उपलब्ध प्रकाशातील प्रकाशचित्रण (व्यक्तिचित्रण - भाग १)

सतीश पाकणीकर
गुरुवार, 28 जून 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

फार पूर्वीपासून स्वतःचे व्यक्तिचित्र काढून घेण्याची आवड माणसाला आहे. पूर्वीच्या काळी हे काम चित्रकलेद्वारे चित्रकार करीत असे. पुढे प्रकाशचित्रकलेचा उदय झाला. व्यक्तिचित्रण कॅमेऱ्याने करणे सोपे झाले. आज जगातील सर्वांत जास्त कॅमेऱ्यांद्वारे जर कोणते फोटो टिपले जात असतील असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर खचितच ‘व्यक्तिचित्रण’ हेच असेल. एखाद्याचा प्रश्न असाही असू शकेल की व्यक्तिचित्रणच का? तर त्याला उत्तर मिळेल, की कोणताही एक चेहरा दुसऱ्यासारखा नाही. त्यामुळे येणारी विविधता ही सर्जनशील कलाकाराला सतत साद घालत असते. आज तर मोबाईल कॅमेऱ्यामुळे अशी व्यक्तिचित्रे टिपणे सुकर झाले आहे. त्यामुळे तुम्ही हे वाचत असतानाही जगाच्या पाठीवर, कोठे न कोठे, कोणीतरी प्रकाशचित्रकार त्याच्या मॉडेलला सूचना करीत, त्याच्या मनातले व्यक्तिचित्र कॅमेऱ्यात पकडण्याची धडपड करीतच असेल हे नक्की.

व्यक्तिचित्रण ही प्रकाशचित्रकलेतील एक महत्त्वाची, सोपी वाटणारी व सहज आजमावता येणारी शाखा असली तरीही ती खूपच आव्हानात्मक आहे हे कोणीही मान्य करेल. कारण या प्रकारात चित्रित होणाऱ्या व्यक्तीच्या सौंदर्यापेक्षा त्या व्यक्तीचे भाव, त्या व्यक्तीचे अंतरंग उलगडून दाखवण्याची जबाबदारी त्या प्रकाशचित्रकारावर असते. तो ती कोणत्या पद्धतीने निभावतो यावर त्या फोटोचे यश अवलंबून असते.

सर्वसाधारणपणे ५० एमएम ते २०० एमएम नाभीय अंतराच्या (फोकल लेन्थ) लेन्स वापरून आपण व्यक्तिचित्रण करू शकतो. मोठ्या ॲपर्चरची लेन्स उपलब्ध असेल तर जास्त चांगले. कारण त्यामुळे डेप्थ ऑफ फील्ड वर नियंत्रण आणून,  पार्श्वभूमी धूसर (आउट ऑफ फोकस) ठेवून आपण व्यक्तीला महत्त्व देऊ शकतो.

सूर्य हा आपला सर्वोत्तम असा प्रकाशाचा स्रोत आहे. हा प्रकाशस्त्रोत आपण कोणत्या वेळी वापरत आहोत याचे भान ठेवावे लागते. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी, सूर्यप्रकाशाची तीव्रता सौम्य असते. तो तिरप्या रेषेत आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पडणाऱ्या सावल्याही तिरप्या पडतात. व्यक्तिचित्रणात चेहऱ्याची वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी अशा प्रकाशाचा फार उपयोग होतो. साधारणपणे व्यक्ती व प्रकाशाचा स्रोत यामध्ये ३० ते ४५ अंशाचा कोन तयार झाल्यास पडणाऱ्या सावल्यांमुळे ‘छाया-प्रकाशाचा’ उत्तम खेळ प्रकाशचित्रात पाहायला मिळतो. पण ही वेळ टळली तर पडणाऱ्या सावल्या या तीव्र व करकरीत होत जातात व ते प्रकाशचित्रास मारक ठरते. तीव्र अशा प्रकाशामुळे पडणाऱ्या सावल्या सौम्य करण्यासाठी आपल्याला डिफ्युजर (अर्ध पारदर्शक कपडा अथवा कागद) किंवा रिफ्लेक्‍टर (प्रकाश परावर्तित करण्यासाठी चमकदार पृष्ठभाग) यांची मदत होऊ शकते. अर्थात हे दोन्ही वापरण्याचीही पद्धत आहे. डिफ्युजर हा प्रकाशाचा स्रोत व ज्या व्यक्तीचे प्रकाशचित्र घेतोय त्याच्यामध्ये धरावा लागतो. रिफ्लेक्‍टरचा वापर हा प्रकाशाच्या स्त्रोताच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो.

अशा प्रकारच्या प्रकाश योजनेत व्यक्तीच्या नाकाची सावली प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला पडते. व्यक्तीच्या नाकाची उंची, डोळ्यांची ठेवण यानुसार सावली पडत असल्याने प्रत्येक व्यक्तीगणिक प्रकाशचित्राच्या रचनेत थोडा बदल करावा लागतो. प्रकाशस्त्रोताचा प्रभावी वापर हा प्रत्येक यशस्वी प्रकाशचित्राचा आत्मा असतो. त्याचप्रमाणे प्रकाशचित्रात जिवंतपणा येण्यासाठी व्यक्तीच्या डोळ्यात प्रकाशस्त्रोताचे छोटे प्रतिबिंब दिसणे आवश्‍यक असते. कारण प्रकाशचित्रातील व्यक्तीच्या डोळ्यांद्वारेच प्रेक्षकांशी संवाद साधला जातो.

सूर्य आकाशात असताना पण त्याचा करकरीत प्रकाश न वापरता आपण सावलीमध्येही प्रकाशचित्रे टिपू शकतो. व्यक्तीला सावलीत उभे करून अथवा बसवून रिफ्लेक्‍टरने प्रकाशकिरणे परावर्तित करूनही उत्तम व्यक्तिचित्रे टिपता येतात. अशा प्रसंगात पार्श्वभूमीवरील असलेला प्रकाश व त्याची तीव्रता याच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. तो खूप कमी अथवा खूप जास्त असल्यास कॅमेऱ्यातील एक्‍स्पोजर मीटर चुकीचे रीडिंग दाखवू शकते. त्याने प्रकाशचित्राच्या एकस्पोजरमध्ये चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी प्रकाशाचा हा विचार गरजेचा असतो.

याखेरीज उपलब्ध प्रकाश म्हणजे आपल्या घरात असलेले टंगस्टन,हॅलोजन, फ्लुरोसंट व आजकालचे एल ई डी लाईट्‌स यांनी मिळणारा प्रकाश. अर्थातच आपण या प्रकारच्या प्रकाशातही उत्तम प्रकाशचित्रे टिपू शकतो. या लाईट्‌सची तीव्रता ही सूर्यप्रकाशाच्या मानाने फारच क्षीण असल्याने आपल्याला कॅमेऱ्यावर एकतर सर्वांत मोठे ॲपर्चर वापरावे लागेल किंवा आयएसओ (ISO) वाढवायला लागेल किंवा शटर स्पीड कमी ठेवावा लागेल. असे करताना मग आपला कॅमेरा ट्रायपॉडवर असणे गरजेचे ठरेल.

कोणत्याही उपलब्ध प्रकाशात आपण फोटोग्राफी करत असलो तरीही त्या बदलत्या प्रकाशाचा रंग पाहून आपल्याला कॅमेऱ्याचा व्हाइट बॅलन्स ठरवावा लागेल. व्यक्तीचित्रणामध्ये आपण रंगीत चित्रणाबरोबरच परिणामकारकपणे कृष्णधवल चित्रणही करू शकतो. कृष्णधवल चित्रण करताना चित्रचौकटीत येणाऱ्या सर्व रंगांचे रूपांतर काळ्या-पांढऱ्या छटांमध्ये होणार असल्याने व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा रंग व पार्श्वभूमीचा रंग यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्याप्रमाणेच पार्श्वभूमीवर असलेल्या चित्रास मारक ठरणाऱ्या गोष्टी, घटक टाळणे महत्त्वाचे असते.

थोडक्‍यात कोणत्याही प्रकारचे व्यक्तिचित्रण करताना पुढील काही घटक विचारात घेणे गरजेचे असते-

  • आपल्या जवळ असलेल्या कॅमेऱ्याची, लेन्सेसची व इतर उपकरणांची योग्य माहिती आपल्याला हवी. एकदम नवीन व प्रथमच वापरत असलेला कॅमेरा अथवा लेन्स आयत्यावेळी चूक घडवू शकतात.
  • कोणत्या प्रकारचे व्यक्तिचित्रण आपण करणार आहोत त्याचा विचार काम सुरू करण्यापूर्वी करायला हवा. फोटोग्राफीचा अभ्यास व सराव झाल्यावर मग फॅशन फोटोग्राफी करायची झाल्यास यश येण्याची शक्‍यता खूप वाढते.
  • योग्य मॉडेल निवडून प्रकाशचित्रण करणे केव्हाही श्रेयस्कर. असे मॉडेल निवडावे की ज्यांना आपली प्रकाशचित्रे काढून घेणे आवडते. सुंदर नव्हे तर मॉडेल ‘फोटोजनिक’ असणे जास्त महत्त्वाचे.
  • मॉडेलला एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून मान देणे आवश्‍यक. मॉडेलशी सुसंवाद साधत आपल्याला हवे तसे भाव चेहऱ्यावर आल्यानंतर ते टिपणे महत्त्वाचे. यात सुरवातीचे काही फोटो वाया जाण्याची शक्‍यता गृहीत धरायला हवी. पण का एकदा तुमचे मॉडेलशी ट्युनिंग जमले, की मग तुमच्या खात्यात चांगली प्रकाशचित्रे आलीच म्हणून समजा.
  • व्यक्तिचित्रण करताना कोणत्याही प्रकारची घाई करणे योग्य नाही. तुम्ही स्वतः ही करू नका व मॉडेललाही करायला लावू नका. कारण प्रकाशचित्रात भावदर्शन महत्त्वाचे आहे व घाई झाल्याने त्याला अडचण येऊ शकते. घाईत असताना आपणही तंत्रातील एखादी चूक करण्याची शक्‍यता असते.
  • प्रकाशचित्रणाचे सर्व नियम जाणून घेतल्यावरच ते मोडायचा प्रयत्न करावा.

इतक्‍या गोष्टी ध्यानात घेऊन, तंत्रावर पकड घेऊन केलेले व्यक्तिचित्रण तुम्हाला व तुम्ही ज्याचे प्रकाशचित्रण करीत आहात त्यांना आनंद दिल्यावाचून राहणार नाही.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या