खाद्यपदार्थ प्रकाशचित्रण

सतीश पाकणीकर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

आज आपण कोणतेही साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक उघडले, की त्यात एखादा खाद्यपदार्थ बनवण्याच्या कृतीचा लेख असतोच असतो. टेलिव्हिजनवरील काही वाहिन्याही असे कार्यक्रम सतत दाखवत असतातच. जिभेला पाणी आणणाऱ्या पाककृती सादर करताना त्या खाद्यपदार्थांचे उत्तम चित्रण केलेले आपल्याला पाहायला मिळते. यात भर म्हणून, की काय वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सामोऱ्या येणाऱ्या जाहिरातींमधूनही पदार्थांची उत्तमोत्तम प्रकाशचित्रे आपल्याला सतत सामोरी येत असतात. याच बरोबरीने पाकक्रियेला समर्पित अशी विविध पुस्तकेही सतत प्रकाशित होत असतात. तंत्रज्ञानामुळे आज असे सर्व चित्रण स्मार्टफोनच्या माध्यमातूनही कोणत्याही क्षणी, एका क्‍लिकच्या आधारे आपल्याला उपलब्ध होते. थोडक्‍यात, पूर्वी कधी नव्हते इतके महत्त्व आज दृश्‍यमाध्यमाला आलेले असताना त्यात ‘फोटोग्राफी’ कशी राहील ?

असे म्हटले जाते, की ‘Food is not just eating energy, it‘s an experience.’ आपल्याला जर असा ‘अनुभव’ पदार्थाचा फोटो बघताना आला, त्या पदार्थाच्या वासाची व चवीची अनुभूती आली आणि तो पटकन उचलून तोंडात टाकावा असे वाटू लागले, तर तो फोटोग्राफ यशस्वी झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. असे एखादे प्रकाशचित्र टिपण्यामागे त्या प्रकाशचित्रकाराची मेहनत तर असतेच, पण त्याच्या बरोबरीने कला दिग्दर्शक व फूडचा रचनाकार (स्टाइलिस्ट) यांचा एकत्रित प्रयत्न असतो. ज्यायोगे अशा चमचमीत पदार्थांची देखणी प्रकाशचित्रे प्रेक्षकांना बघावयास मिळतात. इतर कुठल्याही प्रकाशचित्रण शैलीप्रमाणेच खाद्यपदार्थ प्रकाशचित्रणातही जबरदस्त आकर्षक रंग, पोत आणि आकार यांचे सुरेख मिश्रण आढळते. पण येथेही आपले प्रकाशचित्र उत्कृष्ट होण्यासाठी आपल्याला काही नियमांचे अनुसरण करणे गरजेचे असते. काय आहेत हे नियम?

चांगल्या लेन्ससह असलेला कॅमेरा व प्रकाशाचा उत्तम स्रोत
इतर शैलीप्रमाणेच खाद्यपदार्थ प्रकाशचित्रणातही चांगला कॅमेरा व प्रकाश हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. तुम्ही उपलब्ध प्रकाशात फोटो टिपताय का फ्लॅश वापरून हे महत्वाचे नसून त्या प्रकाशाची गुणवत्ता काय आहे हे येथे महत्वाचे ठरते. खाद्यपदार्थ प्रकाशचित्रणात अन्नाचा अचूक रंग दिसणे महत्वाचे असल्याने प्रकाशाचा स्रोत महत्त्वाचा ठरतो. जर प्रकाशाच्या स्त्रोतातच रंग असेल तर तो रंग मूळ पदार्थाच्या रंगाचा बेरंग करू शकतो. फूड फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम प्रकारचा प्रकाश म्हणजे कोणताही स्रोत वापरून पण ‘सॉफ्ट’(सौम्य केलेला अथवा फैलावलेला) प्रकाश.

पडणाऱ्या सावल्यांवर हुकूमत 
प्रकाशचित्रातील पडणाऱ्या सावल्यांवर आपले नियंत्रण असले पाहिजे. आपण जर तीव्र प्रकाशाचा स्रोत वापरला तर सावल्याही तीव्र पडतील. कधी कधी पदार्थाच्या आकाराला उठाव आणण्यासाठी असा प्रकाश वापरणे योग्य ठरते. पण जर आपण ‘सॉफ्ट’ लाइट वापरला, तर पदार्थांच्या एकमेकांवर पडणाऱ्या सावल्या त्याने सौम्य केल्या जातात व छाया-प्रकाशाचा एक वेगळाच खेळ आपण अनुभवतो. त्यामुळे सावल्यांवर लक्ष देणे गरजेचे असते.

योग्य अशी पार्श्वभूमी
प्रेक्षकांचे लक्ष पदार्थावर केंद्रित व्हावे यासाठी योग्य पार्श्वभूमीची निवड महत्त्वाची ठरते. आपण ज्या पदार्थाचे प्रकाशचित्र घेत आहोत त्याला योग्य होईल अशा रंगाची व पोताची पार्श्वभूमी निवडणे गरजेचे असते. अति भडक रंग अथवा ज्यात जरुरीपेक्षा जास्त पोत अथवा चमक आहे अशी पार्श्वभूमी प्रकाशचित्रास मारक ठरते. लाकडी पृष्ठभाग, कापडी बोर्ड, उत्कृष्ट दर्जाच्या किचन टाइल्स अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ कोणत्याही प्रकारचे अन्न सहज उठून दिसू शकते. अर्थात पदार्थ ज्या ‘डिश’ मध्ये ठेवला आहे त्याचा रंग व पोतही तितकाच महत्त्वाचा असतो. वेगवेगळे रंगीत कागद अथवा कपडे ही पण एक चांगली पार्श्वभूमी असू शकते. टर्किश टॉवेल्स, जाळीदार टेबल क्‍लॉथ्स, फुलांचे फिकट प्रिंट असलेले टेबल क्‍लॉथ्स, टेबल मॅट्‌स अगदी गालिचेही चांगली पार्श्वभूमी म्हणून वापरता येतात. या बरोबरीनेच चमचे, डाव, सुऱ्या यासारख्या वस्तू पार्श्वभूमीमध्ये वापरून आपण फोटोची खोली वाढवू शकतो.

प्रकाशचित्रातील रंगांचा विचार
फूड फोटोग्राफीमध्ये एक उत्तम गोष्ट ही आहे, की तेथे आपल्याला रंगसंगतीत प्रयोग करण्याची संधी मिळते. आपण केलेल्या रचनांवर रंगांचा मोठा प्रभाव असतो आणि त्याचा परिणाम प्रेक्षकाच्या भावविश्वावर होत असतो. त्यामुळे आपल्या प्रकाशचित्रात रंगसंगतीची एक सुसंवादी रचना झालेली असणे महत्वाचे असते. आपण पार्श्वभूमी व पदार्थ यांच्या दरम्यान असलेली रंगसंगतीची तीव्रता किंवा सौम्यता वापरत परिणाम घडवणारे प्रकाशचित्र टिपण्याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते.

प्रकाशचित्रासाठीचा दृश्‍यकोन
आपण कोणत्या दृश्‍यकोनातून प्रकाशचित्र घेत आहोत हाही फार महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. साधारणपणे एकदम वरून, आपण जेवण्याच्या टेबलवर बसलेले असताना आपल्याला पदार्थ ज्या कोनात दिसतात त्या कोनातून (कर्णरेषेतून) किंवा आपल्या नजरेच्या रेषेतून टिपलेली प्रकाशचित्रे बघणाऱ्यावर चांगला परिणाम करतात. पदार्थाची त्रिमिती दिसण्यासाठी कर्णरेषेत टिपलेली प्रकाशचित्रे उपयुक्त ठरतात. जर आपण कोणत्या कोनातून चित्र घ्यावे याबद्दल मनात अनिश्‍चितता असेल तर वेगवेगळे कोन वापरून प्रकाशचित्रे घ्यावी व त्यातून सर्वोत्तम निवडावे. भिन्न दृश्‍यकोन वापरून टिपलेल्या प्रकाशचित्रात किती विविधता येऊ शकते हे अनुभवून आपण आश्‍चर्यचकित होऊ शकतो.

पदार्थांची उत्तम रचना
ज्या पदार्थांचा फोटो आपण काढत आहोत त्याची उत्तम व सुंदर रचना करणे महत्वाचे असते. अशा कामासाठी अनुभवी अशा फूड स्टाइलिस्टची मदत घेणेही उपयुक्त असते. त्याने आपल्या कामाचा वेग वाढू शकतो. फळे आणि भाजीपाल्यांचा उत्तम वापर करून प्रकाशचित्रात मजा आणता येते. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार कापून आपण त्याचा वापर प्लेट सजवण्यास करू शकतो. सजवताना प्लेट किंवा पार्श्वभूमीच्या काठावर कोणतेही अन्न किंवा सॉस वगैरे सांडलेले नाही याची खात्री करून घेण्याची दक्षता घ्यावी.

पदार्थांची सजावट
आपण टिपत असलेले प्रकाशचित्र पाहणाऱ्याला आकर्षक वाटण्यासाठी त्या चित्रात पदार्थांशिवाय पण त्याला सुसंगत अशा इतर गोष्टी वापरून आपण डिशची सजावट करू शकतो. मसाल्याचे पदार्थ, पदार्थात वापरलेले मुख्य घटक, कलात्मक वस्तू , पोत असलेली कपडे, फळे, सुका मेवा, विविधरंगी फुले अशाप्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या उपयोगाला येतात.

संरचनेत ठेवलेला साधेपणा
कधी कधी रचना करताना आपण अनेक वस्तू अथवा गोष्टी प्रकाशचित्रात ठेवत जातो. त्यांची खूप गर्दी झाल्यानेही प्रकाशचित्राची 
मजा निघून जाऊ शकते. म्हणून शक्‍यतो 
रचना साधी पण आकर्षक असायला हवी. प्रत्येक प्रकाशचित्रात रिकाम्या ठेवलेल्या जागेलाही महत्त्व असते. त्याचा आवर्जून विचार करायला हवा.

‘हायलाइट’साठी एक्‍स्पोजर द्यावे
प्रकाशचित्राची इतर सर्व तयारी झाली, योग्य प्रकाशयोजना झाली, की शटरचे बटण दाबण्यापूर्वी आपण शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे योग्य असे एक्‍स्पोजर निवडणे. त्याला फूड फोटोग्राफीमध्ये फार महत्त्व आहे. बऱ्याच वेळी प्रकाशचित्रातील ‘हायलाईट्‌स’ जास्त एक्‍स्पोज झाल्याने चित्रातील रंगावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. हायलाईट्‌स व सावल्या (शॅडोज्‌) दोन्हीही व्यवस्थित चित्रित होणे गरजेचे आहे. एक्‍सपोजरची पातळी अशी ठेवावी की जेणेकरून आपण हायलाईट्‌स मधील बारकावे व तपशीलही प्रकाशचित्रात नोंदवू शकू.

एडिटिंग अवश्‍य करावे
एकदा का आपले प्रकाशचित्र कॅमेऱ्यात बंदिस्त झाले की, झाले सर्व काही असे म्हणून सोडून देऊ नका. आपण टिपलेल्या प्रकाशचित्रांवर सॉफ्टवेअरच्या साहाय्याने संस्करण करणे गरजेचे असते. प्रकाशचित्रातील रंगाची संपृक्तता, रंगछटा, विरोधाभास, सुस्पष्टता वाढावी यासाठी फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर आपल्याला मदतीला असते. आपल्या मनातील चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी हे करणे फक्त गरजेचे नसून आवश्‍यकही आहे. इतकी सगळी काळजी घेतली, की खात्रीशीर रीतीने तुमचे प्रकाशचित्र प्रेक्षकांची नजर नुसती खिळवूनच ठेवेल असे नाही तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहणार नाही. म्हणतात ना Nothing brings people together like good food.  
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या