वेगवेगळ्या प्रकाशयोजना (व्यक्तिचित्रण - भाग १)

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.
 

एक अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळा आला असेल. तुम्ही कोणाचा पोट्रेट फोटो काढण्यासाठी सरसावला आहात, अन्‌ ती व्यक्ती म्हणते की ‘नको, माझा फोटो काढलेले मला आवडत नाही. किंवा ‘नको, माझा फोटो चांगला येत नाही.’ असे असेल तर खुशाल समजा, की त्या व्यक्तीला, तुम्ही तिचा फोटो काढता आहात याचा मनातून आनंद झालेला आहे. हे मी माझ्या अनुभवाच्या आधारे सांगतो आहे. हा फोटोसेशन उपलब्ध प्रकाशातला असो अथवा स्टुडिओतील फ्लॅश वापरून केलेला असो, समोरची व्यक्ती जर आपल्याबरोबरच या प्रकाशचित्रणाच्या अनुभवाची मजा घेत असेल तर ते एक ‘टीमवर्क’ बनून जाते. स्वाभाविकच निर्माण होणारा परिणाम उत्तम अशी प्रकाशचित्रेच असतो. स्टुडिओत काम करताना जवळ जवळ सर्व घटक प्रकाशचित्रकाराच्या नियंत्रणात असतात. त्यामुळे त्याला पाहिजे तसा भाव मॉडेलच्या चेहऱ्यावर येईपर्यंत किंवा फोटोत अपेक्षित परिणाम येईपर्यंत, तो वारंवार प्रकाशचित्रे टिपू शकतो.

त्यासाठी तो कधी त्याची जागा, त्याचा अँगल बदलतो तर कधी त्याच्या फ्लॅशच्या रचना ! मॉडेल त्यावेळी किती उल्हसित व आरामदायक स्थितीत आहे यावर मॉडेलच्या चेहऱ्यावरील भाव अवलंबून असतील पण फोटोतील छायाप्रकाशाचा खेळ मात्र फोटोग्राफरने प्रकाशयोजना कशी केली आहे यावर अवलंबून असेल. सर्वसाधारणपणे स्टुडिओ पोट्रेट फोटोग्राफीसाठी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशयोजना करता येतात. या प्रत्येक प्रकाशयोजनेमुळे प्रकाशचित्रात दिसणारा छाया-प्रकाशाचा खेळ वेगवेगळा परिणाम दर्शवतो. असे असले तरीही या पाच प्रकाशयोजना म्हणजे काही नियम नाही. सूर्य या एकमेव प्रकाशस्त्रोताच्या उजेडाचा, त्याच्या किरणांच्या तिरपेपणाचा अभ्यास करून, तसा परिणाम स्टुडिओ पोर्ट्रेटमध्ये निर्माण करण्याचे काम बऱ्याचवेळा प्रकाशचित्रकार करीत असतो. अर्थातच अवकाशात जशा सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत अगणित जागा/स्थिती असतात व त्याच्या जागेनुसार आपल्याला छायेचा खेळ अनुभवता येतो. त्याप्रमाणेच स्टुडिओत फ्लॅश लाईटच्याही अगणित जागा असू शकतात. त्यामुळे स्टुडिओ पोट्रेट फोटोग्राफीसाठी पाच प्रकाशयोजना प्रमाणित केल्या गेल्या आहेत. व्यक्तीच्या चेहऱ्याच्या ठेवणीप्रमाणे आपण त्यात बदल करू शकतो व अपेक्षित परिणाम साधू शकतो.

काय आहेत या प्रमाणित प्रकाशयोजना?
१. पॅरामाऊंट किंवा बटरफ्लाय लायटिंग २. लूप लायटिंग ३. रेम्ब्रांट लायटिंग ४. स्प्लिट लायटिंग ५. प्रोफाइल किंवा रिम लायटिंग या प्रत्येक प्रकाशयोजनेत फ्लॅशलाईटच्यासाठी वापरली जाणारी नावे म्हणजे

 • की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत)
 • फिल-लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी)
 • हेअर-लाइट (व्यक्तीच्या केसांचा भाग पार्श्वभूमीपासून उठावदार व्हावा यासाठी)
 • बॅकग्राऊंड-लाइट (पार्श्वभूमीसाठी वापर)
 • रिफ्लेक्‍टर किंवा परावर्तक

स्टुडिओ पोट्रेट प्रकाशचित्रण करताना व्यक्तीच्या चेहऱ्याच्या ठेवणीचा अंदाज घेऊन प्रथम ‘की-लाइट’ (प्रकाशाचा मुख्य स्रोत) नियोजित करावा व मग इतर लाईट्‌सची रचना करावी. केसांची छाया चेहऱ्यावर पडत नाही ना याची काळजी घ्यावी. तसेच जर ती व्यक्ती डोळ्यांवर चष्मा घालत असेल तर ‘की लाइट’ चष्म्याच्या काचेत चमकत नाही ना याचीही खात्री करून घ्यावी.या सर्व प्रकाशयोजानांमध्ये एक गोष्ट लक्षात घेता येईल, की जसजसे आपण पॅरामाऊंट लाइटिंगकडून रिम लाइटिंगकडे जातो, तसतसा प्रकाशचित्रित व्यक्तीचा चेहरा सडपातळ झाल्याचा आभास आपल्याला होतो. 

तसेच या प्रकाशचित्रात चेहऱ्यावरील पोताचा प्रभाव पण वाढतो. की-लाइट हा सूर्याच्या स्थितीप्रमाणे बदलत जाताना दिसतो. 

... प्रथम कॅमेऱ्याच्या बाजूस असलेला की-लाइट एका बाजूस सरकत जातो, तसेच त्याची उंचीही कमी कमी होत जाते. की-लाईटची उंची ही मॉडेलच्या डोक्‍याच्या उंचीच्या खाली जात नाही.

पॅरामाऊंट किंवा बटरफ्लाय लायटिंग 
अमेरिकेतील पॅरामाऊंट मोशन पिक्‍चर्स या संस्थेने त्यांच्या सिनेनट्यांची ग्लॅमरस प्रकाशचित्रे टिपण्यासाठी वापरलेले लायटिंग म्हणून या प्रकाशयोजनेचा ‘पॅरामाऊंट लायटिंग’ असे नाव पडले. या प्रकाशयोजनेचे अजून एक नाव आहे ते म्हणजे ‘ग्लॅमर लायटिंग’. तसेच या प्रकारच्या लाइटिंगमध्ये व्यक्तीच्या नाकाखाली बटरफ्लायच्या आकाराची सावली पडत असल्याने ते ‘बटरफ्लाय लायटिंग’ म्हणूनही ओळखले जाते. या प्रकाशयोजनेत गालाची हाडे व त्वचेचा पोत यांना जास्त महत्त्व मिळत असल्याने जास्त करून स्त्रियांचे फोटो टिपताना याचा वापर केला जातो.

 • की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत)-  
 • व्यक्तीच्या नाकाच्या समोरील रेषेत उंचीवरून दिला जातो.
 • फिल-लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी)
 • व्यक्तीच्या डोक्‍याच्या उंचीवरून व की-लाईटच्या बरोबर खाली ठेवून दिला जातो. की-लाइट व फिल-लाइट हे दोन्ही कॅमेऱ्याच्या एकाच बाजूस असल्याने व्यक्तीच्या जवळून व या दोन्ही लाईटच्या विरुद्ध दिशेने रिफ्लेक्‍टर वापरला जातो.
 • हेअर-लाइट (व्यक्तीच्या केसांचा भाग पार्श्वभूमीपासून उठावदार व्हावा यासाठी)  की-लाईटच्या विरुद्ध बाजूने व व्यक्तीच्या डोक्‍याच्यावरून केसांचा भाग पार्श्वभूमीपासून उठावदार व्हावा यासाठी वापरला जातो.
 • बॅकग्राऊंड-लाइट (पार्श्वभूमीसाठी वापर)
 • व्यक्तीच्या मागे, खालील बाजूस व पार्श्वभूमीच्या दिशेने वापरला जातो. प्रकाशाचा झोत अर्धगोलाकृती आकारात वापरल्यास पार्श्वभूमी हळूहळू गडद होत जाण्यास मदत होते.
 • लूप लायटिंग ः लूप लाइटिंगमध्ये पॅरामाऊंट लाइटिंगपेक्षा अगदी थोडासाच बदल केला जातो. सर्वसामान्य तसेच अर्धगोलाकृती चेहऱ्यांच्या व्यक्तींची प्रकाशचित्रे टिपताना या प्रकाशयोजनेचा भरपूर वापर केला जातो.
 • की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत)
 • पॅरामाऊंट लाइटिंगपेक्षा थोडासा खाली व व्यक्तीच्या दिशेने सरकवून याची जागा निश्‍चित केली जाते. त्यामुळे व्यक्तीच्या नाकाखालाची सावली सरकून की- लाईटच्या विरुद्ध दिशेच्या गालावर व हनुवटीवर मिसळून जाते. 
 • फिल लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी) 
 • फिल-लाइट हा आधीच्या स्थानाच्या बरोबर विरुद्ध दिशेला ठेवला जातो. फिल लाईटमुळे वेगळी छाया तयार होणार नाही ही काळजी घेऊन त्याच्या प्रकाशझोताची तीव्रता ठरवावी लागते. ज्यामुळे आपण एकाच प्रकाशस्त्रोत वापरत आहोत असा भास होईल. (कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाईंडरमधून आपण याचा अंदाज घेऊ शकतो.) 
 • हेअर-लाइट व बॅकग्राऊंड-लाइट - 
 • हे दोन्ही लाइट आधीच्याच ठिकाणी. म्हणजेच पॅरामाऊंट किंवा बटरफ्लाय लाइटिंगप्रमाणेच राहतील.

     रेम्ब्रांट लायटिंग , स्प्लिट लायटिंग व प्रोफाइल किंवा रिम लायटिंग या विषयी पुढील लेखात ...  
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या