अमूर्त प्रकाशचित्रण

सतीश पाकणीकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

डिजिटलाय
सोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.

प्रकाशचित्रणाचे विविध प्रकार आपण पाहिले. या सर्व प्रकारात चित्रविषय हा प्रामुख्याने जसा वास्तवात आहे, तसाच तो प्रकाशचित्रात दिसण्याची अपेक्षा आहे. एका अर्थाने ते त्या विषयाचे ‘डॉक्‍युमेंटेशन’च. प्रकाशाच्या सहाय्याने त्या चित्रविषयाचा रंग, पोत, आकार असे घटक चित्रित करताना प्रकाशचित्रकार त्याचे सर्व कसब पणाला न लावेल तरच नवल, पण प्रकाशचित्रकलेच्या शोधानंतर जवळपास ऐंशी वर्षांनी म्हणजेच १९२०च्या सुमारास प्रथमच अमूर्त प्रकाशचित्रकारांची जागतिक लाट आली. लाझ्लो मोहोली-नेगी आणि मान रे यांनी ‘राम’ नावाने काही प्रयोग केले तेव्हा. ‘राम’ म्हणजे फोटो-सेन्सेटिव्ह पेपरवर बनविलेले आर्टवर्क परंतु कॅमेराशिवाय ! हीच ती अमूर्त प्रकाशचित्रणाची सुरवात.

आजच्या घडीला अमूर्त प्रकाशचित्रण अशा प्रकारे प्रगती करत आहे, की कोणीही या प्रकारचे भविष्य वर्तवू शकत नाही. डिजिटल कॅमेऱ्याचा शोध आणि प्रकाशचित्र संपादन करण्याच्या अनेक सॉफ्टवेअर्सने प्रकाशचित्रकारांना जवळजवळ कोणतीही प्रतिमा अमूर्त बनविण्याचे साधन दिले आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर सध्या इंस्टाग्राम या वेबसाइटवर पत्रकारितेतील जवळपास १.७५ दशलक्ष फोटो आहेत. फाईन आर्ट या प्रकारातले जवळपास ६ दशलक्ष फोटो आहेत तर अमूर्त शैलीचे सर्वांत जास्त म्हणजे १०.२ दशलक्षहून अधिक फोटो प्रकाशचित्रकारांनी अपलोड केलेले आहेत. अमूर्त प्रकाशचित्रकारांनी आपल्यापुढे एक अनोखे विश्व उलगडून ठेवले आहे. एखादी खूप लहान वस्तू जी पाहण्यास मानवी डोळे असमर्थ ठरतात त्याचेच नितांत सुंदर दर्शन कॅमेऱ्याद्वारे अमूर्त प्रकाशचित्रकार आपल्याला घडवतात. दीर्घ काळाचे कॅमेरा एक्‍स्पोजर किंवा एकापेक्षा अधिक एक्‍स्पोजर योजून ते आपल्याला वेळेचा तो उलटून गेलेला कालावधी पाहण्याची संधी देतात.

फोटोग्राफीच्या या प्रकाराची महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अगदी नवशिका प्रकाशचित्रकारही अमूर्त प्रकारची फोटोग्राफी करू शकतो. कारण या प्रकारात कोणतीही दिशादर्शक तत्त्वे नाहीत, की रचना किंवा फ्रेमिंगबद्दल कोणते नियम नाहीत. प्रत्येक व्यक्तीची सर्जनशीलता इथे पणास लागते. आपण अगदी स्क्रॅचमधूनही काहीतरी प्रतिमा तयार करू शकतो. आपली कल्पकता, सौंदर्यदृष्टी, रंग-संगतीचे भान हे गुण इथे महत्त्वाचे ठरतात. असे असले तरीही अमूर्त प्रकाशचित्रण यशस्वी होण्यासाठी काही युक्‍त्या आहेत. काय आहेत या युक्‍त्या...

मजबूत पण सौंदर्यपूर्ण आकार
प्रकाशचित्र रचना तयार करण्यास वेगवेगळे आकार आपल्याला मदत करतात. ज्या आधारे अमूर्त प्रतिमा तयार केली जाते. अमूर्त फोटोग्राफीसाठी चांगले विषय शोधताना, मजबूत पण सौंदर्यपूर्ण आकार शोधण्यासाठी लक्ष केंद्रित करावे. आनंददायक, मनोरंजक किंवा गतिमान आकार पहावा. ते प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करतील. अधिक परिणामकारक प्रभावासाठी, कंद आणि फुलं यासारखे सौम्य सेंद्रिय आकार निवडावे.

चित्रविषयाच्या जवळ जावे
परिचित विषयाची अपरिचित प्रतिमा तयार करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे अतिशय जवळून फोटो टिपणे. जवळच्या कोनातून फोटो टिपण्याचा फायदा म्हणजे त्यात चित्रित होणारे तपशील, जे आपण सामान्यतः पाहू शकत नाही. तसेच जवळ जाण्याने आपण नकळतच दृश्‍य चौकट भरून टाकत असतो. त्यामुळे अनावश्‍यक पार्श्वभूमी टाळली जाते. अर्थातच यासाठी मॅक्रो लेन्सची मदत लागेल.

लक्षवेधी रंगांचा वापर
रंग ही अशी गोष्ट आहे की जी प्रेक्षकांचे लक्ष दूर अंतरावरूनही वेधून घेते. रंग मनाला उत्तेजित करतात. आपण प्रकाशचित्रात पकडलेल्या रंगांच्या आधारावर वेगवेगळ्या प्रेक्षकांच्या मनात विविध भावना उत्पन्न होऊ शकतात. अमूर्त प्रतिमांमध्ये रंग वापरण्याचा एक मार्ग म्हणजे संपूर्ण फ्रेम एका रंगाने भरणे. रंग हाच नंतर प्रतिमेचा मुख्य फोकस बनतो व तेच महत्त्वाचे व्हिज्युअल बनते. अत्यंत संतृप्त किंवा तीव्र रंगांचा वापर हा प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा दुसरा मार्ग आहे. विरोधाभासी रंगांच्या सहाय्याने अतिशय गतिशील प्रकाशचित्र निर्माण होऊ शकते.

चित्रातील पोताचा विचार महत्त्वाचा
आपल्या अमूर्त प्रतिमांमध्ये पोताचा योग्य वापर करणे म्हणजे प्रेक्षकांना खात्रीशीर आकर्षित करणे. त्यांना मानसिकदृष्ट्या त्या पोताचा स्पर्श न करताही अनुभव घेण्यास प्रोत्साहित करायचे असेल तर पोताचे उत्तम चित्रण करण्यास पर्याय नाही. अशा प्रकारे प्रकाशचित्र टिपताना खडबडीत वस्त्रे, लाकडाचे पृष्ठभाग, भिंतीपासून उकलला गेलेला रंग किंवा गंजलेल्या लोखंडाचे कच्चे पोत विशेषतः चांगले दिसतात. प्रकाशाचा योग्य वापर देखील खूप महत्त्वाचा आहे.

आकारांची पुनरावृत्ती 
सामान्य वस्तूमधून एक अमूर्त प्रतिमा तयार करण्याचा चांगला मार्ग म्हणजे आकारांची पुनरावृत्ती. आकारांच्या पुनरावृत्तीने प्रेक्षक आकर्षित होण्यास मदत होते. आकारांच्या पुनरावृत्तीमधून अधिक मजबूत आकार आणि ‘ग्राफिकल’ घटक तयार होतात जे अमूर्त फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहेत. ते आकार, रंग आणि खोलीच्या दृष्टीने आपली प्रकाशचित्रे अधिक मनोरंजक बनवितात.

सरळ व वक्राकार रेघांचा वापर
सरळ व वक्राकार रेषांचा वापर अमूर्त प्रकाशचित्रणात प्रभावीपणे होऊ शकतो. या रेषा आपल्या डोळ्यांना फोटोच्या माध्यमातून प्रवास करण्यास मदत करतात. प्रेक्षकांच्या दृष्टीने तो स्वारस्याचा मुद्दा बनतो. आपल्या प्रतिमांमध्ये रेघा वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आडव्या किंवा उभ्या रेघांपेक्षा कर्णाच्या दिशेने असलेल्या रेघा जास्त गतिशील व संतुलित प्रतिमा तयार करतात. तसेच वक्राकार रेषाही एक सौम्य आणि अधिक सुंदर रचना तयार करतात.

प्रतिबिबांचे चित्रण
पाणी किंवा इतर चमकदार पृष्ठांवरील प्रतिबिंब हा अमूर्त फोटोसाठी एक उत्तम दृश्‍यात्मक स्रोत आहे. पाण्यावरील तरंग किंवा असमान प्रतिबिंबे वापरून, अतुलनीय अशी प्रकाशचित्रे टिपली जातात. कधी कधी तर अशा प्रकाशचित्रांचा दर्जा हा एखाद्या पेंटिंगला मागे टाकेल असा असू शकतो.

एका विषयातून दुसऱ्या विषयाचे चित्रण
अमूर्त प्रकाशचित्रणात आपण अजून एक युक्ती वापरू शकतो. ती म्हणजे अर्धपारदर्शक अशा एका घटकामधून दुसऱ्या घटकाचे चित्रण करणे. हे तंत्र अतिशय प्रभावीपणे वापरता येते. आपण ज्या घटकातून चित्रण करीत आहोत तो घटक म्हणजे जणू एखादा फिल्टरच. जो त्याचा मूलभूत रंग अथवा पोत त्या
प्रकाशचित्रात मिसळत असतो. पोत असलेली दुधी काच अथवा पावसाचे थेंब साठलेली एखादी काच हे असे घटक आहेत, की त्यातून पाहिले की ते मूळ विषयातील रंग, पोत, आकार यांचे विकृतीकरण करतात व आपल्याला एक नवीनच प्रतिमा पाहायला मिळते.

सावल्यांचा खेळ
कोणत्याही वस्तूच्या सावल्या या प्रकाशाच्या दिशेप्रमाणे वेगवेगळे आकार धारण करतात. कधी त्यात खेळकर भाव आढळतो तर कधी गूढता. अमूर्त प्रकाशचित्रणात या सावल्या महत्त्वाची भूमिका बजावतात. हा सावल्यांचा खेळ प्रभावीपणे कसा वापरता येईल याचा विचार करायला हवा.

धूसरता
सर्वसाधारणपणे प्रकाशचित्रणाच्या इतर सर्व शाखांमध्ये सुस्पष्टतेला अनन्य महत्त्व आहे. अमूर्त प्रकाशचित्रण ही एकमेव अशी शाखा आहे, की ज्यात धूसरतेनेही चित्रविषय खुलून येऊ शकतो. धूसरता ही दोन प्रकारे साध्य करता येते. एक म्हणजे ‘मोशन ब्लर’ आणि ‘फोकस ब्लर’. चित्रविषय पूर्णपणे फोकस न झाल्यास, सर्व तपशील अस्पष्ट होईल आणि यामध्ये अमूर्त प्रतिमा तयार करण्याची क्षमता असेल. तसेच कॅमेरा हलवूनही आपल्याला ‘ब्लर’चा परिणाम साधता येईल. अर्थात या दोन्ही ‘ब्लर’चे प्रमाण किती ठेवायचे हे प्रत्येकाच्या सर्जनशीलतेवर अवलंबून असेल. या सर्व युक्‍त्यांमध्ये एक चांगली गोष्ट ही आहे: की एकदा आपण खरोखर फोटोग्राफी व या युक्‍त्या समजून घेतल्या की आपण कशा प्रकारची प्रकाशचित्रे घेणार आहोत याचा कोणीही अंदाज बांधू शकणार नाही. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यांच्या एका गीतात म्हणतात ज्ञातातूनी अज्ञाताचे मिळाले संधान. त्यात थोडा बदल केला तर असे म्हणता येईल की ‘मूर्तातूनी अमूर्ताचे मिळाले संधान’

फोटो फीचर

संबंधित बातम्या