योग्य वेळी योग्य लेन्सचा वापर

सतीश पाकणीकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

डिजिटलाय        

सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

फोटोग्राफी करताना आपल्या मागून प्रकाश असेल, एका बाजूने प्रकाश असेल किंवा अगदी समोरून प्रकाश असेल... अशा विविध प्रकारच्या प्रकाशाच्या अद्‌भुत करामती आपण जाणून घेतल्या. त्याचे महत्त्व जाणून घेत प्रकाशचित्रात उमटणारे त्याचे अनोखे रूपही पाहिले. पण हे करताना कलाकाराचे मन असलेल्या प्रत्येक फोटोग्राफरला व त्याच्या सर्जनशीलतेला साथ मिळते ती एस एल आर कॅमेऱ्यावरील बदलता येणाऱ्या लेन्सेसची! ‘फिश-आय लेन्स’पासून ते ‘अल्ट्रा टेलिफोटो लेन्स’पर्यंत बदलता येणाऱ्या लेन्सेस फोटोग्राफरची सर्जनशीलता जोखण्याचे काम करीत असतात. 

सध्या वापरात असलेल्या फूल-फ्रेम डी एस एल आर कॅमेऱ्यात ५० एमएम नाभीय अंतराची लेन्स ही ‘नॉर्मल लेन्स’ म्हणून ओळखली जाते. आपल्या डोळ्यांनी ज्या कोनात प्रतिमा दिसते साधारणपणे तो कोन प्रकाशचित्रात या लेन्सने समाविष्ट होतो. कॅमेरा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या आकाराचे संवेदक (सेन्सर्स) बनवीत असल्यामुळे संवेदकाच्या आकाराप्रमाणे आपल्याला क्रॉप फॅक्‍टरचा विचार करणे गरजेचे ठरते. ५० एमएमपेक्षा कमी नाभीय अंतरे असलेल्या लेन्स या ‘वाइड अँगल लेन्स’ म्हणून ओळखल्या जातात, तर ५० एमएमपेक्षा जास्त नाभीय अंतराच्या लेन्स ‘टेलि लेन्स’ म्हणून ओळखल्या जातात. ज्या प्रकारचे प्रकाशचित्रण आपण करणार आहोत, त्याला योग्य अशा नाभीय अंतराच्या लेन्सेस त्याच्या संग्रहात ठेवणे आवश्‍यक ठरते. त्याचबरोबर लेन्सची खरेदी करताना ‘फास्ट’ लेन्स खरेदी करणे हितावह ठरते. ‘फास्ट लेन्स’ म्हणजे मोठ्यात मोठे उपलब्ध ॲपर्चर असलेली लेन्स होय. एफ १.४ ॲपर्चर असलेली लेन्स ही एफ २.८ ॲपर्चर असलेल्या लेन्सपेक्षा एका स्टॉपने फास्ट असेल. म्हणजेच कमी प्रकाशात एफ १.४ ॲपर्चर असलेली लेन्स जास्त चांगला प्रतिसाद देईल. 

तसेच २८ एमएम नाभीय अंतराच्या लेन्सचा ‘दृश्‍यकोन’ विस्तीर्ण असेल. चित्रविषयाचा जास्त भाग व्यापेल व आपल्या चित्र-चौकटीत जास्त दृश्‍य समाविष्ट होईल. या उलट २०० एमएम नाभीय अंतराच्या लेन्सचा ‘दृश्‍यकोन’ अरुंद असेल व आपल्या चित्र-चौकटीत कमी दृश्‍य समाविष्ट होईल (यात दूरचे दृश्‍य अथवा वस्तू आपल्याला जवळ आल्यासारखी भासेल). २८ एमएम, ५० एमएम व २०० एमएम या तीन लेन्सेस मिळून आपल्याला ‘वाइड अँगल’ ते ‘टेलि अँगल’ असे सर्व प्रकारचे काम करता येऊ शकते. म्हणूनच सुरवातीला आपल्या ‘कीट’मध्ये मध्ये या लेन्सेसचा समावेश करायला हवा. दुसरा पर्याय म्हणजे २८ एमएम ते २०० एमएमची एकच झूम लेन्स बाळगणे. पण अशी लेन्स त्यातील अनेक अंतर्वक्र व बहिर्वक्र अशा भिंगांची मिळून बनलेली असल्याने एफ ३.५ - ते एफ ५.६ या ॲपर्चरची असेल व कमी प्रकाशात प्रकाशचित्रण करताना आपल्याला ते त्रासदायक ठरेल. या सर्वांचा सुवर्णमध्य म्हणजे १६-३५ एमएमची एक, २८-७० एमएमची एक व ७०-२०० एमएमची एक; अशा तीन लेन्सेस जर आपण संग्रहात ठेवल्या तर आपले बहुतांश काम सुकर होऊ शकते. 

वाइड अँगल लेन्सने आपल्याला नॉर्मल व टेलि लेन्सपेक्षा जास्त ‘डेप्थ ऑफ फील्ड’ मिळते. त्यामुळे चित्र-चौकटीत पृष्ठभूमीपासून ते पार्श्‍वभूमीपर्यंत सर्व घटक स्पष्ट नोंदवले जातात. या लेन्सने चित्रीकरण केल्यास जवळच्या वस्तू प्रमाणापेक्षा मोठ्या, तर दूरच्या वस्तू वास्तविक आकारापेक्षा लहान भासतात. त्यामुळे जवळच्या व लांबच्या वस्तूंमधील अंतर जास्त भासते. निसर्गचित्रणात या गोष्टीचा आपल्याला कलात्मक रीतीने वापर करता येतो. अशा लेन्सने चित्रीकरण करताना एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे कमी उंचीवरून दृश्‍य टिपले तर जास्त नाट्य प्रकाशचित्रात अवतरते. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दृश्‍य-कोन विस्तीर्ण असल्याने अनावश्‍यक घटकही प्रकाशचित्रात येऊ शकतात. ते टाळणे आवश्‍यक ठरते. 

वाइड अँगल लेन्स वापरताना उपयोगी ठरतील असे काही मुद्दे - 

 • पृष्ठभूमीवर एखादा महत्त्वाचा घटक असेल, अशी चित्ररचना करावी. यामुळे प्रकाशचित्रात जास्त डेप्थ (खोली) येते. 
 • चित्रविषयाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. यामुळे प्रकाशचित्रात मजेशीर परिणाम साधता येतात. 
 • कमी नाभीय अंतराच्या लेन्सने येणारी रेषांची वक्रता सर्जनशीलतेने वापरावी. 
 • कधी कधी व्यक्तिचित्रणासाठी या लेन्सचा वापर करून पाहावा. 
 • निसर्गचित्रणात पॅनोरमासाठी वापर करावा. 
 • लहान मुलांचे चित्रण या लेन्सेसने करून पाहावे. त्यांचा खोडकरपणा बरोबर टिपला जाईल. 

टेलिफोटो लेन्सने प्रकाशचित्रण करताना आपल्याला कमी ‘डेप्थ ऑफ फील्ड’ मिळत असल्याने मुख्य चित्रविषय हा पार्श्‍वभूमीपासून वेगळा नोंदवताना सोपे जाते. पार्श्‍वभूमी धूसर ठेवण्यास सोपे जाते. व्यक्तिचित्रण, पशुपक्षी चित्रण करताना आपल्याला या लेन्सचा उपयोग होतो. दुसरे असे, की आपण चित्रविषयापासून दूर उभे राहून प्रकाशचित्र टिपत असल्याने आपल्या ‘मॉडेल’चे नैसर्गिक हावभाव आपण कॅमेराबद्ध करू शकतो. अशा लेन्स वापरत असताना मुख्य विषयापेक्षा दूरच्या वस्तू प्रमाणापेक्षा मोठ्या जाणवत असल्याने दोहोंमधील अंतर कमी असल्याचा भास होतो. अर्थातच दृश्‍याचा कोन कमी असल्याने कॅमेरा व हात अतिशय स्थिर ठेवणे महत्त्वाचे ठरते. 

टेलिफोटो लेन्स वापरताना उपयोगी ठरतील असे काही मुद्दे - 

 • शक्‍यतो ट्रायपॉडचा वापर करावा. 
 • केबल रिलीज वापरल्यास कॅमेरा हलण्याची भीती राहणार नाही. 
 • ट्रायपॉडचा वापर करताना लेन्सवर असलेले इमेज स्टॅबिलायझर बंद करावे. 
 • चित्रचौकट शक्‍यतो चित्रविषयाने भरून टाकावी. 
 • मुख्य चित्रविषय पार्श्‍वभूमीपासून अलग ठेवावा. 

सर्वसाधारणपणे वाइड अँगल लेन्स या निसर्गचित्रणासाठी व टेलिफोटो लेन्स या व्यक्तिचित्रण व वन्यजीव चित्रणासाठी वापरल्या जातात. पण प्रकाशचित्रकला ही एक प्रयोगशील कला असल्याने असे अलिखित नियम मोडून जर आपण लेन्सचा वापर उलटा करायचे ठरवले तर नेहमीपेक्षा अनपेक्षित, तरीही सुंदर व नाट्यमय असे परिणाम आपल्याला टिपता येतात. 

लेन्सेसमध्ये असलेली ही विविधता लक्षात घेऊन व योग्य विषयाला योग्य लेन्स वापरत जर आपण प्रकाशचित्रण केले, तर नुसतीच नयनरम्य प्रकाशचित्रे न येता कलात्मक प्रकाशचित्रणाच्या उंबरठ्यावर आपण पोचलोच आहोत असे समजावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या