स्टुडिओतील प्रकाशचित्रण (व्यक्तिचित्रण - भाग २)

सतीश पाकणीकर
मंगळवार, 17 जुलै 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी पासपोर्ट फोटो काढून घेण्यासाठी स्टुडिओची पायरी चढलेला असतो. तेथे असणारे फ्लॅश लाईट्‌स, त्याच्यावरील छत्र्या किंवा सॉफ्ट बॉक्‍सेस, कॅमेरा स्टॅंड, रिफ्लेटर्स, पार्श्वभूमीचे पेपर रोल हे पाहून जरासे गांगरूनही गेल्याचे आठवत असेल. पण एकदा का तो फोटो काढून घेण्याचा सोपस्कार पूर्ण झाला की मात्र आपण त्याच्या येणाऱ्या रिझल्टसाठी आतुरलेले असल्याचेही आपल्याला आठवत असेल. उपलब्ध प्रकाशातील प्रकाशचित्रणाची जशी एक वेगळी मजा असते. वेगळा आनंद असतो तशीच मजा व आनंद स्टुडिओतील प्रकाशचित्रणातही अनुभवायला मिळतो. तसे पाहिले तर स्टुडिओतील प्रकाशचित्रणात जवळजवळ सर्व घटक हे त्या प्रकाशचित्रकाराच्या पूर्ण नियंत्रणात असतात.

बाहेरील प्रकाशचित्रणात बदलत असणारी प्रकाशाची तीव्रता, पार्श्वभूमी, बदलते हवामान, मॉडेलला कपडे बदलण्यासाठी असणारी असुविधा या सर्व गोष्टींवर स्टुडिओतील प्रकाशचित्रणात मात करता येते. दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण स्टुडिओतील प्रकाशचित्रण करू शकतो. इतक्‍या साऱ्या जमेच्या बाजू असताना नवोदित प्रकाशचित्रकाराला त्याचे आकर्षण न वाटले तरच नवल. स्टुडिओतील प्रकाशचित्रण हे बहुतांशवेळी आपल्याला कामाचे समाधान मिळवून देतेच पण केवळ एखाद्याच घटकाकडे झालेले आपले दुर्लक्ष आपले प्रकाशचित्र धुळीला मिळवू शकते. आजकालच्या डिजिटल तंत्रज्ञानाने मात्र आता तीही शक्‍यता धूसर केली आहे कारण क्‍लिक केल्याच्या पुढच्याच क्षणी कॅमेऱ्याच्या मागील स्क्रीनवर चित्र अवतरते. आपली झालेली चूक आपल्या ध्यानात येते व आपण ती चूक लगेचच दुरुस्तही करू शकतो. आज जर आपल्याला स्टुडिओत प्रकाशचित्रण करायचे असेल तर भाड्याने मिळणारे स्टुडिओ उपलब्ध असतात. आपल्या कामाच्या जरुरीप्रमाणे लहान अथवा मोठ्या आकारातील स्टुडिओ आपण वापरू शकतो. कित्येक स्टुडिओ तर कॅमेऱ्यासाहित सर्व साहित्यानिशी सज्ज असतात. आपण तेथे जाऊन पुढच्याच मिनिटाला प्रकाशचित्रण सुरू करू शकतो. पण असा एखादा स्टुडिओ उपलब्ध नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. साधारण चार मीटर रुंद व पाच मीटर लांब असलेल्या एखाद्या खोलीचाही आपण स्टुडिओ म्हणून उपयोग करू शकतो. अशा वेळी लागणारी उपकरणे म्हणजे आपला स्वतःचा कॅमेरा व लेन्सेस, स्टॅंड्‌स काही फ्लॅश लाईट्‌स, त्यातून बाहेर पडणाऱ्या तीव्र प्रकाशाला मंद करण्यासाठी असणाऱ्या छत्र्या किंवा सॉफ्ट बॉक्‍सेस, पार्श्वभूमीसाठी कागदाचे रोल अथवा कापड, हार्ड लाईटसाठी असणारे हनीकोंब व स्नूट, प्रकाशाचे परावर्तन करण्यासाठी असणारे रिफ्लेक्‍टर्स. झाला आपला स्टुडिओ तयार.

या उपकरणांपैकी फ्लॅश लाईट्‌सचा वापर म्हणजे सूर्यप्रकाशाला असलेला पर्याय. या लाईटमध्ये एका फ्लॅश ट्यूबबरोबर कॅपॅसिटर्स, इंडक्‍टर्स, डायोड्‌स व रेझिस्टर्स यांचे मिळून एक इलेक्‍ट्रॉनिक सर्किट बसवलेले असते. या सर्किटमधील कॅपॅसिटर्स हे विद्युत प्रवाह देऊन विद्युतभारित (चार्ज) केले जातात. इंडक्‍टर्स, डायोड्‌स व रेझिस्टर्स यांच्या साहाय्याने या विद्युतभाराचे रूपांतरण फ्लॅश ट्यूबच्या साहाय्याने तत्काळ पण क्षणिक व तेजस्वी प्रकाशात केले जाते. (यालाच आपण फ्लॅश उडाला असे म्हणतो.) स्टुडिओसाठी असलेल्या अशा प्रत्येक फ्लॅश लाईटवर एक ‘स्लेव्ह’ युनिट बसवलेले असते जे स्टुडिओत असलेल्या प्रत्येक फ्लॅश लाईटला एकाच वेळी ट्रिगर करण्यास मदत करते. ज्यामुळे कॅमेऱ्याचे क्‍लिक बटण दाबताच आपण वापरत असलेले सर्व फ्लॅश एकाच वेळी प्रकाशमान होतात. या फ्लॅशवर आपण जरुरी प्रमाणे छत्र्या किंवा सॉफ्ट बॉक्‍सेस, हनीकोंब व स्नूट वापरू शकतो. फ्लॅश फोटोग्राफी करताना त्या फ्लॅशला कॅमेऱ्याचा शटर स्पीड समक्रमित (synchronize) असावा लागतो. हे काम आपण फ्लॅशला एक सिन्क्रो केबल जोडून किंवा रिमोट सिन्क्रो वापरून करू शकतो. 

उदाहरणार्थ बहुतेक सर्व कॅमेऱ्यात १/१२५ हा शटर स्पीड समक्रमित स्पीड म्हणून ठरवलेला असतो. या स्पीडच्या खालील (स्लो) म्हणजे १/६०, १/३०, १/१५, १/८, १/४, १/२.... हे सर्व शटर स्पीड समक्रमित होतात, पण त्यावेळी कॅमेरा हलू नये यासाठी तो ट्रायपॉडवर असणे गरजेचे ठरते. परंतु १/१२५ या शटर स्पीडच्या वरील (फास्ट) म्हणजे १/२५०, १/५००, १/१००० हे शटर स्पीड समक्रमित होत नाहीत. कारण फ्लॅशच्या प्रकाशमान असण्याच्या कालावधीच्या आधीच शटर बंद झालेले असते. यासाठी कॅमेऱ्यावर शटर स्पीड काय ठेवला आहे हे सर्वांत आधी बघावे. त्यानंतर फ्लॅशची तीव्रता तपासावी. (बऱ्याच फ्लॅशला तीव्रता कमी- जास्त करण्याची सोय असते.) कॅमेरा लेन्सवर ठेवलेले ॲपर्चर व ठेवलेला आयएसओ या गोष्टींची खातरजमा करावी. ही सेटिंग्ज तपासल्यावर महत्त्वाचे असते ते अचूक असे ‘एक्‍स्पोजर’. येथे एक महत्त्वाची बाब ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की ‘फ्लॅश फोटोग्राफी करताना कॅमेऱ्यामधील एक्‍स्पोजर मीटरचा काहीही उपयोग नसतो. ‘त्यासाठी वेगळे अत्याधुनिक असे फ्लॅशमीटर वापरावे लागते. हे फ्लॅशमीटर फ्लॅशच्या तीव्रतेबरोबरच उपलब्ध प्रकाशाचेही मोजमाप करते. पण असे फ्लॅशमीटर जर आपल्याजवळ नसेल तर मात्र कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर पाहून व त्या प्रकाशचित्राचा हिस्टोग्राम पाहून अचूक एक्‍स्पोजर ठरवता येते.

स्टुडिओत फ्लॅशने प्रकाशचित्रण करताना फ्लॅशचा वापर चार प्रकारे केला जातो.

  • की लाईट (प्रकाशाचा मुख्य स्रोत)
  • फिल लाईट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी)
  • हेअर लाईट (व्यक्तीच्या केसांचा भाग पार्श्वभूमीपासून उठावदार व्हावा यासाठी)
  • बॅकग्राऊंड लाईट (पार्श्वभूमीसाठी वापर)

याशिवाय प्रकाश परावर्तित करण्यासाठी रिफ्लेटर्स वापरले जातात. तसेच काही स्पेशल इफेक्‍ट्‌स निर्माण करण्यासाठीही फ्लॅश वापरले जातात. अर्थात आपला सर्वांचा प्रकाशाचा स्रोत ‘सूर्य’ हा फक्त एकच असल्याने त्याच्यामुळे पडणाऱ्या सावल्यांप्रमाणे जर आपण आपल्या फ्लॅश वापरून टिपलेल्या प्रकाशचित्रात सावल्या आणू शकलो तर ते नेहमीच जास्त प्रभावी ठरते. सूर्याच्या आभाळातील वेगवेगळ्या स्थानांप्रमाणे जर आपण आपल्या मुख्य प्रकाश स्त्रोताची (फ्लॅशची) रचना करत गेलो, तर एकाच व्यक्तीच्या चेहऱ्यात बदलणाऱ्या सावल्यांमुळे आपल्याला वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. त्यातील उत्तम अशी फ्लॅशची रचना निवडून आपण आकर्षक स्टुडिओ पोट्रेट निर्माण करू शकतो. याच्या बरोबरीनेच मॉडेलने केलेला मेक-अप हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा प्रकाशचित्र आकर्षक ठरण्यात उपयुक्त होतो.

या प्रकारच्या प्रकाशचित्रणातही कॅमेऱ्याची, लेन्सेसची व इतर उपकरणांची योग्य माहिती, कोणत्या प्रकारचे व्यक्तिचित्रण आपण करणार आहोत त्याचा विचार, सुंदर नव्हे तर मॉडेल ‘फोटोजनिक’ असणे, मॉडेलला एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून मान देणे, कोणतीही घाई न करणे, प्रकाशचित्रणाचे सर्व नियम जाणून घेतल्यावरच ते मोडायचा प्रयत्न करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्यास यशस्वी व्यक्तिचित्रण करणे फार अवघड नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या