प्रवासातील प्रकाशचित्रण

सतीश पाकणीकर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

डिजिटलाय

पाचव्या शतकातील ग्रीक तत्त्वज्ञ हेरॅक्‍लिटसने असे म्हणून ठेवले आहे, की ‘The only thing that is constant is Change.’ जग हे सतत बदलणारेच राहणार आहे आणि हा बदल मानवाला आवश्‍यकही आहे. आपण जेव्हा कोणत्याही ठिकाणी प्रवास करतो, त्यावेळी झालेल्या बदलाने आपले मन नक्कीच प्रफुल्लित झालेले असते. आज देशपरदेशात प्रवास करणे सोपे झालेले आहे. त्याबरोबरच प्रकाशचित्रणकलेत झालेल्या क्रांतीने त्या प्रवासातील आपल्या आठवणी आपल्यासाठी ; तसेच आपला मित्र परिवार व नातेवाईक यांच्यासाठीही आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करून आणतो. ती प्रकाशचित्रे म्हणजे जणू काही त्या प्रवासाचे, त्या निघून गेलेल्या क्षणाचे एक परतीचे तिकीटच असते! तसेच, ती प्रकाशचित्रे म्हणजे त्या त्या ठिकाणांचा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनून जातो. काही व्यक्ती जशी प्रवासाची आठवण म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ‘सोव्हेनीर’ म्हणून घेऊन येतात त्याचप्रमाणे एक चांगला प्रकाशचित्रकार प्रकाशचित्रांच्या माध्यमातून आपल्या बरोबर त्या ठिकाणचे ‘सुवर्णक्षण’ घेऊन येत असतो. प्रत्येक पर्यटन स्थळाचे स्वतःचे एक स्वरूप असते. त्याबरोबरीनेच तेथील संस्कृती, इतिहास, तेथील जनजीवन, भावभावना, परिसराची वैशिष्ट्ये आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा असतात. अर्थातच

फोटोग्राफीच्या तंत्रावर आपली हुकूमत असणे गरजेचे ठरते. तसे पाहता प्रवासातील प्रकाशचित्रणात फोटोग्राफीच्या इतर काही शाखाही अंतर्भूत होतात. प्रवासाच्या दरम्यान आपण निसर्गचित्रण, स्थापत्यचित्रण, वन्यजीवचित्रण, व्यक्तिचित्रण हे सारे काही करीत असतोच. त्यामुळे त्या शाखांसाठी लागणारे कौशल्य येथेही आपल्याला उपयोगी पडते. असे असले तरीही इतर काही महत्त्वाचे घटक आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. ज्यामुळे आपली प्रवासातील प्रकाशचित्रे देखणी येण्यास मदत होते.

ठिकाणाची योग्य माहिती
आपण ज्या ठिकाणी प्रवासास जाणार आहोत त्या ठिकाणाची इथ्यंभूत माहिती आपल्याला असायला हवी. आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण अशी माहिती सहज मिळवू शकतो. त्याचप्रमाणे, त्याठिकाणी आधी जाऊन आलेल्या मित्रांना भेटून आपण अशी माहिती घेऊ शकतो. आपल्या गंतव्य स्थानाच्या आजूबाजूला असलेली ‘फोटोजनिक’ ठिकाणे कोणती आहेत, तेथील महत्त्वाच्या वेळा काय आहेत हे आधीच माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरते. कोणत्या प्रतिमा/ फोटो एखाद्या ठिकाणाचे सार पकडतील हे आधीच माहिती करून घेतले तर आपला अमूल्य वेळ व पैसा दोन्हीची बचत होऊ शकते.

स्थानिक लोकांशी संवाद
आपण भेट देत असलेल्या ठिकाणाची संपूर्ण माहिती जर कोणाला असेल तर ती तेथील स्थानिकांना. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत जर संवाद साधता आला तर तुमच्या पोतडीत फक्त उत्तम प्रकाशचित्रेच जमतील असे नाही तर तुम्ही अनुभव समृद्ध बनत जाल. स्थानिक जीवनाचे, तेथील जनमानसाचे चित्रण हा ट्रॅव्हल फोटोग्राफीचे महत्त्वाचे अंग आहे. आपण विनम्रपणे विनंती केली तर लोकांना स्वतःचे फोटो काढून घेणे आनंदाचे वाटते. आणि मग ते आडपडदा सोडून आपल्याला सहकार्य करायला मागे पुढे पाहत नाहीत. अर्थात आपले काम झाल्यावर त्यांना धन्यवाद देण्यास मात्र आपण विसरता कामा नये.

दिवसाची सुरुवात व शेवट 
सूर्योदयाच्यावेळी व सूर्यास्ताच्यावेळी अलीकडे व पलीकडे एक एक तास हा प्रकाशचित्रणासाठी सुवर्णकाळ समजला जातो. त्यावेळी पडणाऱ्या सावल्या या लांब पडत असल्याने प्रकाशचित्रात खोलीचा (Depth) आभास निर्माण करणे सोयीचे जाते. रंग व पोत यांचाही एक आकर्षक खेळ चित्रित करता येतो. त्यासाठी आपण पहाटे लवकर उठून बाहेर पडणे व संध्याकाळी उशिरापर्यंत फोटोग्राफी करणे आवश्‍यक ठरते. सूर्यास्तानंतर दिवेलागणीच्या वेळातही आपल्याला त्या त्या ठिकाणाचे वेगळे रूप नजरेस पडते. दुपारच्यावेळी सूर्यप्रकाश जेव्हा डोक्‍यावरून असतो त्यावेळी सावल्या फारच तीव्र असतात. अशावेळी आपण त्या ठिकाणाची ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ करू शकतो. अथवा त्यावेळी संध्याकाळची तयारी म्हणून मस्त विश्रांती घेता येते.

प्रकाशचित्रणास प्राधान्य द्यावे 
आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना वेगात फोटो घेण्याच्या प्रयत्नात असतो. इथेच गोंधळ होतो. असे टिपलेले फोटो हे मग इतरांप्रमाणेच सर्वसामान्य दिसतात. प्रकाशचित्रणासाठी आपण नियोजित वेळ दिला नाही तर त्या ठिकाणाचे दर्जेदार फोटो कसे टिपले जाणार? म्हणूनच आपल्या प्रवासाच्या वेळापत्रकात ‘प्रकाशचित्रण वेळ’ वेगळा राखून ठेवावा. चांगल्या फोटोग्राफीसाठी आपली त्या कलेशी असलेली वचनबद्धताही तितकीच आवश्‍यक आहे. आपल्या बरोबरीचे सर्वच प्रवासी प्रकाशचित्रणासाठी आलेले नसतात. त्यांना आपले काम कंटाळवाणे होऊ शकते. अशावेळी आपणास स्वतःच्या फोटोग्राफीसाठी वेगळा वेळ काढणे आवश्‍यक ठरते. त्याला पर्याय असू शकत नाही. ग्रुपबरोबर प्रवासाला जाताना दिवसाची सुरवात होण्याआधी बाहेर पडून व हिंडून आपण चांगली प्रकाशचित्रे मिळवू शकतो.

मानवी घटक समाविष्ट करावा 
एखाद्या निसर्गचित्रांचे अथवा ऐतिहासिक स्थळाचे प्रमाण दाखवण्यासाठी आपल्याला प्रकाशचित्रात मानवी घटक अंतर्भूत करावे लागतात. मुख्य विषय चित्रविषयाबरोबर आपण जर मानवाकृतीची मांडणी केली तर प्रकाशचित्रात दोन्हीचा परस्पर संबंध प्रथापित करता येतो व प्रमाणाचा अंदाज प्रेक्षकाला करता येतो. याच्या बरोबरीनेच प्रकाशचित्रात एक प्रकारचा जिवंतपणा येतो. प्रकाशचित्रात मानवी घटक आणल्याने त्या प्रकाशचित्रातून आपोआप एक गोष्ट / कथा बाहेर येण्यास मदत होते. त्याप्रमाणेच ती प्रतिमा अधिक शक्तिशाली बनल्याचेही दिसते.

योग्य ‘क्‍लिक’साठी संयम आवश्‍यक आहे
आपल्यासमोर जे काय दृश्‍य आहे ते टिपणे म्हणजे फोटोग्राफी नव्हे. कॅमेरा लेन्स, आपली दृष्टी, मन व हृदय हे सर्व घटक जेव्हा एकाकार होतील, त्यावेळी टिपले जाणारे प्रकाशचित्र हे वर्णनापलीकडे गेलेले असेल. पण त्यासाठी आवश्‍यक गोष्ट म्हणजे संयम. कोणत्याही वेळी कॅमेऱ्याचे शटर दाबताना वरील घटक एकाकार झाले आहेत ना याची मनोमन खात्री करून घ्यावी. त्यासाठी वेळ समर्पित करण्याचा जागरूक प्रयत्न करावा. चांगल्या दर्जाच्या ‘फोटोग्राफी’साठी वेळ द्यावा लागतो. योग्य क्‍लिकसाठी काही तासही वाट पहावी लागते. त्यानंतरच व्यावसायिक दर्जाची प्रकाशचित्रे निर्माण होऊ शकतात.

कॅमेरा व इतर सामग्रीला जपावे 
हे विषयापासून थोडेसे दूर आहे , परंतु ते तितकेच महत्त्वाचे पण आहे. फोटोग्राफीचे सर्व साहित्य अतिशय महाग असते. त्यामुळे भुरट्या चोरांचे लक्ष अशा साहित्याकडे जाणे हे अपरिहार्य असते. त्यासाठी नेहमी आपली कॅमेराबॅग व इतर साहित्य शक्‍यतो स्वतःजवळच बाळगावे. त्याबरोबरीनेच कॅमेरा व इतर साहित्याचा विमा खरेदी करावा. हा सर्वोत्तम मार्ग आहे.
 
अधिकचे साहित्य 
जास्त क्षमता असलेली म्हणजेच जास्त प्रकाशचित्रे जतन करता येतील अशी व वेगवान मेमरी कार्डस, कॅमेऱ्याच्याच कंपनीच्या बॅटरी हे दोन महत्त्वाचे घटक अतिरिक्त असणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणेच त्या त्या दिवशी टिपलेली प्रकाशचित्रे साठवण्यासाठी चांगल्या क्षमतेचा लॅपटॉप जवळ असणे हे ही आवश्‍यक आहे. ज्यायोगे कोणत्याही अज्ञात ठिकाणी तुम्ही फोटोग्राफीचा कोणत्याही दडपणाशिवाय मनसोक्त आनंद घेऊ शकता. वरील घटकांबरोबरच रूल ऑफ थर्ड, कंपोझिशन या तांत्रिक बाबीही लक्षात ठेवून त्या वापरणे फायद्याचे ठरते.

असे म्हणतात की ‘Travel makes one modest , you see what a tiny place you occupy in the world.’ असा अनुभव येणे व उत्तम प्रकाशचित्रे संग्रही जमणे हेच प्रवासाच्या प्रकाशचित्रणाचे सार ठरावे.

भरपूर प्रकाशचित्रण करून आल्यावर त्या प्रतिमांचा परत आस्वाद घेताना फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्या सर्व प्रतिमांवर संस्करण करीत आपण नेत्रसुखद अशा असंख्य इमेजेस तयार करू शकतो. आपल्याला त्याचा आनंद तर मिळतोच पण त्याबरोबर पुढील पिढ्यांसाठी आपण एक ठेवा निर्माण करीत असतो हे महत्त्वाचे! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या