स्टुडिओतील व्यक्तिचित्रण (भाग २)

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

पॅरामाऊंट किंवा बटरफ्लाय लाइटिंग व लूप लाइटिंग या दोन प्रकारच्या लाइटिंगची माहिती आपण गेल्या लेखात करून घेतली. त्यात प्रकाशचित्रात आपण जे लाइट वापरले होते त्यात की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत) व फिल लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी) या दोन्ही लाईटवर प्रकाश सौम्य करण्यासाठी सॉफ्ट बॉक्‍सेस वापरले होते. तीच सर्व रचना पुढील काही प्रकारांसाठीही वापरली आहे. सौम्य प्रकाश वापरण्याचे एकूण सौंदर्यशास्त्र हे केवळ फॅशनच्या जगातील प्रतिमांचे अनुकरण करण्यासाठी नव्हे, तर ते वापरल्याने आपल्याला सुंदर प्रकाशचित्रे टिपणे सोपे जाते. व्यक्तीचित्रणात मोठे सौम्य प्रकाशस्रोत वापरल्याने मुळातच चित्रविषय सौम्य प्रकाशात उजळला जात असल्याने त्याला वेगळ्याच प्रकारचा मोहकपणा प्राप्त होतो. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील लहान मोठे व्रण अथवा दोष झाकले जातात व नंतर प्रकाशचित्रावर कमीत कमी परिष्करण करावे लागते. त्यातच जर आपण बाजारात मिळणारा विशिष्ट प्रकारचा ‘सॉफ्ट फोकस फिल्टर’ कॅमेऱ्यावर वापरला तर प्रकाशचित्रातील करकरीतपणा नाहीसा होतो व व्यक्ती जास्त मोहक दिसू लागते. अर्थात हे सर्व व्यक्तीगणिक बदलणारे असल्याने तो नियम नसून एक मार्गदर्शक तत्त्व आहे हे लक्षात ठेवणे अगत्याचे आहे.

रेम्ब्रांट लाइटिंग 
 याचेच अजून एक नाव म्हणजे ४५ अंशाच्या कोनातील लाइटिंग. यामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्याच्या ज्या बाजूस (गालावर) छाया पडलेली असते तेथे एक त्रिकोणी आकाराचा प्रकाशाचा कवडसा (हाय लाइट) पडलेला दिसतो. सोळाव्या शतकातील प्रसिद्ध डच चित्रकार रेम्ब्रांट याच्या चित्रातून आपल्याला या प्रकारचा छाया-प्रकाशाचा खेळ बघायला मिळतो. त्यामुळे या प्रकाशयोजनेचे रेम्ब्रांट लाइटिंग असे नामकरण करण्यात आले आहे. अतिशय नाट्यपूर्ण अशी ही प्रकाशयोजना आहे. ही प्रकाशयोजना बऱ्याचदा पुरुष मॉडेलसाठी वापरली जाते.

     की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत) ः  लूप लाइटिंगपेक्षा थोडासा खाली व व्यक्तीच्या दिशेने सरकवून याची जागा निश्‍चित केली जाते. त्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्याच्या छाया असलेल्या बाजूस गालावर एक त्रिकोणाकृती हाय लाइट निर्माण होतो.
     फिल लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी) - फिल-लाइट हा आधीच्या म्हणजेच लूप लाइटिंगमधील त्याच्या जागेवर तसाच राहतो. फिल-लाईटमुळे वेगळी छाया तयार होणार नाही ही काळजी घेऊन त्याच्या प्रकाशझोताची तीव्रता ठरवावी लागते. ज्यामुळे आपण एकच प्रकाशस्त्रोत वापरत आहोत असा भास होईल. (कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाईंडरमधून आपण याचा अंदाज घेऊ शकतो.) 

हेअर-लाइट व बॅकग्राऊंड-लाइट 
हे दोन्ही लाइट आधीच्याच ठिकाणी. म्हणजेच पॅरामाऊंट किंवा लूप लाइटिंगप्रमाणेच राहतील.

स्प्लिट लाइटिंग 
 या प्रकाशयोजनेत व्यक्तीचा अर्धा चेहरा प्रकाशाने उजळतो. तर अर्ध्या चेहऱ्यावर छाया असते. गोलाकार चेहऱ्याची गोलाई जर कमी भासवायची असेल तर ही प्रकाशयोजना उत्तम ठरते. तसेच चेहऱ्यातील असलेला एखादा दोष अथवा एखादे वैगुण्य झाकायचे असेल तरीही ही प्रकाशयोजना करता येते. प्रकाशचित्रात जास्तीतजास्त नाट्यमयता निर्माण करायची झाल्यास फिल लाइट न वापरता ही प्रकाशयोजना वापरल्यास असे नाट्य निर्माण करता येते.

     की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत)  आधीच्या इतर लाइटिंगपेक्षा थोडासा खाली व व्यक्तीच्या दिशेने अजून जास्त सरकवून याची जागा निश्‍चित केली जाते. त्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर एका बाजूस पूर्ण छाया निर्माण होते. व्यक्तीचा चेहरा अर्थातच कॅमेऱ्याकडे असणे गरजेचे आहे.

     फिल लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी) - फिल-लाइट हा आधीच्या म्हणजेच लूप व रेम्ब्रांट लाइटिंगमधील त्याच्या जागेवर तसाच राहतो. फिल-लाईटमुळे वेगळी छाया तयार होणार नाही ही काळजी घेऊन त्याच्या प्रकाशझोताची तीव्रता ठरवावी लागते.

  हेअर-लाइट व बॅकग्राऊंड-लाइट हे दोन्ही लाइट आधीच्याच ठिकाणी. म्हणजेच पॅरामाऊंट, लूप, किंवा रेम्ब्रांट लाइटिंगप्रमाणेच राहतील.

प्रोफाइल किंवा रिम लाइटिंग 
या प्रकाशयोजनेत व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यापासून ९० अंशाच्या कोनात वळून मुख्य प्रकाशस्त्रोताकडे झालेला असतो. व्यक्तीचित्रणात चेहऱ्याची मोहक वैशिष्ट्ये, जसे की धारदार नाक टिपण्यासाठी या प्रकारची प्रकाशयोजना प्रभावी ठरते. व्यक्तीचा चेहरा एकाच बाजूने दिसत असल्याने नाट्य निर्माण होते.

     की-लाइट (प्रकाशाचा मुख्य स्रोत) आधीच्या म्हणजेच स्प्लिट लाइटिंग या प्रकाशयोजनेप्रमाणे याची जागा निश्‍चित केली जाते. व्यक्तीचा चेहरा प्रकाशस्त्रोताच्या दिशेला असल्याने चेहऱ्याच्या कडेवर एक हायलाईट निर्माण होतो. तसेच व्यक्तीच्या केसांवर व गळ्यावरही प्रकाश पसरतो. असा प्रकाश केसांवर व गळ्यावर जास्त प्रमाणात पसरणार नाही याची मात्र काळजी घेण्याची गरज असते.
     फिल लाइट (मुख्य स्त्रोतामुळे पडणाऱ्या सावल्या कमी करण्यासाठी) फिल-लाइट हा कॅमेरा व की लाइट यांच्या बाजूलाच ठेवला जातो. व्यक्तीच्या पाठीकडच्या बाजूने परावर्तक वापरला जातो. अर्थात फिल लाइट व परावर्तक यांनी निर्माण होणारा प्रकाश प्रकाशचित्रातील नाट्यास बाधा आणणार नाही याची काळजी घेतली जाते.

     हेअर-लाइट व बॅकग्राऊंड-लाइट हे दोन्ही लाइट आधीच्याच ठिकाणी. म्हणजेच पॅरामाऊंट, लूप, रेम्ब्रांट किंवा स्प्लिट लाइटिंगप्रमाणेच राहतात. गरजेप्रमाणे जास्तीचा हेअर-लाइटसुद्धा वापरला जातो. आधी लिहिल्याप्रमाणे या सर्व प्रकाशयोजना म्हणजे एखादा नियम नाही तर मार्गदर्शक म्हणून वापरता येतात. व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवण, प्रकाशचित्रात निर्माण करायचे नाट्य, प्रकाशचित्राचा होणारा अथवा अपेक्षित वापर या अनेक घटकांवर प्रकाशयोजना अवलंबून असेल. सर्जनशील प्रकाशचित्रकार त्याच्या अनुभवानुसार प्रकाशयोजना करीत असतो. कोणत्याही फोटोसेशनच्या अखेरीस निर्माण होणारी प्रकाशचित्रे आकर्षक, मोहक किंवा गरजेनुसार असणे ही यशस्वी प्रकाशचित्रकाराची खरी कसोटी असते. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या