नेत्रसुखद निसर्गचित्रण

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

आजच्या जगात तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळे इतर अनेक गोष्टींबरोबर एक महत्त्वाची जी गोष्ट झाली आहे, ती म्हणजे योग्य नियोजनाच्या आधारे प्रवास सुखकर झाला आहे. नव्या नव्या ठिकाणी सहली आयोजित करणाऱ्या प्रवासी कंपन्यांच्या आकर्षक जाहिराती पाहून प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढतच आहे. त्यातूनच आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल फोन विराजमान झालाय. म्हणूनच प्रत्येक प्रवासी हा त्याच्या कॅमेऱ्यातून ‘निसर्गचित्रण’ करणारा प्रकाशचित्रकारही झाला आहे. व्यक्तीचित्रणाच्या बरोबरीनेच ‘निसर्गचित्रण’ ही शाखाही लोकप्रियतेचे नवे उच्चांक पार करीत आहे. एखाद्या नयनरम्य प्रदेशातून प्रवास करताना घडोघडी निसर्गाची अनेकविध रूपे आपल्याला मोहून टाकतात. त्या प्रत्येक ठिकाणी थांबत आपण आपल्या कॅमेऱ्यात तो ‘नजारा’ बंदिस्त करत राहतो. घरी परत आल्यावर तेथे अनुभवलेला तो निसर्ग प्रकाशचित्रांच्या माध्यमातून आपण जेव्हा परत पाहतो त्यावेळी मात्र ती भव्यता, ती सुंदरता, ती अद्‌भुतता प्रकाशचित्रातून लुप्त झाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. का होते असे ?

जेव्हा आपण एखादे निसर्गदृश्‍य पाहतो, तेव्हा आपले डोळे आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या घटकांवर निवडकपणे लक्ष केंद्रित करतात. उरलेल्या घटकांकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता व किमया डोळे आणि मेंदू यांच्याकडे सर्वांत जास्त आहे. कॅमेऱ्यातील लेन्स आणि सेन्सर्स हे अशी किमया आपले आपण करू शकत नाहीत, तर त्यांना इतर काही घटकांच्या मदतीची आवश्‍यकता असते. म्हणूनच प्रवासातील तो ‘नजारा’ जर पुन्हा पुन्हा अनुभवायचा असेल तर निसर्गचित्रण करताना आपल्याला काही महत्त्वाच्या युक्‍त्या लक्षात ठेवाव्या लागतात. प्रथमतः उत्तम निसर्गचित्र टिपण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे त्यासाठी आपण देत असलेला ‘वेळ’. आधी कधीच भेट दिली नाही अशा एखाद्या ठिकाणी आपण पोचतो त्याच्या आधीच त्या स्थानावरील सूर्योदय व सूर्यास्त यांच्या नक्की वेळा तसेच तेथील हवामान यांची माहिती करून घेणे आवश्‍यक असते. आजकाल मोबाईल फोनमध्ये होकायंत्र असते. त्याच्या आधारे कोणत्यावेळी सूर्यप्रकाश कसा असणार आहे याची कल्पना आपण करू शकतो. ती जागा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात कशी उजळून निघेल याचा अंदाज घेत जर आपण आपला कार्यक्रम आखला तर उत्तम निसर्गचित्रे आपल्या संग्रही येऊ शकतात. अर्थात याला थोड्या सरावाची साथ हवी. 

आपल्या प्रवासातील निसर्गचित्रणात सर्वसाधारणपणे जलाशय, वाहणाऱ्या नद्या अथवा झरे, जंगले, पठारे अथवा गवताळ कुरणे, वाळवंट, पर्वतशिखरे, समुद्रकिनारे, गुंफा, प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे तसेच धार्मिक स्थळे, शहरे यांचा समावेश होऊ शकतो. अर्थात यांचे चित्रण करताना अनेकवेळा आपल्याला व्यक्तींचा समावेश पण करावा लागतोच. पण हे सर्व घटक लक्षात घेता काही संकेत आपण पाळले तर आपल्या निसर्गप्रकाशचित्रणात गुणवत्तेची हमी सहजी देता येईल. काय आहेत हे संकेत?

खोलीचा आभास निर्माण करावा
निसर्गचित्र टिपताना प्रतिमेतील सर्व वेगवेगळे घटक फोकसमध्ये ठेवून खोलीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करावा. हे करण्यासाठी आपण एफ/१६ अथवा एफ/२२ यासारखे ॲपर्चर वापरणे गरजेचे असते. ॲपर्चर इतके बारीक ठेवल्याने अर्थातच ‘डेप्थ ऑफ फील्ड’ वाढते व खोलीचा आभास निर्माण होतो. पण ॲपर्चर बारीक असल्याने लेन्समधून आत जाणारा प्रकाश कमी झाल्याने शटरस्पीड कमी (स्लो) ठेवावा लागतो. त्यामुळे कॅमेरा जर ट्रायपॉडवर ठेवला तर उत्तम.

वाइड अँगल लेन्सचा वापर  
निसर्गचित्र टिपण्यासाठी शक्‍यतो वाइड अँगल लेन्सला प्राधान्य दिले जाते. कारण त्यामुळे प्रतिमेत विस्तृत दृश्‍य समाविष्ट केले जाते. बरोबरीनेच जवळच्या वस्तू प्रमाणापेक्षा मोठ्या भासतात, तर लांबच्या वस्तू प्रमाणापेक्षा लहान भासतात. याने खोलीचा आभास जास्त दृगोचर होतो. मुळातच वाइड अँगल लेन्समुळे ‘डेप्थ ऑफ फील्ड’जास्त मिळते. चित्रविषय वेगवेगळ्या कोनातून टिपण्याचा प्रयत्न करणे कधीही नवनिर्माणाची संधी उपलब्ध करून देतो. म्हणून काही मनोरंजक कोन वापरून पहा.

विशिष्ट फिल्टर्सचा वापर 
सर्वोत्तम प्रतिमा मिळविण्यासाठी, आपण आपल्या निसर्गप्रकाशचित्रणात दोन फिल्टरचा वापर करू शकतो. ‘पोलराईझिंग फिल्टर’ व ‘न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर’ हे ते दोन फिल्टर्स. वातावरणात असलेल्या विविध घटकांमुळे प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते. या परावर्तनामुळे प्रकाशचित्रात रंगांचा वास्तविकपणा योग्य रीतीने टिपला जात नाही. पोलराईझिंग फिल्टरने अवास्तव परावर्तन नाहीसे केले जाते व प्रकाशचित्रातील रंग योग्य प्रकारे नोंदवले जा तात. न्यूट्रल डेन्सिटी फिल्टरने प्रकाशाची तीव्रता कमी करता येते. वेगवान पाण्याचा प्रवाह, धबधबे यातील वेग जर आपल्याला चित्रित करायचा असेल तर शटरस्पीड कमी वेगाचा (स्लो) ठेवावा लागतो. पण जास्त प्रकाशात असा कमी शटरस्पीड मिळणे दुरापास्त होते. अशा वेळी न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर आपल्या मदतीला येतो.

वेग अथवा गती चित्रित करावी 
आधीच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या प्रकाशचित्रात वेग चित्रित केला तर लांबी, रुंदी व खोली बरोबरच चौथी मिती (डायमेन्शन) म्हणजे काळ (टाइम) हा चित्रित होईल. असे प्रकाशचित्र प्रेक्षकाची नजर खिळवून ठेवेल. असे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे, ऑटो मोड मधील शटरस्पीड -प्राधान्य (टी व्ही किंवा एस) मोडचा वापर करणे आणि दोन सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त काळ शटरस्पीड ठेवून हालचाल चित्रित करणे. तसेच आपण ॲपर्चर-प्राधान्य (ए व्ही) मोडचा वापर करून एफ/३२  सारख्या छोट्या ॲपर्चरचा वापर करुन कमी वेगाचा (स्लो) शटरस्पीड मिळवू शकतो व वेगवान दृश्‍यातील वेगाचा आभास निर्माण करू शकतो. अर्थात पुन्हा अशावेळी आपण ट्रायपॉड वापरणे आवश्‍यक ठरते. जेणेकरून कॅमेरा न हालल्याने चित्रातील उर्वरित भाग हा सुस्पष्ट येईल.

पाण्याचा आरशासारखा वापर
जेथे शांत, संथ पाणी उपलब्ध असते तेथे त्या पाण्यात आजूबाजूच्या प्रदेशाचे नितांत सुंदर प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसते. जणू काही आरसाच. अशा प्रकारचे प्रतिबिंब प्रकाशचित्रात टिपण्याचा क्षण कोणालाही मोहात पडतोच. ‘गोल्डन अवर’ असे ज्या वेळेचे वर्णन केले जाते ती वेळ म्हणजे सूर्योदयानंतर सुमारे एक तास व सूर्यास्तापूर्वी सुमारे एक तास हीच ती सुवर्णवेळ! या वेळी प्रकाशाची तीव्रता सौम्य असते. वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. अशावेळी प्रतिबिंबाचा वापर करणे ही पर्वणीच. आय एस ओ मात्र जितका कमीतकमी ठेवता येईल तेवढे प्रकाशचित्रात येणारे तपशील जास्त चित्रित होणार ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.

मानवी जीवनाचा अंतर्भाव
निसर्गचित्रण करताना कधी कधी त्यामध्ये मानवी जीवनाचा अथवा प्राणी जीवनाचा संदर्भ देणे अगत्याचे ठरते. त्यामुळे प्रकाशचित्राच्या भव्यतेला एक वेगळीच मोजपट्टी उपलब्ध होऊ शकते. अशावेळी ‘कंपोझिशन’च्या गोल्डन पॉइंटच्या नियमाची मदत घेऊन एखाद्या व्यक्तीची रचना केली तर आपोआपच मानवाचे निसर्गावरील अवलंबित्व पाहणाऱ्याच्या नजरेत भरते.

तृतीयांश नियमांचा वापर करा
व्ह्यू फाईंडरमधून बघताना आपण जर प्रकाशचित्रांचे दोन उभ्या व दोन आडव्या रेषा कल्पून (उभ्या दोन रेषांनी उभे तीन भाग व आडव्या दोन रेषांनी आडवे तीन भाग) नऊ समान भाग केले तर या रेषा एकमेकांना जेथे छेदतात त्या चार बिंदुना ‘गोल्डन पॉइंट्‌स’ असे म्हणतात. चित्रविषयातील महत्त्वाचा घटक जर या चार बिन्दुपैकी कोणत्याही एका बिन्दुजवळ येत असेल तर तशी रचना डोळ्यांना सुखद वाटते. निसर्गचित्रण करताना क्षितिज रेषा जर या दोन काल्पनिक आडव्या रेषांच्या जवळ ठेवली तर जास्त परिणाम साधला जातो. तृतीयांश नियमाद्वारे बनलेले एक प्रकाशचित्र सामान्यतः अधिक मनोरंजक आणि डोळ्याला सुखावणारे ठरते. थोडक्‍यात प्रकाशचित्रकाराचा संयम, त्याने साधलेली योग्य वेळ, वापरलेले योग्य असे तंत्र, योग्य क्षणाची केलेली प्रतीक्षा आणि त्याचा कलात्मक दृष्टिकोन हे सर्व घटक जुळून आले की प्रेक्षकाला त्या प्रकाशचित्राला दाद देण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उपलब्धच राहणार नाही. संयम आणि बराचसा सराव याद्वारे आपण हे सहजसाध्य कौशल्य विकसित करून घेऊ शकतो आणि स्वतः:ला व इतरांनाही निसर्गाच्या पुनः प्रत्ययाचा आनंद देऊ शकतो. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या