरल लुक असावा. डोळ्यांना स्मोकी आय लुक छान दिसतो. हेअर स्टाइलमध्ये मेसी बन किंवा मेसी कर्ल्स लुक खूपच उठून दिसतो. वधूसाठी खास फुलांचा टियारा करून तिच्या हेअर स्टाइलबरोबर मॅच करता येतो.

रेट्रो थीम वेडिंग
एक आगळीवेगळी आणि लोकप्रिय थीम म्हणजे रेट्रो थीम आणि व्हिंटेज थीम. रेट्रो म्हणजे १९६० ते १९८० या काळातील कपड्यांची फॅशन, हेअरस्टाइल, मेकअप जसे होते तसा लुक देणे. मुमताज फॅशन साडी, शर्मिला टागोरचा मोठा जुडा.... आणि साइड कर्ल्स, हेवी आणि बोल्ड आयलायनर आणि बोल्ड ब्लश... अशी थीम ठरवली, की वधू-वराबरोबर बाकीचे नातेवाईकपण खूप एंजॉय करतात. या थीममध्ये मेकअपवर तर भर द्यावाच, पण विशेष करून कपड्यांची निवडही त्या काळाप्रमाणे करावी. पोलका डॉट्स किंवा फ्लोरल प्रिंट, व्हर्टिकल प्रिंट, लेहरिया, शिफॉन मटेरियल, जरदोसी काम आणि अशाच वेगवेगळ्या कपड्यांच्या फॅशनची त्याकाळी धूम होती आणि अजूनही खूप लोकप्रिय आहे.

संगीत, मेंदी आणि फॅशन
हल्ली लग्नात जितके महत्त्व लग्नाच्या दिवशीच्या फॅशनला असते, तेवढेच त्याच्या आधीच्या विधींच्या फॅशनलापण असते. इतर विधीही धडाक्यात सेलिब्रेट केले जातात. हळदीचा कार्यक्रम असेल तर पिवळ्या रंगाच्या कपड्यांची थीम निवडावी. पिवळ्या फुलांचे दागिने करावेत, छान दिसतात. या कार्यक्रमात मेकअप हा अगदी बेसिक किंवा लाइट करावा. हळदीच्या वेळेस घ्यावयाची काळजी म्हणजे हळद ऑरगॅनिक असावी आणि कोणाला ॲलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी. नवऱ्या मुलीने खास काळजी घ्यावी.

मेंदीचा कार्यक्रम तर सगळ्यांसाठी खूपच उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे या कार्यक्रमात सामील असतात. मेंदीची थीम म्हणजे अर्थातच मेंदी कलर ते हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेले कपडे. बहुतांश ठिकाणी मेंदी आणि संगीत हा कार्यक्रम एकाच दिवशी करतात. आता या दिवशीचे कपडे डेस्टिनेशन कोणते आहे त्यावर ठरवावेत. बीच रिसॉर्ट असेल तर शॉर्ट वन पीस किंवा रॉ सिल्क किंवा सॅटिनचे ट्रॅडिशनल प्रिंटचे इंडो वेस्टर्न ड्रेसेस निवडावेत. जर पारंपरिक डेस्टिनेशन असेल तर चनिया चोली किंवा पटियाला कुर्ता जास्त ट्रेंडमध्ये आहे. 

संगीतसाठी पुन्हा परत वेगळी थीम असते. क्रॉप टॉप आणि ट्रॅडिशनल घागरा किंवा पूर्ण डेलिकेट एम्ब्रॉयडरी अथवा जरदोसी काम असलेले वन पीस सध्या फॅशनमध्ये आहेत. पुरुषांच्या कपड्यांमध्ये इंडोवेस्टर्न पर्याय आहेत. जोधपुरी स्टाइल किंवा सूटपण एकदम स्टायलिश दिसतो.

कितीही नवनवीन ट्रेंड्स, फॅशन्स आल्या, तरी आपल्या पारंपरिक लग्न समारंभात सिल्कच्या कपड्यांना कशाचीच तोड नाही. सिल्क शेवटी सदाबहारच राहणार आणि सर्वांच्या पसंतीचे राहणार!

आधुनिक फॅशन ट्रेंड्स

  • शरारावर शॉर्ट कुर्ती सध्या ट्रेंडमध्ये आहे. नेटच्या कापडावर थ्रेड वर्क अथवा जरदोसीचे काम करून शरारा उठावदार केला जातो, घालायला हलका पण एकदम रिच लुक देणारा. यासाठी नेहमीचे जरा गडद रंग सोडून पेस्टल शेड्स सध्या पसंत केले जातात. 
  • घागऱ्यावर नेहमीची ओढणी न घेता, त्यावर क्रॉप टॉप घालून लाँग जॅकेट टीमअप केल्यावर त्याचा लुक खुलून दिसतो. 
  • जुन्या जरीच्या साड्यांचे कळीदार अनारकली कुर्ते अथवा वन पीसही तरुण मुलींची खास पसंती आहे. 
  • समारंभाच्या दृष्टीने वेलवेट, सॅटिन, नेट, सिल्क, क्रेप हे कापडाचे प्रकार मुख्यत्वे निवडले जातात, कारण यावर पाहिजे तशी एम्ब्रॉयडरी व कलाकुसर करून घेता येते. 
  • पुरुषांच्या कपड्यांच्या फॅशनमध्येसुद्धा आता शेरवानी, कुर्ता, बंदगळामध्ये वेलवेट व सॅटिन सर्वाधिक पसंती आहे.
  • पुरुषांना जर कुठल्या समारंभाला हेवी कुर्ते अथवा पारंपरिक पोशाख घालायचा नसेल, तर साध्या जीन्स आणि शर्टवर सॅटिन, वेलवेट अथवा खादीचे जॅकेट टीमअप करावे आणि तुम्ही काही मिनिटांत रेडी फॉर द ओकेजन!

काही टिप्स 

  • पहिला अतिमहत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न ठरल्यापासून नियमितपणे आपल्या त्वचेची आणि केसांची निगा राखणे. यासाठी आपल्या ब्युटी थेरपिस्टशी संपर्क करावा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घ्यावी. चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या, वांग असेल तर आधीपासून स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घ्यावा. असे काही त्वचेचे विकार असल्यास लग्न ठरण्याआधीपासूनच योग्य तो उपचार सुरू करावा. म्हणजे लग्नाच्या वेळेस त्वचा सुदृढ, निरोगी व सतेज दिसेल.
  • थीम वेडिंगमध्ये इतर नातेवाइकांचे मेकअप आणि पोशाखसुद्धा प्लॅन केलेले असावेत. ड्रेस कोड ठरवावा. फक्त कुठलाही पोशाख किंवा मेकअप यांचा अतिरेक व्हायला नको, याची काळजी घ्यावी. कपड्यांची निवडसुद्धा फॅशन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी. म्हणजे एकदम परफेक्ट वेडिंगची मजा घेता येईल.
  • मेकअप करत असताना आपल्या त्वचेचा रंग ओळखून त्याप्रमाणे करावा. चेहरा पांढरा फटक किंवा अगदी गोरा दिसला पाहिजे हा अट्टहास नको. आहे ते कॉम्प्लेक्शन कसे खुलून दिसेल यावर भर असावा, म्हणजे मेकअप नॅचरल दिसतो आणि मेडअप लुक दिसत नाही.

संबंधित बातम्या