प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने चित्रण

सतीश पाकणीकर
गुरुवार, 22 मार्च 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

 

र्वसाधारणपणे असा समज असतो की प्रकाशचित्रकाराच्या पाठीमागून प्रकाश येऊन तो जर चित्रविषयावर पडत असेल तर अशी प्रकाशचित्रे उत्तम येतात. बऱ्याच अंशी हे सत्यही आहे. पण प्रकाशचित्रण ही एक प्रयोगशीलता मागणारी अशी कला आहे. अशावेळी पाठीमागूनच प्रकाश हवा असा नियम मोडीत काढून जर आपण प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने चित्रण केले तर आपल्याला अनेक विषयात वैविध्यपूर्ण प्रकाशचित्रे मिळू शकतात. लाझ्लो मोहली नेगी या प्रसिद्ध फोटोग्राफरने असे म्हणून ठेवले आहे की ‘The photographer is a manipulator of light; photography is manipulation of light.`अशा प्रकारचे प्रयोग करून बघताना एकाच प्रकाशाची ही वेगवेगळी रूपं आपल्याला दिसल्याने आपण आश्‍चर्यचकित होऊन जातो. या ठिकाणी एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला हवी की आपण आपल्या कॅमेऱ्यावर ठेवलेले सेटिंग अत्यंत अचूक हवे. या प्रकारच्या फोटोग्राफीला ‘कॉन्ट्रे-जर’ (Contre-jour) अशी संज्ञा वापरली जाते. विविध प्रकारे हे तंत्र आपल्याला वापरता येते.

‘सिल्ह्युट प्रकाशचित्रण’
 फोटोग्राफीत प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने चित्रण करताना सर्वांत जास्त वापरले जाणारे हे तंत्र आहे. चित्रविषयाच्या पाठीमागून प्रकाश आल्याने त्याचे रूपांतर ग्राफिक आकारामध्ये होऊन जाते व त्या बरोबरीनेच चित्रविषयातील बारकावे नोंदले न गेल्याने चित्रातील गूढता पण वाढते. या तंत्रात चित्रविषयाच्या पार्श्वभूमीवरील प्रकाश हा मुख्य चित्रविषयापेक्षा बराच जास्त प्रकाशमान असायला हवा. तसेच चित्रचौकटीतील अनावश्‍यक घटक पण टाळायला हवेत. सर्वसाधारणपणे पार्श्वभूमीसाठी एक्‍स्पोजर दिले की उत्तम प्रतीची सिल्ह्युट आपण टिपू शकतो. कधी कधी मुद्दाम केलेल्या अंडर एक्‍स्पोजरमुळेही सिल्ह्युट उत्तम दिसतात. अरुणोदयाची वेळ व संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीचा धूसर प्रकाश या दोन वेळा आभाळात रंगांची उधळण असते व ही ‘सिल्ह्युट’ साठी अतिशय योग्य वेळ असते. 

रिम लायटिंग प्रकाशचित्रण 
रिम लायटिंग म्हणजे चित्रविषयाच्या कडेनी दिसणारी प्रकाशाची प्रभावळ! व्यक्तीच्या केसांमागून प्रकाश आल्यास किंवा ढगांच्या पुंजक्‍यांमागे सूर्य लपल्यास आपल्याला प्रकाशाची अशी प्रभावळ अनुभवला येते. चित्रविषयाच्या कडांवरून प्रकाश चमकल्याने तो पार्श्वभूमीपासून सुटून ठळकपणे नोंदवला जातो. यासाठी प्रकाश हा चित्रविषयाच्या पाठीमागून पण तिरप्या रेषेत यायला हवा. या तंत्रातसुद्धा मुद्दाम केलेल्या अंडर एक्‍स्पोजरमुळे रिमलायटिंगचा परिणाम जास्त चांगल्या प्रकारे साधता येतो. गवताची पाती, वेताची झुडपे, बारीक टोकदार पाने असलेल्या वनस्पती यासारख्या गोष्टी हे रिमलायटिंगसाठी असलेले नैसर्गिक चित्रविषय. असे असले तरी हेच तंत्र वापरून प्रतिभावंत प्रकाशचित्रकार उत्तम दर्जाची व्यक्तिचित्रेही  निर्माण करतात.

अर्धपारदर्शकता टिपणारे प्रकाशचित्रण
काही चित्र विषयातून प्रकाश अंशतः पार होऊ शकतो. अशा चित्रविषयाला अर्धपारदर्शक असे म्हणतात. झाडांची पाने, फुले अथवा काचेच्या रंगीत वस्तू  यांवर जर पाठीमागून प्रकाश पडला तर आपल्याला त्यांचा रंग अधिक तेजस्वी दिसतो. तसेच त्यांचा पोतही सुस्पष्टपणे दिसतो. म्हणून हे तंत्र वापरल्यास अशा विषयांची प्रकाशचित्रे अधिक सुंदर दिसू शकतात. चर्चमध्ये असणाऱ्या मोठ-मोठ्या ‘स्टेन्ड ग्लास’च्या खिडक्‍याही याच तंत्राने उत्तमरीत्या टिपता येतात. असे अर्धपारदर्शकता असलेले विषय टिपताना ‘चित्रचौकट’ पूर्ण भरलेली असेल तर चित्रविषयातील रंगांची संतृप्तता जास्त भावते.

लो-की प्रकाशचित्रण 
या तंत्रात प्रकाशचित्रात गडद रंगांचे प्राबल्य असते. प्रकाशचित्रात मुख्य चित्रविषयावर पाठीमागून प्रकाश असेल व पार्श्वभूमीवर कमी उजेड असेल किंवा ती सावलीत असेल तर या प्रकारचे दृश्‍य टिपता येते. हे तंत्र वापरताना अचूक एक्‍स्पोजर हा कळीचा मुद्दा ठरतो. कृष्ण-धवल प्रकाशचित्रणात गडद रंग हे काळ्या रंग-छटा निर्माण करत असल्याने लो-की प्रकाशचित्रण हे जास्त प्रभावीपणे सादर करता येते.

हाय-की प्रकाशचित्रण
लो-की प्रकाशचित्रणाच्या बरोबर विरुद्ध म्हणजे हाय-की प्रकाशचित्रण. या तंत्रात प्रकाशचित्रात सौम्य रंगांचे प्राबल्य असते. एखादी साधी फुलदाणीसुद्धा हाय-की प्रकाशचित्रणाचा विषय होऊ शकते. फिकट अथवा पांढऱ्या पार्श्वभूमीवर सौम्य रंगाचा चित्रविषय व पाठीमागून तिरपा प्रकाशाचा झोत हे समीकरण जुळले की उत्तम हाय-की प्रकाशचित्र संग्रहात आलेच म्हणून समजा. अर्थातच अनावश्‍यक गोष्टी टाळणे ही अट येथेही आहेच. एकस्पोजरचा विचार करता हाय-की फोटोमध्ये बहुतेक वेळी ओव्हर एक्‍स्पोजरची गरज भासते.

लेन्स फ्लेअरसह प्रकाशचित्रण
एका विशिष्ट कोनातून प्रकाशाचा किरण लेन्समधून कॅमेऱ्यात शिरला तर जो परिणाम प्रकाशचित्रात दिसतो त्याला लेन्स फ्लेअर असे म्हणतात. खरं तर हा एक दोष समजला जातो. पण जर कल्पकतेने याचा वापर केला तर प्रकाशचित्रात एक वेगळाच मूड निर्माण होतो. पार्श्वभूमी जर गडद रंगांची असेल व  एफ/११ किंवा एफ/१६ अशी ॲपर्चर वापरली तर हा परिणाम जास्त प्रभाव निर्माण करू शकतो.

प्रकाशकिरणांचे प्रकाशचित्रण
सूर्योदयाच्या सुमारास हवेत असलेल्या धुक्‍यामुळे अथवा धुलीकणांमुळे उन्हाची कोवळी किरणे दृश्‍यमान होतात. झाडांच्या पानापानातून पाझरणारी ही किरणे छाया-प्रकाशाचा सुंदर खेळ करताना दिसतात. गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर किरणांचा चाललेला हा खेळ टिपण्याचा मोह हा कोणाला आवरता येणार? निसर्गचित्र असो, ऐतिहासिक स्मारके असो अथवा व्यक्तिचित्रण, प्रकाशाच्या किरणांचा असा वापर प्रकाशचित्राला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.

याखेरीज चित्रविषयात पार्श्वभूमीवर जर छोट्या छोट्या आकारात लाईट्‌स असतील (उदाहरणार्थ दिवाळीत आपण वापरतो त्या दिव्यांच्या रंगीत माळा) व चित्रविषयापासून ते दूर असतील तर ‘आउट ऑफ फोकस’ झाल्याने त्यांचा एक वेगळा परिणाम प्रकाशचित्रात दिसतो. त्याला ‘बोके’ अशी संज्ञा वापरतात. तो लाइट आकाराने जितका लहान तितका तो स्पष्ट व वर्तुळाकार ‘बोके’ निर्माण करतो. जाहिरातीत वापरले जाणारे व्यक्तिचित्रण, वन्यजीव चित्रण, स्थिर-चित्रण अशा विषयात कल्पकतेने केलेला ‘बोके’चा वापर आपण नेहमी पाहतो. एफ/२.८ किंवा त्यापेक्षा मोठ्या ॲपर्चरमुळे ‘बोके’चा परिणाम जास्त खुलून दिसतो. रस्त्यावरील फोटोग्राफी करताना गाड्यांचे दिवे, दूरवरील इमारतींमधून दिसणारे दिवे किंवा सणासुदीला वापरलेल्या प्रकाशयोजनांचा वापर करून आपण आपल्या प्रकाशचित्रात ‘बोके’ निर्माण करू शकतो. रंगांच्या वापरा बरोबरच फोटोत एक वेगळी जादू करण्याचे कसब या ‘बोके’ मध्ये खासच आहे. 

थोडक्‍यात नेहमीच्या वाटेने न जाता प्रकाशाच्या विरुद्ध बाजूने फोटो टिपताना - चित्रविषयातील आकार व रेषा, प्रकाशाचा तिरपेपणा अथवा कोन, फ्लेअरमुळे होणारा परिणाम, दृष्य-कोन व विरोधाभास, एक्‍स्पोजर यांवर लक्ष देणे गरजेचे आहेच पण बरोबरीने प्रकाशचित्रणाची योग्य वेळ निवडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशी प्रकाशचित्रे टिपताना प्रकाशाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था व रूपे आपल्याला दिसतील त्यांनी अनोखे प्रकाशचित्र तर मिळेलच पण आपल्या जगण्याला एक वेगळी समृद्धी पण मिळेल.

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या