दृष्टिकोन (Perspective) 

सतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार
शुक्रवार, 16 मार्च 2018

डिजिटलाय    
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

कलादालनातील प्रकाशचित्र प्रदर्शनातील एखादे प्रकाशचित्र पाहताना पटकन आपल्या तोंडून छानशी दाद निघून जाते  
‘व्वा ऽऽ काय डेप्थ आलीय फोटोत !’ 

प्रत्यक्ष लांबी व उंची अशा दोनच मिती असलेल्या त्या कागदाच्या तुकड्याने आपली फसगत केलेली असते. प्रकाशचित्रकाराने त्याचे कौशल्य पणाला लावून आपल्या तोंडून अशी दाद मिळवलेली असते. आपल्या डोळ्यांना नेहमी जसा त्रिमितीय अनुभव येत असतो तोच त्रिमितीय अनुभव त्या ‘डेप्थ’ त्या प्रकाशचित्रात अवतरलेला असतो. प्रकाशचित्रकाराने तेथे ‘परस्पेक्‍टिव्ह’ या संकल्पनेचा वापर केलेला असतो. उत्तम प्रकाशचित्रण म्हणजेच ही अशी आभासांची दुनिया. 

‘परस्पेक्‍टिव्ह’ या संकल्पनेची व्याख्या करायची झाल्यास ‘खोली (डेप्थ)ची जाणीव किंवा प्रकाशचित्रातील घटकांचा एकमेकांशी असलेला अवकाशीय संबंध’ अशी करता येईल. 
प्रकाशचित्रणात ‘परस्पेक्‍टिव्ह’ही संकल्पना वेगवेगळ्या चार प्रकारे साधता येते.

अवरोधिकरण (ब्लॉकिंग), एकमेकांवर आच्छादन, झाकणे (ओव्हरलॅपिंग) किंवा अडथळा (ऑब्स्ट्रक्‍शन) असणे 
प्रकाशचित्रात जेव्हा एखादा घटक दुसऱ्या घटकाला झाकत असतो किंवा मध्ये अडथळा आल्यासारखा दिसतो त्यावेळी आपला मेंदू लगेचच अलीकडचा घटक हा त्या झाकलेल्या घटकापेक्षा जवळ आहे हे नोंदवतो. ते प्रकाशचित्र द्विमितीय असूनही मेंदूद्वारे त्या दोन घटकातील अंतराची नोंद केली जाते. ही नोंद आभासी स्वरूपाची असल्याने तेथे आपण ‘डेप्थ’ चा अनुभव घेतो. याला प्रकाशचित्रणात ‘ओव्हरलॅप परस्पेक्‍टिव्ह’ असे म्हटले जाते. त्या एकाच प्रकाशचित्रात जर या ओव्हरलॅपची पुनरावृत्ती होत असेल तर प्रेक्षकाला त्या प्रकाशचित्रातील वेगवेगळ्या घटकांमध्ये एकमेकांशी असलेला अवकाशीय संबंधाचा अंदाज येऊन खोलीचा आभास जाणवतो. 
दूरदर्शन मालिकेतील प्रसंगात वेळोवेळी या तंत्राचा वापर केलेला आपण अनुभवू शकतो. 

सापेक्ष आकार (रिलेटिव्ह साईझ) 
मानवाचा मेंदू पराकोटीच्या गुंतागुंतीचा आहे पण त्याची सहजी फसगतही होते. एखादी वस्तू जेव्हा दूरवर असते तेव्हा ती जवळ असलेल्या वस्तूंपेक्षा आकाराने लहान वाटते. प्रत्यक्षात तसे नसते. पण आपल्या मेंदूत वेगवेगळ्या वस्तूंचे स्वाभाविक आकार नोंदले गेलेले असतात. जसे की झाडे, गाड्या, प्राणी अथवा मानव, घरे. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या इमारतीपेक्षा दुप्पट आकाराचा मनुष्य प्रकाशचित्रात पाहतो तेव्हा आपल्या मेंदूने हे नोंदवलेले असते की ती इमारत दूरवर आहे व मनुष्य जवळ आहे. पण जर आपण वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू वेगवेगळ्या अंतरावर अशा प्रकारे ठेवल्या की त्या एकाच प्रतलावर आहेत असे वाटेल तर मात्र आपण काही गमतीशीर प्रकाशचित्र पण टिपू शकतो. थोडक्‍यात म्हणजे आपला मेंदू त्याला ज्ञात असलेल्या आकाराबरोबर प्रकाशचित्रातल्या वस्तूच्या आकाराशी मूल्यमापन करतो. बरोबरच अंतराचा अंदाजही करतो व त्यानुसार त्या प्रकाशचित्रात त्याला प्रकाशचित्रकाराला अभिप्रेत असलेल्या "डेप्थ'चा अनुभव मिळतो. यालाच "स्केलिंग' असेही म्हणतात.

पंक्तीयुक्त(लिनियर), एकरेषीय (रेक्‍टीलिनीअर) किंवा अंतर्धान पावणारा बिंदू (व्हॅनिशिंग पॉइंट) 
चित्रकार काय किंवा प्रकाशचित्रकार काय, आपापल्या कलेत प्रत्यक्षातल्या त्रिमितीय प्रतिमांचा वापर करून द्विमितीय प्रतलावर संरचना करीत म्हणजेच चित्रात किंवा प्रकाशचित्रात आभासी प्रतिमा निर्माण करत असतात. ‘अगणित बिंदू एकत्र येऊन एक रेषा तयार होते’, ‘ज्याला फक्त लांबी व रुंदी आहे ते पृष्ठ होय आणि ज्या पृष्ठावरील दोन बिंदू जोडणारी सरळ रेषा त्याच पृष्ठांत संपूर्णतः समाविष्ट होते ते पृष्ठ म्हणजे प्रतल होय’ अशा दोन व्याख्या आपण शालेय शिक्षणात शिकलेले असतो. अजाणतेपणे या शिक्षणाचा आपण रोजच वापर करत असतो. दोन समांतर रेषा किंवा दोन समांतर प्रतले जेव्हा आपल्याला एका बिंदूत मिळाल्याचा भास होतो तेव्हा आपला मेंदू ठराविक अंतराची नोंद करतो. यालाच एकरेषीय परस्पेक्‍टिव्ह असे म्हणतात. दोन समांतर जाणारे रेल्वेचे रूळ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ते रूळ आपल्याला खूप अंतरावर एका बिंदूत मिळालेले भासतात किंवा एखाद्या उंच इमारतीचे प्रकाशचित्र जमिनीवरून टिपताना तिचे वरचे मजले लहान होत गेलेले दिसतात व प्रकाशचित्रात ती इमारत मागे झुकली आहे असा भास निर्माण होतो. अशी शेकडो उदाहरणे आपल्याला हरघडी दिसू शकतात. येथे एक सर्वसामान्य गैरसमज दूर करायला हवा की ‘परस्पेक्‍टिव्ह’ हे लेन्सवर अथवा लेन्सच्या नाभीय अंतरावर (फोकल लेन्थ) अवलंबून असते. उलट फिश-आय अथवा पॅनोरामिक लेन्सेसने प्रकाशचित्रात अवास्तव असे परस्पेक्‍टिव्ह नोंदवले जाते. अर्थातच याचा उपयोग प्रकाशचित्रात नाट्यमयता आणण्यासाठी नेहमीच केला जातो.

सुस्पष्टतेचा अभाव ( Lack of Sharpness ), रंगांची गुणवत्ता ( Colour Quality) किंवा कॉन्ट्रास्ट 
वातावरणात असलेले धूलीकण, धुके व प्रकाशाच्या विखरणामुळे खूप दूरवरील वस्तू आपल्या डोळ्यांना अति सुस्पष्ट दिसत नाहीत. तसेच रंगांमध्येही त्यांची गुणवत्ता जाणवत नाही. हा अस्पष्टतेचा परिणाम हा वाढत्या धुलीकणांमुळे व वाढत्या अंतरामुळे वाढतच जातो. ही बाब आपल्या मेंदूमध्ये नोंदली गेलेली असते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रकाशचित्र नजरेसमोर आले की मेंदू लगेचच अंतराचा अंदाज निर्माण करतो. सुस्पष्ट दिसणाऱ्या वस्तू जवळच्या व धूसर दिसणाऱ्या वस्तू लांबच्या असा अंतराचा आभास निर्माण होतो. परस्पेक्‍टिव्ह निर्मितीत या घटकाचा खूपच उपयोग होतो. येथे एक हिंट लक्षात ठेवायला हवी  अशा प्रकारे अंतराचा आभास निर्माण करताना जर लेन्स इन्फिनिटी अंतरावर फोकस न करता जरा अलीकडे फोकस केली तर इन्फिनिटी अंतरावरील वस्तू धूसर नोंदवल्या जाऊन प्रेक्षकाच्या मनात जास्त अंतराचा आभास निर्माण करता येतो. परस्पेक्‍टिव्ह हे लेन्सच्या फोकल लेन्थवर अवलंबून नसून ते कॅमेरा ते चित्रविषय यातील अंतरावर अवलंबून असते. पण वाइड अँगल लेन्स वापरल्यास पर्स्पेक्‍टीव्हमध्ये अतिशयोक्ती झालेली दिसते कारण अशा प्रकाशचित्रात वस्तूतील अंतर जास्त भासते व जवळची वस्तू प्रमाणाबाहेर मोठी दिसते. टेलीफोटो लेन्सने प्रकाशचित्रातील वस्तूमधील अंतर कमी असल्याचा भास निर्माण होतो व त्यामुळे वस्तूंचे आकारमान साधारण सारखेच जाणवते. पर्स्पेक्‍टीव्हमध्ये समतलता आलेली भासते. विचार व निरीक्षण करणारा प्रकाशचित्रकार या घटकांचा उत्कृष्ट वापर आपल्या कामात करीत असतो. खरं तर आपण प्रकाशचित्र टिपताना कॅमेरा परस्पेक्‍टिव्ह निर्माण करीत असतोच. पण पर्स्पेक्‍टीव्हमागचे तत्त्व जर आपण जाणून घेतले पाहिजे. त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. मग आपल्या प्रकाशचित्रात वस्तूंचे स्वरूप व आकार यांचे एक सुरेख मिश्रण प्रत्ययास येऊन प्रेक्षकाच्या मनात प्रकाशचित्रातील आकारमान, अवकाश, खोली व अंतर यांची एक संवेदना तयार होईल व ते प्रकाशचित्र प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेईल. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या