औद्योगिक प्रकाशचित्रण

सतीश पाकणीकर
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

औद्योगिक प्रकाशचित्रण हे काही फॅशन फोटोग्राफी, एरिअल फोटोग्राफी किंवा फूड फोटोग्राफी इतके आकर्षक नाही. या प्रकाराला म्हणावे तसे ‘ग्लॅमर’ प्राप्त झालेले नाही. पण प्रकाशचित्रणाच्या या शाखेला आजच्या युगात खूपच महत्त्व आले आहे. सहजतेने सर्व माध्यमांद्वारे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचण्याच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीने हे शक्‍य झाले आहे. औद्योगिक प्रकाशचित्रण ही शाखा मनोरंजक, महत्त्वाची आणि आव्हानात्मक आहेच आहे. औद्योगिक फोटोग्राफीची संकल्पना म्हणजे उपकरण, उत्पादने, यंत्रसामग्री, आणि कधीकधी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे केलेले प्रकाशचित्रण. बहुतांश वेळा मुख्य विषय म्हणजे मोठ-मोठी यंत्रे किंवा उपकरणे; जसे ट्रान्सफॉर्मर्स, गॅस टर्मिनल प्लॅंट, धरणे, फाउंड्री, शॉप फ्लोअर्स, बांधकामे, खाणी अशी वेगवेगळी ठिकाणे. अशा ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये असते तशी स्वच्छता किंवा सर्व सुविधा उपलब्ध होतीलच असे नाही. तसेच हे विषय काही दिसण्यास मोहक व आकर्षक असतीलच असेही नाही. म्हणूनच हे सामान्य रूप असलेले विषयही आपल्या फोटोत मोहक करून दाखवणे, ते आकर्षक कसे होतील, मनोरंजक कसे होतील याचा विचार करणे प्रकाशचित्रकारांना आव्हानात्मक असते. तसेच सक्षम औद्योगिक प्रकाशचित्रकार म्हणून आपले कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला, फोटोजर्नालिझम, उत्पादन फोटोग्राफी, आर्किटेक्‍चरल फोटोग्राफी आणि पोर्ट्रेट्‌ससारख्या असंख्य वैशिष्ट्यांसह बहुमुखी असणे आवश्‍यक आहे. तरच आपण आपल्या प्रतिमांद्वारे जनमानसाशी सक्षमपणे संवाद साधू शकतो.
औद्योगिक फोटोग्राफीसाठी लागणारी सामग्री ही इतर प्रकारच्या फोटोग्राफीच्या सामग्रीच्या तुलनेत खूपच जास्त असते. अर्थातच त्यासाठी लागणारे आर्थिक भांडवलही जास्त असते.
मोठ्या फॉरमॅटचे कॅमेरे, जास्त व तीव्र प्रकाश देतील असे अनेक फ्लॅश लाईट्‌स, अद्ययावत फ्लॅश मीटर, त्याच्या ॲक्‍सेसरीज, मजबूत असा ट्रायपॉड, पार्श्वभूमीसाठी लागणारे पडदे, पेपर रोल्स व हे सगळे साहित्य घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था. ही सर्व जय्यत तयारी झाली तरीही आयत्यावेळी त्या ठिकाणी प्रकाशचित्रणात लागणारे महत्त्वाचे गुण म्हणजे संयम व जागरूकता. फोटोग्राफीच्या इतर शाखांप्रमाणे औद्योगिक फोटोग्राफी या शाखेसाठीही काही महत्त्वाची तत्त्वे आपल्याला पाळावी लागतात. काय आहेत ही तत्त्वे ....

सामग्री
उत्तम दर्जाचा कॅमेरा व त्याच्या बरोबर सर्वांत आवश्‍यक अशा उत्तम दर्जाच्या लेन्सेस. औद्योगिक दृश्‍यास त्याच्या वास्तविक अर्थाने टिपण्याचा हेतू असेल तर, आपल्याला संग्रहात अनेक जलद ( Fast ) लेन्सेसची आवश्‍यकता भासते. विषयाच्या विस्तारानुसार तो चित्रित करण्यात या लेन्सेस मदत करतात, चांगल्या झूम लेन्ससह आपल्यापासून दूर असलेल्या विषयांचे सुस्पष्ट असे चित्रण आपण करू शकतो. त्यासाठी चित्रविषयाच्या जवळ जाण्याची आवश्‍यकता रहात नाही. फ्लॅश लाईट्‌स व मजबूत असा ट्रायपॉड ही उपकरणेही हवीतच.

सुरक्षा महत्त्वाची
औद्योगिक क्षेत्रात प्रकाशचित्रण करताना आपल्यासाठी सुरक्षितता हा सर्वोच्च आवश्‍यक घटक आहे. ते औद्योगिक क्षेत्र आणि चित्रविषय याविषयी आपण स्वतः परिचित असणे आवश्‍यक आहे. आपल्या तेथील वावरास कोठे अनुमती आहे व कोठे नाही याची खातरजमा करून घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी जर प्रकाशचित्रणाच्या आधी तेथे भेट देता आली तर उत्तमच. शूट सुरू करण्यापूर्वी मशिन किंवा उपकरणेदेखील जाणून घ्यावी. शूट दरम्यान दुर्घटना आणि त्रुटी टाळण्यासाठी आपण कोणती सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे हे जाणून घ्यावे. मूलभूत माहितीमुळे आपल्याला सुरक्षितता आणि सावधगिरीच्या बाबतीत त्याची मदत होईल. सुरक्षिततेच्या सूचना औद्योगिक क्षेत्रात जागोजागी, ठळकपणे लावलेल्या असतात. सुटसुटीत कपडे, डोळ्यांवर चष्मा, हेल्मेट व दणकट असे शूज हे सुरक्षेचे प्राथमिक घटक असतील.

प्रकाशचित्रणातील बारकाव्यांवर लक्ष
आपण टिपत असलेला फोटो प्रेक्षकाला कसा दिसणार आहे याचा सर्वप्रथम विचार करणे महत्त्वाचे आहे. आपण टिपत असलेल्या इमेजमधले सर्व लोक योग्य कपडे घालून आहेत याची खात्री करायला हवी. तसेच पादत्राणे, हेल्मेट्‌स, सेफ्टी जॅकेट्‌स या गोष्टी व्यवस्थित आहेत याची खात्री काटेकोरपणे करायला हवी. याकडे दुर्लक्ष झाल्यास इतर बाबतीत उत्तम असलेला फोटो कंपनीद्वारे नाकारला जाऊ शकतो.

योग्य वेळेची निवड
औद्योगिक फोटोग्राफीत फ्लॅश लाईट्‌स बरोबरीनेच उपलब्ध प्रकाशाचाही खूपच उपयोग करायला लागतो. त्यासाठी योग्य दिवस निवडण्यासाठी आपण जितके शक्‍य तितके नियोजन करायला हवे. विशेषतः जर प्रकाशचित्रण बाहेरील जागेत असेल तर पूर्ण सूर्यप्रकाश टाळायला हवा. अशावेळी जर शक्‍य असेल तर आभाळात ढग जमले असतील अशी वेळ निवडण्याचा प्रयत्न करावा. अभ्राच्छादित वेळेत आकाश हे एका मोठ्या ‘सॉफ्ट बॉक्‍स’सारखे कार्य करते आणि छान सॉफ्ट असा प्रकाश देते. अर्थात सर्व वेळी हे साधेलच असे नाही.

योग्य तंत्राची निवड
प्रकाशचित्रात हालचाल टिपली जायला हवी आहे, की त्यातील सर्व घटक एकदम स्थिर यायला हवे आहेत हे प्रकाशचित्रागणिक बदलते असते. कोणत्याही प्रकाशचित्रात हालचाल टिपण्यासाठी हळुवार शटरस्पीड वापरणे गरजेचे असते. असा स्पीड वापरला, तर चित्रात येणारे अनावश्‍यक लोक हालचालींच्या गतीमुळे सुस्पष्ट दिसत नाहीत व ते चित्रास पूरक ठरते. तसेच यंत्रावर असलेल्या मीटर्समधील आकडे टिपण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. बरोबरीनेच हे तंत्र एक व्यस्त आणि उत्पादनक्षम अनुभवदेखील निर्माण करू शकते. याउलट काही वेळा तपशील सुस्पष्ट दिसण्यासाठी किंवा यंत्राची, कामगाराची हालचाल स्थिर करण्यासाठी जास्त वेगाचा शटरस्पीड वापरणे गरजेचे असते. अशावेळी प्रकाशाचा अंदाज घेऊन त्यासाठी आपल्याला उच्च आयएसओ सेटिंग ठेवणे आवश्‍यक ठरते व त्याचवेळी वेगवान लेन्स वापरणे उपयोगाचे ठरते.

सदैव सतर्कता
उत्तम अशा प्रकाशचित्राची संधी कधीही येऊ शकते. ती दवडली जाणार नाही यासाठी सतर्कता आवश्‍यक आहे. अशा संधीसाठी आपला कॅमेरा सदैव तयार हवा. त्यामुळे चित्रविषय कुठे आहे हे कोणीतरी आपल्याला सांगण्याची अपेक्षा करू नका. संबंधित असलेल्या सर्व गोष्टींचा फक्त वापर करा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘सर्जनशील’ होण्याचा प्रयत्न करावा. चित्रविषयामधील नाट्यमयता कशात आहे याचा सतत शोध घ्यायला हवा. त्याद्वारे आपल्या ग्राहकाच्या उद्योगातील संपूर्ण प्रक्रिया चित्रित करून आपण ग्राहकाला आनंदी करू शकतो.

औद्योगिक क्षेत्रातील साधनांचा वापर 
औद्योगिक प्रकाशचित्रणात औद्योगिक क्षेत्रातील कोणत्याही उपलब्ध साधनांचा वापर आवश्‍यक असतो. कधीकधी प्रकाशचित्रासाठी वेगळा दृश्‍यकोन मिळवण्यासाठी आपल्याला फोर्कलिफ्ट्‌स, चेरी पिकर, क्रेन आणि इतर जंगम प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो. या सुविधा वापरतानाही त्यांची व आपली सुरक्षितता हा महत्त्वाचा घटक ठरतो. उदाहरणार्थ फोर्कलिफ्ट्‌स वापरताना त्याच्या दातांवर चांगला मजबूत असा प्लॅटफॉर्म/ फलक वापरायला हवा. कॅमेरा व ट्रायपॉडसह त्याच्यावर उभे राहून तज्ज्ञ चालकाकडूनच फोर्कलिफ्ट वापरावी. पुरेशा उंचीवर गेल्यावर प्रकाशचित्रात कंपने येऊ नयेत यासाठी फोर्कलिफ्टचे इंजिन बंद करावे. तसेच पुन्हा खाली येताना अत्यंत हळूवार गतीने फोर्कलिफ्ट खाली आणावी. सुरक्षितता ही सर्वकाळ उपयोगी पडणारी गोष्ट आहे याचा विसर पडू देऊ नये.
औद्योगिक फोटोग्राफी करताना या मूलभूत बाबी महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळ्या प्रोजेक्‍ट किंवा असाइनमेंटवर अवलंबून, अतिरिक्त नियम आणि सावधगिरी असू शकते. त्याची जाणीव आपल्याला असणे आवश्‍यक आहे. म्हणूनच त्या ठिकाणच्या प्रतिनिधीशी आपण स्वतः बोलणे महत्त्वाचे आहे.
आपण वर विचार केलेल्या व आवश्‍यक असलेल्या सर्व सुरक्षा उपायांसह औद्योगिक फोटोग्राफी आव्हानात्मक असू शकते. 
जर आपल्याला औद्योगिक प्रकाशचित्रणाचा प्रयत्न करायचा असेल तर तो पार्कमध्ये फिरण्याइतका सहजसाध्य नाही, परंतु त्यातून मिळणारी समाधानता ही दृढनिश्‍चय, शिस्त व कठोर परिश्रम यांचा मिलाफ असेल हे मात्र नक्की! 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या