पृष्ठभूमी व पार्श्वभूमीचा वापर

सतीश पाकणीकर, औद्योगिक प्रकाशचित्रकार
बुधवार, 21 मार्च 2018

डिजिटलाय

सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

डेप्थ ऑफ फील्ड व फ्रेमिंग (चित्र चौकट) याचा विचार करताना आपण खरं तर पृष्ठभूमी व पार्श्वभूमी यांचा ओझरता विचार केलेला आहे. पण आपल्या मुख्य चित्रविषयाइतकेच प्रकाशचित्राच्या सौंदर्यात मोलाची भर घालणारे महत्त्वाचे घटक म्हणजे पृष्ठभूमी व पार्श्वभूमी ! या दोन्हीही घटकांचा जाणीवपूर्वक अभ्यास करायचा असेल तर सोपी युक्ती म्हणजे इतर फोटोग्राफर्सनी टिपलेल्या प्रकाशचित्रांचे अवलोकन करणे. सर्व यशस्वी, सौंदर्यपूर्ण प्रकाशचित्रात पृष्ठभूमी व पार्श्वभूमीचा परिणामकारक वापर हा एक अविभाज्य भाग असतो.

पृष्ठभूमीचा परिणामकारक वापर
उत्कृष्ट प्रकाशचित्रणातून आपल्या मनापर्यंत भावनांचे आदान-प्रदान होते असे जर आपण मानले तर आपल्याला असेही म्हणता येईल की प्रकाशचित्रातील प्रत्येक घटकाचाही या भावनांच्या आदान-प्रदानात सहभाग हवा. एखाद्या घटकाचा जर असा सहभाग नसेल तर तो घटक आपण प्रकाशचित्रातून वगळायलाच हवा. ही गोष्ट पृष्ठभूमीला लागू पडते. आपण जर पृष्ठभूमीची रचना योग्य प्रकारे करू शकलो तर प्रकाशचित्र हमखास यशस्वी होणारच.

पृष्ठभूमीची रचना करताना आपण डेप्थ, भवतालचा विचार, मूड, वेगवेगळ्या आकारांची मांडणी, रंगांच्या छटा व विरोधाभास, गतिमानता या सर्वांचा विचार करूनच मग प्रकाशचित्र टिपले पाहिजे. यशस्वी प्रकाशचित्रात यापैकी एक अथवा अनेक घटकांचा अंतर्भाव झालेला आढळतो.
हा सर्व विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की आपण पाहिलेल्या ज्या प्रकाशचित्राला आपली मनःपूर्वक दाद जाते त्या सर्व प्रकाशचित्रात वरीलपैकी कोणत्या न कोणत्या तंत्राचा वापर केलेला आहे. 

ज्याप्रमाणे प्रकाशचित्र टिपताना पृष्ठभूमीचा विचार करायला हवा तितक्‍याच महत्वाने पार्श्वभूमीचाही विचार करायला हवा. कधी कधी आपण फोटो टिपताना आपल्या चित्रविषयात इतके गुंगून जातो की पार्श्वभूमीवर असलेल्या चित्र-विचित्र गोष्टी, आकार, रंग याचे आपल्याला भानही राहत नाही. परिणामी जेव्हा आपण नंतर तेच प्रकाशचित्र बघतो त्यावेळी आपली निराशा होते. कारण आपल्या मित्राच्या अथवा मैत्रिणीच्या कानामागून जाणारा एखादा पाइप त्याच्या अथवा तिच्या कानातून आल्याचा भास आपल्याला होतो. कॅमेऱ्याचा अँगल थोडासाच बदलून आपण तो टाळू शकलो असतो अशी रुखरुख नंतर मनाला लागून राहते. हे टाळण्यासाठी कॅमेरा क्‍लिक करण्याअगोदर पार्श्वभूमीचा विचार करणेही  गरजेचे आहे. कोणत्याही नाट्य प्रकाराला ‘सेट’ चे जे महत्त्व आहे तेच महत्त्व प्रकाशचित्रात पार्श्वभूमीला आहे. 

कॅमेऱ्याचा अँगल थोडासाच बदलून, लेन्सची फोकल लेन्थ बदलून, पार्श्वभूमीवरील प्रकाश कमी अथवा जास्त करून, चित्र चौकट पूर्ण भरून (पार्श्वभूमीचा भाग कमी करून) असे वेगवेगळे पर्याय वापरत आपण पार्श्वभूमी प्रकाशचित्राला पूरक होईल अशी करू शकतो.

कॅमेऱ्याचा अँगल बदलून : आपण ज्या अँगलमधून फोटो टिपत आहोत त्यात थोडासा बदल केला तरी पार्श्वभूमीवर असलेले त्रासदायक घटक आपण टाळू शकतो. समजा आपण एखाद्या फुलाचे प्रकाशचित्र टिपत आहोत व पार्श्वभूमीवर ओबड धोबड भिंत, इलेक्‍ट्रिकचा खांब किंवा एखादे वाहन असे घटक आहेत तर अशावेळी त्या फुलाच्या थोड्या खालच्या अँगलने टिपलेल्या फोटोत पार्श्वभूमीवर निळे आकाश दिसेल व ते फूल उठावदार दिसेल. अशा थोड्याशाच बदलाने एक उत्तम प्रकाशचित्र आपली संग्रही जमेल. 

डेप्थ
प्रकाशचित्रात त्रिमितीचा म्हणजेच खोलीचा आभास निर्माण करण्यासाठी पृष्ठभूमीचा वापर हा सर्वांत जास्त प्रमाणात केलेला दिसतो. कॅमेरा लेन्सच्या अगदी जवळ पृष्ठभूमी ठेवून पार्श्वभूमी दूरवर ठेवल्याचा परिणाम साधता येतो. हा परिणाम वाइड अँगल लेन्सच्या साहाय्याने सहजपणे नोंदवता येतो. वाइड अँगल लेन्समुळे जवळच्या वस्तू प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या भासतात तर लांबच्या वस्तू प्रमाणापेक्षा जास्त लहान भासतात. दोन वस्तूंमधील अंतर जास्त भासल्याने खोलीचा आभास निर्माण होतो.

भवतालाचा विचार
आपण ज्या भवतालात प्रकाशचित्र टिपत आहोत त्या भोवतालच्या घटकांचा अंतर्भाव प्रकाशचित्राच्या पृष्ठभूमीसाठी करणे हा अजून एक सर्वसामान्य मार्ग. उदाहरणार्थ एखाद्या धबधब्याच्या प्रकाशचित्रात फक्त धबधबा न दाखवता त्याच्या भवतालचा समावेश चित्रात केल्याने एक वेगळाच परिणाम त्या प्रकाशचित्रात साधता येतो.

मूड
प्रत्येक प्रकाशचित्राला त्याचा स्वतःचा असा एक मूड असतो. पृष्ठभूमीच्या योग्य वापराने आपण हे वेगवेगळे मूड्‌स प्रकाशचित्रात आणू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या सुंदर निसर्गचित्रात पृष्ठभूमीला शांत असा जलाशय चित्रित केला तर त्याचा वेगळा परिणाम प्रेक्षकाच्या मनावर होऊ शकतो.

वेगवेगळ्या आकारांची मांडणी
प्रेक्षकाची नजर जर आपल्याला अपेक्षित मुख्य चित्रविषयावर न्यायची असेल तर पृष्ठभूमीवर त्याला पूरक अशा आकारांची रचना केल्यास ती नजर खिळून राहण्यास मदत होते. वक्राकार रेषा असलेले आकार प्रकाशचित्राचा प्रभाव वाढवितात. त्यातही सौम्य वक्राकार रेषा असलेले आकार चित्रात डौल निर्माण करतात तर दातेरी वाकड्या-तिकड्या वक्राकार रेषा असलेले आकार चित्रात ताण निर्माण करतात.

रंग-छटा व विरोधाभास 
काही प्रकाशचित्रात जास्त विरोधाभास (contrast) असलेली पृष्ठभूमी वापरण्याने त्या प्रकाशचित्रातील मुख्य विषयाला न्याय मिळतो. सूर्योदय अथवा सूर्यास्ताचे प्रकाशचित्रण करताना हे तंत्र वापरण्याने उत्तम दर्जाची प्रकाशचित्रे टिपता येतात.

गतिमानता
प्रकाशचित्रात पृष्ठभूमीवर तिरप्या अथवा कर्णाच्या रेषेत जाणाऱ्या रेषांच्या आकारांची रचना केली तर त्याचा परिणाम हा प्रेक्षकाला गतिमानता जाणवण्यात होतो.

लेन्सची फोकल लेन्थ बदलून
कॅमेऱ्यावर बसवलेल्या लेन्सची फोकल लेन्थ बदलून पार्श्वभूमीवर असलेले त्रासदायक घटक आपण टाळू शकतो. दृष्यकोन कमी करण्यासाठी अशा वेळी टेलीफोटो लेन्सचा उपयोग होतो. टेलीफोटो लेन्सने प्रकाशचित्रातील वस्तूमधील अंतर कमी असल्याचा भासही निर्माण होतो. चित्रविषयाचे अंतर जर पार्श्वभूमीपासून वाढवले तर अशावेळी पार्श्वभूमी अस्पष्ट होऊन चित्रविषयाकडे नजर स्थिरावते. 

पार्श्वभूमीवरील प्रकाश कमी अथवा जास्त करून 
पार्श्वभूमीवरील प्रकाशाचे नियंत्रण करून आपल्याला ती काळपट अथवा उजळ करता येते. चित्रविषयाला अनुसरून असे बदल केल्यास ते पूरक ठरते. अशावेळी पार्श्वभूमीवरून चमकून येणाऱ्या हाय-लाईट्‌सकडे मात्र जास्त लक्ष देणे गरजेचे ठरते.        

चित्र चौकट पूर्ण भरून
चित्रविषयाच्या जवळ जात चित्रचौकट पूर्ण भरून टाकत आपण त्रासदायक पार्श्वभूमी टाळू शकतो. याखेरीज व्यावसायिक प्रकाशचित्रकार फोटोग्राफी करताना मोठे कागदी रोल वापरताना आपण पाहतो. त्यांना ‘कोलोरामा’ असे म्हटले जाते. अशा कागदी पार्श्वभूमी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतात. संपूर्ण एकसारखी, सुरकुत्यांशिवाय असलेली पार्श्वभूमी छतापासून जमिनीपर्यंत अंथरून व्यावसायिक प्रकाशचित्रण केले जाते. 

आज डिजिटल फोटोग्राफीमुळे वेगवेगळ्या पार्श्वभूमी तयार करणे शक्‍य झाले आहे. अशा शेकडो पार्श्वभूमी तयार करून ‘फोटोशॉपसारख्या’ सॉफ्टवेअरच्या साहाय्याने चित्रविषयाला अनुरूप अशी कोणतीही पार्श्वभूमी आपण वापरू शकतो. स्टुडिओत स्वच्छ पांढऱ्या पार्श्वभूमीवर मॉडेलचा फोटो टिपून एका क्षणात सॉफ्टवेअरच्या साहाय्याने पार्श्वभूमीला आपण समुद्राचा अथवा वाळवंटाचा, एखाद्या घराचा अथवा बगीचाचा आधीच काढलेला फोटो वापरू शकतो. इथे कल्पनेच्या भराऱ्या घेताना मात्र मॉडेलच्या प्रकाशचित्रातील प्रकाशयोजना व पार्श्वभूमीमध्ये असलेली प्रकाशयोजना यांचा योग्य मेळ घालणे आवश्‍यक बनून जाते.

थोडक्‍यात पृष्ठभूमी व पार्श्वभूमी या दोन्हीही महत्त्वाच्या घटकांवर लक्ष द्यायला हवे. त्यांचा प्रभावीपणे वापर करून जर आपण प्रकाशचित्रण केले तर येणारे प्रकाशचित्र लक्षवेधी तर असेलच पण कलेला एका वेगळ्या स्तरावर नेणारेही असेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या