प्रकाशचित्रणाचे वेगवेगळे प्रकार 

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

सकाळी सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री अंथरुणावर पाठ टेकेपर्यंत प्रत्येक व्यक्ती दिवसभरात हजारो प्रतिमांना सामोरी जात असते. काही स्मरणात राहतात, तर असंख्य विसरल्या जातात. दैनंदिन जीवनातील प्रसंग सोडले तरीही आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या काही प्रतिमा आपण विसरू शकत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांच्या या प्रतिमांनी आपल्या मनावर गारुड केलेले असते. अर्थातच अशा प्रतिमांचा निर्माता असतो ‘प्रकाशचित्रकार.’ 

आज जवळजवळ प्रत्येकाच्या खिशात स्मार्ट फोन आहे. उच्च प्रतीचे कॅमेरे त्या स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध आहेत. पर्यायाने प्रत्येक व्यक्ती ही प्रकाशचित्रकार झालेली आहेच. त्यामुळे दिवसाचे कोणतेही क्षण ‘फ्रिज’ करून ठेवण्याची किमया मानवाला साधली आहे. जणू अंतर्धान पावणाऱ्या काळावर मिळवलेला हा विजयच आहे. त्या गेलेल्या क्षणांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी मिळवलेला विजय! 

कला व शास्त्र यांचा सुरेख संगम म्हणजे ‘प्रकाशचित्रकला’ होय. प्रकाशचित्रकार फोटोग्राफीमध्ये लपलेल्या सर्जनशीलतेचा जेव्हा शोध घेतो, त्यासाठी कष्ट घेतो तेव्हा ती कला म्हणून सादर होते; तर जेव्हा तो प्रकाशचित्र तांत्रिक बाबींनी परिपूर्ण करून यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती कला एक शास्त्र म्हणून पुढे येते. असा कला व शास्त्र यांचा संगम होत, अनोखे मिश्रण होत प्रतिमा तयार होतात व आपल्याला सामोऱ्या येतात. मग त्या छंदासाठी टिपलेल्या असोत किंवा व्यवसायासाठी! 

त्यामुळे जीवनाचे विविध रंग टिपणाऱ्या अनेकानेक प्रकारच्या प्रकाशचित्रांसाठी प्रकाशचित्रकलेच्या विविध शाखा आपल्याला अनुभवता येतात. त्यांतील काही प्रमुख अशा शाखांची आपण थोडक्‍यात ओळख करून घेऊ या. 

जाहिरात प्रकाशचित्रण (Advertising Photography) 
आपल्या वापरात असलेल्या प्रत्येक वस्तू अथवा सेवेच्या जाहिरातीसाठी वापरले जाणारे प्रत्येक प्रकाशचित्र हे जाहिरात प्रकाशचित्रण या प्रकारात मोडते. वस्तू अथवा सेवेचे वैशिष्ट्य जास्त परिणामकारकपणे व्यक्त करणारी ही प्रकाशचित्रे टिपण्यासाठी प्रकाशचित्रकाराला तंत्रावर प्रभुत्व असणे अतिशय गरजेचे असतेच; पण त्याच बरोबरीने त्या विषयानुरूप वैचित्र्यपूर्ण प्रतिमांसाठी लागणारी शोधक नजरही असावी लागते. ही एक स्वतंत्र व विशेष शाखा असल्याने यात लागणारी सामग्रीही (उदा. कॅमेरा, लेन्सेस, फ्लॅशलाईट्‌स, पार्श्‍वभूमी इत्यादी) वैशिष्ट्यपूर्ण असते. जाहिरात संस्था, मासिके, पुस्तके, कॅलेंडर्स, वेबसाइट्‌स यासाठी; तसेच वेगवेगळ्या प्रिंट माध्यमांसाठी लागणारी नजर-खेचक अशी प्रकाशचित्रे काढण्याची जबाबदारी प्रकाशचित्रकारावर असते. अर्थातच मोठ्या परिघाच्या या प्रकारात प्रकाशचित्रकाराला स्टुडिओमधील मॉडेल्स, विविध वस्तू, ॲक्‍शन सीन्स अथवा उपलब्ध नैसर्गिक वातावरण या कशालाही सामोरे जायला लागते. तशी तयारी असावी लागते. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय अथवा जाहिरात वा डिझाईन संस्थेत नोकरी असे या कामाचे स्वरूप असू शकते. सर्जनशीलता, तंत्राची माहिती, उत्तम सामग्री व अथक परिश्रम घेण्याची तयारी असेल, तर प्रकाशचित्रणाच्या या प्रकारात कारकीर्द करण्यास कशाच्याच मर्यादा नाहीत.

निसर्गचित्रण (Landscapes) :  फोटोग्राफीमध्ये सर्वांत जास्त वापरला जाणारा हा प्रकार आहे. डोंगर-दऱ्या, समुद्र किनारे, जंगले, नयनरम्य तळी, उद्याने हे सर्व घटक उत्तम निसर्गचित्र टिपण्यास आपल्याला उद्युक्त करतात. फोटोग्राफीच्या इतर प्रकारांच्या तुलनेत कमी सामग्री येथे वापरली जाते. एक उत्तम कॅमेरा, वाइड अँगल लेन्स, काही फिल्टर्स व मजबूत ट्रायपॉड ही झाली साधन सामग्री! शहराच्या बाहेर जेथे मानवनिर्मित अशी कोणतीही गोष्ट नाही, अशा शांत ठिकाणी पोचून आपण निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्याशी तद्रुप होत निसर्गचित्रण करू शकतो. यासाठी अर्थातच एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग्य अशा प्रकाशासाठी प्रतीक्षा करून अचूक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणे. शटरचे वेगवेगळे स्पीड वापरत आपण एरवी साध्या दिसणाऱ्या त्या निसर्गचित्रात प्राण फुंकू शकतो. कॅमेरा व पर्यायाने फोटो हलू नये म्हणून आपण अशा वेळी मजबूत ट्रायपॉड वापरणे हिताचे ठरते. फोटोग्राफीमधील हा प्रकार नैसर्गिक जगाच्या अद्‌भुततेची नवनवी दालने आपल्याला खुली करून देतोच; पण त्या बरोबरच ते सौंदर्य न्याहाळताना, टिपताना आपल्या मनात त्या असीम निसर्गाविषयी कृतज्ञतेचा भावही निर्माण करतो.

व्यावसायिक व औद्योगिक प्रकाशचित्रण (Commercial & Industrial Photography)  
वेगवेगळे व्यवसाय अथवा उद्योगांसाठी लागणारे प्रकाशचित्रण म्हणजे व्यावसायिक व औद्योगिक प्रकाशचित्रण होय. या प्रकारातील बरेचसे प्रकाशचित्रण हे त्या जागेवर म्हणजेच उद्योगांमध्ये जाऊन करावे लागते. त्यामुळे प्रवास करावा लागणे हे आलेच. एकापेक्षा जास्त असलेले प्रकाशस्रोत, चित्रविषयात घ्यावा लागणारा मोठा परिसर व वेळोवेळी येणाऱ्या अडथळ्यातून उपाय शोधत करावे लागणारे प्रकाशचित्रण अशी सर्वसाधारण परिस्थिती असते. मोठमोठ्या कारखान्यांतील इमारती, यंत्रसामग्री, उपकरणे, शॉप फ्लोअर, यंत्रनिर्माण, यंत्रांवर काम करताना कामगार, कंपनीचे अधिकारी, उत्पादने अशा वैविध्यपूर्ण विषयांची अत्यंत अचूक अशी प्रकाशचित्रे टिपणे हे या प्रकारात अपेक्षित असते. कोणता विषय केव्हा समोर असेल हे सांगता येत नसल्याने प्रकाशचित्रकाराला त्याच्या सर्व सामग्रीसह सदैव तयार असावे लागते. कंपनीचे वार्षिक अहवाल, कंपनीअंतर्गत वृत्तपत्रे, माहितीपत्रके, प्रदर्शने यासाठी प्रकाशचित्रे वापरली जात असल्याने त्यांचा दर्जा सर्वोत्तमच असावा लागतो. त्यामुळे उत्तम व्यवसाय-कौशल्ये व फोटोग्राफीच्या सर्व तंत्रांवर प्रभुत्व ही खासियत असलेली व्यक्ती व्यावसायिक व औद्योगिक प्रकाशचित्रण सहजी करू शकते. आर्ट डायरेक्‍टर्स, जाहिरात संस्था, ग्राफिक डिझायनर्स, प्रिंटर्स यांच्याशी सतत संपर्क होत असल्याने त्या विषयातील ज्ञानही सतत अद्ययावत करून घेणे अगत्याचे असते. तसेच या प्रकारातील ग्राहकवर्ग हाही आर्थिक, विपणन, संशोधन, अभियांत्रिकी, डिझाईन अशा विविध प्रकारच्या संस्थांतून येत असल्याने त्या प्रत्येक शाखेची योग्य अशी माहिती प्रकाशचित्रकाराला असणे आवश्‍यक ठरते.

व्यक्तिचित्रण (Portraiture) :  व्यक्तिचित्रण हा विषय फार पूर्वीपासून हाताळला गेला आहे. राजे-महाराजे आपली व्यक्तिचित्रे दरबारी चित्रकारांकडून काढून घेत असत. फोटोग्राफीच्या शोधानंतर हे काम सोपे झाले व आधी चित्रकार असलेले लोक फोटोग्राफर म्हणून काम करू लागले. फोटोग्राफीच्या बाल्यावस्थेत असा एक फोटो टिपण्यासाठी कॅमेऱ्यावर बराच काळ एक्‍स्पोजर द्यावे लागे. अर्थातच ज्या व्यक्तीचा फोटो टिपला जात असे, त्या व्यक्तीला बराच काळ स्थिर बसावे लागे. पण आज तंत्रज्ञानाच्या आधारे आपण निमिषार्धात उत्तमोत्तम ‘पोर्ट्रेट्‌स’ टिपू शकतो. प्रकाशचित्रणाचा हा प्रकार दोन भागात विभागता येईल. एक म्हणजे उपलब्ध प्रकाशातील व्यक्तिचित्रण व दुसरे म्हणजे स्टुडिओतील व्यक्तिचित्रण. कॅमेरा व लेन्स तीच असली, तरीही एकाच व्यक्तीच्या या दोन प्रकारातील व्यक्तिचित्रांत वेगळेपणा आढळतो. याचे कारण अर्थातच प्रकाशाचे वेगवेगळे स्रोत होय. तसेच त्याच व्यक्तीचा दुसऱ्या फोटोग्राफरने टिपलेला फोटोही वेगळाच भासू शकतो याचे कारण ‘व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती.’ हेच व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य ठरते. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भावभावनांचा खेळ टिपणे हा व्यक्तिचित्रणाचा गाभा आहे. मग ते फक्त चेहऱ्याचे प्रकाशचित्र असो, की त्या व्यक्तीचे पूर्णाकृती प्रकाशचित्र असो! आपण ज्या व्यक्तीचे प्रकाशचित्र टिपत आहोत, तिचा चेहरा व्यवस्थित ‘फोकस’ झाला असणे गरजेचे असते; खासकरून त्या व्यक्तीचे डोळे! कारण कोणत्याही ‘पोर्ट्रेट’मध्ये डोळेच सर्व संवाद साधत असतात. बरोबरीनेच ती व्यक्ती आरामदायी पद्धतीने उभी आहे अथवा बसली आहे हे पाहणे ही महत्त्वाची जबाबदारी फोटोग्राफरवर असते. या गोष्टी साधल्या, की नैसर्गिक भाव असलेले व्यक्तिचित्र आपोआपच जमून येते.

वृत्तपत्र प्रकाशचित्रण (Photo journalism) : We see, we understand; we see more, we understand more.. हे फिलिप जॉन ग्रिफिथ या फोटोजर्नालिस्टचे विधान चांगले वृत्तपत्रप्रकाशचित्रण पाहताना सहजच आठवते. आपण कोणतेही वर्तमान पत्र उघडले, की आपली पहिली नजर जाते ती त्यातील प्रकाशचित्रांवर! तेव्हा आपण अनुभवत असतो ‘फोटोजर्नालिझम.’ या प्रकारात प्रकाशचित्रकार प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना चित्रित करून ती बातमी आपल्यापर्यंत पोचवत असतो. असे म्हणतात, ‘एक हजार शब्द जे व्यक्त करू शकत नाहीत ते काम एक प्रकाशचित्र करते.’ पण म्हणजेच एक हजार शब्दांचा आशय सांगणारे प्रकाशचित्र टिपण्याचे कसब या प्रकारचे काम करणाऱ्या प्रकाशचित्रकाराकडे असणे आवश्‍यक आहे. उत्तम दर्जाचा कॅमेरा, काही लेन्सेस व चांगल्या पॉवरची फ्लॅशगन इतकी कमी सामग्री या प्रकारात लागते. पण त्या बरोबरीनेच बातमीसाठीची शोधक नजर, ताज्या घडामोडींची जाण अन विलक्षण चपळता ही त्या फोटो सामग्रीपेक्षाही महत्त्वाची अंगे असणे जरुरीचे ठरते. योग्य वेळी, योग्य ठिकाणी सजग उपस्थिती असेल तर एखाद्या ठरलेल्या कार्यक्रमात अनपेक्षित घटनेचा साक्षीदार होण्याचे भाग्य अशा प्रकाशचित्रकाराच्या नशिबात लिहिलेले असते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर छापून येणाऱ्या ‘स्टोरीज’ हे अशाच अथक प्रयत्नांचे फलित असते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या