अंतर्गत सजावट प्रकाशचित्रण

सतीश पाकणीकर
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

निसर्गरम्य वातावरणात तुम्ही व तुमचा ग्रुप, ट्रॅव्हल एजंटवर विश्वास ठेवून रानवाटेवरून टेकडी चढत आहात. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या वृक्षराजीतून मावळतीच्या सूर्याची तिरपी किरणे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमची मुक्कामाची जागा काही अंतरावर आहे. पण टेकडीवर असल्याने तुम्हाला ती दिसत नाहीयं. चढ संपतो. एक दीर्घ श्वास तुम्ही घेता आणि .... समोर अचानक तुम्हाला अप्रतिम अशी रिसॉर्टची इमारत दिसते. मावळतीच्या किरणांनी लपेटलेली. तुमच्या मुखातून या दृश्‍याला नकळत दाद दिली जाते अन  गळ्यातला कॅमेरा अथवा तुमच्या मोबाईल मधला कॅमेरा अवचित उचलला जातो. ते देखणे रिसॉर्ट कॅमेराबद्ध करताना ...तुम्ही ‘स्थापत्य प्रकाशचित्रकार’ झालेले असता. त्या रिसॉर्टचे अंतरंग तुम्ही प्रकाशचित्रित करताना तुम्ही ‘अंतर्गत सजावट प्रकाशचित्रकार’ झालेले असता. जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनात घडणारा हा प्रसंग. 

आपण घरात राहतो, मोठमोठ्या मॉलमध्ये खरेदी करतो, कॉलेजात-विद्यापीठात शिकतो, ऑफिसमध्ये काम करतो, रेस्टॉरंटमध्ये जेवतो. अशा प्रत्येक घटनेतून आपण स्थापत्य या विषयाला  अजाणतेपणी सामोरे जात असतो.  स्थापत्याच्या हजारो उत्तम प्रतिमा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून रोजच दिसत असतात. प्रकाशचित्रकलेची सुरुवात  साली झाली पण व्यावसायिक स्थापत्य प्रकाशचित्रणाची सुरुवात साधारण १८३९ पासून झाली. पुढे जेव्हा १९३० मध्ये हाफ-टोन प्रिंटींगचा शोध लागला त्यानंतर मात्र स्थापत्य व अंतर्गत सजावट यांच्या प्रकाशचित्रणाने महत्वाचे स्थान मिळवले. आज जाहिरातीची विविध तंत्रे उपलब्ध असल्याने त्यासाठी लागणाऱ्या उत्तम दर्जाच्या स्थापत्य व अंतर्गत सजावटीच्या प्रकाशचित्रांना कधी नव्हती एवढी मागणी आहे व ती वाढतच जाणार आहे. म्हणूनच प्रकाशचित्रणाच्या या शाखेविषयी जरा जास्त लक्षपूर्वक अभ्यास करून तो आपल्या प्रकाशचित्रणात वापरणे अगत्याचे ठरेल. त्यासाठी अनुभवलेल्या काही गोष्टी किंवा टीपा आपल्याबरोबर वाटून घेणेही महत्त्वाचेच ठरेल. त्यायोगे जर आपल्या स्थापत्य प्रकाशचित्रणाच्या दृश्‍य स्वरूपात काही मदत झाली तर ते उपयोगी ठरेल. 

प्रकाशचित्रणासाठीचे साहित्य
स्थापत्य किंवा अंतर्गत सजावटीसाठी आपल्याकडे उत्तम कॅमेऱ्याबरोबर चांगल्या दर्जाच्या वाइड अँगल लेन्सची गरज असते. १६ एमएम ते २४ एमएम नाभीय अंतराची वाइड अँगल लेन्स असेल तरी आपले काम सोपे होऊन जाते. जास्तीत जास्त मोठे अथवा खुले ॲपर्चर क्रमांक असलेली लेन्स कमी प्रकाशातही उत्तम प्रकाशचित्र घेऊ शकते. परस्पेक्‍टिव्ह करेक्‍शनसाठी ‘टिल्ट- शिफ्ट’ लेन्सही असणे आवश्‍यक ठरेल. या बरोबरीनेच आपल्याकडे उत्तम दर्जाचा, मजबूत पण वजनाला कमी असलेला असा ट्रायपॉड असणेही गरजेचे आहे. काही वेळी प्रकाशचित्रातील कॉन्ट्रास्ट आणि प्रतिमा अधिक सुस्पष्ट होण्यासाठी पोलराईजिंग फिल्टर वापरणे देखील मदतीचे ठरू शकते. आजच्या काळात त्याही पुढे जायचे असेल व एखाद्या इमारतीचे विहंगम प्रकाशचित्र टिपायचे असेल तर आपल्या संग्रहात उत्तम कॅमेरा बसवलेले ‘ड्रोन’सारखे यंत्रही हवे. 

योग्य प्रकाशयोजना (Lighting)
प्रकाशचित्रणाच्या या प्रकारातही योग्य प्रकाशयोजनेला अनन्य असे महत्त्व आहे. इमारतींचे बाहेरून चित्रण करताना बऱ्याच वेळी उपलब्ध प्रकाशाशिवाय अन्य पर्याय नसतो. इमारतीचा मुख्य व दर्शनी भाग कोणत्या दिशेस आहे हे प्रकाशचित्रकारच्या हातात नसते. त्यामुळे त्या भागावर कोणत्या वेळी उत्तम प्रकाश पडतो याचा आधीच अभ्यास करून वेळ निवडावी लागते. सुर्योदयानंतर सकाळचे दोन तास व सूर्यास्तापूर्वी दोन तास हा सुवर्णवेळ म्हणून गणला जातो. अशावेळी पडणाऱ्या सावल्याही आकाराने लांब पडत असल्याने आपल्या प्रकाशचित्रात खोलीचा आभास निर्माण होणे सोपे जाते. अंतर्गत सजावटीसाठी अर्थातच खिडक्‍या व दारे यांमधून उपलब्ध असणाऱ्या प्रकाशाबरोबरच खोलीतील दिवे, झुंबरे, छतावर केलेली प्रकाशयोजना यांचाही उपयोग करून घ्यावा लागतो. अर्थात अशा मिश्रित प्रकाशयोजनेत आपल्याला जो प्रकाश स्र्तोत मुख्य म्हणून दाखवायचा आहे त्याच्यासाठी योग्य असा ‘व्हाइट बॅलन्स’ ठेवणे गरजेचे असते. नुसत्या प्रकाशाचा वापर करून आपण एखाद्या जागेची विशिष्ट रचना किंवा वातावरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. 

योग्य असा दृश्‍यकोन
एकच इमारत अथवा अंतर्गत रचना वेगवेगळ्या कोनातून वेगळी भासते. अशा विविध दृश्‍यकोनांपैकी सर्वांत आकर्षक कोन कोणता हे त्या जागेवर जाऊन पाहिल्याशिवाय कळत नाही. कधी उंचीवर जाऊन तर कधी अगदी जमिनीलगत झोपून आपल्याला असे आकर्षक दृष्यकोन मिळू शकतात. प्रकाशचित्रात समाविष्ट घटकांचे एकमेकांशी असलेले नाते अशा दृश्‍यकोनांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रकाशचित्रकाराची असते.

जागेवरील आयोजन 
अंतर्गत सजावटीचे प्रकाशचित्रण करताना कित्येक वेळा तेथील जागेचे प्रकाशचित्रणास योग्य असे आयोजक करावे लागते. पडद्यांची रचना, सोफ्यावरील वस्तूंची रचना, टीपॉय वर ठेवलेल्या वस्तू, पुस्तकांचे कपाट आणि त्यात व्यवस्थित ठेवलेली पुस्तके, भिंतीच्या कोपऱ्यात ठेवलेला आकर्षक दिवा , जमिनीवरील कार्पेट या सर्वांची सहज अशी रचना प्रकाशचित्रात वातावरण बरोबरीने त्या जागेचे वैशिष्ट्य दाखवत असते. ते प्रकाशचित्र जर आपण जाहिरातीसाठी काढत असलो तर जाहिरातीच्या मजकूरासाठी योग्य अशी जागा ठेवणे आवश्‍यक ठरते. एखादे प्रकाशचित्र जर आपण , ती जागा ज्याने डिझाईन केली आहे त्याच्यासाठी काढत असलो तर सजावटीचे घटक, वापरलेली प्रकाश योजना, भिंतीची रंगसंगती व त्यातून बाहेर येणारे त्या जागेचे व्यक्तिमत्त्व हे प्रकर्षाने दाखवणे अगत्याचे ठरेल. जर आपण एखाद्या हॉटेलचे प्रकाशचित्र टिपत असलो तर वरील सर्व घटकांबरोबर तेथील वातावरण टिपणे हे जास्त महत्वाचे असेल.

उभ्या व आडव्या रेषा
प्रकाशचित्रणाच्या या शाखेत उभ्या व आडव्या रेषांचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही. प्रकाशचित्रात भिंती, दारे व खिडक्‍या, पुस्तकांच्या अलमारी, टेबले व खुर्च्या यांनी निर्माण होणाऱ्या असंख्य अशा उभ्या व आडव्या रेषा तयार होतात. उभ्या रेषा भिंतींच्या कोपऱ्यातील रेषेस समांतर व आडव्या रेषा क्षितिज समांतर येणे गरजेचे असते. ‘टिल्ट- शिफ्ट’ लेन्सच्या साहाय्याने आपण त्या रेषा योग्य प्रकारे समांतर ठेवू शकतो. आजकाल सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आपण हे काम प्रकाशचित्रणानंतरही करू शकतो हा मोलाचा फायदा आहे.

ट्रायपॉडचा वापर
स्थापत्य व अंतर्गत सजावटीच्या प्रकाशचित्रणात ट्रायपॉड हा फार महत्त्वाचे स्थान बजावतो. कितीही अनुभवी प्रकाशचित्रकार असला व त्याचा हात कितीही स्थिर राहू शकत असला तरीही उत्तम दर्जाच्या, मजबूत पण वजनाला कमी असलेल्या ट्रायपॉडशी त्याच्या हातांची तुलना होऊ शकत नाही. आपल्याला जर सुस्पष्ट आणि व्यावसायिक प्रकाशचित्राची अपेक्षा असेल तर ट्रायपॉड हा गरजेचाच आहे असे मानावे. ट्रायपॉडशिवाय टिपलेली प्रतिमा ही केवळ धुरकटच दिसेल (हात हलल्याने) असे नाही तर आपण केवळ एक हौशी प्रकाशचित्रकार आहात हे पण त्यातून दिसेल. अशा चुकांमुळे त्या प्रकाशचित्रणाचा कोणताच उपयोग होऊ शकणार नाही.

योग्य ॲपर्चरचा वापर  
‘डेप्थ ऑफ फील्ड’चा प्रभावी वापर हे कोणत्याही स्थापत्य व अंतर्गत सजावटीच्या प्रकाशचित्रणाचे गमक आहे. योग्य वेळी योग्य अशा ॲपर्चरचा वापर करीत प्रकाशचित्रकार नको असलेले घटक एकतर धुरकट करीत असतो किंवा सर्व घटक एकदम सुस्पष्ट चित्रित करीत असतो. 

‘पोस्ट प्रॉडक्‍शन’
पोस्ट-प्रॉडक्‍शन हे आजच्या डिजिटल प्रकाशचित्रणासाठी एक वरदान आहे. प्रकाशचित्रणाच्यावेळी सर्व प्रकारची काळजी घेऊनही कधी कधी काही घटक आपल्या हाताबाहेर असतात. त्यामुळे आपण ज्यावेळी चित्रण करतो त्यावेळचे तसेच्या तसे प्रकाशचित्र टिपल्यानंतर दिसत नाही. कधी अपुरी प्रकाशयोजना तर कधी मर्यादित जागेची समस्या असे अनेकानेक घटक असू शकतात. त्यामुळे ‘फोटोशॉप’सारख्या सॉफ्टवेअरमधून आपण अशा प्रतिमांवर नंतर काम करणे गरजेचे ठरते. ते करायलाही हवे. उभ्या-आडव्या रेषांची मांडणी, विरोधाभास (कॉन्ट्रास्ट), उच्च-प्रकाश(हायलाईट), सावल्या( शॅडोज) आणि प्रकाशचित्रांचे क्रॉपिंग, व्हाइट बॅलन्स यासारखे घटक प्रमाणित करीत आपण आपले प्रकाशचित्र अचूकतेकडे नेणे ही आवश्‍यक बाब तर आहेच पण त्याचबरोबर योग्य व अचूक प्रकाशचित्राचा अनुभव घेणे ही वर्णनातीत आनंद देणारी घटनाही आहे.  
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या